অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ग्रामसेविकेच्या ‘गुड मॉर्निंग’चा प्रभाव, धारणगाव झाले हागणदारीमुक्त

ग्रामसेविकेच्या ‘गुड मॉर्निंग’चा प्रभाव, धारणगाव झाले हागणदारीमुक्त

सिन्नर तालुक्यातील धारणगाव ग्रामसेविका वनिता वर्पे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हागणदारीमुक्त झाले आहे. महिला असूनही पहाटे ग्रामस्थांच्या प्रबोधनासाठी वर्पे यांनी केलेले प्रयत्न ग्रामस्थांच्या कौतुकाचा विषय ठरले आहेत.

वनिता वर्पे या 2003 मध्ये ग्रामसेविका पदावर सोनारी येथे रुजू झाल्या. आपले बाळ सव्वा महिन्याचे असूनही रुजू होताच त्यांनी गाव हागणदारीमुक्त करण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यासाठी अनेकदा रात्रीच्या ग्रामसभादेखील घेतल्या. मात्र त्यांच्या प्रयत्नांना मर्यादित यश आले. मात्र त्याचवेळी त्यांनी एकतरी गाव पुर्णत: हागणदारीमुक्त करण्याचा निश्चय त्यांनी केला.

धारणगाव येथे जून 2016 मध्ये रुजू झाल्यानंतर त्यांनी या समस्येकडे प्राधान्याने लक्ष दिले. त्यावेळी 192 पैकी 81 कुटुंबांकडे शौचालय होते. बैठका घेतल्यानंतर नागरिक शौचालय बांधण्यासाठी होकार देऊ लागले, मात्र कृती होत नव्हती. त्यावर ‘गुडमॉर्निंग’ पथकाची कल्पना त्यांनी सुरू केली. त्यासाठी गावातील महिला आणि पुरुषांना एकत्रित केले.स्वत: वनिता पहाटे साडेतीन वाजता उठून घरातली कामे करीत साडेपाचला गावात पोहोचायच्या. उघड्यावर विधीसाठी जाणाऱ्या लोकांना गाठून त्यांना गुलाबाचे फुल दिले जायचे. समोरच्या व्यक्तीला या प्रकाराची चीड आल्यास शौचालय लवकर बांधले जातील या हेतूने त्यांनी महिला पथक पुरुषांना आणि पुरुष पथक महिलांना ‘गुड मॉर्निंग’ करेल, अशी नामी शक्कम लढवली आणि त्यात त्यांना यश आले.

या पथकाद्वारे उघड्यावर विधीसाठी जाणाऱ्यांचे फोटोदेखील काढले जायचे. त्यामुळे नागरीक आपल्या भावना तिव्रपणे व्यक्त करीत होते. मात्र त्यांच्याकडे वनिता यांनी दुर्लक्ष केले. हे सर्व सुरू असताना ग्रामस्थांचे प्रबोधनही सुरू होते. अखेर ग्रामस्थ शौचालय बांधण्यासाठी तयार झाले. आशाबाई काळे यांच्यासारख्या गरीब महिलेला प्रसंगी सर्व सहकार्य करून प्रत्येक घरात शौचालय होईल याची खबरदारी घेण्यात आली. सरपंच जीजाबाई शेळेके, जयाबाई वाळेकर, उपसरपंच दिपक शिसोदे यांनी त्यासाठी चांगले सहकार्य केले. पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनीदेखील वनिता यांना सातत्याने प्रोत्साहन दिले.

गावातील वयोवृद्ध शिक्षक भालचंद्र पाटील यांच्याकडे कागदपत्रे नसल्याने ते शौचालय बांधू शकत नव्हते. ग्रामपंचायतीने स्वत:चे नवे शौचालय बांधण्याऐवजी त्याचे नुतनीकरण करून उरलेल्या रकमेत गुरुजींचे शौचालय बांधण्याचा निर्णय घेतला आहे. हागणदारीमुक्तीच्या निमित्ताने गाव एकत्र आल्याने करवसुली 100 टक्के झाली आहे. गुडमॉर्निंग पथकाचे काम संपल्यानंतर वसुलीचे काम केले जात असे. गावाने लावलेली 100 पैकी 75 झाडे जगवली आहेत. मार्चअखेर हागणदारीमुक्त झालेले हे गाव आता विकासाच्या विविध योजना राबविण्यासाठी पुढे सरसावले आहे.

वनिता वर्पे-ग्रामसेवक झाल्यानंतर गाव हागणदारीमुक्त करण्याच्या स्वप्नाने झोप येऊ दिली नाही. ग्रामस्थ सकाळी गावात गेल्यावर ‘पुढच्या वेळी पथक आले तर गोटे मारू’ असे सांगायचे. त्यावर प्रत्युत्तरादाखल ‘एक खडा तर मारून पहा’ असे ठणकावून सांगितले. मात्र नंतर याच ग्रामस्थांनी चांगले सहकार्य केले आणि एकदिलाने काम केल्याने गाव हागणदारीमुक्त झाले. आज स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद आहे. महिला आहे म्हणून कामाला मर्यादा असतात असे मला कधीच वाटले नाही.

जीजाबाई शेळके, सरपंच-लहान-मोठ्यांना शौचालयाचा चांगला उपयोग झाला आहे. विशेषत: महिलांना आत बाहेर जावे लागत नाही. सुरुवातीला महिला ऐकायच्या नाहीत. मात्र आता सर्वांना समस्या सुटल्याचा आनंद आहे. गावातल्या नसुनही वनिताताईंनी केलेल्या कामाचे सर्वांना कौतुक आहे.

लेखक- डॉ. किरण मोघे,
जिल्हा माहिती कार्यालय, नाशिक

स्त्रोत - महान्युज

अंतिम सुधारित : 8/20/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate