माणुसकीची भिंत हा उपक्रम महाराष्ट्रातील अनेक शहरांत सुरु झाला आहे. गरजूंपर्यंत पोहोचून त्यांना कपडे, धान्य देण्याचा असाच उपक्रम अमरावतीच्या आधार या संस्थेतर्फे राबविला जात आहे. कुपोषणाची समस्या असलेल्या अमरावती मधील मेळघाट या भागात ‘आधार’ संस्थेने कार्य सुरू केले आहे. संस्था अध्यक्ष प्रदीप बाजड हे सध्या आदिवासीच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांच्या टीमसह झटत आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, कर्मयोगी गाडगे महाराज, प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज अशी संतपरंपरा असलेल्या अमरावतीला सामाजिक कार्याची पार्श्वभूमी मोठी आहे. मोठे क्षेत्रफळ लाभलेल्या 14 तालुक्यांच्या या मोठ्या जिल्ह्यात आज अनेक स्वयंसेवी संस्था कार्यरत आहेत. तथापि, मेळघाट अर्थात चिखलदरा व धारणी या दोन तालुक्यातील आदिवासी बांधवांसाठी आपल्याला अमरावतीत राहून काय मदत करता येईल, याची चर्चा श्री. बाजड यांनी त्यांच्या मित्रांमध्ये केली आणि ‘आधार’ संस्था आकारास आली. संस्थेची स्थापना गांधी जयंतीचे औचित्य साधून 2 ऑक्टोबर 2016 रोजी करण्यात आली.
संत गाडगे महाराजांकडून प्रेरणा घेत त्यांचा दशसूत्रीचे अवलंब करण्याचे उद्दीष्ट त्यांनी स्वीकारले. भुकेल्याला अन्न, तहानलेल्याला पाणी आणि गरिबांना वस्त्र या संकल्पनेचे अनुकरण करण्याचा निश्चय केला. विकासापासून काहीसा दूर असलेल्या या नागरिकांना थोडी मदत व्हावी या हेतूने धान्य, कपडे व गरजेच्या वस्तू देण्याचे त्यांनी ठरवले.
आधारचे कार्यक्षेत्र केवळ मेळघाट एवढेच मर्यादित नाही; पण तेथील आदिवासी बांधवांच्या गरजा लक्षात घेतल्या तर तिथे काम करण्यास प्राधान्य देणे आवश्यकच होते. शेती हा मेळघाटातील प्रमुख व्यवसाय असून या भागात मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव राहतात. त्यात वनांवर अवलंबून राहणाऱ्या नागरिकांची संख्याही मोठी आहे.
संस्थेची सुरवात त्यांनी स्वत:पासून केली. घरी कपाटातील भरगच्च कपडे पाहून कल्पना आली की, या वस्तू सामान्यत: सर्वजण खरेदी करतो; पण मेळघाटातील माणसांना अशी चैन शक्य नाही. किमान गरजेपुरते कपडे तरी मिळत नाही. मग त्यांनी मनाशी ठरवले की, या वस्तू गरजूंपर्यंत पोहोचविल्यास त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवू शकू.
समाजात अनेक संपन्न, उच्च मध्यमवर्गीय, मध्यमवर्गीय लोक राहतात. ‘आधार’ने त्यांना आवाहन केले. त्यांना ते अपीलही झाले. अनेक लोक मदतीसाठी पुढे आले. त्यामुळे अनेकांना वाटप करता येतील इतक्या वस्तू आम्ही ते जमा करु शकले. एका वर्षात ‘आधार’ 70 गावांपर्यंत पोहोचू शकले.
पुढील वर्षभरात किमान 150 गावांत हे सेवा कार्य पोहोचविण्याचा संस्थेचा मानस आहे. तो निश्चित यशस्वी होईल, याची त्यांना खात्री आहे. नुकत्याच झालेल्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात कवी ज्ञानेश वाकुडकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून या कार्याला पाठिंबा दर्शविला आहे.
मेळघाटातील नागरिकांच्या गरजा पाहता कपडे विशेषत: महिलांचे व मुलांच्या कपड्यांची मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे. लहान मुलांची खेळणी व अभ्यास साहित्याचीही आवश्यकता असून तशा वस्तू, लग्नाच्या आंदणातील भांडी आदी ‘आधार’ पर्यंत पोहचवाव्यात. अधिक माहितीसाठी 9028379707 या क्रमांकावर संपर्क साधावा.
लेखक: जयंत गणेशराव सोनोने
माहिती स्रोत: महान्युज
अंतिम सुधारित : 8/6/2020