देशाच्या राजधानीत केंद्र शासनाच्या महत्वांच्या आयोजनांना उपस्थित राहून महाराष्ट्राच्या वैविद्यपूर्ण कामगिरीविषयी वार्तांकन सतत करीत असतो. वर्ष २०१७ चा समारोप होत असताना अशाच मोठ्या आयोजनाला हजेरी लावण्याचा व त्यात महाराष्ट्राच्या वैविद्यपूर्ण कामगिरीबाबत वार्तांकनाचा महत्त्वपूर्ण अनुभव. आयोजन होते अन्न प्रक्रिया उद्योगाविषयीचा देशातील सर्वात मोठा मेळा अर्थात “वर्ल्ड फुड इंडिया २०१७”.
केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग विभागाच्या वतीने देशात प्रथमच अशा प्रकारचे भव्य आयोजन करण्यात आले. ६० देश आणि देश-विदेशातील २ हजार कंपन्या यात सहभागी झाल्या. ऐतिहासिक इंडिया गेट आणि विज्ञान भवनात हे आयोजन करण्यात आल्याने आयोजनास विशेष महत्व प्राप्त झाले. देशातील प्रत्येक राज्यांनाही आपापल्या राज्यात अन्न प्रक्रिया उद्योगात गुंतवणूक आकर्षित करण्याची नामी संधी या आयोजनामुळे चालून आली. ही महत्त्वाची घटना लक्षात घेता महाराष्ट्र शासनानेही या आयोजनात राज्याचे ‘अन्न प्रक्रिया धोरण २०१७’ जाहीर करून राज्यात अन्न प्रक्रिया उद्योगासाठी उपलब्ध करून दिलेल्या विविध सुविधांबाबत देश व जगाला संदेश दिला.
३ ते ५ नोव्हेंबर पर्यंत चाललेल्या भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले तर समारोपाच्या कार्यक्रमाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संबोधित केले. महाराष्ट्राच्यावतीने कृषी व फलोत्पादन मंत्री पांडुरंग फुंडकर तिनही दिवस या कार्यक्रमात उपस्थित होते. श्री.फुंडकर आणि पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्य विकासमंत्री महादेव जानकर आणि कृषी व फलोत्पादन राज्यमंत्री सदाशिव खोत यांनी याठिकाणी उभारण्यात आलेल्या महाराष्ट्र दालनात देश–विदेशातील कंपन्यांच्या शिष्टमंडळांशी चर्चा केली. महाराष्ट्र सदनात राज्यातील उद्योजकांना केलेल्या संबोधनात श्री.फुंडकर यांनी राज्यातील अन्न प्रक्रिया उद्योगाला गती देण्यासाठी लवकरच केंद्रीय मंत्र्यांसोबत दिल्लीत बैठक घेणार असल्याचे आश्वासन दिले. याशिवाय राज्यातून सहभागी झालेल्या उद्योजकांनीही या महाकुंभाचा भरपूर लाभ घेतला.
या आयोजनाच्या दुसऱ्या दिवशी राज्याचे ‘अन्न प्रक्रिया उद्योग धोरण २०१७’ जाहीर करणे ही महत्त्वपूर्ण घटना ठरली, याचे कौतुक दस्तुरखुद्द केंद्रीय अन्न प्रकिया उद्योग मंत्री हरसिमरत बादल कौर यांनी या आयोजनाच्या समारोपीय कार्यक्रमात देश विदेशातील उद्योजकांसमोर केले. राज्याचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शेती क्षेत्रात विक्रमी गुंतवणूक वाढविण्यासाठी तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेले ‘अन्न प्रकिया धोरण २०१७’ जाहीर केले. राज्याला अन्न प्रक्रिया उद्योगाचे गंतव्य स्थान बनविणे, प्रतिवर्षी या उद्योगाचा दुहेरी आकड्यात विकास करणे, या उद्योगात शेतकऱ्यांचा सहभाग वाढवून येत्या ५ वर्षात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे, या क्षेत्रात जवळपास ५ लाख कौशल्याधारीत मनुष्यबळ निर्माण करणे, सकस आहारातून कुपोषणाच्या समस्येवर मात करणे आदी महत्त्वाचे उद्दिष्ट या धोरणात ठेवण्यात आले आहे.
२०१०-११ मध्ये देशात महाराष्ट्र अन्न प्रक्रिया उद्योगाच्या नोंदणीत तिसऱ्या क्रमांकावर होता. तसेच, १९९१ ते मार्च २०१२ पर्यंत राज्यात अन्न प्रक्रिया उद्योगात १,०३९ कोटींची परकीय गुंतवणूक झाली. या उद्योगाच्या विकासासाठी राज्यात औद्योगिक विकास महामंडळाच्यावतीने फुड पार्क, वाईन पार्क, फ्लोरीकल्चर पार्क उभारण्यात आले आहेत. अन्न प्रक्रिया उद्योगात गुंतवणुकीसाठी राज्याने विविध परवान्यांचे सुलभीकरण केले आहे तसेच पायाभूत सुविधाही उपलब्ध करून दिल्या आहेत. राज्यात उद्योगासाठी असलेल्या गुंतवणूकपूरक वातावरणाची माहिती स्वत: मंत्र्यांनी देऊन उद्योजकांना गुंतवणुकीसाठी आवाहन केल्याचा परिणाम या महाकुंभात दिसून आला.
केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयासोबत वर्ल्ड फुड इंडिया-२०१७ मध्ये विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी करार झाले. याअंतर्गत 65 हजार कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक भारतात होणार आहे. विशेष म्हणजे कोकाकोला, पेपस्किो, ऍमेझोन, ब्रिटानिया आणि पतंजली या नामांकित कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी पसंती दिली आहे. २०१६-१७ या आर्थिक वर्षात थेट परकीय गुंतवणुकीमध्ये ५० टक्केपेक्षा अधिक गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे. जागतिक बँकेने नुकतेच जाहीर केल्यानुसार उद्योग क्षेत्रात भारताने १३० व्या स्थानाहून १०० व्या स्थानावर झेप घेतली आहे. यामध्ये सर्वाधिक गुंतवणूक महाराष्ट्रामध्येच झाली असल्याचे विवरण आहे. या सर्व बाबी महाराष्ट्रातील अन्न प्रक्रिया उद्योगासाठी अत्यंत महत्वाच्या व अभिमानास्पद आहेत.
‘वर्ल्ड फुड इंडिया’ मधील महाराष्ट्र दालनास देश-विदेशातील गुंतवणुकदारांच्या शिष्टमंडळाने भेट देऊन राज्याच्या मंत्री महोदयांसोबत राज्यात अन्न प्रक्रिया उद्योग उभारणीबाबत चर्चा केली ही चर्चा सकारात्मक झाली. सिल्ड एअर आणि रिचग्रॅवीस या अमेरिकन कंपन्या, स्पेनमधील काँगल्डस नवारा याशिवाय ओएसआय विस्टा ग्रुप, युम ब्रांड, शरफ ग्रुप या विदेशी कंपन्यांच्या. तसेच, भारतातील ट्रांस इंजिनीअर इंडिया प्रा. लि. च्या कृषी विभागाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सितिकांथा चौधरी, कारगील इंडिया कंपनीचे अध्यक्ष सिराज चौधरी, श्रीनी फुड पार्क प्रा.लि. चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनील कुमार श्रीवास्तव, एल.एल. लॉजिस्टीक प्रा.ली. च्या कृषी विभागाचे व्यवस्थापकीय संचालक अनुप अग्रवाल आणि एजीटी फुड इंडिया प्रा. लि. च्या वरिष्ठ अधिका-यांनीही मंत्रिमहोदयांशी राज्यात उद्योग उभारणीबाबत विविध विषयांवर चर्चा केली.
‘महाराष्ट्र दालनात’ राज्यातील अन्न प्रक्रिया उद्योजकांनी सहभाग घेतला. या प्रदर्शानामुळे त्यांना खूप लाभ झाल्याच्या भावना त्यांनी बोलून दाखविल्या.
राज्य शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्यावतीने ‘महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजिवीका कार्यक्रमांतर्गत’ राबविण्यात येणाऱ्या ‘उमेद’ प्रकल्पामुळे ग्रामीण भागातील अन्न प्रक्रिया उद्योगात महिलांना मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. ४ वर्षांपूर्वी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील सिमा पाटील या प्रकल्पाशी जुळल्या. गहू, ज्वारी, बाजरी आणि मुग रोस्टकरून त्या बाजारात विकतात. ‘उमेद’ प्रकल्प सुरु झाला तेव्हा १० महिला या कार्यक्रमाशी जुळल्या होत्या आता हा आकडा १ हजाराच्याही पुढे गेल्याचे त्यांनी सांगितले. वर्ल्ड फुड इंडियातील महाराष्ट्र दालनात त्यांना स्टॉल लावण्याची संधी मिळाली आणि या संधीचे सोने झाल्याचे समाधानच त्या व्यक्त करतात. या स्टॉलला देश-विदेशातील उद्योजक व ग्राहकांनी भेट दिली व आमच्या उद्योगाबाबत विचारणा केली. आमच्या कार्याचे कौतुकही त्यांनी केले.आम्ही याठिकाणी रोस्टेड गहू, ज्वारी, बाजरी आणि मुग प्रदर्शन व विक्रीसाठी ठेवले असून आमचा बराच माल विकला गेला आहे. राज्यशासनाच्या माध्यमातून देशाच्या राजधानीत जागतिक प्रदर्शनात सहभागी होण्याची संधी मिळाल्याने आपला उद्योग कुठे आहे आणि त्याला आपण कशा पद्धतीने आणखी पुढे घेऊन जाऊ शकणार याबाबतचा दृष्टीकोन तयार झाला असून माझ्यासाठी हा अनुभव खूप महत्वाचा असल्याच्या भावना बोलक्या होत्या.
केंद्र शासनाच्या अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत ‘वर्धा मेगा फुड पार्क’ हा शेतमालासाठी शीतगृह उपलब्ध करून देणारा वर्धा जिल्ह्यातील कारंजा (घाडगे) तालुक्यातील शिंदी-विहीरी गावातील स्टॉलही या ठिकाणी होता. माहिती देताना फुड पार्कचे आशिष अग्रवाल म्हणाले, महाराष्ट्र दालनातील आमच्या स्टॉलला देश-विदेशातील उद्योजक व ग्राहकांनी भेट दिली हा अनुभव आमच्यासाठी खूप महत्वाचा ठरला. फुड पार्कविषयी माहिती देताना त्यांनी सांगितले, शिंदी-विहीरी या वर्धा जिल्ह्यातील दुर्गम भागात आम्ही वर्ष २०१२-१३ पासून शेतकऱ्यांच्या शेतमालासाठी शीतगृह उपलब्ध करून देत आहोत. या प्रकल्पासोबत परिसरातील जवळपास १ हजार शेतकरी आणि शेतमाल उत्पादित करणाऱ्या १२ कंपन्या जुळल्या आहेत. या प्रकल्पात ३०० कामगार आणि ५० कर्मचारी कार्यरत असून हे सर्व स्थानिक आहेत म्हणजेच स्थानिकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. प्रकल्पाच्या परिसरातील शेतकरी या प्रकल्पाचा लाभ घेत असून मोठ्या प्रमाणात शेतमाल परदेशात पाठविण्यात येतो. आतापर्यंत जवळपास अडीच हजार शेतकऱ्यांनी या प्रकल्पाचा लाभ घेतल्याचे त्यांनी सांगितले.
सांगलीचे विठ्ठल चव्हाण यांनी २ महिन्याआधीच घाण्याच्या तेलाचा उद्योग सुरु केला आहे. वर्ल्ड फुड इंडिया या जागतिक प्रदर्शनाला भेट देऊन येथून नवनवीन संकल्पना समजून घेण्यासाठी ते खास दिल्लीत आले. महाराष्ट्र दालनातील भेटीत आपल्याला खूप नवनवीन गोष्टी समजल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. या दालनात उद्योजक व शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून आपल्या उद्योगाच्या पुढील वाटचालीसाठी महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेतली त्याचा आपणास भविष्यात खूप फायदा होणार असल्याच्या श्री.चव्हाण यांच्या भावना सूचक व प्रेरक होत्या.
महाराष्ट्र दालनामध्ये राज्य शासनाची व खाजगी अन्न प्रक्रिया उद्योजकांची एकूण 21 दालने उभारण्यात आली. खाद्य प्रक्रिया, जास्तकाळ टिकविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या उपाययोजना, नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलेली फळे, रस, अन्य पदार्थांचे प्रदर्शन याठिकाणी मांडण्यात आले. या दालनाचे सुरेख व सुंदर असे संकल्पनाचित्र तसेच आतील सजावटही जे.जे स्कुल ऑफ ऑर्ट या नामांकित संस्थेच्या चमुने केली.
‘वर्ल्ड फुड इंडिया’ प्रदर्शनात जगभरातील अन्न प्रक्रिया उद्योग, गुंवतवणूकदार, तज्ञ सहभागी झाले. अन्न प्रक्रिया उद्योगात गुंतवणूक व व्यापार वाढविण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने केलेले हे भव्य आयोजन आणि त्यात महाराष्ट्र शासनाचा दमदार सहभाग हा अनुभव अभिमानास्पद आणि अविस्मरणीय ठरला.
लेखक - रितेश मोतीरामजी भुयार,
उपसंपादक, महाराष्ट्र परिचय केंद्र नवी दिल्ली.
माहिती स्रोत : महान्यूज
अंतिम सुधारित : 6/16/2020