कुरखेडा तालुक्यातील रामगड हे साधारण दीड हजारांहून अधिक लोकवस्तीचे गाव आहे. या गावात 2 ते 3 किराणा मालाची दुकाने आहेत. आसपासच्या ग्रामीण भागात अशी दुकाने नसल्याने त्या गावांमधून दैनंदिन गरजेच्या तसेच मासिक किराणा सामान भरण्यासाठी ग्रामस्थ येथे येतात.
या गावात सोमनाथ रघुनाथ थलाल याचे कमलेश किराणा स्टोअर्स नावाचे दुकान होते. दुकानात ग्राहकांच्या मागणीनुसार मालाचा पुरवठा करण्यासाठी खेळत्या भांडवलाची समस्या होती. त्यामुळे काही माल विकला की कुरखेडा किंवा वडसा (देसाईगंज) पर्यंत जाऊन नव्याने साठा खरेदी करावा लागे.
सतत जाण्या-येण्यात वेळ तर खर्ची पडत होता सोबत जाण्या-येणाऱ्या व मालाच्या वाहतुकीत पैसा लागत होता. यामुळे मालाच्या विक्रीतून नफ्याचे प्रमाण तोकडे होते.
आपल्या दुकानात भरगच्च साठा असावा व आलेला ग्राहक अमूक एक वस्तू नाही म्हणून परत जाऊ नये यासाठी सोमनाथ प्रयत्न करीत होता. यात आर्थिक अडचण होती. स्वप्नातलं भरगच्च माल भरलेलं तालुक्यातलं उत्तम सेवा देणारं दुकान आपलं असावं असं स्वप्न बाळगणाऱ्या सोमनाथला कायम निराश व्हायला लागायचं.
जिल्हा माहिती कार्यालयातर्फे मुद्रा कर्ज योजनेच्या प्रसिद्धीसाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येतात. यातील एक बातमी त्याच्या वाचनात आली आणि त्याने लगेच कुरखेडा येथील बँक ऑफ इंडिया शाखेच्या व्यवस्थापकांशी संपर्क साधला.
त्याने अर्ज सादर केल्यावर बँकेच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या दुकानास भेट देऊन पाहणी केली. त्याचा व्यवसाय खरोखर चांगल्या पद्धतीने सुरु आहे याची खात्री पटल्यानंतर कुठल्याही तारण व हमी (गॅरंटी) शिवाय 2 लाखांचे कर्ज त्याला मंजूर केले.
बँकेने त्याला 16 फेब्रुवारी 2016 रोजी कर्ज मंजूर केले. ग्राहक हाच देव म्हणून व्यवसाय करणाऱ्या सोमनाथची खेळत्या भांडवलाची समस्या दूर झाल्याने त्याला आनंद झाला. त्याने लगोलग मालाचा साठा मुबलक राहिल व एकही ग्राहक परत जाणार नाही याची काळजी घ्यायला सुरुवात केली.
त्याचा सेवाभाव, व्यावसायिक कौशल्य आणि 'मुद्रा' चे अर्थसहाय्य यामुळे व्यवसाय वाढीला लागायला वेळ लागला नाही. गेल्या दीड वर्षामध्ये 18 लाख रुपयाची उलाढाल त्याने गाठली. ग्रामीण भागाच्या दृष्टीने अल्पावधीत इतकी मोठी प्रगती खरोखरच प्रेरणादायक अशीच आहे. आणि हेच मुद्रा कर्ज योजनेचे यश आहे.
- प्रशांत दैठणकर
माहिती स्रोत: महान्युज
अंतिम सुधारित : 9/20/2019