‘जन गण मन’ असे राष्ट्रगीताचे सूर कानी पडताच प्रत्येक भारतीयाची मान उंचावते... नकळत स्फूर्ती देणाऱ्या या शब्दांना मानवंदना देण्यासाठी प्रत्येकजण आपल्या जागेवर उभे राहून सलामी देतात. या शब्दांची आणि सुरांची नुसती सुरुवातही प्रत्येक भारतीय नागरिकास स्फूर्ती देणारी आहे. मात्र या राष्ट्रगीताचे एकही सूर ज्यांना ऐकू येऊ शकत नाहीत, यातील एक शब्दही ज्यांना उच्चारता येत नाही... अशा मूकबधीर (दिव्यांग) मुलांनी सादर केलेले राष्ट्रगीत बघताना अंगावर रोमांच उभे झाले. या अनोख्या राष्ट्रगीतातून या मुलांनी बेल्जियमच्या राणीला सलामीच दिली.
बेल्जियमच्या राणी मथिल्दे आणि राजे फिलिप्पे भारताच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या कार्यक्रमातील एक भाग म्हणून राणी मथिल्दे युनिसेफतर्फे आयोजित एका कार्यक्रमास उपस्थित होत्या. शाळकरी मुलांना स्वच्छतेचे महत्व पटवून सांगण्यासाठी तयार करण्यात आलेल्या गाण्याचे लोकार्पण करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे आकर्षण ठरले ते शिवाजी लायन्स स्कूल या मूक-बधीर मुलांसाठी असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी अभिनयातून सादर केलेले राष्ट्रगीत आणि स्वच्छतेविषयीच्या गीतावरील नृत्य... बेल्जियमच्या राणीच्या स्वागतासाठी जेव्हा राष्ट्रगीत वाजायला सुरुवात झाली... तसे सर्व उपस्थित मान्यवर जागेवर उभे झाले आणि स्टेजवरील मुलांनी ‘गायला’ सुरुवात केली...
खरच शब्दांना अर्थ देणाऱ्या त्यांच्या हावभावांमधून राष्ट्रगीताला मूक सलामीच दिली जात होती. या सादरीकरणासाठी कष्ट घेतलेल्या श्रीमती भूमिका पारेख यांच्याशी संवाद साधून,अधिक माहिती घेतली. भूमिका मूळच्या भारतीय मात्र लग्नानंतर बेल्जियमला स्थायिक झाल्या. तिथे त्या ‘आयू नामक’ संस्थेशी जोडल्या गेल्या आहेत.
बेल्जियममध्ये अंध, अपंग, व्हिलचेअरवरील रुग्ण तसेच हॉस्पिटलमध्ये काही व्याधींमुळे ग्रस्त झालेले आणि नैराश्याकडे झुकणाऱ्या सगळ्यांना भूमिका आणि त्यांची टीम नृत्य करण्याची प्रेरणा देतात. भारतातही त्या यासाठी वारंवार येत असतात. व्यवसायाने मूकबधीर विद्यार्थ्यांची शिक्षिका असलेल्या भूमिका नृत्याद्वारे दु:खी जनांच्या आयुष्यात आनंद पसरविण्याचे काम करतात.
स्वच्छतेची सवयही लहानपणापासून लागली पाहिजे. यासाठीच शालेय विद्यार्थ्यांना आवडेल आणि लक्षात राहतील असे शब्द आणि संगीत असलेले ‘वॉश युवर हॅन्ड’ हे गाणेही या मूकबधिर मुलांनी नृत्याद्वारे सादर केले... गाणे जेवढे आधूनिक रिमिक्स होते... ठेका धरायला लावणारे होते तेवढेच नयनरम्य असे नृत्य या मूकबधीर मुलांनी सादर केले. पदन्यास करायला सूर कानावर पडण्याची आवश्यकता नाही ते अंतर्मनातच निनादले पाहिजे, असे यावेळी मनोमन वाटत राहीले, अन् पटलेही.
लेखिका - अर्चना शंभरकर,
विभागीय संपर्क अधिकारी.
माहिती स्रोत : महान्यूज
अंतिम सुधारित : 6/29/2019