अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील थाटे (वाडगाव) येथील केशरबाई तोलाजी दराडे यांनी पाझर तलावात गेलेल्या जमिनीचा मोबदला मिळावा म्हणून 'आपले सरकार' या वेबपोर्टलवर तक्रार केली. मुख्यमंत्री कार्यालयाने त्याची तात्काळ दखल घेत मंत्रालय ऑनलाइन लोकशाही दिनात त्यांच्या तक्रारीचा समावेश केला. व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे होणाऱ्या या लोकशाही दिनामध्ये मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशामुळे तात्काळ कार्यवाही झाली. यानंतर या महिलेस जमिनीचा मोबदला म्हणून 33 लाख 76 हजार 699 रुपये देण्यात आले.
‘उशिरा का व्हईना न्याय मिळाला...माला यातच आनंद हाये’ अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त करताना 79 वर्षीय केशरबाईच्या एका डोळ्यात हासू, दुसऱ्या डोळ्यात आसू आणि चेहऱ्यावर समाधान दिसत होते. एक प्रदीर्घ लढाई जिंकल्याचा आनंद त्या व्यक्त करत होत्या.
राज्यातील सर्वसामान्य नागरिकांचा दैनंदिन जीवनात प्रशासनाशी संबंध येत असतो. या नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवा अधिक गतिमान आणि सुलभ होण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाची जोड या सेवांना देण्यात आल्यामुळे जलद आणि पारदर्शक सेवा देण्यात यश मिळत आहे. लोकाभिमुख आणि जबाबदार प्रशासन हा शासनाचा जिव्हाळ्याचा आणि प्राधान्याचा विषय राहिला आहे. त्यामुळेच सेवा हमी कायद्याची अंमलबजावणीसह इतर अनेक महत्त्वाच्या सेवा ऑनलाईन देण्यास प्रारंभ झाला आहे. या ऑनलाईन सेवेमुळे गतिमानता आणि सर्वसामान्यांना दिलासा मिळत आहे. याचे एक प्रातिनिधीक उदाहरण म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील 79 वर्षीय वृद्धेस मिळालेला न्याय.
केशरबाईंचे पती तोलाजी तात्याबा दराडे यांची मौजे वाडगाव शिवारातील गट नं 331/14 क्षेत्र 1.99 हे. आर ही जमीन 1977 साली झालेल्या पाझर तलावात गेली. त्यावेळी दराडे कुटुंबीय उपजीविकेसाठी स्थलांतरित झाले होते, त्यामुळे भूसंपादन प्रक्रियेविषयी त्यांना कोणतीही माहिती नव्हती. मूळ गावी परतल्यानंतर तलावाविषयी माहिती मिळाली. पण तोपर्यंत भूसंपादन आणि निवाड्याची प्रक्रिया पूर्ण झालेली होती. त्यानंतर 1984 ते 1995 वेळोवेळी पत्रव्यवहार व चौकशी करून पाठपुरावा केला. तत्कालीन जिल्हा परिषद सदस्या कमल विनायक खेडकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 2006 साली उपोषण केले. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी व पंचनामा करण्यात आला. त्यामध्ये जमीन गट नं 331/14 क्षेत्र 1.99 हे. आर प्रत्यक्ष तलावात गेलेले आढळून आले व त्यांनी नवीन प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले. 2007 मध्ये हा प्रस्ताव विशेष भूसंपादन अधिकारी कार्यालयाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवल्याचे जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंत्यांनी कळवले. पण त्यानंतर नेमकी काय कार्यवाही झाली याची माहिती मिळाली नाही.
दरम्यान, तोलाजी तात्याबा दराडे यांचे 2007 मध्ये आजारपणामुळे निधन झाले. 2015 मध्ये मोठा मुलगाही (बाबासाहेब) मयत झाला. केशरबाईंकडे मोलमजुरीशिवाय दुसरा कोणताही पर्याय राहिला नाही. कमल विनायक खेडकर, विकास खेडकर यांच्या मदतीने त्यांनी विविध स्तरावर पाठपुरावा केला. याच दरम्यान, विकासला ‘आपले सरकार’ या पोर्टलबद्दल माहिती मिळाली. एक आशेचा किरण दिसला. त्यांनी मे 2016 मध्ये ऑनलाईन तक्रार दाखल केली. मुख्यमंत्री कार्यालयाने तात्काळ या प्रकरणाची दखल घेत त्यांच्या तक्रारीचा समावेश मंत्रालय लोकशाही दिनामध्ये करण्यात आला. लोकशाही दिनामध्ये मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले. जिल्हाधिकारी अहमदनगर आणि विभागीय आयुक्त नाशिक यांनी आवश्यक ती कार्यवाही केली. केशरबाईंच्या बँक खात्यावर पाझर तलावात गेलेल्या जमिनीचा मोबदला म्हणून 33 लाख 76 हजार 699 रुपये नुकतेच जमा करण्यात आले. सुमारे 40 वर्षांपूर्वीचे भूमिसंपादनाचे प्रकरण मार्गी लागले.
‘शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य’ ही केवळ उक्ती नव्हे तर कृतीतून दाखवून देण्यात आले. माहिती-तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून वंचिताना न्याय मिळवून देणारी ही बाब निश्चित आनंददायी आहे.
लेखक : दीपक चव्हाण
माहिती स्रोत : महान्यूज
अंतिम सुधारित : 8/13/2020