जालना जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्यातील डोंगरगाव. गावातील नागरिकांचा मुख्य व्यवसाय हा शेतीच. तथापि, शेतीला अन्य व्यवसायाची जोड देणे ही काळाची गरज बनली आहे. अत्यल्प शिक्षण, उद्योग, व्यवसायाचा अनुभव नसतानाही केवळ इच्छाशक्ती, चिकाटी व जिद्दीच्या जोरावर याच गावातील ईश्वरदास घनघाव यांनी शासनाच्या कृषी उद्योजकता विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून अनुदान घेऊन केळीपासून चिप्स बनविणारा प्रक्रिया उद्योग सुरु केला आहे. स्वत:बरोबरच इतरांनाही रोजगार देऊन त्यांनी वार्षिक 20 ते 25 लाख रुपयांची उलाढाल करणारा प्रक्रिया उद्योग सुरू करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
डोंगरराव येथील ईश्वरदास घनघाव यांना उद्योगाचे कुठलेही ज्ञान नव्हते. केवळ काहीतरी करुन दाखविण्याच्या जिद्दीने त्यांनी खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्रात या उद्योगाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. तसेच मराठवाडा कृषी विद्यापीठातून फळे व भाजीपाल्यावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगाचे संपूर्ण प्रशिक्षण घेऊन आपल्या शेतातच केळीवर प्रक्रिया करुन त्यापासून चिप्स बनविण्याचा उद्योग सुरु केला. या उद्योगामध्ये सुरूवातीला घनघाव यांना मोठ्या प्रमाणात अडचणी आल्या. घरातीलच भाजी करण्याची कढई व घरातीलच स्वयंपाक करणारी चूल या सहाय्याने ते चिप्स बनवत होते. यासाठी लागणारी हिरवी केळी जालना येथील बाजारामधून विकत घेऊन त्याच्या साली काढून किसणीच्या सहाय्याने चिप्स बनवणे, चिप्स तळणे, त्यावर मसाला टाकणे व नंतर हातानेच पॅकींग करणे आदी कामांसाठी अधिक प्रमाणात वेळ लागत होता. परंतू 2016-17 या आर्थिक वर्षामध्ये कृषी उद्योजकता विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून श्री. घनघाव यांनी या प्रक्रिया उद्योगासाठी अनुदान मिळण्याबाबत अर्ज सादर केला आणि व्यवसाय करण्याची त्यांची जिद्द, चिकाटी पाहून त्यांना या कार्यक्रमांतर्गत 10 लक्ष रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले. तेव्हापासून खऱ्या अर्थाने त्यांच्या या प्रक्रिया उद्योगास भरभराटी आली.
श्री. घनघाव यांना कृषी उद्योजकता विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून उद्योगाच्या बांधकामासाठी चार लक्ष तर आधुनिक मशिनरीजसाठी सहा लक्ष रुपयांचे अनुदान देण्यात आले. या अनुदानातून घनघाव यांनी अत्याधुनिक मशीनच्या सहाय्याने दर ताशी एक हजार 500 चिप्सच्या पॅकेटची निर्मिती करतात. घरातील साहित्याच्या सहाय्याने सुरू केलेल्या व्यवसायाचे शासनाने दिलेल्या अनुदानामुळे मोठ्या व्यवसायामध्ये रुपांतर झाले. या व्यवसायाच्या माध्यमातून वर्षाला 20 ते 25 लाख रुपयांची उलाढाल होऊन स्वत:बरोबरच त्यांनी अनेक बेरोजगारांना या उद्योगामधून रोजगार मिळवून दिला आहे.
श्री. घनघाव यांनी केळीपासून उत्पादित केलेल्या चिप्सला मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणात मागणी असून त्यांचा माल औरंगाबाद, बीड, परभणी, जालना, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोलीसह मराठवाड्यातील इतर जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात विकला जातो.
या उद्योगामुळे घनघाव यांच्या कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावून मुलांना उच्च शिक्षण देता आले. त्यांच्या मुलाने एमबीएचे शिक्षण पूर्ण केले असून या शिक्षणाचा उपयोग शेतपिकावर आधारित प्रक्रिया उद्योग वाढविण्यासाठी करण्यात येणार आहे. बाजारामध्ये मिळणाऱ्या 250 प्रकारच्या नमकीनचे उत्पादन करुन ते बाजारामध्ये विकण्याचा श्री. घनघाव यांचा मानस आहे.
समाजामध्ये आजघडीला अनेक बेरोजगार तरुण आहेत. शासनाच्या अनेक कल्याणकारी योजना आहेत. तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा व उद्योग उभारून स्वत:च्या पायावर उभे राहावे. जालना जिल्ह्यात फक्त आवळा व केळी या फळपिकांवरच प्रक्रिया करणारे उद्योग असून इतरही फळपिकावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगाची उभारणी करण्यासाठी जिल्ह्यात मोठा वाव आहे. जिद्द, चिकाटी व मेहनत करण्याची तयारी असल्यास आपण स्वत:साठी पैसा तर कमवू शकतोच त्याचबरोबर रोजगार निर्मितीही करू शकतो, असा विश्वास श्री. घनघाव यांनी व्यक्त केला आहे.
-अमोल महाजन
माहिती स्रोत: महान्युज
अंतिम सुधारित : 2/19/2020