प्रधानमंत्री यांनी केलेल्या आवाहनानुसार राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमास ‘प्रगती योजने’द्वारे नवी दिशा देण्यात आली आहे. या अभियानाद्वारे 5 ते 20 सप्टेंबर, 2017 या कालावधीत राज्यामध्ये कुष्ठरोग शोध मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेचे उद्दिष्ट व ध्येय यासंबधी माहिती या लेखामध्ये देण्यात आली आहे.
कुष्ठरोग ही एक सामाजिक समस्या आहे. कुष्ठरोगाचे वर्णन प्राचीन काळापासून ‘महारोग’ या नावाने केले जात असे. समाजामध्ये कुष्ठरोगाबाबत बऱ्याच गैरसमजुती व अंधश्रद्धा आहेत. कुष्ठरोग अनुवांषिक आहे, तो दैवीशाप किंवा पापकर्माची शिक्षा म्हणून कुष्ठरोग होतो असे गैरसमज समाजामध्ये पसरले आहे. कुष्ठरोग म्हणजे विकृती, विदृपता या समजामुळे आजारातील सुरुवातीच्या लक्षणांचा कुष्ठरोगाची लक्षणे म्हणून रुग्णांकडून स्वीकार होत नाही. किंबहुना रुग्णांकडून भितीपोटी या रोगाची प्राथमिक लक्षणे लपविली जातात अथवा गुप्त ठेवण्याचे प्रयत्न केले जातात.
सन 1873 साली नॉर्वेच्या डॉ.अरमुर हॅन्सेन या शास्त्रज्ञाने कुष्ठरोग हा आजार ‘मायकोबॅक्टेरिअम लेप्री’ या जंतूंमुळे (व्हायरस) होतो असे सिद्ध केले. म्हणून वैद्यकीय क्षेत्रात या रोगाला हॅन्सेन्स डीसीज या नावानेसुद्धा ओळखण्यात येते.
महाराष्ट्रात 1955-56 पासून एक उद्देशिय पाहणी पद्धतीने पाहणी, शिक्षण व उपचार या तत्वांवर राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम राबविण्यास सुरुवात झाली. सन 1981-82 पासून प्रभावी औषधोपचाराचा समावेश असलेली बहुविध औषधोपचार पद्धती राज्यात टप्प्याटप्प्यात लागू करण्यात आली. 1995-96 सालापर्यत राज्यातील सर्व जिल्हे या योजनेखाली आणण्यात आले. या उपाययोजनांमुळे 2015-16 अखेरपर्यत दर दहा हजार लोकसंख्येमागे 460 (म्हणजेच 0.48) कुष्ठरोग रुग्ण राज्यात आढळून आले आहेत. देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत कुष्ठरोग रुग्णांच्या संख्येमध्ये महाराष्ट्राचा शेवटचा क्रमांक आहे. कुष्ठरोग रुग्णांच्या संख्येत घट व्हावी आणि त्याचा नायनाट व्हावा यासाठी केंद्र व राज्य शासनातर्फे वेगवेगळया उपाययोजना करण्यात येतात. यातील काही योजना या निरंतर चालणाऱ्या आहेत. कुष्ठरोग रुग्णांना शोधून काढून त्यांच्यावर योग्य उपचार करतानाच दृष्य स्वरुपात नसणाऱ्या रुग्णांना शोधून काढण्यासाठी 5 ते 20 सप्टेंबर,2017 दरम्यान राज्यात कुष्ठरोग शोध मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेविषयी माहिती पुढीलप्रमाणे आहे.
कुष्ठरोग शोध मोहिमेचा उद्देश -
• जिल्ह्यातील ‘हिडन’ कुष्ठरोग रुग्णांचा शोध घेणे.
• प्राथमिक अवस्थेत अथवा सुरुवातीच्या काळात औषधोपचार.
• लहान मुलांमध्ये कुष्ठरोगाचा प्रादुर्भाव रोखणे.
• शुन्य कुष्ठरोग रुग्ण असलेली गावे निश्चित करणे.
कुष्ठरोग शोध मोहिमेतील सर्वेक्षण -
• राज्यात जिल्ह्यांमधील विनिर्दिष्ट तालुक्यांमध्ये सर्वेक्षण करण्यात येणार.
• नागरी भागातील झोपडपट्टी, स्थलांतरीत लोकसंख्या असणाऱ्या भागात सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
• आशा सदस्य व पुरुष स्वयंसेवकाच्या सहकार्याने सर्वेक्षण करण्यात येणार.
• महिला सदस्यांची तपासणी आशा सेविकेमार्फत तर पुरुष सदस्यांची तपासणी पथकातील पुरुष सदस्यांमार्फत करण्यात येणार.
• 5 ते 20 सप्टेंबर,2017 (एकूण 14 दिवस) दरम्यान सर्वेक्षण करण्यात येणार.
• दररोज ग्रामीण भागात पथकामार्फत 20 घरांचे आणि नागरी भागात 25 घरांचे सर्वेक्षण करण्यात येणार.
• दुर्गम भाग/वीट भट्टी/बांधकामे इत्यादी भागातील सर्वेक्षण करण्याचे नियोजन.
• घरातील सर्व सदस्यांची प्रत्यक्ष तपासणी करण्यात येणार. घरातील सर्व सदस्य सापडतील याप्रमाणे स्थानिक वेळेनुसार सर्वेक्षण केले जाणार.
• अनुपस्थित सदस्यांसाठी अभियानाच्या 7 व्या व 14 व्या दिवशी परत भेट देऊन तपासणी करण्यात येणार.
अभियानात राबविण्यात येणाऱ्या कृतींचे नियोजन-
• या मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी तालुकानिहाय नियोजन करण्यात आले आहे.
• आशा व पुरुष स्वंयसेवक यांना प्रशिक्षण देण्यात येणार.
• अभियानाबाबत जनजागरण व आरोग्य शिक्षण शिबिराचे आयोजन.
• सर्वेक्षणाचा अहवाल दैनंदिन पद्धतीने सादर करण्यात येणार.
• अभियान अंमलबजावणीसाठी जिल्हा व तालुका समन्वय समितीची स्थापना. जिल्हा समितीमध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक व आरोग्य सेवा सहाय्यक संचालकांचा समावेश. तालुका समितीमध्ये तालुका वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश.
• प्राथमिक आरोग्य केंद्रातील उपलब्ध बहुविध औषध साठ्यांचा आढावा.
• सर्वेक्षणामध्ये आढळून आलेल्या संशयितांची वेळेत तपासणी करण्याचे नियोजन.
कुष्ठरोग शोध मोहिमेसाठी प्रशिक्षण -
घरोघर सर्वेक्षण करण्यासाठी निवडण्यात आलेल्या या अभियानाच्या सर्व आशा व पुरुष स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण प्राथमिक आरोग्य केंद्र, नागरी आरोग्य केंद्रस्तरावर आयोजित करण्यात आले आहे. संबधित तालुक्यातील कुष्ठतंत्रज्ञ व कंत्राटी निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांनासुध्दा प्रशिक्षणामधे सहभागी करुन घेण्यात आले होते.
अभियान यशस्वीतेसाठी प्रभावी पर्यवेक्षणाचे नियोजन करण्यात आले आहे. सर्वेक्षण करणाऱ्या पथकाचे कामकाज योग्यरितीने चालत असल्याची खात्रीकरण्यासाठी स्वतंत्र पर्यवेक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे. पथक सर्वेक्षणासाठी वेळेत हजर झाले आहे काय, पथकाला सर्व साहित्य मिळाले आहे काय, सर्वेक्षण वेळेत सुरु झाले आहे काय याबाबत पर्यवेक्षकाकडून नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. कुष्ठरोग शोध मोहीम महत्वाकांक्षी कार्यक्रम असून त्याला सामाजिक चळवळीचे स्वरुप दिल्यास कुष्ठरोगावर कायमस्वरुपी मात करणे सहज शक्य होईल.
लेखक: जयंत कर्पे
माहिती स्रोत: महान्युज
अंतिम सुधारित : 1/22/2020