অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

हॉकर्स...जगण्यासाठी कमवण्याचा एक पर्याय!

हॉकर्स...जगण्यासाठी कमवण्याचा एक पर्याय!

हॉकर्स! “ये वडापाववाला, वडापाव लो.... पाणी बॉटल, पाणी बॉटल... ऊसाचा ताजा रसवाला....”.बस स्थानकात गाडी शिरताच असा एकच गोंगाट करणारे फेरीवाले. गाडीच्या खिडक्यांमधून हे फेरीवाले प्रवाशांना आमच्याकडचेच काही तरी घ्या म्हणून विनवत असतात. काही वर्षांपूर्वी गाडीच्या आत चढून साहित्य विकणारे फेरीवाले आता नियमानुसार गाडीत चढू शकत नाहीत. त्यामुळे बस आली की, त्या मागे धावत जाऊन खिडकीच्या बाहेरून जेवढा धंदा होईल, त्यावर त्यांना समाधान मानावे लागते. अहमदनगरच्या स्वस्तिक बसस्थानकात कुतूहल म्हणून या हॉकर्ससोबत संवाद साधला तेव्हा तिथे आनंदची भेट झाली.

राजु भंडारे हा चाळीशीतला इसम त्याच्यासमवेत भेटला. त्याची कथा आणखीनच विदारक. दहावीपर्यंत शिकला. कामधंदा नाही म्हणून बसस्थानकावर हॉकर्स म्हणून साहित्य विकू लागला. गेल्या २० वर्षांपासून तो हॉकर्स आहे. अहमदनगरला एका झोपडपट्टीत राहतो. घरी खाणारे तोंड सहा. कमावता हा एकटा. घरच्यांनी लग्नाचा तगादा लावला. पण खाणारं आणखी एक तोंड वाढवून करू काय? असा त्याचा रोखठोक प्रश्न. कमाई कमी असल्याने आता लग्न करायचंच नाही, असा निश्चय त्याने केला. सुनील पवार १५ वर्षांचा मुलगा. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत बाजार हिवरं या गावी त्याचे कुटुंबीय राहतात. घरी दोन एकर कोरडवाहू शेती. आई, वडील दोघेही गावात मजुरी करतात.  सुनील कधीच शाळेत गेला नाही.

गावात हाताला काम नाही म्हणून नगरला आला. गेल्या तीन वर्षांपासून बसस्थानकावर हॉकर्स काम करतो. दिवसाला १५०-२०० रूपये रोज कमावतो. सुरेश जगताप हेही १५ वर्षांपासून हॉकर्स आहेत. सावत्र आईच्या त्रासामुळे शिकू शकले नाहीत. तेही झोपडपट्टीत राहतात. त्यांची पत्नीही छोटे मोठे कामं करून घराला हातभार लावत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांना एक मुलगा, एक मुलगी आहे. काहीही झाले तरी मुलांना शिकवायचेच असा त्यांचा ठाम निश्चय आहे. त्यांची मुलगी नववीत तर मुलगा पाचवीत आहे.. शिवम हा बिहारमधून आलेला मुलगा. १२-१३ वर्षांचा असेल. त्याचे वडीलही नगरला रोज मजुरी करतात. दोन, तीन महिन्यांपूर्वीच ते शिवमला येथे घेऊन आले आणि हॉकर्स म्हणून त्याला कामी लावले.

आनंद काकडे. एम.कॉम. झालाय. नोकरीसाठी अनेक ठिकाणी प्रयत्न केले. पण वशिल्याशिवाय कुठं काही जमेना. एका खासगी कंपनीत महिना सात हजार रूपयांवर काम करू लागला. अहमदरनगरपासून जवळच असलेल्या देहरे या गावी त्याचे कुटुंब राहते. बाहेर राहुन भागायचं नाही. तो देहरेला परतला. काय करायचं म्हणून विचार करत असताना कोणीतरी त्याला अहमदनगरच्या बसस्थानकावर हॉकर्स म्हणून गोळ्या बिस्कीट विकण्याचा सल्ला दिला. गावा, घराजवळ राहुन चार पैसे मिळतील या आशेने पस्तीशीतल्या आनंदने अंगात खाकी रंगाचं शर्ट आनंदाने चढवलं. तो हॉकर्स झाला. वडापाव, पाणी बॉटल, गोळ्या, बिस्कीट... मालक ट्रे मध्ये देईल ते साहित्य दिवसभर नगरच्या बसस्थानकावर बसमागे धावत धावत विकतो. यातून त्याला २०० ते ३०० रूपये उरतात. पूर्वीच्या सात हजारांपेक्षा गावात राहून नऊ हजार कमावत असल्याचा आनंद असला तरी उच्च शिक्षण घेऊनही नोकरी मिळाली नाही, याची त्याला खंत आहे. नगरच्या बसस्थानकावर मराठी आणि बिहारी हॉकर्सची संख्या अधिक आहे.

बसस्थानकावर परवानाधारक कॅन्टीन चालकाला हॉकर्ससाठी परवाने दिले जातात. गाड्यांच्या अवागमनाची संख्या लक्षात घेऊन हॉकर्सची संख्या ठरते. पूर्वी हॉकर्स बस आली की आतमध्ये चढून साहित्य विकायचे. मात्र आता शासनाने या प्रकारावर बंदी घातल्याने त्यांना बाहेरूनच विक्री करावी लागते. त्यामुळे पूर्वीसारखा धंदा होत नाही. ग्राहक भाव करतात आणि हॉकर्समध्येच स्पर्धा असल्याने कधी कधी नुकसान सहन करूनही साहित्य विकावे लागते. हॉकर्सचा परवानाधारक या सर्व हॉकर्सना कमिशन तत्वावर ठेवतो. जो अधिक साहित्य विकेल त्याला अधिक कमीशन मिळत असल्याने साहजिकच त्यांच्यात विक्रीसाठी, ग्राहक ओढण्यासाठी चढाओढ होते. अनेकदा यातून वादाचे प्रसंगही उद्भवतात. शासनाने फेरीवाल्यांसाठी धोरण ठरवून त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी पावले उचलावी अशी एकमुखी मागणी आनंद, राजु, सुनील, सुरेश या सर्वांनीच केली.

 

लेखन: नितीन पखाले

अंतिम सुधारित : 7/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate