অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

खादी ग्रामोद्योगाच्या सहकार्याने अभियंता पवार झाले उद्योजक

खादी ग्रामोद्योगाच्या सहकार्याने अभियंता पवार झाले उद्योजक

शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन युवकांनी व्यवसायाला चालना दिल्याचे अनेक उदाहरणे आहेत. नोकरी करणे येवढाच पर्यांय नसून विविध क्षेत्रात भरीव काम करूनही समाधान मिळविता येते. त्यामुळे कोट्यवधीचे पॅकेज सोडून आपला व्यवसाय सुरु करण्याची, त्यातून इतरांनाही रोजगार उपलब्ध करुन देण्याची धमक युवा पिढीमध्ये आहे. असेच एक उदाहरण म्हणजे रत्नागिरी जिल्हयातील सुनिल महिपती पवार यांचे.. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाने अशा मेहनती अभियंत्याला स्वत:चा उद्योग स्थापनासाठी प्रोत्साहन व सहकार्य दिल्यामुळे एका अभियंत्याला उद्योजक होता आले.या यशस्वी अभियंता उद्योजकांची ही यशकथा...

अभियंता म्हणून कंपनीत अधिकारी असतानाही आपल्याला एक यशस्वी उद्योजक व्हायचंय हे पवार यांनी स्वप्न बाळगले. हेच स्वप्न त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. त्या अनुषंगाने वेगवेगळया उत्पादनाचा अभ्यास, इंटरनेटव्दारे आणि वेगवेगळया प्रदर्शनांना भेटी देऊन, वेगवेगळया उद्योगांविषयी चर्चा करुन घ्यायचा प्रयत्न सतत चालू होता. तुम्ही संधी शोधण्याची वाटचाल सुरु केलीत तर अनेक संधी सुध्दा तुमच्या दिशेने वाटचाल करण्यास सुरुवात करतात याची प्रचिती मला माझ्या बाबतीत आली असे आत्मविश्वासाने सागंत होते गाने खडपोली ता. चिपळूण जि. रत्नागिरी येथिल सुनिल महिपती पवार..त्यांच्याच शब्दांत त्यांची ही वाटचाल.

त्यावेळी काही मोजक्याच कंपनीमध्ये बॉयलर साठी इंधन म्हणून ऑईल, कोळसा, डिझेल ऐवजी बायोमास ब्रिकेट हे ॲग्रोफॉरेस्ट्री वेस्ट पासून बनविलेल्या इंधनाचा वापर सुरु करण्यात आला होता. आमचे त्यावेळचे कंपनीस्थित डायरेक्टर लेफ्ट. कर्नल सेनगुप्ता, प्रॉडक्शन मॅनेजर डोलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे इंधन आमच्याही कंपनीत वापरण्यास सुरुवात केली. सतत वर्षभराच्या वापरानंतर ऑईलच्या तुलनेत या ब्रिकेटसच्या वापरामुळे काय फायदा झाला याचा अभ्यास करण्यात आला. असे लक्षात आले की इंधनाच्या खर्चामध्ये जवळ जवळ 40 टक्के बचत होत आहे. ऑईलच्या तुलनेत प्रदुषणही नाही. असे दोन महत्वाचे फायदे या इंधनामुळे दिसून आले. यातून पुढेही अभ्यास सुरु केला.

या नव्या उद्योगासाठी लागणारी सर्व माहिती कच्चा माल, त्याची उपलब्धता, लागणाऱ्या मशिनरीज, कामगार उपलब्धता, भाग भांडवल, याचा सर्वंकष अभ्यास करुन खादी ग्रामोद्योग मंडळाच्या चिपळूण शाखेत कार्यरत असलेले सचिव तुळशीदास गावडे साहेब यांना भेटलो. त्यांनी तत्परतेने पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेची माहिती दिली. त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले. तत्कालीन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी रमेश सुरुंग यांचे मार्गदर्शनही लाभले. यातूनच 2010 मध्ये बायोमास ब्रिकेट उत्पादनाचा व्यवसाय सुरु केला. व्यवसाय सुरु असताना वेळोवेळी या दोन्ही अधिकाऱ्यांनी भेट देऊन मार्गदर्शन अथवा काही अडचण येत नाही ना याची काळजी घेतली, याचा विशेष उल्लेख करावासा वाटतो.

प्रत्येक व्यवसाय सुरु करीत असताना सुरुवातीची काही वर्षे तुम्हाला असंख्य अडचणींना सामोरे जावेच लागते . किंबहुना तशी मानसिकता ठेवूनच उद्योजक व्हावे असे मी म्हणेन, उद्योग उभारताना भागभांडवल उभा करणे हा महत्वाचा टप्पा असतो. त्यासाठी आपले नातेवाईक, मित्रमंडळी व बँकेचे अधिकारी फार महत्वाची भूमिका पार पाडत असतात. बँक ऑफ महाराष्ट्राचे लिमये यांनी या नवीन प्रोजेक्टची अतिशय आत्मीयतेने दखल घेऊन बँकेकडून अर्थसहाय्य केले.अर्थसहाय्य मिळताच केवळ तीन महिन्यात त्यांच्याकडे उत्पादन घेऊन गेलो. त्यावर त्यांनी माझ्या हाताला धरुन बाहेर आणत...सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना उद्देशून सांगितले. ...'आपण यांना तीन महिन्यापूर्वी अर्थसहाय्य केले व यांनी इतक्या कमी वेळात त्याचे हे (बाळ) प्रॉडक्ट आपणांला आणून दाखवलयं.', गहिवरुन टाकणारा प्रसंग होता तो.

दोन वर्षापूर्वी ब्रिकेट उत्पादनास पुरक असा बायोस्टोव्ह उत्पादनाचा व्यवसाय सुरु केला व त्यासाठी पुण्यातील नेचर कनेक्ट इंडिया प्रा. लि. चे डायरेक्टर जयंत सरनाईक, सौ. गोडबोले मॅडम यांनीही मार्गदर्शन केले. खादी ग्रामोद्योगचे अधिकारी मोहित यांनी या बायोस्टोव्हच्या मार्केर्टींगसाठी मंडळामार्फत वेगवेगळे प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन दिले. व्यवसायाला वेळोवेळी भेट देऊन व संपर्क ठेवून सतत प्रोत्साहीत करत असतात.पत्नी विद्या आपली अधिकारी पदाची असलेली नोकरी व दोन्ही मुलींचा सांभाळ यातून मला व्यवसायात सर्वार्थाने मदत करत असते, ती फारच मोलाची वाटते. कंपनीच्या यशस्वी वाटचालीत सर्व कर्मचारी वर्ग, अधिकारी वर्ग यांचे खूपच योगदान आहे. आज माझ्या उद्योगामुळे 20-25 लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. यातही खूप मोठ समाधान आहे. या व्यवसायात खादी ग्रामोद्योगाचा सिंहाचा वाटा आहे, हे नमूद करतानाही मला अभिमान वाटतो आहे.

लेखक - राहूल भालेराव

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 4/24/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate