उस्मानाबाद जिल्ह्यातील अगदी छोटेसे गाव हिंगलजवाडी. या गावातील एक महिला स्वतःच्या कर्तृत्वातून न्यूयॉर्क असा प्रवास करते आणि ग्रामीण महिलांचे प्रेरणास्थान बनते. घरातील अठराविश्व दारिद्र्यावर मात करून स्वतःच्या विकासाबरोबरच चार हजाराहून अधिक महिलांना आत्मनिर्भर करते. तिच्या या कर्तृत्वाची दखल देशाच्या विकासाचे नियोजन करणाऱ्या ‘निती आयोगाकडून’ घेतली जाते आणि या महिलेस वुमेन ट्रान्स्फॉर्मिंग इंडिया ॲवार्ड (Women Transforming India Award) या पुरस्काराने गौरविते. त्या महिलेचे नाव आहे ‘कमल कुंभार’
नीती आयोगाने यावर्षी देशभरातील सहा कर्तृत्वान महिलांना ‘वुमेन ट्रान्स्फॉर्मिंग इंडिया’ या पुरस्काराने गौरविले आहे. कमल कुंभार या त्यापैकीच एक आणि एकमेव आणि पहिल्या महाराष्ट्रीयन ठरल्या. घरातील दारिद्र्य दूर व्हावे आणि आपण आत्मनिर्भर व्हावे या ध्येयाने पछाडलेली ही महिला सुरुवातीला बांगड्या विकण्याचे काम करू लागली. परंतु म्हणावे तितके उत्पन्न त्यातून मिळत नव्हते. आपण कुक्कुटपालन सुरू करावे असा विचार त्यांच्या मनात आला आणि इथूनच त्यांच्या आयुष्याला एक दिशा मिळाली. घरची केवळ एक एकर शेती होती, परंतु कृषिपूरक उद्योग करायचे तर शेती आवश्यक होती. मग त्यांनी करार तत्वावर पाच एकर शेती घेतली व कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला. त्यांच्या या प्रयोगाला स्वयंम शिक्षण प्रयोग या स्वयंसेवी संस्थेने मदतीचा हात दिला. कडकनाथ या प्रजातीच्या कोंबडी पालनाचा व्यवसाय सुरू केला. या कोंबडीचे एक अंडे 50 रुपयाला विकले जाते तर कोंबडीच्या पिलांची किंमत एक हजार इतकी आहे. या व्यवसायातून त्यांना महिन्याला एक ते दीड लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. हा व्यवसाय भरभराटीस येत असताना त्यांनी शेळी पालन व्यवसाय सुरू केला. शेतात शेततळे घेऊन पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्न सोडविला.
आज कमल कुंभार स्वतः आत्मनिर्भर व आर्थिकदृष्ट्या सक्षम बनल्या. एवढ्यावरच न थांबता त्यांनी गावातील व परिसरातील महिलांना आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न सुरू केला आणि बघता बघता त्यांच्या या प्रयत्नातून चार हजाराहून अधिक महिलांनी शेतीपूरक उद्योग सुरू केले. कमल कुंभार या ग्रामीण भागातील महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी महाराष्ट्रभर फिरत असतात. जेमतेम 10 वीपर्यंतचे शिक्षण झालेल्या कमल कुंभार व्यवसायाचे मार्केटिंग कसे करावे याबद्दल इतकं अभ्यासपूर्ण बोलतात की मार्केटिंग झालेला पदवीधर त्यांच्यापुढे फिका पडेल. व्यवहारातून जे ज्ञान मिळते तेच महत्वाचे असते, यावर त्यांचा विश्वास आहे.
आता न्यूयॉर्कला प्रयाण
कमल कुंभार या १३ सप्टेंबर रोजी न्यूयॉर्कला जात आहेत. ज्या स्वयंम शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण महिलांना आत्मनिर्भर केले त्या संस्थेच्या कामाची व कमल कुंभार यांच्या कर्तृत्वाची दखल चक्क संयुक्त राष्ट्र संघाने घेतली आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या विकास कार्यक्रमांतर्गत दिला जाणारा Equator हा पुरस्कार कमल कुंभार या स्वीकारणार आहेत. जर एखाद्या महिलेने ठरविले तर ती खरच क्रांती घडवू शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणून श्रीमती कुंभार या आहेत. कोणतेही काम कधीच वाईट नसते तर ते काम आपण किती तन्मयतेने करतो यावर त्या श्रद्धा ठेवतात. त्यामुळेच त्यांचे काम अधिक उठून दिसते. मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागात शेतीबरोबरच शेती पूरक उद्योगात महिलांनी उतरावे यासाठी आपण आयुष्यभर काम करू असा निर्धार त्यांनी केला आहे. त्यांच्या कार्य कर्तृत्वाला सलाम.
लेखक: दयानंद कांबळे,
माहिती स्रोत: महान्युज
अंतिम सुधारित : 4/7/2020