नाविण्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या आधारे मानवी अवयवांच्या प्रत्यारोपणाद्वारे विविध गंभीर आजारांवर उपचार साध्य होत आहेत. अवयवदानांतर्गत लाइव्ह ऑर्गन डोनेशनद्वारे किडनी व लिव्हर प्रत्यारोपण करण्यात येते. तसेच कॅडेव्हर/मस्तिष्क स्तंभ मृत पश्चात किडनी, लिव्हर, लंग्ज, हार्ट, त्वचा इत्यादी अवयव दान करता येतात. अवयव दानाविषयी सध्या सर्वत्र जनजागृती सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून धुळे शहरासह जिल्ह्यात वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर साडेसहा वर्षांपूर्वी मातेने किडनी देऊन पुनर्जन्म दिलेल्या प्रवीणदास जाधव याच्याविषयी माहिती देणारा हा लेख…
धुळे तालुक्यातील विश्वनाथ या खेड्यातून प्रवीणदास पंढरीनाथ जाधव हा पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतलेला तरुण रोजगारासाठी विद्येचे माहेरघर पुणे येथे पोहोचला होता. तेथील एका कनिष्ठ महाविद्यालयात तो नोकरीसही लागला. 2010 च्या मध्यास त्याच्या प्रकृतीत चढउतार सुरू झाले. डॉक्टरांकडे येणे-जाणे वाढले. मात्र, निदान काही केल्या होईना त्यामुळे तो कुटुंबासह माघारी विश्वनाथ येथे परतला. येथेही त्याच्या प्रकृतीच्या तक्रारी सुरूच होत्या. धुळ्यातील डॉक्टरांकडे त्याने प्रकृती दाखविली. या डॉक्टरांनी त्याला सत्य परिस्थिती सांगताच त्याच्या डोळ्यांपुढे दिवसा काजवे चमकायला लागले. आधीच घरची परिस्थिती जेमतेम. त्यात दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे निदान. अशा परिस्थितीत आता आणखी काही दिवसाचे आपण सोबती असे धरुन तो चालू लागला. मात्र, सकाळ माध्यम समूह, समाजातील जाणकारांची मदत आणि आईने दिलेल्या एका किडनीमुळे प्रवीण शस्त्रक्रिया होऊन आज साडेपाच वर्षे उलटूनही सर्वसामान्यांप्रमाणे आयुष्य जगतोय.
पुणे येथून गावी परतल्यावर प्रवीणच्या प्रकृतीच्या तक्रारी वाढतच गेल्या. त्याने थोडेफार पैसे जमवून धुळ्यातील डॉ.संजय संघवी यांच्याकडे प्रकृती दाखविली. त्यांच्याच इस्पितळात नाशिक येथून किडनी तज्ज्ञ डॉक्टर येत असत. त्यांनीही प्रवीणची तपासणी केली. त्याला पुढील उपचारासाठी त्यांनी नाशिक येथील इस्पितळात येण्यास सांगितले. तेथे गेल्यावर किडनी बदलाच्या शस्त्रक्रियेसाठी 12 ते 15 लाख रुपयांचा खर्च येईल, असे प्रवीणला सांगण्यात आले. आधीच हाता-तोंडाची लढाई लढताना 12 ते 15 लाख रुपये आणावेत कुठून, असा प्रश्न मनात घेऊन प्रवीण पुन्हा गावाकडे परतला. एरवी प्रवीणच्या दवाखान्यातील वाढत्या फेऱ्यांची कल्पना त्याच्या गावच्या ग्रामस्थांना आली होती.
प्रवीणच्या गंभीर आजाराची कल्पना आल्यामुळे गावकऱ्यांनी एक बैठक बोलावली. या बैठकीत मदतीचे आवाहन करण्यात आले. त्यातून 20 हजार रुपयांची मदत झाली. तेवढी रक्कम घेऊन प्रवीण व त्याचे कुटुंबीय उपचारासाठी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात पोहोचले. तेथे त्याला डायलिसिसचा सल्ला देण्यात आला. हातातील पैसे संपल्यावर प्रवीण पुन्हा गावी परतला होता. या घटनेची माहिती न्याहळोद (न्याहळोद व विश्वनाथ गावाच्या मधून पांझरा नदी वाहते. तसेच न्याहळोदच्या अनेक शेतकऱ्यांची शेती विश्वनाथ शिवारात येते) येथील बातमीदार अशफाक खाटीक यांना मिळाली. याबाबतचे वृत्त वृत्तपत्रात प्रकाशित होताच अनेक दानशूर हात पुढे आले. त्यांनी प्रवीणला सर्वतोपरी मदत देवू केली. त्यामुळे प्रवीणला धुळ्यातील जवाहर वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. तेथे जवळपास 15 दिवस त्याच्यावर डायलिसिस सुरू होते. तेथून प्रवीणला शस्त्रक्रियेसाठी मुंबई येथील प्रसिद्ध अशा जे.जे.इस्पितळात दाखल करण्यात आले. त्यासाठी पत्रकार निखिल सूर्यवंशी यांचा पुढाकार होता. जे. जे. इस्पितळात अधिष्ठाता पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवीणवर उपचार सुरू झाले.
प्रवीणच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याने त्याला त्याची आई ताराबाई पंढरीनाथ जाधव यांनी एक किडनी देवू केली होती. शस्त्रक्रियेपूर्वी दोघांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. अखेर 12 फेब्रुवारी 2011 रोजी प्रवीण व त्याच्या आईला शस्त्रक्रियेसाठी नेण्यात आले. आठ तासांच्या दीर्घ शस्त्रक्रियेनंतर प्रवीणवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. एवढेच नव्हे, तर शस्त्रक्रियेनंतर अवघ्या तीन तासांत प्रवीणला बसविलेल्या किडनीने काम करण्यास सुरवात केली. आता आई व मुलगा यांना प्रत्येकी एक किडनी आहे. ते व्यवस्थित जीवन जगत आहेत. प्रवीणला दरमहा औषधे व गोळ्या घ्याव्या लागतात, तर प्रवीणच्या आईची प्रकृती ठणठणीत आहे.
जाधव कुटुंबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन प्रत्येकाने अवयवदानाचा संकल्प केला, तर अनेकांना पुन्हा या सुंदर जीवनाचा लाभ घेता येईल.
लेखक: गोपाळ साळुंखे
माहिती स्रोत: महान्युज
अंतिम सुधारित : 4/16/2020