राजधानी दिल्लीत हलक्या पावलांनी येऊ लागलेल्या थंडीचे बोट धरुन यंदाची दिवाळी सुरांमधे रंगली. तरुण गायक राहूल देशपांडे, मधुरा दातार यांचे गायन आणि सुधीर गाडगीळ यांच्या सिद्धहस्त निवेदनाने दिवाळी पहाट रंगली. दिल्ली मराठी प्रतिष्ठानची स्थापना होऊन एक वर्ष झाले. दिल्ली आणि परिसरातील महाराष्ट्रीयन मंडळे एकत्रित येऊन साजरा करण्यात आलेला प्रतिष्ठानचा हा तिसरा कार्यक्रम होता. यापूर्वीचे दोन कार्यक्रमही दिल्लीकर मराठी मनांनी उदंड प्रतिसादाने यशस्वी केले आहेत. मागील वर्षी इंडिया गेट वरील गायक महेश काळे आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या दिवाळी पहाट च्या कार्यक्रमाने प्रतिष्ठानच्या सांस्कृतिक कार्यक्रमांची सुरुवात झाली. 'चला हवा येऊ द्या' या झी वाहिनीवरील विनोदी कार्यक्रमाचे चित्रीकरणाचे आयोजन ही दिल्ली मराठी प्रतिष्ठानने केले होते.
कार्यक्रमांची हीच आगळी वेगळी परंपरा सांभाळताना दिल्ली मराठी प्रतिष्ठानाने यंदा दिवाळीत दिल्लीकर मराठी रसिकांना सुरेल मेजवानी दिली. जनपथावरील इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राच्या प्रशस्त मैदानावर भाऊबीजेच्या दिवशी भल्या सकाळी अगदी गुरुग्राम, नोएडा, उत्तर प्रदेश, फरिदाबाद, गाझीयाबाद येथून महाराष्ट्रीयन दिल्लीकर एकत्रित येऊन मध्यवर्ती ठिकाणी मोठ्या संख्येने जमले होते. त्यांचे स्वागत भव्य रांगोळी, आकाश कंदील, आकर्षक सजावट आणि सोबत एकमेकांना दिवाळीच्या मराठीतून शुभेच्छा देऊन करण्यात येत होते.
शेजारीच आकर्षक खाद्य पदार्थ, महाराष्ट्राशी संबंधित माहिती, व्यवसायांची दालने उभारली होती. या भारावून गेलेल्या वातावरणात वसंतराव देशपांडे यांच्या गायकीचा वारसा पुढे नेणाऱ्या राहूल देशपांडे यांनी दिवाळी पहाटची ही मैफील अधिकच संस्मरणीय केली. 'अलबेला सजन आयो रे....' या भैरव रागातील सुरावटींनी राहूल यांनी सुरुवातीलाच श्रोत्यांच्या मनावर पकड घेतली. त्यांनी कट्यार मधील 'दिल की तपीश.....' हे गाजलेले गीत सादर केले. त्याच बरोबर ‘राधा धर मधू मिलिंद….जयजय’, ‘बगळ्यांची माळ फुले……’, ‘प्रथम तुला वंदितो……’ अशी एकाहून एक सरस गीते सादर करुन त्यांनी दाद मिळवली. सलग दोनदा 'वन्समोअर' घेणारे राहूल यांनी 'तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल.....' हा अभंग गाण्यास सुरुवात केली तेव्हा उन्हं बरीच वर आली होती. दिल्लीतील 'ऑक्टोबर हीट' चा प्रभाव जाणवु लागल्याने मैफील आवरती घ्यावी लागली. मधुरा दातार यांनीही ‘उगवला सूर्य पूर्व दिशा रंगली……’, ‘मी राधिका मी प्रेमिका…..’, ‘युवती मना….’, ‘तरुण आहे…..’ रात्र अजूनी सारखी गीते गाऊन आशा भोसलेंची आठवण ताजी केली. श्री गाडगीळ यांच्या खुमासदार निवेदनाने मैफिलीला चार चाँद लागले. राहूल यांचे दमदार सूर कानात साठवत दिल्लीकर रसिकजन घरी परतले.
लेखिका - निवेदिता मदाने-वैशंपायन, भ्र. क्र.०९९६८४११३९१ (लेखिका मुक्त पत्रकार आहेत)
माहिती स्रोत : महान्यूज
अंतिम सुधारित : 7/12/2020