आपण एखादी गोष्ट करायची असं जर मनात आणले तर आवाका पाहून प्रत्येकजण ते करीत असतो. पण त्यासाठी जिद्द, चिकाटी आणि मेहनत असावी लागते, त्याशिवाय ते शक्यच नाही. हेच गौतम गवई यांनी सिद्ध करून दाखविले आहे.घरची अत्यंत हलाखीची परिस्थिती, मोलमजूरी करून खायचं, अशा स्थितीत रोजचं काम मिळालं तर सोन्याहून पिवळं झाल्यासारखं वाटायचं. अशा त्या परीस्थितीत लहान वयात वडिलांसोबत खदान वर काम करून गौतमने बीए पर्यंत शिक्षण घेतलं. शिक्षण घेता घेता सामाजिक विषमतेमुळे जीवनात कसे संघर्ष करावे लागतात, चटके बसलेल्या समाजाला जागृत करायचं असेल, त्यांना न्याय मिळवून द्यायचा असेल तर प्रसार माध्यमांचा आधार घेतला पाहिजे, हे ओळखून गौतम गवई यांनी पत्रकारितेची निवड केली. २००१ पासून विदर्भातील अग्रेसर दैनिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देशोन्नती, जनमाध्यम या नामांकित दैनिकांमधून मुक्त पत्रकार म्हणून पत्रकारितेला सुरूवात केली. दरम्यान दैनिक सम्राट मधून भंडारा जिल्ह्यातील खैरलांजी मधील अमानूष हत्याकांडाचं वृत्तांकन केल्यानंतर त्यांनी विदर्भातील अनेक प्रश्नांना वाचा फोडायचं काम या माध्यमातून केलं.
मुंबईत पदार्पण केल्यानंतर गवई यांनी मुंबईतील महानायक या दैनिकासाठी मंत्रालय विधिमंडळ प्रतिनिधी म्हणून काम करायला सुरूवात केली. हे करीत असताना मागासवर्गियांना उद्योजक बनविण्याच्या शासकीय योजना आल्यानंतर त्या योजनांचा अभ्यास करुन मागासप्रवर्गाच्या उन्नतीच्या योजनांचे प्रकल्प हाती घेऊन आपणही उद्योजक बनावे, असे स्वप्न त्यांनी उराशी बागळून तशी पावलं उचलण्यास सुरूवात केली. या योजना काय आहेत, त्याचा लाभ कसा घेता येईल, याचा साकल्याने विचार करून गौतम गवई यांनी मंगला मागासवर्गीय औद्योगिक संस्था मर्यादित खामगाव, जिल्हा बुलढाणा या संस्थेची नोंदणी केली. संस्थेच्या वतीने शुद्ध पेय जल निर्मिती उद्योग उभारणीचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आणि शासन मान्यता मिळवून प्रकल्प सुरु केला.अनेक मित्रांच्या लाख मोलाच्या सहकार्याने अथक प्रवास करीत तो टप्पा पार केल्यानंतर गवई यांनी खामगाव सारख्या छोट्या शहरात कोट्यवधी रूपयांचा बिलोरी पॅकेज्ड ड्रिंकींग वॉटर प्रकल्प उभा केला. आज बुलढाणा, अकोला आणि आजुबाजूच्या शहरात बिलोवी या पेय जलास मोठ्या ब्रॅण्डेड कंपन्या बाजारात असताना मोठा प्रतिसाद मिळतो आहे. दर्जा सिद्ध करून बिलोवी पॅकेज्ड ड्रिंकींग वॉटर ग्राहकांच्या पसंतीस उतरल्याचे गौतम गवई अभिमानाने सांगतात. लवकरच हा ब्रॅण्ड राज्यभर नावारूपाला येईल, असा विश्वासही ते व्यक्त करतात. या करीता आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असल्याचे ते सांगतात.
गवई या एकाच व्यवसायावर समाधान मानत बसले नाहीत. पहिला उद्योग सुरू झाल्यानंतर तो यशस्वी झाल्यानंतर त्यांनी जैविक कोळसा उत्पादनावर भर देऊन तोही प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पामुळे या परिसरातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळाला. तर यामधून शेतकरी बांधवांना दिलासा देणारा हा प्रकल्प आहे. कमी सिंचन क्षमता व पर्जन्यमान असलेल्या भागातील पीक काढल्यानंतर जो नको असलेला भाग तुरट्या परट्या कुटान असा रॉ, वेस्ट कचरा शेतकरी शेतातच जाळून टाकतात, त्याचा काही फायदा शेतकऱ्याला होत नाही. असा कचरा खरेदी करून त्यापासून जैविक कोळसा निर्माण करणारा प्रकल्प गवई यांनी सुरू केला. हा जैविक कोळसा औद्योगिक बाजारात ब्रिक्वेट म्हणून ओळखला जातो. दगडी कोळशाला पर्याय म्हणून ब्रिक्वेट बॉयलर कारखान्यात जळाऊ म्हणून वापरला जातो. याचा उपयोग ग्रामीण भागात स्वयंपाकासाठी गृहिणी वापरतात. या कोळशामुळे पर्यावरणाची हानी होत नाही. तसेच शेतकऱ्यालाही आर्थिक फायदा होतो. राज्यात हजारो कोटी रूपयांची उलाढाल असलेला हा व्यवसाय आहे. या क्षेत्रात नुकतेच गवई यांच्या संस्थेने आपले स्थान पक्के केले आहे.अशा प्रकारे गौतम गवई पत्रकारितेच्या माध्यमातून उद्योगाकडे वाटचाल करीत आहेत. समाजातील उपेक्षीत वर्गासाठी अजून बरंच काही करायचयं असा आशावाद गौतम गवई यांनी व्यक्त केला. अशा होतकरू युवकाच्या पुढील वाटचालीस हार्दिक सदिच्छा.
लेखक - संजय बोपेगावकर
स्रोत -महान्यूज
अंतिम सुधारित : 10/20/2019