आदिवासी बहुल समाजाचं वास्तव्य असलेला जिल्हा गडचिरोली. त्यातच दुर्गम व डोंगराळ भागात वसलेलं कोरची- कुरखेडा मार्गावर पुराडा हे गाव. त्या गावातील एक मध्यमवर्गीय कुटूंब अनिल दादाजी डोंगरवार यांचं. वडिलोपार्जित मिळालेली एक एकर जमीन.. त्यात संसाराचा गाडा कसा हाकायचा हा प्रश्न ऐरणीवर होता. पण त्यांच्या अंगी असलेल्या कौशल्यावर अनिल यांनी मोजक्या तुटपूंज्या पैशात गावातच दुचाकी वाहन दुरुस्तीचं दुकान सुरु केलं.
दुकान म्हटलं तर तांत्रिक युगात मशिनरी वा साहित्य असल्याशिवाय दुकान चालणार नाही. आपलं भागणार नाही, आपली प्रगती होणार नाही, आपण समाजाच्या मुख्य प्रवाहात येणार नाही, याची जाणीव होताच त्यांनी सतत संपर्कात असलेले जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. शाखा रामगडचे व्यवस्थापक यांना आपली परिस्थिती विषद केली.
शाखेच्या व्यवस्थापकांनी डोंगरवार यांच्या अंगी असलेले कौशल्य, जिज्ञासू वृत्ती, सतत नवीन काहीतरी करण्याची धडपड लक्षात घेता दैनिक बचतीचे महत्व पटवून दिले. व्यवसायातून होणाऱ्या उत्पन्नातून अल्पबचतीचे खाते उघडायला सांगून अल्पावधीतच डोंगरवार यांनी 9-10 महिन्यात 45 हजार रुपये जमा केले. व्यवस्थापकांनी सुरुवातीला प्रगतीकडे पहिलं पाऊल टाकलेल्या डोंगरवार यांच्या जमा रकमेच्या दुप्पट कर्ज म्हणजेच 90 हजार रूपये मुद्रा कर्ज योजनेत उपलब्ध करुन दिले. डोंगरवार यांना मिळणारे उत्पन्न कमी असल्याने त्यांनी सदर व्यवसायाला जोड म्हणून स्पेअर पार्टस् ठेवायला सुरुवात केली. पुन्हा आर्थिक भांडवलाची गरज असल्याने बँकेने होतकरू बेरोजगाराला स्वत:च्या पायावर भक्कमपणे उभे राहण्यास मदत करुन तब्बल तीन लाख रुपयांचे दीर्घकालीन कर्ज उपलब्ध करुन दिले. तेव्हाच अल्पशा काळात अनिल डोंगरवार यांना खऱ्या अर्थाने बऱ्यापैकी मिळकत प्राप्त होऊ लागली.
आज डोंगरवार मोठ्या अभिमानाने सांगतात की, मुद्रा कर्ज योजनेच्या माध्यमातून जिल्हा बँकेच्या सहकार्याची साथ माझ्या सारख्या बेरोजगाराला मिळाली म्हणूनच मी पायी फिरणारा आज स्वत:चे दुचाकी वाहन घेऊन फिरु शकतो. स्वत:ची दुकानाची खोली तयार करु शकलो, मुलगा तालुक्याच्या ठिकाणी इंग्रजी शाळेत शिकतो. हे सारं शक्य झालं ते जिल्हा मध्यवर्ती बँकेने दिलेल्या साथीमुळे, सहकार्यामुळं. खरंच असे काम करीत असलेली बँक म्हणजे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक गडचिरोली जिल्ह्याची शान आहे, गौरवास्पद आहे, असे अभिमानाने सांगतो.
- प्रशांत दैठणकर
माहिती स्रोत: महान्युज
अंतिम सुधारित : 10/20/2019