मुलगी किंवा मुलगा वयात येण्यापूर्वीचा विवाह म्हणजे बालविवाह. वयात येणे म्हणजे मुलगी गर्भधारणेस योग्य होणे व मुलगा प्रजोत्पादनक्षम होणे.थोडक्यात सांगावयाचे तर, शारीरिक आणि मानसिक परिपक्वता प्राप्त होण्यापूर्वीच मुलामुलींचा विवाह करणे, अशी बालविवाहाची व्याख्या करता येईल. या विवाहात वैवाहिक जीवनातील जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये यांविषयी वधू-वर अनभिज्ञ असतात. पारंपरिक जीवन जगणाऱ्या जगातील अनेक मानवसमूहांत ही चाल असल्याचे दिसते. मेलानीशियन जमातींमध्ये आणि पॉलिनीशियन प्रतिष्ठितांमध्ये ही चाल दिसून येते. पापुआ न्यू गिनीच्या आधिपत्याखालील न्यू गिनी बेटाच्या आग्नेयीस असलेल्या ट्रोब्रिआंड द्वीपसमूहात बालविवाह मोठ्या प्रमाणावर होत असत. अमेरिकेतील निग्रो समाजात आणि आशिया खंडातील अनेक जमातींत बालविवाह पूर्वी होत असत व अद्यापही काही ठिकाणी होतात. चीनमध्ये साम्राज्य युगाच्या सुरुवातीला लग्नासाठी मुलीचे वय १४ व मुलाचे वय १६ वर्षे ठरविले गेले. कन्फ्यूशसच्या पूर्वीच्या काळात तर लग्नाचे सर्वसामान्य वय मुलासाठी २० ते ३० मुलीसाठी १५ ते २० होते. तरीही वाग्दानासाठी कोणतीही वयोमर्यादा पाळलेली आढळत नाही. क्वचित मुलाच्या जन्माच्या आधीही पालक वचनबद्ध होत असत. तेराव्या शतकात कोरियामध्ये बालविवाहाची प्रथा आढळते. कोरियाचा तत्कालीन राजा कोंजाँग (१२१९-५९) हा मंगोलियन सम्राटास नजराणा देऊन खूष ठेवण्यासाठी सुंदर मुलींना मंगोलियामध्ये पाठवत असे. या पद्धतीच्या भीतीनेच मुलीचे लग्न लहान वयात करण्याची प्रथा तेथे रूढ झाली असावी. मध्ययुगातील तथाकथित शिलेदार युगातही इंग्लंड व यूरोपमध्ये ५ वर्षांच्या मुलीशी विवाह करण्याची पद्धत होती. परंतु बालविवाहाला भारतात जे स्वरुप प्राप्त झालेले आहे, तसे इतरत्र कोठेही दिसत नाही. याठिकाणी विवाह आणि वाग्दान यात फरक करावयास हवा. काही जमातींत वाग्दान लवकर होते, पण विवाह मात्र मुलीला ऋतुप्राप्ती झाल्यानंतरच होतो. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, ऋतुप्राप्तीपूर्वी विवाह करण्यास परंपरा, रुढी आणि धर्मशास्त्रे यांनी जरी मान्यता दिलेली असली, तरी ऋतू प्राप्त होण्यापूर्वी पतीने पत्नीचा उपभोग घेण्यास मात्र सर्वत्रच प्रतिकूलता आहे. मुस्लिम धर्मशास्त्राने तर जबरी संभोग करणाऱ्यास शंभर फटके मारावेत असे सांगितले असून मनुस्मृतीनेही याचा कडक निषेध केलेला आहे.
वेदकाळात बालविवाहाचे उल्लेख आढळत नाहीत. धर्मसूत्रांच्या काळापासून मात्र ते दिसून येतात. काही धर्मसूत्रांनी वधू ही ‘नग्निका’ असावी असे म्हटले आहे. ‘नग्निका’ शब्दाच्या अर्थाबद्दल मतभेद आहेत. एक अर्थ, मुलीला योनी झाकण्याची इच्छा, म्हणजे लाज उत्पन्न झालेली नसते, असा होतो. दुसरा अर्थ असा, की जिला अद्याप ऋतू प्राप्त झालेला नाही. परंतु इतक्या लहान वयात धर्मसूत्रांच्या काळात तरी विवाह होत होते का, असा प्रश्न पडतो. कारण गृह्यसूत्रांत ‘चतुर्थी कर्म’ या विवाहविधीचा उल्लेख आहे. हा विधी विवाहानंतर करावयाचा असतो. हा फलशोभनाचा विधी आहे व ऋतू प्राप्त झाल्याशिवाय फलशोभन संभवत नाही. यावरून मुलींचे विवाह प्रौढ वयातच होत असत, असे अनुमान करावयास हरकत नाही. विवाहित पती-पत्नींनी लग्नानंतर तीन रात्री ब्रह्मचर्य पाळावे, असा जो नियम सूत्रकारांनी सांगितलेला आहे, त्यावरूनदेखील वरील अनुमान निघते. इ. स. पू. सु. पाचशे वर्षापूर्वी होऊन गेलेल्या गौतम नावाच्या स्मृतिकाराने वरील ‘नग्निका-विवाह’ सिद्धांताला विरोध केलेला आहे. त्याचे म्हणणे असे आहे. की रजोदर्शन होण्यापूर्वी विवाहकरावा; तथापि विवाहासाठी रजोदर्शनानंतर काही थोडा अवधी लागला तरी हरकत नाही. गौतम स्वत:चे विचार व्यक्त करीत होता, त्या काळातच बालविवाह हळूहळू रुढ होत होते. गौतमानंतर ३०० वर्षांनी होऊन गेलेल्या याज्ञवल्क्याच्या काळात तर ऋतू प्राप्त होण्यापूर्वी मुलीचा विवाह झालाच पाहिजे असा विचार पक्का ठरला गेला. स्त्रीने ऋतू प्राप्त झाल्यावर विवाह केलाच पाहिजे, त्याशिवाय तिला स्वर्गाचे द्वार खुले होणार नाही, असे मानले जाऊ लागले. इ. स. च्या पहिल्या पाच शतकांपर्यंत लग्नाचे वय कमी करण्याचे बरेच प्रयत्न झाले. रजोदर्शनापूर्वी आपल्या मुलीचे लग्न जो पिता, माता व ज्येष्ठ भ्राता करीत नाही तो नरकात जातो, असे सांगितले आहे. आठव्या वर्षी मुलीचा विवाह प्रशस्त होय, असे मनूने म्हटले आहे. इ. स. च्या सहाव्या-सातव्या शतकांपर्यंत लग्नाची ही वयोमर्यादा निश्चित झाली व एकोणिसाव्या-विसाव्या शतकांपर्यंत ती तशीच कायम राहिली. आठ वर्षांच्या मुलीस ‘गौरी’, नऊ वर्षांची ‘रोहिणी’, दहा वर्षांची ‘कन्या’व नंतर ‘रजस्वला’ असे मानले जाऊ लागले. ब्राह्मणाने नग्निका किंवा गौरी हिच्याशी विवाहबद्ध व्हावे, असे वैखानस सूत्रांत सांगितले आहे. वयाचे हे नियम ब्राह्मणांपुरतेच मर्यादित नव्हते आणि क्षत्रिय, वैश्य मुलींचे विवाह ऋतू प्राप्तीनंतर जरी क्वचित होत असले, तरी पुढेपुढे घराण्याचा कुलीनपणा टिकवण्यासाठी या आचारनियमांना प्राधान्य दिले गेले. अशा रीतीने बालविवाह हिंदू समाजात रुढ झाले. मुसलमानांमध्येदेखील बालविवाहास मान्यता मिळाली.
बालविवाहाच्या संदर्भात वधूच्या वयाचा विचार जेवढा झाला, तेवढा वराच्या वयाचा झालेला नाही. समावर्तनाचा संस्कार झाल्याशिवाय त्रैवर्णिक पुरुषाचे लग्न होऊ शकत नाही आणि समावर्तनाचे वय पंचवीस वर्षे- म्हणजे वेदाध्ययन पूर्ण झाल्यावर-येते. याचा अर्थ पंचवीस वर्षांचे आत तर त्रैवर्णिक विवाह होतच नसे, असा होतो. मनूने असे म्हटले आहे, की तीस वर्षे वयाच्या पुरुषाने बारा वर्षे वयाच्या मुलीशी विवाह करावा. वराचे वय चोवीस व वधूचे आठ, असे अंतरदेखील मनूने मान्य केलेले आहे. महाभारतात वराचे वय तीस व वधूचे दहा किंवा वराचे एकवीस व वधूचे सात असावे, असे म्हटले आहे.
वरील सर्व विवेचन लक्षात घेता, प्राचीन स्मृतिकारांनी मुलीच्या कौमार्यावर जास्त भर दिलेला आढळतो. ऋतू वाया जाऊ नये. याविषयी त्यांचा कटाक्ष होता. वाया जाणाऱ्या प्रत्येक ऋतूबरोबर एक एक भ्रूणहत्येचे पातक लागेल, असे त्यांनी बजावून ठेवले आहे. पितृसत्ताक कुटुंबपद्धतीत मुलीच्या विवाहाची संपूर्ण जबाबदारी ही पित्याची असते. वंश, जात, गोत्र-प्रवर, पिंड इत्यादींसंबंधी अंतर्विवाही व बहिर्विवाही नियम अस्तित्वात असल्यामुळे व वयात आलेली मुलगी स्वत:च वरसंशोधन करून कदाचित वरील नियमांचे पालन करण्याची शक्यता कमी असल्यामुळे, मुलगी वयात येण्यापूर्वीच तिचे लग्न उरकून टाकावे, अशी वृत्ती बळावली असावी. तसेच स्त्रीच्या चारित्र्याला अतिशय महत्त्व दिले जात असल्याने, मुलगी वयात आल्यानंतर एखाद्या पुरुषाच्या वासनेस बळी पडू नये किंवा स्वत: ही मोहात पडून बदनाम होऊ नये यासाठी बालविवाहाची प्रथा रुढ झाली असावी. यात पुन्हा परकीय आक्रमकांनी भर घातली.
गेली दोन हजार वर्षे बालविवाहाची चाल केवळ स्थिरच झाली असे नव्हे, तर पक्की होत गेली. विवाहाचे वय अधिकाधिक कमी होत गेले. पाळण्यातील मुलामुलींचे विवाह लावण्यापर्यंतही मजल गेली; इतकेच नव्हे तर दोन गरोदर स्त्रियांपैकी एकीला मुलगा व दुसरीला मुलगी होईल, असे गृहीत धरून लग्न ठरवले जाई. याला ‘पोटाला कुंकू लावणे’, असे महाराष्ट्रात म्हणतात.
एकोणिसाव्या शतकात समाजसुधारणेच्या चळवळी सुरु झाल्या. त्यात बालविवाहाचा प्रश्न अतिशय तीव्रपणे चर्चिला गेला. राजा राममोहन रॉय, ईश्वरचंद्र विद्यासागर, केशवचंद्र सेन या बंगाली व जोतीराव फुले, म. गो. रानडे, गो. ग. आगरकर, धो. के. कर्वे या मराठी समाजसुधारकांनी बालविवाहाच्या विरूद्ध मोहीमच उघडली. स्त्रीशिक्षणाचा पुरस्कार केला. बेहरामजी मलबारी, लाला गिरिधारीलाल, रायबहादुर बक्षी सोहनलाल, हरी सिंग गौर, हरविलास सारडा यांनी कायदा करून सुधारणा करावी या मताचा पुरस्कार केला व त्यांपैकी काहींनी कायदेमंडळात बालविवाहबंदीची विधेयकेदेखील आणली.
संमतिवयाचा प्रश्न बालविवाहाच्या चालीतूनच निर्माण झाला. जरठकुमारी विवाह, बालविधवांची समस्या, अकाली वैधव्य प्राप्त झालेल्या काही स्त्रियांचे अनाचार व त्यातून जन्माला येणाऱ्या अनौरस संततीचा प्रश्न, भ्रूणहत्या इ. अनेक विषय बालविवाहाशीच निगडित आहेत. बालविवाहाची अनिष्टता समजावून देण्यासाठी सुधारकांनी लेख लिहिले; व्याख्याने दिली; वादविवाद केले. औद्योगीकरण जसजसे वाढत गेले व शहरांची जसजसी वाढ होत गेली, तसतशी बालविवाहांना साह्यभूत होणारी एकत्र कुटुंबपद्धती हळूहळू नष्ट होऊ लागली. स्त्री-शिक्षणाचा प्रसार होत गेला व बालविवाहाची चाल हळूहळू बंद होत गेली.
बालविवाहात स्त्रियांवर अकाली मातृत्व लादले जाण्याचा दोष होता. ज्या वयात शिक्षण घ्यावयाचे, त्याच वयात स्त्री-पुरुष संसारात पडत. यामुळे समाजातून विद्या नाहीशी झाली. आयुर्मान घटण्यास बालविवाह आणि अकाली मातृत्व हीदेखील कारणे होती. समज येण्यापूर्वीच लग्न होत असल्यामुळे, आईवडील शोधून देतील तशा वराबरोबर अथवा वधूबरोबर जीवन कंठणे भाग पडे. त्यातून कौटुंबिक ताण निर्माण होत, संघर्ष होत आणि पहिली पत्नी सोडून देऊन दुसरी केल्यामुळे पहिलीला परित्यक्तेचे जीवन जगावे लागे. ही स्थिती सुधारण्यासाठी पुढील कायदे करण्यात आले : (१) १८६० : इंडियन पीनल कोड, कलम ३७५ व ३७६ – दहा वर्षाखालील मुलीशी वा पत्नीशीही समागम करण्यास बंदी. बालविवाह प्रतिबंधक कायदा १९२९ मध्ये झाला. त्यापूर्वी बालविवाहाला प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने उचललेले पहिले पाऊल म्हणून कलम ३७५ मधील ही तरतूद लक्षणीय मानावी लागेल. (२) १८९४ : म्हैसूर सरकारने बालविवाहाचा कायदा करून, आठ वर्षांखाली मुलीचे वय असल्यास विवाहाला बंदी केली. (३) १९०४ : बडोदा सरकारने मुलीचे विवाहयोग्य वय बारा व मुलाचे सोळा वर्षांचे ठरवले. (४) १९२७ : इंदूर सरकारने मुलीची वयोमर्यादा बारा व मुलाची चौदा ठरविली. (५) १९२९ : बालविवाह प्रतिबंधक कायदा (सारडा कायदा) – या अन्वये मुलीचे वय चौदा व मुलाचे वय अठरा ठरवण्यात आले. (६) १९५५ : हिंदू विवाह कायदा-मुलीचे वय पंधरा वर्षांचे ठरले व मुलाचे अठरा. तसेच १९७८ च्या कायद्यानुसार मुलीचे वय अठरा व मुलाचे एकवीस वर्षे ठरले.
बालविवाहासंबंधी वरील स्वरुपाचे कायदे करण्यात आलेले असले, तरी समाजावर कायद्याचा तसा फारसा प्रभाव पडला नाही. ग्रामीण भागात तुरळक प्रमाणावर आजही बालविवाह होतच आहेत. स्त्रीशिक्षणाचा प्रसार जसजसा होत आहे, तसतसे हे प्रमाण कमी कमी होत आहे.
संदर्भ : 1. Kapadia, K. M. Marriage and Family in India, Pages 138 to 166, Bombay, 1966.
2. Rathbone, Eleanor F. Child Marriage: The Indian Minotaur, London, 1934.
लेखक: नरेश परळीकर
माहिती स्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 9/27/2019
रक्ताचा लालपणा कमी होणे म्हणजे अॅनिमिया. यालाच रक्...
ब-याच मुलांना हा आजार 'जन्मजात' असतो. काही जणांना ...
या विभागात लहान मुलांना आईच्या दुधाचे काय फायदे आह...
लहान मुलांसाठी कमी खर्चात सकस आहार कसा व कोणता द...