एड्स म्हटलं अनेकांच्या मनात धडकी भरते, या रोगाविषयी जनजागृती झाली असली तरी भीतीसुद्धा असतेच. वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरात प्रतीक्षा हेअर सलून मालकाने एड्सविषयी जनजागृतीचा वसा घेतला. आणि आपल्या व्यवसायातही त्यानुसार बदल केले.
२००४ साल. वस्तऱ्याने कापले तर एड्सची लागण होण्याची भीती मोठ्या प्रमाणात ग्राहकांमध्ये निर्माण झाली होती. त्यामुळे हेअरकटींग व्यवसायावर परिणाम होऊ लागला होता. त्यावर प्रतीक्षा हेअर सलूनचे काशीनाथ कोकाटे व राम कोकाटे यांनी आपल्या पारंपारिक व्यवसायाला सुरक्षा कवच दिलं.
१२ वर्षांपूर्वी ‘एक व्यक्ती, एक वस्तरा’ हा उपक्रम त्यांनी सुरु केला. आज त्यांच्या सलूनमध्ये सातशे पेक्षा अधिक वस्तऱ्यांचे दालनच तयार झालय. प्रत्येक वस्तऱ्याला एक नंबर व नाव दिलेलं असून त्याच वस्तऱ्याने त्या त्या व्यक्तीची दाढी केली जाते. हा वस्तरा कोकाटे बंधू स्वतः विकत आणतात.
दाढीसोबतच प्रत्येक ग्राहकाला एड्सविषयी मार्गदर्शन करतात. आपल्या व्यवसायासोबत जनजागृती करणाऱ्या कोकाटे यांचा अकोला येथील ‘अनुग्रह एकात्मिक ग्रामीण विकास संस्थे’तर्फे सत्कार करण्यात आला आहे.
लेखक - मनोज जयस्वाल ,
वाशिम
अंतिम सुधारित : 8/7/2023