श्रीगणेशाची आरती करण्याचा मान मिळणार आणि तोदेखील मोठ्या पाहुण्याच्या समवेत म्हणून चिमुरडी आनंदात होती. मधूनच त्यांचे भक्तीगित म्हणणे सुरू होते. चेहऱ्यावर उत्साह ओसंडून वहात होता. अखेर पाहुण्यांचे आगमन झाले आणि स्वागतगिताने सुरूवात झाली. पाहुण्यांनी छायाचित्रकार, कार्यकर्ते सर्वांना बाजूला सारले आणि कौतुकाने त्या चिमुकल्यांचे गीत ऐकू लागले.....
....प्रसंग होता पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या संपर्क कार्यालयतील गणेशोत्सवाचा आणि ते चिमुकले शासकीय अंध शाळेतील दिव्यांग विद्यार्थी होते. अर्थाच पाहुणे खुद्द पालकमंत्रीच होते. अवयवदानाबाबत जनजागृती करण्यासाठी खास या कार्यालयात श्रीगणेशाची स्थापना करण्यात आली आहे. मंडपातच अवयवदानाबाबत मॉडेल आणि छायाचित्रांच्या माध्यमातून अवयवदान मोहिमेची माहिती प्रसारीत करण्यात आली आहे. ध्वनीक्षेपकावर अवयवदानाचे महत्व सांगणारे गीतही मधून ऐकायला मिळत होते. नोंदणी टेबलवर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे विद्यार्थी अवयवदानाबद्दल माहिती सांगून अवयवदात्यांची नोंदणी करीत होते. ही सर्व व्यवस्था पहाणाऱ्या स्वीय सहायक संदीप जाधव यांच्या नियोजनाच्या सुचना सुरू होत्या...
मुले ज्या ठिकाणी गीत म्हणत होती त्याच्याच मागे ‘Be an organ donor’ असा संदेश लिहिला होता. ती मुले जणू सृष्टी पाहू शकत नव्हती मात्र दातृत्वाची दृष्टी देण्यासाठी त्याठिकाणी आली होती. दोन भक्तीगिते सादर झाल्यानंतर पालकमंत्री श्रीगणेशाच्या मुर्तीजवळ गेले. मुलांनाही त्याठिकाणी नेण्यात आले. मुले व्यवस्थित मंचावर चढतील याकडे कार्यकर्त्यांचे आणि स्वत: मंत्री महोदयांचे लक्ष होते. श्रीगणेशाची आरती सुरू झाल्यानंतर स्वत: श्री.महाजन आरतीच्या काही ओळी झाल्यावर एकेक विद्यार्थ्याच्या हातात आरतीचे ताट देत होते. चेहऱ्यावर समाधान आणि आनंदाच्या भावनाही तेवढ्याच स्पष्ट झळकत होत्या. आरतीनंतर मुलांसमवेत छायाचित्र काढण्यात आले. एक मोठी व्यक्ती आपल्यासोबत आहे याचाच त्या मुलांना खुप आनंद वाटत होता. अर्थातच त्यांच्यासाठी हा दिवस खासच होता....
....सार्वजनिक उत्सवातून सामाजिक जाणीव विकसीत व्हावी अशी अपेक्षा असते. उत्सवातून समाजकार्य उभे राहिल्यास त्या उत्सवाचे महत्व अधिक वाढते. पालकमंत्री महाजन यांनी याच उद्देशाने आपल्या संपर्क कार्यालयात श्रीगणेशाची स्थापना केली आहे. वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरीक, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले, दिव्यांग विद्यार्थी यांच्याकडेही समाजाचे लक्ष जावे आणि त्यांनादेखील आनंदात सहभागी करून घ्यावे म्हणून इथे आरतीचा मान त्यांना देण्यात येतो. सोबत अवयवदानाबाबत जनजागृती....
....या कार्यक्रमापूर्वीदेखील पालकमंत्री महोदयांनी योगासन स्पर्धांचा असाच आनंद घेत खेळाडुंचे मनसोक्त कौतुक केले. पालकमंत्र्यांना भाषणाची विनंती केल्यावर ‘भाषण जावू देत एक राऊंड अधिक पाहू या’ अशीच त्यांची प्रतिक्रीया होती. इथेदेखील मुलांचे गीत ऐकताना ‘आणखी एक म्हणू देत’ असे म्हणून त्यांचा उत्साह वाढविला. शासकीय कामातील धावपळ, राजकारण, विविध कार्यक्रम यांच्यापलिकडील पालकमंत्र्यांचे हे जग त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील सेवाकार्याच्या अनुरूपच होते. गणेशोत्सव केवळ आनंदाचा, उत्साहाचा आणि साजरा करण्याचा नसून तो जाणिवांचा उत्सव व्हावा असा प्रामाणिक प्रयत्न श्री.महाजन यांनी आपल्या या उपक्रमाद्वारे केला आहे.
स्वत: पालकाची भूमीका साकारणाऱ्यानेच अशा संवेदनशीलतेने सामाजिक कार्याचा संदेश दिल्यावर त्याला निश्चितपणे प्रतिसाद मिळणारच. त्यामुळे यावर्षीचा गणेशोत्सव नाशिकसाठी विशेष ठरला असेच म्हणावे लागेल. जिल्ह्यातील इतरही सार्वजनिक मंडळांनी जनजागृतीचे उपक्रम राबविले आहेत. अशा उपक्रमांची वाढणारी संख्या आशादायी आहे. ‘संवादपर्व’च्या निमित्ताने ग्रामीण भागात होणाऱ्या कार्यक्रमांनाही चांगला प्रतिसाद मिळतो आहे. अशा जाणीवा जपणारा उत्सवच लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असावा आणि प्रत्येक संवेदनशील नागरिकाचीदेखील तीच अपेक्षा असावी.
‘मृत्युनंतर होते आमची माती
अवयव देऊन इतरांना जपू नाती
नाती कशी रुजतात खोलखोल
माणसा अवयवदानचे ओळख मोल’
‘संवादपर्व’ अंतर्गत भोयेगाव येथील विद्यार्थीनींनी गायलेल्या या ओळीदेखील याच भावना व्यक्त करणाऱ्या आहेत.
लेखक: डॉ.किरण मोघे
माहिती स्रोत: महान्युज
अंतिम सुधारित : 3/6/2019