आदिवासींच्या ताब्यातील निवासी जमिनी या अतिक्रमित असल्या तरी नियमानुकूल करुन त्यांना हक्काचा निवारा उपलब्ध करुन द्यावा, या शासनाच्या धोरणाची रायगड जिल्ह्यातील महसूल विभाग यंत्रणेने कार्यतत्परतेने अंमलबजावणी केल्यामुळे आज कोळे ता. म्हसळा येथील 24 आदिवासी कुटुंबांना हक्काचा निवारा प्राप्त झाला आहे.
म्हसळा तालुक्यातील मौजे कोळे येथील आदिवासी वाडीतील 24 कातकरी समाजातील व्यक्तींना अनुसूचित जमाती प्रवर्गातील व्यक्तींच्या घराखालील अतिक्रमण केलेल्या जागा नियमानुकूल करण्याबाबत राज्यपाल
महोदयांच्या ठोस उपाययोजना आदेशामुळे लाभ देण्यात आला आहे. या आदेशान्वये महसूल प्रशासनाने केलेल्या अंमलबजावणीमुळे कोळे - 23, आगरवाडा -4 व पांगळोली - 8 अशी एकूण 35 अतिक्रमणे नियमानुकूल करण्यात आली आहेत. त्यामुळे आज या आदिवासींना हक्काचा निवारा प्राप्त झाला आहे.
म्हसाळा तालुक्यात मौजे कोळे येथील गट नं.90 (जुना सर्वे नं.72/1अ),क्षेत्र 0.30.0 व मौजे-आगरवाडा येथील 4 कातकरी समाजातील व्यक्तींना गट नं./स.नं.6/0क्षेत्र-0-73-0, मौजे-वारळ येथील गट नं/स.नं.154/1 ई मध्ये 6 कातकरी समाजातील व्यक्तींची अतिक्रमणे व मौजे पांगळोली येथील गट नं./स.नं153/1ब मध्ये कातकरी समाजातील व्यक्तींनी सरकारी जमिनीमध्ये अतिक्रमण करुन 43 घरे बांधली होती. या संदर्भात राज्यपाल महोदयांनी दिलेल्या ठोस उपाययोजना आदेशान्वये कोकणातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील कातकरी या जमातीच्या व्यक्तींच्या घराखाली अतिक्रमण केलेल्या जागा नियमानुकूल करण्याबाबत महसूल विभागाने कारवाई केली. या प्रकरणी तलाठी व मंडळ अधिकारी यांचेमार्फत चौकशी व सर्वेक्षण करुन संबंधित व्यक्तींना सरकारी जागेवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याचे प्रस्ताव तयार करण्यात आले. त्यानंतर श्रीवर्धन येथील उपविभागीय अधिकारी यांचेकडे सादर करुन त्यांच्या आदेशान्वये 35 अतिक्रमणे नियमानुकूल करण्यात आले.
म्हसळा तालुक्यातील मौजे आगरवाडा येथील चार कातकरी कुटूंबांना राहत असलेल्या घरांच्या जमिनी त्यांच्या नावावर करुन 7/12 व गा.न.नं.6 चे उतारे उपविभागीय अधिकारी, श्रीवर्धन प्रविण पवार यांचे हस्ते मंगेश वाघमारे, शंकर वाघमारे, शांताराम वाघमारे, लक्ष्मण वाघमारे यांना वितरीत करण्यात आले.
या कार्यक्रमास तहसिलदार म्हसळा रामदास झळके, सहा. पोलीस निरिक्षक सुदर्शन गायकवाड, निवासी नायब तहसिलदार के.टी.भिंगारे, निवडणूक नायब तहसिलदार एन.एल.मोरे, मंडळ अधिकारी म्हसळा, कल्याण देऊळगांवकर, मंडळ अधिकारी खामगांव जे.डी.मोरे, तलाठी वरवठणे एस.के.शहा व तहसिल कार्यालयातील कर्मचारी व तलाठी कर्मचारी उपस्थित होते.
संकलन : जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग
माहिती स्रोत: महान्युज
अंतिम सुधारित : 4/22/2020