महिला आणि मुलींनी कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना स्वत:च्या पायावर उभं राहणे शक्य व्हावे या भुमिकेतून येथील महिला आर्थिक विकास महामंडळ अर्थात माविम तर्फे विविध प्रकारचे कौशल्य प्रशिक्षण दिले जात आहे. या अंतर्गत असणाऱ्या फॅशन डिझायनिंगच्या अभ्यासक्रमातून या प्रकारचे कौशल्य ग्रहण करणाऱ्या महिला आणि मुलींनी थेट रोजगार उपलब्ध तर झालाच आहे, सोबतच इतरांना देखील या माध्यमातून पुढे नेण्याची संधी समोर आली आहे.
येथील एम.आय.डी.सी. परिसरात असलेल्या माविमच्या इमारतीत या प्रकारचे प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सोबतच कौशल्य प्रशिक्षण विभागाच्या व्यावसायिक प्रशिक्षण भागीदार म्हणून याची नोंद देखील झाली असून याच प्रकारचे प्रशिक्षण देणाऱ्या वडसा येथील केंद्राला यंदाच्या प्रमोद महाजन कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत जिल्हयातील पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार देखील प्राप्त झाला आहे.
गडचिरोली सारख्या शहरात ग्रामीण छाप अधिक असताना सुंदर अशा डिझायनर साड्यांची निर्मिती देखील केंद्रातील महिला आणि मुली करीत आहेत असे माविमच्या जिल्हा समन्वयक कांता मिश्रा यांनी याबाबत बोलतांना सांगितले.
जॉर्जेट, नेट, सूपरनेट, लेस अशा विविध माध्यमांचा एकत्रित वापर करुन या सुंदर अशा साडयांचे आरंभी डिझाइन तयार करण्यात येते. या ठिकाणी प्रशिक्षण देणाऱ्या वैशाली ताकसांडे यांच्या मार्गदर्शनात येथे 11 मुली व महिला या साडयांची निर्मिती करीत आहेत. बाजारात उपलब्ध असणाऱ्या साडयांपेक्षा वेगळया परंतु त्यापेक्षा माफक दरात साडी तयार करण्याचे काम येथे होते.
साडयांची निर्मिती करण्यासोबतच नाविन्यपूर्ण पध्दतीने त्याची विक्री कशा प्रकारे करता येईल याबाबतही या सर्वांना येथे मार्गदर्शन करण्यात येते. येथील जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता भांडेकर आणि नगराध्यक्ष योगिता पिपरे यांनी एका कार्यक्रमानिमित्त येथे भेट दिली.
त्यावेळी या केंद्राची पाहणी त्यांनी केली. सहज भेटीवर आलेल्या या दोघीजणींनी येथील साड्यांची पहाणी केल्यावर थेट साडी खरेदी केली त्यावेळी या केंद्रातील सर्वांनाच आपल्या चांगल्या कामाची पावती मिळाल्यासारखे झाले.
माविमच्या सखी संचालित या केंद्रावर साधारण 20 प्रकारच्या विविध शिलाई मशीन उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. या खेरीज बॅगांची शिलाई करता येईल अशा हेवी लेदर शिलाई मशीन, पिको मशीन, फॉल शिलाई आदींची सोय या ठिकाणी आहे. प्रशिक्षणार्थी महिला आणि मुली यांना निवासी पध्दतीने प्रशिक्षण देण्याची व्यवस्था देखील या इमारतीत आहे. या केंद्रातील कामाचा दर्जा पाहून या वर्षी येथील एका खाजगी शाळेने आपल्या मुलांच्या गणवेश शिलाईची ऑर्डर या ठिकाणी नोंदवली आहे. याच पध्दतीचे एक केंद्र वडसा (देसाईगंज) येथे सुरु आहे. पुरस्कार प्राप्त अशा या केंद्रात सध्या झाडीपट्टी रंगभूमीतील कपडेपट शिलाईचे काम चालू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौशल्य आधारीत व्यवसायाकडे वळा असा दिलेला संदेश या ठिकाणी प्रत्यक्षात आल्याची प्रचिती या केंद्राला भेट दिल्यावर नक्कीच येते.
लेखक: प्रशांत दैठणकर
माहिती स्रोत: महान्युज
अंतिम सुधारित : 4/19/2020