कोकण विभागात विपूल वनसंपदा आहे. या वनसंपदेच्या माध्यमातून स्थानिक आदिवासींना रोजगार सहजपणे उपलब्ध होऊ शकतो. याच रोजगाराच्या माध्यमातून त्यांचा उदरनिर्वाह सहजपणे करता येऊ शकतो. म्हणून शासनाने अनेक नवीन पर्याय उपलब्ध करुन दिले आहेत.
सह्याद्रीच्या कुशीत आदिवासी मोठ्या संख्येने राहतात. हे आदिवासी बांबूच्या टोपल्या आणि इतर वस्तू तयार करून विकण्याचे काम करतात. या वस्तू विकण्यासाठी त्यांना हक्कांची जागा नव्हती. यावर तोडगा म्हणून मुरबाड तालुक्यातील नाणेघाट प्रवेशाजवळ वनविभाकडून आदिवासी बांधवाना त्यांनी जंगलातून जमा केलेला रानमेवा, वनौषधी आणि बाबूंच्या टोपल्या विकण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. भूमाता वनधन विक्री केंद्र या नावाने एका छताखाली हा बाजार भरतो. वन विभागाने आदिवासींच्या रोजगाराची बिकट वाट सोपी केली.
नाणेघाटाच्या प्रवेशद्वारावर वैशाखरे येथे दर शुक्रवारी भरणाऱ्या या बाजारात परिसरातील केव्हारवाडी, बनाचीवाडी, भांगवाडी, वाडाचीवाडी अशा अनेक आदिवासी समाज बांबूपासून टोपल्या बनवून मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आणतात. घोटी, इगतपुरी, वेल्हे, जुन्नर, ओतूर, आळेफाटा अशा विविध ठिकाणाहून व्यापारी आणि लोक येऊन या टोपल्या किंवा इतर सामान घेऊन जातात. सामूहिक वनहक्क प्राप्त गावांमधील पारंपरिक वननिवासींनी वनोपजावर आधारित तयार केलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी वन विभागाने वन मंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी हा निर्णय घेतला.
अन्य भागात आदिवासी महिलांना रानभाज्या आणि अळंबी विक्रीच्या माध्यमातून चांगला रोजगार उपलब्ध होत आहे. सध्या बाजारपेठेत अळंबीचा 30 ते 40 रुपये वाटा मिळतो आहे. पावसाळ्यात नैसर्गिकरित्या ही अळंबी उगवते. चविष्ट आणि आरोग्यवर्धक अशा अळंबीला खूप मागणी असते.
अळंबी किंवा मशरुम म्हटले की, शाकाहारी व मांसाहारी खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटते. हेल्थफूड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अळंबीचा हंगाम सध्या सुरु झाला आहे. रायगड जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये अळंबी विकणाऱ्या आदिवासी महिला दिसत आहेत. पावसाळ्यात नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या अळंबीचा आस्वाद घेतात.
अळंबी ही बुरशी गटातील वनस्पती आहे. अळंबीला इंग्रजीमध्ये मशरुम असे म्हणतात. पावसाळ्यात निसर्गात अळंबी आढळते. तसेच व्यापारी स्वरुपात लागवडही केली जाते. अळंबीमध्ये जास्त प्रथिने, लोह, तांबे, तंतुमय पदार्थ व कमी ऊर्जा असते. अशा प्रकारच्या अन्नाची गरज मधुमेही व लठ्ठ व्यक्तींना असते. जीवाणू आणि विषाणूंना प्रतिकार करणारी प्रथिने अळंबीमध्ये असतात. रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी करणारे घटक असतात. अळंबीतील प्रथिनांमध्ये शरीरवाढीसाठी आवश्यक त्या सर्व अमिनो आम्लांचा समावेश असून ती भाजीपाल्यांतील प्रथिनांपेक्षा उच्च प्रतीचे व पचनास हलकी असतात. ‘क’ जीवनसत्व अधिक असल्यामुळे अळंबीचे नियमीत सेवन केल्यास रोगापासून बचाव होऊ शकतो. ब-2 जीवनसत्वसुध्दा अधिक असते. यामुळे शर्करायुक्त पदार्थाचे पचन, रक्तवाहिन्यांचे आकुंचन कमी होणे व लहान मुलांना ‘बेरीबेरी’ हा रोग निवारण्यास मदत होते. तसेच पचनक्रिया सुरुळीत ठेवणारे अन्न म्हणून अळंबी उत्तम आहे.
बांबूपासून बनविलेल्या वस्तू, वनभागात उत्पादित होणाऱ्या रानभाज्या याशिवाय अळंबी यासासह अन्य विक्रीयोग्य वस्तू बाजारात आणून आदिवासींच्या रोजगारासाठी शासनाचे प्रयत्न यशस्वी होत आहेत हे या प्रतिनिधीक उदाहरणांवरुन दिसते आहे.
लेखक: डॉ.गणेश व.मुळे
माहिती स्रोत: महान्युज
अंतिम सुधारित : 2/11/2020