महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी सुवर्ण जयंती राजस्व अभियानामुळे जळगाव जिल्ह्यातील नागरिकांना परस्परांच्या मोठ्या मनांचा प्रत्यय आला आणि त्यामुळे गावा गावातील अनेक रस्ते मोकळे झाले. हे सारे महसूल प्रशासनाच्या पारदर्शक कारभारामुळे सहज शक्य झाले.
महाराष्ट्र शासनाच्या सुवर्ण जयंती राजस्व अभियानाअंतर्गत गावा गावातील गाव नकाशानुसार अतिक्रमित, बंद झालेले गाडी रस्ते, पाणंद, पांधण, शेतरस्ते शिवरस्ते मोकळे करण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राबविण्यात आला. जळगाव जिल्ह्यातही हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर राबविण्यात आला. या समस्येचे स्वरुप जळगाव जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणावर होते. गावा गावात अंतर्गत रहदारी, शेतातून जाण्याचे मार्ग यांची समस्या यामुळे निर्माण झाली होती. साहजिकच त्याचा परिणाम अनेकांना सहन करावा लागत होता. यातील सर्वच रस्त्यांच्या नोंदी गाव नकाशावर असतात. पण प्रत्यक्ष हे रस्ते दिसत नव्हते. कुणी अतिक्रमण केले होते तर कुठे रस्ते बंद करण्यात आले होते. यामुळे गावात विनाकारण वाद होत असत. गावची शांतता भंग पावून त्याचा परिणाम गावकऱ्यांच्या प्रगतीवर होत होता.
जळगाव जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या सुवर्ण जयंती राजस्व अभियानाअंतर्गत मोठ्या प्रमाणावर पाणंद रस्ते मोकळे करण्यात आले. यासाठी प्रशासनाने दिलेल्या हाकेला गावकऱ्यांनी मोठ्या मनाने होकार दिला आणि हा हा म्हणता गावा गावातील रस्ते आणि मने मोकळी झाली. या अभियानात महसूल विभागामार्फत आधी गाव नकाशांच्या अवलोकनानंतर संपूर्ण जिल्ह्यातील अशा एकूण दोन हजार 50 रस्त्यांची नोंद घेण्यात आली. त्यानुसार एक हजार 438 गावांच्या दर्शनी भागात हे नकाशे लावण्यात आले. याप्रमाणे 713 ठिकाणी शेतकऱ्यांनी स्वतः आपले अतिक्रमण काढून घेतले. शेतकऱ्यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे गावा गावातील एक हजार 129 किलोमिटर लांबीचे रस्ते मोकळे झाले. त्यानंतर कायदेशीर मार्गाने 688.09 किलोमिटर लांबीचे 267 रस्ते खुले करण्यात आले. त्यानंतर लोकसहभागातून 1731.45 किमी लांबीचे रस्ते मोकळे करण्यात आले. यामुळे 15 हजार 340 शेतकऱ्यांना लाभ झाला असून तब्बल 17 हजार 36 हेक्टर 36 आर एवढ्या शेतजमिनीला त्याचा फायदा झाला.
वर्षानुवर्षे छोट्या छोट्या कारणांसाठी हे रस्ते बंद होते. महसूल अधिकाऱ्यांनी गावातील दोन गटांत सामंजस्य घडवून विनातक्रार रस्ते तयार करण्यात आल्याने शेतकरी सुखावले आहेत.
याच प्रमाणे एक महिन्यापेक्षा अधिक काळ प्रलंबित असलेली फेरफार नोंदींची प्रकरणे निकाली काढण्यासाठी प्रत्येक मंडळ मुख्यालयात फेरफार अदालती घेण्यात आल्या. त्यानुसार 86 महसूल मंडळात 3 हजार 137 फेरफार अदालती घेण्यात आल्या. सद्यस्थितीत जळगाव जिल्ह्यात 42 हजार 922 फेरफार प्रकरणांमध्ये अंमल देण्यात आला आहे. या फेरफार अदालतींमुळे जागीच निकाल लागल्याने लोकांची मोठी सोय झाली.
याच अभियानाचा भाग म्हणून जळगाव जिल्ह्यातील एक हजार 504 गावांपैकी एक हजार 502 गावात चावडी वाचन पूर्ण करण्यात आले. या चावडी वाचनामुळे मयत खातेदारांची 14 हजार 26 प्रकरणे, सरकारी जमिनीवरील अतिक्रमणांची 144 प्रकरणे, 70 शर्तभंग प्रकरणे, चार देवस्थान प्रकरणे, अनधिकृत बिनशेती प्रकरणे 57 अशा 14 हजार 271 त्रूटी निघाल्या. त्या दूर करण्यासाठी 13 हजार 744 प्रकरणात फेरफार करुन प्रकरणे निकाली काढण्यात आली. याच प्रमाणे जलद व पारदर्शक पद्धतीने अकृषिक परवानगी देण्यासाठी 517 प्रकरणे दाखल झाली होती. त्यातीळ 210 प्रकरणांवर अंतिम आदेश देण्यात आले. 239 प्रकरणे त्यातील तृटींमुळे निकाली काढण्यात आले तर 68 प्रकरणे चोकशी व निर्णयासाठी प्रलंबित आहेत.अशा अनेक पातळीवर हे अभियान जळगाव जिल्ह्यात यशस्वीपणे राबविल्याने महसूल कार्याला गती मिळाली आहे. विविध प्रकारचे दाखले नागरिकांना वेळेत मिळू लागले आहेत. प्रशासन जनतेपर्यंत पोहोचल्याने 'शासन आपल्या दारी' ही प्रचिती जळगाव जिल्ह्यातील जनतेला आली आहे. याचा दृष्यपरिणाम म्हणजे लोकांचा वेळ आणि पैसा तर वाचलाच शिवाय लोकांची शासकीय कार्यालयातील गर्दी कमी झाली आहे. अशा या लोकाभिमुख कारभारामुळे जनता आणि प्रशासन यांच्यातील सहकार्य निश्चितच वाढीस लागेल. जिल्ह्याच्या आणि राज्याच्या प्रगतीसाठी हीच काळाची गरज आहे.
लेखक - मिलिंद दुसाने, जिल्हा माहिती अधिकारी, जळगाव
स्त्रोत : महान्यूज
अंतिम सुधारित : 6/5/2020
तालुक्याच्या स्थळापासून साठ किलोमीटर अंतरावर पेढेव...