मुख्यत्वे मानवशास्त्र व समाजशास्त्र विषयांच्या अभ्यासात वापरली जाणारी एक महत्त्वाची संकल्पना. मानव समाजजीवनाच्या नित्य वा नैमित्तिक प्रसंगातील उठण्याबसण्याच्या, बोलण्या-चालण्याच्या, विचार करण्याच्या व अन्योन्यक्रियेच्या समूहाच्या सवयी म्हणजे रूढी होत. व्यक्तिव्यक्तींमधील दैनंदिन, प्रासंगिक अशा वारंवार घडणाऱ्या अन्योन्यक्रियेला सुलभता लाभावी म्हणून काही संकेत सहजगत्या निर्माण होतात. त्यांचे रूपांतर कालांतराने रूढींमध्ये होते. रूढी म्हणजे संस्कृतीचे एक अंग होय. भिन्न क्षेत्रांतील विविध रूढींच्या धाग्यांनीच संस्कृतीचा वैशिष्ट्यपूर्ण पट तयार होतो. यावरून रूढींची उत्पत्ती आणि तिचे सातत्य हे संस्कृतीप्रमाणेच असते, हे स्पष्ट आहे.
दैनंदिन जीवनातील सर्वसाधारण गोष्टींपासून उच्च नैतिक आदर्शापर्यंत रूढींचा अंमल चालतो. म्हणूनच सामाजिक जीवनात रूढींचे क्षेत्र सर्वव्यापी आहे. रूढींना त्यांच्या सामाजिक व वैयक्तिक आचरणांमुळे बळकटी येते. रूढी या सर्वंकष असतात व समाजातील कोणतीही व्यक्ती वा स्तर त्यांपासून सुटलेला नसतो. आचारविचार, विश्वास, श्रद्धा, नैतिक मूल्यकल्पना, कपडेलत्ते, खाणेपिणे, परस्परसंबंध इ. बाबतींत रूढींचे प्राबल्य दिसून येते. रूढींमुळे ⇨सामाजिकरणाची आणि सामाजिक अन्योन्यक्रियेची प्रक्रिया सुकर होते व समाजाला स्थैर्य प्राप्त होते. प्रसिद्ध अमेरिकन मानवशास्त्रज्ञ रूथ बेनेडिक्ट (१८८७−१९४८) यांच्या मते सामाजिक अनुभवांत आणि श्रद्धांमध्ये रूढींचा सहभाग अत्यंत प्रभावी व सर्वाधिक महत्त्वाचा असतो आणि म्हणूनच ह्या रूढींच्या भिंगाशिवाय आपण सर्वांगीण सामाजिक जीवनाकडे पाहू शकत नाही. रूढी ह्या अलिखित नियम असतात व त्यांच्या अनौपचारिकपणामुळे त्यांचे दडपणही विशेष जाणवत नाही. सर्वसाधारण समाजाच्या दृष्टीने रूढी हे समाज नियंत्रणाचे उत्कृष्ट साधन होय.
सर्वसामान्यतः समाज हा रूढींनी बांधलेला आणि त्यामुळे सर्व व्यवहारांमध्ये रूढींवर अवलंबून असतो. विशिष्ट सामाजिक संदर्भात असलेल्या रूढी, तो संदर्भ बदलला की जाचक बनण्याचा संभव असतो. कारण रूढींचे पालन निःशंक मनाने आणि विनातक्रार केले जाते. प्राप्त परिस्थितीत निरर्थक वाटणार्याअ आणि व्यवहाराला अडथळा निर्माण करणाऱ्या, रूढी कालबाह्य ठरतात. सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेत कालबाह्य ठरलेल्या रूढी टिकणार नाहीत आणि आहेत त्या रूढी टिकवून सामाजिक परिवर्तन घडवून आणता येत नाही. अशा वेळेस विचारवंत समाजसुधारक पुढे येऊन अशा रूढींच्या उच्चाटनाकरिता हरतऱ्हेसने प्रयत्न करतात. परंतु अशा रूढींच्या जागी दुसऱ्या रूढी प्रस्थापित होण्याकरिता सामाजिक संदर्भ बदलणे हे वैचारिक परिवर्तनापेक्षा अधिक प्रभावी साधन ठरलेले आहे, असेच दिसून येईल. कालांतराने रूढीमुळे परिवर्तनाला अडथळा निर्माण होत असला, तरी रूढींचे संपूर्ण उच्चाटन कधीच होणार नाही. कारण समाजजीवनास रूढींचे संपूर्ण उच्चाटन कधीच होणार नाही.
कारण समाजजीवनास रूढींची आवश्यकता असते. रूढी अगर परंपरा निर्माण करणे हा समाजजीवनाचा सहज स्वभाव आहे. रूढी म्हणजे समाजजीवनाचे वेळापत्रक होय. परंपरा ही अपरिवर्तनीय असण्याचे कारण त्या परंपरेत अनुस्यूत असलेल्या रूढींत असते. सामाजिक परिवर्तनाच्या संदर्भात हा मुद्दा विशेष लक्षणीय ठरतो. तथापि सर्वसाधारणपणे ररूढींची समाजनियंत्रणासाठी अतिशय आवश्यकता भासते, असे दिसून येते. समान रूढींमुळे व्यक्तिव्यक्तींमध्ये व समूहामध्ये आपुलकी वाढते, त्यांच्यांत ऐक्यभावना निर्माण होते, परंतु रूढिभिन्नतेमुळे परकेपणाही निर्माण होतो.
एखाद्या समाजाचे व संस्कृतीचे तुलनात्मक परीक्षण त्या समाजाच्या रूढींच्या अभ्यासानेच होऊ शकते आणि ह्या रूढी त्या समाजाच्या रूढींच्या अभ्यासानेच होऊ शकते आणि ह्या रूढी त्या त्या समाजाच्या रूढींच्या अभ्यासानेच होऊ शकते आणि ह्या रूढी त्या त्या समाजाच्या प्रत्यक्ष दैनंदिन जीवनातूनच अभ्यासता येतात, असे सुप्रसिद्ध पोलिश मानवशास्त्रज्ञ, ब्रॉनीस्लॉ मॅलिनोस्की (१८८४−१९४२) यांचे मत आहे. त्यांच्या मते दैनंदिन जीवनातील रूढींचा प्रत्यक्ष निरीक्षणातून केलेला अभ्यास म्हणजे एका अर्थी त्या संस्कृतीचा, समाजाचाच अभ्यास म्हणजे एका अर्थी त्या संस्कृतीचा, समाजाचाच अभ्यास म्हणता येईल. कारण संस्कृतीच्या सामान्य संकल्पनेचे उपयोजन रूढींच्या संदर्भातच करता येते आणि रूढींची परंपरा म्हणजे संस्कृतीचा वारसा होय.
संदर्भ : 1. keessing, F. M. Cultural Anthropology : Science of Custom, Holsten, 1958.
2. Sumner, W. G. Folkways, : A Study of the Sociogical Importance of Usages,
Manners, Cusotms, Motres and Morals, New York, 1959.
लेखक: य. भा. दामले ; मा. गु. कुलकर्णी
माहिती स्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 7/12/2023
एक आधुनिक राजकीय संकल्पना.
फ्रेंच भूमितिकार.प्रक्षेपीय भूमितीतील प्रमुख संकल...
सदिश ही गणितातील संकल्पना भौतिकीच्या गरजेपोटी निर्...
फळे भाजापीला यासारख्या नाशवंत फलोत्पादनाचे काढणीपश...