पालघर जिल्ह्यातील आदिवासी तरुणांना रोजगार व उद्योजकता क्षेत्रात काम करण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार माहिती व मार्गदर्शन केंद्र महत्वाची भूमिका पार पाडत आहे. पालघर केंद्रात एकूण ३९ व्हिटीपी कार्यरत आहेत. त्यापैकी १० व्हिटीपीमध्ये प्रशिक्षण सुरु आहे. तसेच एकूण ३३ बॅचेस सुरु असून त्यामध्ये ९२३ प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहेत. आतापर्यंत एकूण ४२ बॅचमध्ये प्रशिक्षण पूर्ण झाले असून त्यामध्ये ८५७ विद्यार्थ्यांनी यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण केलेले आहेत. तसेच ॲसेसमेंट पूर्ण झालेल्या एकूण बॅचेसची संख्या २७ असून विद्यार्थ्यांची संख्या ४९३ इतकी आहे.
पालघर जिल्ह्यामध्ये उद्योग केंद्रित प्रशिक्षण देणाऱ्या एकूण सात कंपन्यानी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी सोबत सामंजस्य करार करुन ९०२० बेरोजगार उमेदवारांना प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध केला जाणार आहेत. त्यामध्ये एकूण ५९५ पेक्षा अधिक उमेदवारांनी प्रशिक्षण पूर्ण केलेले आहे. या कार्यालयामार्फत चार रोजगार मेळावे घेण्यात आलेले आहेत. त्यामध्ये बेरोजगार उमेदवार तसेच उद्योजकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली होती.
पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या कंपनीने महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, मुंबई यांनी रु. ५० लाख तसेच वाळवंडा येथे आदिवासी महिलांना गारमेंटचे प्रशिक्षण देण्यासाठी २०० शिलाई मशिन उपलब्ध करुन दिले असून, तसा सामंजस्य करार देखील केला आहे. त्यानुसार १०० शिलाई मशिन प्राप्त झालेल्या आहेत. आदिवासी तरुणांसाठी नारियल विकास बोर्ड, दापोली, ता.जि.पालघर येथे कौशल्य विकास कार्यशाळा घेण्यात आली. वि.वा. महाविद्यालय विरार, येथे रोजगार मेळावा व कौशल्य विकास प्रशिक्षण मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले. यामध्ये एकूण २२ उद्योजक व ८ व्हिटीपींनी भाग घेतला. उपस्थित उमेदवारांपैकी ७९९ उमेदवारांची प्राथमिक निवड केली. डहाणू येथे रोजगार मेळावा व कौशल्य विकास प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. यामध्ये १५ उद्योजक, ७ व्हिटीपी व ५ एमओयु यांनी सहभाग दर्शविला. उपस्थित उमेदवारांपैकी १६६ उमेदवारांची नोकरीसाठी प्राथमिक निवड करण्यात आली व ३९८ उमेदवारांना कौशल्य विकास प्रशिक्षण घेण्यासाठी निवडण्यात आले.
कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत राज्यात मंचर(पुणे), अचलपूर (अमरावती), कळवण व रावेर (नाशिक), किनवट (औरंगाबाद), चंद्रपूर (चंद्रपूर), गोंदिया (गोंदिया), गडचिरोली (गडचिरोली) या ठिकाणी पालघर मधील आदिवासी उमेदवारांकरीता कौशल्य विकास, रोजगार माहिती व मार्गदर्शन केंद्र कार्यरत आहेत.
आदिवासी उमेदवारांकरिता कौशल्य विकास, रोजगार माहिती व मार्गदर्शन केंद्रामार्फत आदिवासी उमेदवारांना स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग चालविले जातात. एक बॅच ही ३५ ते ४० उमेदवारांची असते. अशा एकूण ३ बॅचेस संपूर्ण वर्षामध्ये घेण्यात येतात. तसेच उमेदवारांना प्रतिमहिना रु. १०००/- (एक हजार) इतके मानधन देण्यात येते व ४ स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांचा एक संच मोफत देण्यात येतो. तसेच या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करण्यासाठी मान्यवर तज्ज्ञांना बोलविले जाते. या केंद्रामार्फत आदिवासी तरुणांना नवी विकासाची दिशा देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
लेखक - दत्तात्रय कोकरे
प्र. जिल्हा माहिती अधिकारी, पालघर
माहिती स्रोत : महान्यूज
अंतिम सुधारित : 7/19/2020