हृदयात देशभक्तीचे जाज्वल्य घेऊन अवघ्या विशीत ते तडीस नेणे, काही सोपे काम नाही. ‘द स्काय इज लिमीट’ ही इंग्रजीतील म्हण अगदीच कमी वयात खरी करुन दाखविण्यालाही धैर्य लागते. ‘आकांक्षेपुढती गगन ठेंगणे’ उगाच नाहीत म्हणत. त्यात थोडासा बदल करुन “क्षितीजापुढती गगन ठेंगणे” असे म्हणता येईल. मुळात तानाजी मालुसरे यांच्यामुळे पावन झालेल्या आणि लढाऊ बाणा निर्माण करणाऱ्या सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी येथे 132 व्या तुकडीच्या दीक्षांत पथसंचलनाचा कार्यक्रम भारतीय नौदलाचे प्रमुख ॲडमिरल सुनील लांबा यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. जन्मजात देशभक्तीचे बाळकडू वडिलांकडून मिळाले असल्यामुळे देशसेवेचे स्वप्न ऊराशी बाळगून अगदी सुरुवातीपासूनच ध्येयावर नजर रोखून विदर्भातील एकमेव युवक एनडीएच्या क्षितीजावर उगवला आहे.
नावाप्रमाणेच देशसेवेला आपल्या जीवनाचे ध्येय मानणाऱ्या या युवकाचे नाव क्षितीज. वडील कॅप्टन दिपक लिमसे यांनी आपल्या आयुष्याशी दहा वर्षे हिमालयाच्या कुशीत घालवली. तर उर्वरीत काही वर्षे पूर्वोत्तर भारतातील सात बहिणींच्या डोंगरदऱ्यांत. कर्नल दिपक लिमसे भारतीय लष्करी सेवेतून सेवानिवृत्त झाल्यानंतरही नागपूरच्या जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. आपल्याप्रमाणे मुलानेही देशसेवाच करावी, हे त्यांचे स्वप्न. मुलानेही वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत, पुण्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 132 व्या तुकडीत त्याचे प्रशिक्षण पूर्ण करुन दीक्षांत समारंभात मोठ्या दिमाखात पथसंचलन केले. पुण्यातील खेत्रपाल परेड ग्राउंडवर नुकताच दीक्षांत पथसंचलन समारंभ पार पडला.
शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण करुन देशसेवेसाठी प्रत्यक्ष युद्धभूमीवर जाऊन शत्रूराष्ट्राच्या सैन्यांना पाणी पाजण्याचे येथील प्रत्येक प्रशिक्षणार्थ्याचे स्वप्न असते. त्यामुळे याक्षणी प्रत्येक श्वासात, नसानसांत, डोळ्यांत, हृदयात फक्त देशभक्ती वाहते. तीन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या कॅडेट्सचा गौरव केल्यानंतर परेडदरम्यान उंच आकाशात सूर मारत झेपावणारी हेलिकॉप्टर्स आणि सुपर डिमोना ही खास विमाने पाहण्याची एक वेगळीच पर्वणी. ही पर्वणी एनडीएच्या या तुकडीत 304 प्रशिक्षणार्थ्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले त्यानिमित्ताने उपस्थितांना मिळाली.
जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी असलेल्या कॅप्टन दीपक लिमसे यांच्या ऊर पुत्राच्या कामगिरीने भरुन आला. मुलगा क्षितीजने ऊराशी बाळगलेले स्वप्न पूर्ण केल्याचे समाधान त्यांच्या देहबोली आणि डोळ्यातील वाहणाऱ्या आनंदाश्रूवरुन लक्षात येत होते.
क्षितीज रामदास पेठेतील सोमलवार हायस्कूलमधून विशेष प्राविण्यासह दहावी उत्तीर्ण केली असून, बारावी औरंगाबाद येथून तो उत्तीर्ण झाला आहे. क्षितीजने नुकताच राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये तीन वर्षांचा अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केला असून, यापुढील एक वर्षाचे प्रशिक्षण तो देहरादून येथे पूर्ण करणार आहे. त्यानंतर तो भारतीय सैन्यात लेफ्टनंट पदावर सेवा बजावणार आहे.
विदर्भातील युवकांनी लष्करात अधिकारी व्हावे – क्षितीज लिमसे
या निवडीबद्दल क्षितीज लिमसेला विचारले असता, तो पूर्णत: समाधानी नाही. विदर्भातील एक विद्यार्थ्यांने लष्करी सेवेत उच्च पदावर पोहचल्यामुळे आनंद मानण्याचे काहीच कारण नाही. जेव्हा या पदावर विदर्भातून अनेक युवक पोहचून देशसेवा करतील, तेव्हाच मला खरा आनंद होईल, असे संत्रानगरीचा सपूत म्हणतो. तसेच विदर्भातील युवकांना लष्करात येण्याचे आवाहन करण्यास तो विसरत नाही. या निवडीचे श्रेय क्षितीज वडील कॅप्टन दीपक लिमसे, आई, बहिण आणि आपल्या गुरुला देतो.
- प्रभाकर बारहाते, माहिती सहाय्यक, नागपूर
माहिती स्रोत: महान्युज
अंतिम सुधारित : 4/14/2020