भेद सारे मावळू द्या, वैर साऱ्या वासना
मानवाच्या एकतेची पूर्ण होवो कल्पना
मुक्त आम्ही, मानू फक्त बंधुतेच्या भावना
सत्य, सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
अगदी हेच वातावरण सध्या खानापूर तालुक्यात अनुभवायला मिळतेय. दुष्काळमुक्ती व टंचाई मुक्तीसाठी राज्य शासनाबरोबरच अनेक स्वयंसेवी संस्था आणि गट-तट, जात, पंथ आदी भेद बाजूला सारून लोकसहभागातून प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचेच एक उदाहरण म्हणजे सिने अभिनेते अमिर खान यांच्या पाणी फाऊंडेशनच्या वतीने सुरू करण्यात आलेली पाणीचषक (वॉटर कप) स्पर्धा. यामध्ये लोकसहभाग आणि श्रमदानातून जलसंधारणाची कामे केली जात आहेत. याला हातभार म्हणून भारतीय जैन संघटना जेसीबी/पोकलेनसाठी निधी पुरवणार आहे. तर डिझेलचा खर्च जिल्हा प्रशासन उचलणार आहे. दुष्काळ मुक्तीसाठी जिल्हा प्रशासन करत असलेल्या प्रयत्नांना या स्पर्धेची जोड मिळाल्याने जलसंधारणाच्या कामांचा वेग वाढला आहे.
आमदार अनिल बाबर, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, उपाध्यक्ष सुहास बाबर, खानापूर पंचायत समिती सभापती मनिषा बागल, उपसभापती बाळासाहेब नलवडे, पंचायत समिती सदस्य कविता सुशांत देवकर, बंडोपंत राजोपाध्ये यांनी यामध्ये जातीने लक्ष घातले आहे. त्यांच्या प्रोत्साहनाखाली उपविभागीय अधिकारी अश्विनी जिरंगे, तहसीलदार रंजना उंबरहंडे-ढोकळे, गटविकास अधिकारी संतोष जोशी, विस्तार अधिकारी श्रीपाद जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली जैन संघटनेचे उदय शहा, डॉ. दीपक शहा, पाणी फाऊंडेशनचे तालुका समन्वयक, तांत्रिक प्रशिक्षक आणि पाणलोट सेवक यांच्या सहकार्याने या गावातील नागरिकांनी जलसंधारणाच्या कामांचा सपाटा लावला आहे.
सर्वांसाठी पाणी टंचाईमुक्त महाराष्ट्र 2019 या संकल्पनेंतर्गत राज्य शासन जलयुक्त शिवार अभियान राबवत आहे. त्यामध्ये सांगली जिल्ह्यात गत दोन वर्षात जलसंधारणाची भरीव कामे करण्यात आली आहेत. आता पाणीचषक स्पर्धेसाठी सांगली जिल्ह्यातील खानापूर, आटपाडी आणि जत तालुक्यांची निवड झाली आहे. या तिन्ही तालुक्यांतील 104 गावांमध्ये जलसंधारणाची कामे करण्यात येत आहेत.
गावाच्या कुटुंब संख्येइतके नांदेड पॅटर्न शोषखड्डे, गावच्या लोकसंख्येइतके वृक्षारोपण खड्डे, श्रमदानाने माणसी 6 घनमीटर केलेली मृद व जलसंधारण कामे, यंत्राद्वारे 150 घनमीटर प्रति हेक्टर जल व मृद संधारणाची कामे, गावच्या खातेदार संख्येच्या 50 टक्के मातीपरीक्षण, आगपेटीमुक्त शिवार, वॉटर बजेट, पाणी बचत तंत्रज्ञान (ठिबक सिंचन, तुषार सिंचन, मल्चिंग इ.), कार्यरत विहिरीच्या 15 टक्के विहीर पुनर्भरण, जलसंधारणाच्या जुन्या 3 कामांची दुरूस्ती अशी कामे करण्यात येत आहेत. त्याबरोबर या सर्व कामांची गुणवत्ता राखणे व जलसंधारणाची माथा ते पायथा कामे करणे यावर विशेष भर देण्यात आला आहे. 8 एप्रिलपासून सुरू झालेली ही कामे 22 मे पर्यंत करणे अपेक्षित आहे.खानापूर तालुक्यातील लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि नागरिक, मग त्यामध्ये पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून महिला आणि मदतीला चिमुकलेही अंग झटकून काम करत आहेत.
भाग्य लिहिलेलं माझंतुझं, घाम आलेल्या भाळावरी
स्वप्न लपलेलं माझंतुझं, इथं बरड माळावरी
घेऊन कुदळ खोरं, चला जाऊ म्होरं, देऊ देशाला
असे म्हणत तालुक्यातील अनेक गावांमध्ये हा उत्साह ओसंडून वाहत आहे. लोकप्रतिनिधींनी यासाठी संपूर्ण मेहनत घेऊन गावांना एकत्र करण्याचं कसब साधलं आहे, असं म्हटल्यास वावगं ठरू नये. त्यात सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारीही केवळ बघ्याच्या किंवा प्रोत्साहन देणाऱ्याच्या भूमिकेत न राहता स्वतः श्रमदान करत आहेत. यामध्ये पोसेवाडी, घोटी बुद्रुक आणि लेंगरे या गावांमध्ये जोमाने कामे करण्यात येत आहेत. पोसेवाडी आणि घोटी बुद्रुकमध्ये सलग समतल चर (सीसीटी) ची कामे करण्यात आली आहेत. छोटे मातीचे धरण घोटी बुद्रुकमध्ये करण्यात आली आहे. शेतीची बांधबंदिस्ती (कंपार्टमेंट बंडिंग), अनघड दगडी बांध ही कामे हाती घेण्यात आली आहे. लेंगरेमध्ये तर केवळ 2 ते अडीच तासात 2 हजार खड्डे खणले, हे विशेष!
नसे राऊळी वा नसे मंदिरी
जिथे राबती हात तेथे हरी
या काव्यपंक्तींचा उल्लेख इथे आवर्जून करावा वाटतो. घोटी बुद्रुकमध्ये केलेल्या कामांना निसर्गाची साथ मिळाली. तिथेही अवघ्या काही तासात सीसीटी, कंपार्टमेंट बंडिंगची कामे झाली आणि निसर्गसुद्धा काम करणाऱ्या हाताच्या मदतीला धावून आला. अवघ्या 15 मिनिटांच्या पावसाने या जलसंधारणाच्या कामांमध्ये पाणीच पाणी झाले. या पाणीसाठ्यातून एक गोष्ट अधोरेखित झाली ती म्हणजे चांगल्या कामाचे निसर्गानेही जलधारा बरसून कौतूक केले. स्पर्धा तर एक निमित्त आहे. पण, भरलेल्या जलसाठ्याकडे पाहून खरोखरीच श्रमाचे सार्थक झाल्याचे सगळ्यांच्याच चेहऱ्यावर दिसत आहे.
लेखक - संप्रदा द. बीडकर
प्र. जिल्हा माहिती अधिकारी
सांगली
स्त्रोत - महान्युज
अंतिम सुधारित : 7/28/2023
पाणी व मजुरी या दोन मुख्य समस्यांशी झुंजत शेतकरी श...