অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

तरुण उद्योजक आनंद माहूरकर यांनी चोखाळली वेगळी वाट !

तरुण उद्योजक आनंद माहूरकर यांनी चोखाळली वेगळी वाट !

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘मेक इन इंडीया’ ची साद घातल्यानंतर महाराष्ट्र शासनानेही त्याला ‘मेक इन महाराष्ट्र’ ने प्रतिसाद दिला. गेल्या तीन वर्षाच्या काळात राज्यातील औद्योगिक वातावरणाला चालना मिळावी म्हणून राज्य सरकारने अनेक महत्वाची पावले उचलली आहेत. राज्यात स्टार्ट-अप कंपन्यांसाठी पोषक वातारण निर्माण करण्यात आल्याने अनेक परदेशी कंपन्यांनी राज्यात मोठी गुंतवणूक केली. याच सगळ्या गोष्टीचा परिणाम म्हणून आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारख्या क्षेत्रात जगभर ठसा उमटविलेले मूळचे भारतीय वंशाचे मराठी उद्योजक आनंद माहूरकर यांच्या ‘फाईन्डॲबिलिटी सायन्ससेस’ या कंपनीशी ‘सॉफ्टबँक’ या जपानी कंपनीने दि. 22 जुलै 2017 रोजी करार केला आहे. या करारांतर्गत औरंगाबाद शहरातील फाईन्डॲबिलिटी सायन्ससेस कंपनीत 50 कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. कामानिमित्त पुण्यात आलेल्या उद्योजक आनंद माहूरकर यांच्याशी बातचीत केल्यानंतर हा सर्व पट समोर आला. त्यांच्या थक्क करणाऱ्या प्रवासाबाबतची माहिती श्री. माहूरकर यांच्याच शब्दात...

माझे बारावी पर्यंतचे शिक्षण अंबेजोगाईत झाले. औरंगाबादच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून मी मेकॅनिकलची पदवी घेतल्यानंतर भारत फोर्ज, व्हिडीओकॉन यांसारख्या कंपनीत मी नोकरी केली. त्यानंतर मी बोस्टनला गेलो. त्याठिकाणी सॉफ्टवेअर कंपनीसाठी काम करू लागलो. या कंपनीचा व्यवसाय मी 25 कोटींवरून 350 कोटींवर नेला. अगदी नवीन ब्रँड असणाऱ्या कंपनीचा व्यवसाय आपण एवढा वाढवू शकतो तर आपण आपलीच कंपनी का काढू नये, असा विचार माझ्या मनात आला. त्यानुसार मी फाईन्डॲबिलिटी सायन्ससेस नावाची माझी स्वत:ची कंपनी अमेरिकेतल्या बोस्टन येथे सुरु केली.

माझी कंपनी मी स्वत:च्या पायावर उभी केली. त्यासाठी मी कोणाचीही मदत घेतली नाही. आपल्याकडे जीद्द, चिकाटी आणि क्षमता असली की आपण काहिही करू शकतो, हे मी माझ्या स्वत:च्या अनुभवावर सांगू शकतो. या माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आल्यावर आपल्या भारताचे एकही उत्पादन या क्षेत्रात नसल्याचे मला समजले. आपल्या भारतीय कंपन्या केवळ सेवा पुरविण्याचे काम करतात. त्यामुळे मी माझे स्वत:चे प्रोडक्ट तयार करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मी ‘आर्टिफिशीअल इंटेलिजन्स’ क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली.

आज या क्षेत्रात फाईन्डॲबिलिटी सायन्ससेस या आमच्या कंपनीने चांगले नाव कमविले आहे. अमेरिका, जपान आणि युरोपमधल्या मोठ्या कंपन्यांसह भारतातील विविध क्षेत्रातील मोठ्या कंपन्या आमच्या ग्राहक आहेत. मानवी बुद्धीला असणाऱ्या मर्यादा ओलांडण्याचे काम आमचे प्रोडक्ट करते. जगभरात घडणाऱ्या घडामोडी आणि मार्केटचे विश्लेषण करून आम्ही आमच्या ग्राहकांना अचूक सल्ला देतो. यात कोणतीही भविष्यवाणी नाही, तर अचूक विश्लेषणावर आधारीत आमचे काम चालते. त्यामुळे आमच्या प्रोडक्टला मागणी आहे. आमच्या प्रोडक्टचा ब्रँड हा फ्युचर ब्रँड आहे. त्याला मर्यादा नाही.

ते पुढे म्हणतात, अमेरिकेत माझ्या कंपनीचे काम चांगल्या प्रकारे सुरू आहे. मात्र मी केवळ 800 रुपयात माझे चार वर्षाचे अभियांत्रिकीचे शिक्षण औरंगाबादमधून त्याकाळी पूर्ण केले. त्यामुळे या समाजाचे आपण देणे लागतो ही भावना मला येथे काम करण्यास अधिक प्रेरणा देते. याच प्रेरणेतून मी औरंगाबाद येथे 2010 या वर्षापासून माझ्या कंपनीच्या माध्यमातून सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट सेंटर सुरू केले. पुणे-मुंबई सारखी समांतर आर्थिक क्षेत्रे इतर शहरात तयार झाली तर आपोआप त्याठिकाणी रोजगार निर्मिती होऊन पुणे-मुंबई शहरांवरील ताण कमी होऊन राज्यातील सर्व क्षेत्रांचा समतोल विकास हाईल.

मी औरंगाबाद येथून काम करण्यास सुरूवात केली, त्यावेळी सर्वच जण मला हसत होते. परंतु संगणक आणि चांगली इंटरनेट सेवा उपलब्ध असल्यास आपण कुठूनही काम करू शकतो, हे मी व माझ्या सहकाऱ्यांनी सिद्ध केले आहे. आज माझ्याकडे औरंगाबादच्या ऑफिसमध्ये 40 लोक काम करत आहेत. औरंगाबाद सारख्या शहरात मी माझे सुसज्ज असे कार्यालय सुरु केले आहे. भारतात खूप मोठे बौद्धिक सामर्थ्य आहे. युवकांजवळ असणाऱ्या बौद्धिक सामर्थ्याला चालना देण्याची आवश्यकता आहे. माझ्या कंपनीच्या माध्यमातून मी हा छोटासा प्रयत्न करत आहे.

हे सर्व करत असताना एक गोष्ट महाराष्ट्रात अत्यंत चांगल्या प्रकारे घडत आहे. नवीन उद्योगाला पोषक वातावरण आहे, हे मी आवर्जून सांगू इच्छितो. यामुळे नवउद्योजकांना चांगल्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्याने परदेशी गुंतवणूक राज्यात येण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. त्याचा चांगला परिणाम राज्यात दिसत असून परदेशी गुंतवणुकीचे प्रमाण वाढले आहे. या ठिकाणी उद्योग वाढल्यास आपल्या देशातील बौद्धिक संपदा याच ठिकाणी वापरली जाईल.

महाराष्ट्रात स्टार्ट-अप कंपन्यांसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. महाराष्ट्र हा औद्योगिक गुंतवणुकीसाठी अत्यंत सुरक्षित राज्य असल्याचा चांगला संदेश जगभरात गेला आहे. त्यामुळेच जपानच्या ‘सॉफ्टबॅक’ या कंपनीने आमच्या सोबत काम करण्याचा निर्णय घेतला. या कंपनीच्या एका शिष्टमंडळाने औरंगाबादला भेट दिली. गेल्या वर्षभरापासून ते याठिकाणचा सर्व्हे करत आहेत. त्यांना महाराष्ट्र गुंतवणुकीसाठी सुरक्षित वाटल्यानेच त्यांनी आमच्या सोबत 22 जुलै 2017 रोजी 50 कोटी रूपये गुंतवणुकीचा करार केला.

समाजाची सर्वांगीण प्रगती होण्यासाठी स्टार्ट-अप कंपन्यांच्या पाठीशी शासनाने ठामपणे उभे राहण्याची आवश्यकता आहे. सध्याच्या काळात महाराष्ट्रात या गोष्टी घडत आहेत, याचा मला अभिमान वाटतो. आपल्या देशातील नव उद्यमींना याचा लाभ झाला पाहिजे. राज्यातील तरुणांनी रोजगार शोधण्यापेक्षा रोजगाराची निर्मिती करण्यावर भर दिला पाहिजे. आपल्या राज्यातील वातावरण यासाठी अनुकूल आहे.

‘फाईन्डॲबिलिटी सायन्ससेस’ कंपनीच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स या कामाबाबत विचारले असता श्री.माहूरकर म्हणाले, ‘‘सोशल मीडिया अकाऊंट, कॉल रेकॉर्डींग, ई-मेल, सार्वजनिक वर्तन, आवड या सर्व गोष्टींचे विश्लेषण आम्ही करतो. याचा उपयोग कोणत्याही कंपनीसाठी त्यांचे ग्राहक शोधणे, ग्राहकांच्या गरजा ओळखणे यासाठी होतो. मानवी बुद्धीला मर्यादा असतात, त्या भेदून काम करण्याचे कसब या तंत्रज्ञानात आहे. याचा उपयोग मानवाचे आयुष्य अधिक सुकर करण्यासाठी होऊ शकतो. त्याच बरोबर आमची ग्राहक असणाऱ्या ॲल्युमिनीअम ट्रेडींग कंपनीला आम्ही बाजाराचा अभ्यास, बातम्या आणि स्थानिक परिस्थिती यांचे विश्लेषण करून ॲल्युमिनीअमच्या दराबाबत अंदाज देतो”.

त्याचबरोबर आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून कोणत्या व्यक्तीला कोणते कपडे, फॅशन सूट होईल, कोणती हेअर स्टाईल चांगली दिसेल याचीही माहिती देता येते. आंतरराष्ट्रीय पातळीवर वावरणाऱ्या अनेक महत्वाच्या व्यक्ती याचा वापर आपले व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी करतात. या क्षेत्राला चांगले भविष्य आहे. मानवी जीवनाच्या समृद्धीसाठी हे काम आम्ही करत आहोत. महाराष्ट्रातील तरुण उद्योजकांनी जोखीम पत्करून पुढे येण्याची गरज आहे. धाडस केल्याशिवाय हाती काही लागत नसते. फक्त आपल्यातील न्यूनगंड काढून पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.

-संग्राम इंगळे

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 7/4/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate