आजही काही व्यवसाय तसेच नोकरी यांमध्ये पुरुषांची मक्तेदारी असल्याचे दिसून येते. अशा काही व्यवसायांमध्ये टॅक्सी चालक, रिक्षा चालकांचा समावेश आहे. पूर्वीच्याकाळी गावं लहान होती तेव्हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पायी सुद्धा जात येत होते. परंतु दिवसेंदिवस गावांचा, शहरांचा विकास होत आहे, वाढ होत आहे, उद्योगासाठी, कामासाठी लोकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावं लागत आहे. त्यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला टॅक्सी किंवा रिक्षाची गरज भासते. अशा वेळेस आपणास ओ... रिक्षा वाले काका... भय्या... दादा अशाच पद्धतीची हाक कानावर पडते. पण ह्याच हाकेमध्ये आता काकी, ताई, दिदी, मावशी अशा हाकेची सुद्धा मोठ्या प्रमाणावर भर पडते आहे. ठाणे शहरात अशाच हाकेला ओ देणारी रिक्षाचालक आहे ममता जैस्वार.. तिची ही यशोगाथा...
तसा पाहता रिक्षा चालकाचा व्यवसाय हा अत्यंत धाडसी आणि परिश्रमाचा आहे. त्यातूनही वाहन चालवताना अपघात होणार नाही याची सतत काळजी घ्यावी लागते. आणि म्हणूनच मला ठाण्यात रिक्षा चालवताना एक तरुणी दिसल्यावर तिच्याशी बोलल्यावाचून राहवलेच नाही. सुदैवाने माझ्याबरोबर बोलण्यासाठी या महिला चालक ममता जैस्वार हिनेही वेळ काढला आणि तिच्या बोलण्यातून तिचा आता पर्यंतचा जीवनप्रवास उलगडला.
ममता जैस्वार ही मुळची ठाण्यातीलच. तिचे वडील रिक्षा चालक असल्याने ती त्यांना लहानपणापासूनच रिक्षा चालवताना पाहायची. त्यातूनच तिला रिक्षा चालवण्याची आवड निर्माण झाली. खरं म्हणजे मुली कधी रिक्षा चालवताना दिसत नाहीत. ममताची रिक्षा चालवण्याची आवड ओळखून तिच्या वडीलांनी तिला रिक्षा चालवण्याचे प्रोत्साहन दिले. त्यामुळे ममता वयाच्या विसाव्या वर्षीच रिक्षा चालवायला लागली.
RTO कडे ज्यावेळेस ती रिक्षा चालविण्याचा परवाना घेण्यांसाठी गेली त्यावेळेस परिवहन अधिकाऱ्यांना देखिल एक मुलगी रिक्षा चालवण्याचं परवाना घेण्यासाठी आल्याचे पाहून आश्चर्य वाटले. रिक्षा चालवण्याची परीक्षा घेताना ममताने ज्या सराईत पणे रिक्षा चालवली ते पाहून परिवहन अधिकाऱ्यांना सुद्धा कौतुक वाटले आणि त्यांनी लगेचच रिक्षा चालवण्याचा परवाना ममताला दिला. ममताचे शिक्षण जरी दहावी पर्यंत झाले तरी रिक्षा चालवण्याच्या आवडीमुळे तिने हाच व्यवसाय निवडण्याचे धाडस केले आणि आज ती एक यशस्वी रिक्षा चालक म्हणून ओळखली जाते.
रिक्षा चालवताना आलेल्या अनुभवांविषयी बोलताना ममता म्हणते “महिला प्रवासी तर तिला प्राधान्य देतातच परंतु ही महिला रिक्षा चालक सुरक्षित पणे रिक्षा चालवेल की नाही अशी शंका देखिल मनात येऊ न देता पुरूष प्रवासी देखील माझ्या रिक्षात बसतात आणि माझ्यावर विश्वास दाखवतात, याचा मला खूप आनंद होतो.’’ मी मुलगी आहे म्हणून मी ओव्हरटेक करणं कधी कधी काही चालकांच्या पचनी पडत नाही. मुलगी असून ओव्हरटेक करते...? अशा अर्थाने गाडी चालवणाऱ्यांच्या नजरेतला विखार सहज वाचता येणारा असतो... असं देखिल ममता सांगते. तथापि, आजपर्यंत भेटलेले सर्वच प्रवासी चांगले होते, हे ममता कृतज्ञतेने नमूद करते.
रिक्षा चालकांची समाजात असलेली उद्धट वागणुकीची प्रतिमा बदलली गेली पाहिजे असे ममताला वाटते. त्यामुळे ती स्वतः सर्वच प्रवाशांशी सौजन्याने वागते, बोलते. रिक्षात लहान मुलं अथवा ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यांच्याशी ती अत्यंत प्रेमाने वागते. काही महिला तिच्याच रिक्षा मधूनच प्रवास करायला प्राधन्य देतात तर, काही महिला तिचं कौतुकही करतात. ममताच्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा.
लेखक - सिद्धी बोबडे
स्त्रोत - महान्युज
अंतिम सुधारित : 7/28/2023