काही माणसं जशी स्वकष्टातून उभी राहिलेली असतात तशीच काही गाव ही एखाद्याचं प्रेरणादायी नेतृत्व मान्य करीत, त्याला पाठिंबा देत कष्ट उपसतात आणि या सगळ्याच्या एकत्रित प्रयत्नातून उभं राहातं एक आदर्श गाव. अशाच कष्टातून उभ्या राहिलेल्या आणि विकासाच्या उर्जेने स्वंयप्रकाशित झालेल्या वाशिम जिल्ह्यातील जांभरूण महालीची ही गोष्ट.
काही वर्षांपूर्वी या गावाचं चित्र ही इतर गावांपेक्षा वेगळं नव्हतं. उघडी गटारे, चिखलाने भरलेले रस्ते, आपसी हेवेदावे यानं हे गाव ही ग्रासलं होतं. पण पांडुरंग महाले नावाच्या एका गावकऱ्यानं गावाचं हे रुप बदलून टाकायचं ठरवलं आणि त्याच्यापाठीशी ठाम उभं राहून अख्ख्या गावानं त्याला साथ दिली.
अवघ्या 303 उंबरऱ्याचं आणि 1899 लोकसंख्येचं हे गाव. वाशिमपासून 16 कि.मी अंतरावरच्या या गावाचा मुख्य व्यवसाय शेती. सोयाबीन, कापूस, तुर, भाजीपाला ही गावची पिकपद्धत. गावात 3 लघु पाणी पुरवठा योजना 5 विहिरी आणि 8 बारमाही हातपंपासह एक विंधन विहिर आहे तर गावात एकूण 46 पथदिवे आहेत त्यातील 16 दिवे सौरउर्जेवरचे. 10 बायोगॅस सयंत्र असलेल्या या गावात 9 बचतगट स्थापन झाले असून त्यातून गावातील महिलांनी स्वंयरोजगाराची वाट चोखाळली आहे. गावात पहिली ते सातवीपर्यंतची जिल्हा परिषदेची शाळा असून 2 अंगणवाड्या आहेत. सौ. मायावती बाळुभाऊ खडसे या महिला सरपंचाच्या आणि अरविंद पडवान या ग्रामसेवकाच्या नेतृत्वाखाली गाव प्रेरणादायी वाटचाल करीत असले तरी या सर्व पायाभरणीत गावकऱ्यांचा सहभागही तितकाच मोलाचा आहे.
ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक अविरोध संपन्न करणाऱ्या गावाची प्रकाशवाट खुपच सुंदर आणि कौतूकास्पद आहे. गावानं श्रमदानातून रस्त्यावरील अतिक्रमणं दूर करीत शेत तेथे शिवार रस्ते बांधले. उत्पन्नाच्या एक टक्का एवढी रक्कम एकत्र करून श्री. जंबुकेश्वर या मंदिराची भव्य उभारणी केली तशीच हणुमान मंदिराचीही. जलस्वराज्य प्रकल्पांतर्गत 10 टक्के लोकसहभागातून पाणी स्त्रोताचे बळकटीकरण करीत गाव पाण्याच्यादृष्टीने स्वंयपूर्ण केले. अशाच पद्धतीने गावातील तलावाचे खोलीकरण आणि रुंदीकरण करण्यात आले. श्रमदान आणि लोकवर्गणीतून 2.5 कि.मी पाणंद रस्त्याचे काम पूर्ण करतांना गावानं गावातील मोठी घरं आणि शासकीय इमारती यावर शिवकालीन पाणी साठवण योजनेचा वापर करीत पडणाऱ्या पावसाचे संकलन केले, त्यातून विहिरींचे पुनर्भरण.
गावच्या सभोवताली पावसाचं पाणी पडायचं आणि वाहून जायचं त्यामुळे जमीनीची धूपही व्हायची. हे थांबविण्यासाठी गावानं 45 हेक्टर जमीनीवर सलग समतल चराचे काम श्रमदानातून केले. एक मीटर खोल आणि एक मीटर रुंद असे शेकडो समतल चर या जमीनीत खणल्या गेल्याने पाणी साठून जमीनीत मुरण्यास मदत झाली. कधीकाळी 20 टक्के सिंचनाखाली असलेले गाव आता 80 टक्क्यांच्या आसपास सिंचनाखाली आलं. भूमीगत गटारातून प्रत्येक घराचं सांडपाणी गावाबाहेर नेण्यात आलं असून ते पुन्हा जमीनीत मुरवले जात आहे.
नळ योजनेची देखभाल दुरुस्ती गावकऱ्यांनी आपापसात वाटून घेतली आहे. जनावरांसाठी पाण्याचा हौद, वनराई बंधारे यातून गावकऱ्यांनी गावाच पाणी गावातच अडवलं. त्याचा चांगला परिणाम आता पाणीटंचाईच्याकाळातही दिसून आला. टंचाईच्याकाळातही गावात पाण्याचं दुर्भिक्ष जाणवलं नाही. गाव हिरवगारं राहिलं.
गाव एका गुलाबी रंगात रंगले असून ऐक्याचा हा धागाच गावाला महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम अभियानात बक्षीस देऊन गेला. आज गावातील प्रत्येक घरावर पुरुषांप्रमाणेच बाईचीही मालकी आहे. तशी नावाची पाटी प्रत्येक घरावर झळकत असून शेडनेतची शेती असणारं आणि कमी जागेत आणि कमी पाण्यात अधिकाधिक पिक घेणारं गाव म्हणून गावानं आपली स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. गावात शेळी-कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय अशा शेतीपूरक व्यवसायाला चालना देण्यात आली असून गावात पूर्ण दारुबंदी आहे. गावाचा विकास झाला की स्वाभाविकच गावकऱ्यांचाही होतो. तसच जांभरूण महालीचंही झालं. केलेल्या विकासकामांमुळे गावाचे दरडोई उत्पन्न तर वाढलेच पण गावकऱ्यांच्या राहणीमानात सुधारणाही झाली.
गावाला अस्पृश्यता निवारण पुरस्कार, आदर्श गाव पुरस्कार, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानातील जिल्हा स्तरीय प्रथम पुरस्कार, जिल्हा परिषद प्रा. शाळेला सानेगुरुजी आदर्श शाळा पुरस्कार, निर्मलग्राम पुरस्कार, जिल्हा परिषदेचा जलमित्र पुरस्कार, वसंतराव पाईक सांडपाणी व्यवस्थापन विभागीय पुरस्कार, महात्मा गांधी तंटामुक्त गाव पुरस्कार, श्री. जंबुकेश्वर शेतकरी मंडळाला नाबार्ड अंतर्गत रज्यस्तरीय पुरस्कारअशा विविध पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
ग्रामविकासाचा कळस असं ज्या योजनेचं वर्णन केलं जातं त्या पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेत गावानं सहभाग घेतला आणि गावाला पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकासाची दिशा मिळाली. गावानं योजनेतील तीनही वर्षाचे निकष पहिल्याचवर्षी पुर्ण केले. त्यासाठी गावाचा तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते पर्यावरण विकासरत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. योजनेअंतर्गत गावात जवळपास सात हजार झाडं लावली गेली त्यातील 5 हजाराच्या आसपास झाडं जगली आहेत. घरपट्टी-पाणीपट्टी यासारखी ग्रामपंचायतीची करवसुली 93 टक्क्यांच्या आसपास गेल्याने ग्रामपंचायत आर्थिकदृष्टया सक्षम झाली आहे. गावातील जवळपास सर्व रस्ते सिमेंट काँक्रिटचे आहेत.
गाव विकासाच्या विविध योजना राबवल्या तसे फलितही दिसून येऊ लागले. गावाचं रुप बदलत असतांना अनेक नाविन्यपूर्ण कल्पना गावानं राबविल्या. यात गावाचा वाढदिवस करण्यापासून ते गावातील सुनांचा आणि जेष्ठ मातांचा सत्कार करण्यापर्यंतच्या कल्पनांची अंमलबजावणी सुरु झाली. एक गाव एक गणपती, एक गाव एक दुर्गा, पर्यावरण संतुलित होळी, वृक्षांचे वाढदिवस यासारख्या नाविन्यपूर्ण कल्पनांबरोबर गावातील सणवार- यात्रा-जत्रा, जयंत्या या सर्व प्रसंगाना लोक एकत्र येऊन ते सार्वजनिकरित्या साजरे करू लागले.
जांभरूण महाली गावानं थक्क करणारी प्रगती केल्याने महाराष्ट्र राज्य पाठ्य पुस्तक मंडळाने याची दखल घेत बारावीच्या नवीन अभ्यासक्रमाच्या इंग्रजी पुस्तकात " टुवर्डस् आयडियल व्हिलेजेस्" या पाठात जांभरूण महाली या गावाचा उल्लेख केला आहे.. गावाची ही पॉझेटिव्ह एनर्जी इतरांनाही मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरत असून यशाने हुरळून न जाता साध्य केलेला विकास टिकून कसा राहिल, नवीन काय प्रगती करता येईल याचा गावाला आणि गावकऱ्यांना सतत ध्यास असल्याने आदर्श जांभरुण महाली गाव विकासात अग्रेसर आहे आणि राहील यात शंका नाही.
लेखिका : डॉ. सुरेखा म. मुळे
स्त्रोत: महान्यूज
अंतिम सुधारित : 11/27/2019