অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

भर अरण्यातले डिजिटल गाव : हरिसाल

भर अरण्यातले डिजिटल गाव : हरिसाल

सागांची गर्द राई, सातपुड्याचे उंच डोंगर, केवळ सागच नव्हे तर अनेक वनस्पती आणि प्राणी यांची विपुल जैवविविधता आणि त्यात वसलेली छोटी-छोटी गावे, तेथील आदिम जनजीवन अशी वैशिष्ट्ये मेळघाट शतकानुशतकांपासून राखून आहे. डोंगरद-यातून खळाळून वाहणारी सिपना ही नदी या वैभवात भरच घालते. सागवान असा सिपना या शब्दाचा अर्थ आणि मेळघाट म्हणजे दोन घाटांचा मेळ.

महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश अशा दोन्ही राज्यांना समृद्ध करणारे मेळघाट हे सातपुड्याच्या दक्षिण रांगांत वसले आहे. त्याला गाविलगड पर्वतही म्हणतात. सुमारे 300 गावे या पर्वताच्या कुशीत वसली आहेत. कोरकू ही येथील जनसमुदायाची भाषा. तापी नदीच्या या खो-यात सिपनेसह खंडू, खापर, गाडगा, डोलार या नद्याही वाहतात. वाघाचे अस्तित्व ही येथील वनसमृद्धीची खूण. व्याघ्रप्रकल्पासाठी प्रसिद्ध असलेला हा मेळघाट काही काळापासून कुपोषणाच्या प्रश्नाने अस्वस्थ आहे.

त्यामुळे कुपोषण समूळ नष्ट करण्यासाठी सर्वंकष प्रयत्न केले जात आहेत. कारण, या प्रश्नावर केवळ आरोग्यसेवेची उभारणी हाच एकमेव उपाय नव्हता तर रोजगाराची निर्मिती व शिक्षणाची सांगड घालणेही आवश्यक होते. येथील स्थलांतर रोखण्याची व आरोग्याविषयी जनजागृतीही गरजेची होती. याच हेतूने शासनाने भक्कम आरोग्य यंत्रणा उभारण्यासह मेळघाटात शिक्षण व रोजगाराच्या विविध योजना व प्रकल्पांची अंमलबजावणी सुरु केली. या एकसंध प्रयत्नांमुळे मेळघाटात अनेक सकारात्मक बदल होत आहेत. पर्यावरण आणि प्रगती या दोहोंचा तोल साधत आपला मेळघाट बदलत आहे.

अलीकडे देशाचे लक्ष वेधून घेतले ते मेळघाटातील हरिसाल या दुर्गम गावाने. हे चिमुकले गाव धारणी या तालुक्यात वसले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘डिजिटल इंडिया’ या महत्वाकांक्षी कार्यक्रमानुसार शासनाकडून हे गाव ‘डिजिटल ग्राम’ म्हणून घोषित झाल्यावर या गावाने कातच टाकली आहे. परतवाड्याहून धारणीकडे जाताना डोंगरद-या, घाटातून प्रवास करताना पुढे मोबाईलला रेंज मिळते की नाही, असा विचार मनात येतो आणि सेमाडोहमधून सिपनाकाठाने अरण्यातून पुढे सरकत गाडी येऊन पोहोचते ती हरिसालला. हरिसालला पोहोचलो की रेंज नसण्याचा विचार कुठल्या कुठे पळून जातो आणि आपण नवलात पडतो ते तेथील डिजिटल व्यवहार पाहून. सबंध जगाशी ‘फुल्ली कनेक्टेड’ असणारे हे भारतातले पहिले डिजिटल गाव.

येथील अंगणवाडी, शाळा, दवाखाना, बँक, स्वस्त धान्याचे दुकान, ग्रामपंचायतीचा व्यवहार डिजिटल स्वरुपात होत आहे. आपण हरिसालमध्ये शिरलो की येथे तंत्रसाक्षरतेने आणलेली जागरुकता आणि गावक-यांमधील सकारात्मक ऊर्जा आपल्याला भारुन टाकते. ही किमया शासनाने घडवली ‘मायक्रोसॉफ्ट’च्या सहकार्याने आणि गावक-यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने. तंत्रसाक्षरतेने व्यवहारात निर्माण केलेल्या पारदर्शकता व गतीचे हरिसाल हे भक्कम उदाहरण ठरावे.

‘मायक्रोसॉफ्ट’ने ‘टीव्‍ही व्‍हाईट स्‍पेस’ हे अद्ययावत तंत्रज्ञान या प्रकल्पासाठी वापरले आहे. मोबाईल, इंटरनेट कनेक्‍टिव्‍हिटीसाठी लागणाऱ्या स्‍पेक्‍ट्रमची कमतरता असते. त्याचा खर्चही अधिक असतो. त्या तुलनेत शेवटच्‍या टप्‍प्‍यात (Last Mile) इंटरनेट सुविधा प्रदान करण्‍यासाठी ‘टीव्ही व्हाईस स्पेस’ तंत्रज्ञान उपयुक्त व किफायतशीर ठरते. टेलिव्हिजनसाठी उपयोगात येणाऱ्या स्‍पेक्‍ट्रमचा वापर 10 ते 15 टक्क्यांहून अधिक होत नाही. उर्वरित स्‍पेक्‍ट्रम इंटरनेट सुविधेसाठी वापरला जाऊ शकतो. तो वापरण्‍यासाठी ‘मायक्रोसॉफ्ट’ने हरिसालला विशिष्ट अॅन्‍टेना बसवला आहे, त्या माध्‍यमातून गावातील सार्व‍जनिक सुविधा प्रदान करणारी बँक, प्राथमिक आरोग्‍य केंद्र, स्वस्त धान्य दुकान, पोस्‍ट ऑफिस, ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी साझा, शाळा, अंगणवाडी केंद्र यांना सहजपणे इंटरनेट सुविधा उपलब्‍ध झाली.

याद्वारे हे गाव केवळ ‘डिजिटली कनेक्ट’ एवढाच या उपक्रमाचा हेतू नाही, तर गावक-यांना रोजगार, उत्तम शिक्षण व चांगल्या आरोग्य सुविधा पुरविणे हेही त्यातून साधले जात आहे. हे साधण्यासाठी डिजिटल यंत्रणा उभारण्यासह गावातील तरुणांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात आले. ग्रामपंचायतीच्या कारभारासह गावातील बँक (बँक ऑफ महाराष्ट्र), अंगणवाडी, आश्रमशाळा, स्वस्त धान्य दुकान येथील सगळा व्यवहार डिजिटल स्वरुपात होऊ लागला आहे. गावातील डिजिटल स्कूल व तिथे चालू असलेल्या प्रशिक्षण वर्गामुळे गावातील व परिसरातील बाल, किशोरवयीन व तरूण मुले तंत्रसाक्षर झाली. कृषी मालावर आधारित प्रक्रिया उद्योग, मृदपरीक्षण, दुग्धविकास, भाजीपाला उत्पादन, बचत गट स्थापन करुन त्याद्वारे वनोपज विक्री, हवामानाचा अंदाज, पीकपद्धती, पावसाचा अंदाज, पीक व्यवस्थापन अशी गावक-यांना उपयुक्त माहिती ठळकपणे डिजीटल बोर्डवर उपलब्ध होऊ लागली आहे. त्यामुळे दुर्गम भागात वसलेल्या या गावातील नागरिकांना अद्ययावत माहिती मिळू लागली आहे.

तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव ही मेळघाटातील आरोग्‍य सुविधांतील महत्वाची अडचण. त्यामुळे ‘हॅवलेट पॅकर्ड’ या जगप्रसिद्ध संगणक कंपनीच्या सहकार्याने हरिसाल व धारणीला ‘टेलिमेडीसीन प्रोजेक्ट’च्या माध्यमातून उपचारांच्या सुविधा देण्यात येत आहेत. टेलिमेडिसीनद्वारे मेळघाटातील रुग्णांना थेट अमरावती सुपर स्पेशालिटी रुग्णालय तसेच मुंबईतील जे.जे. हॉस्पिटलसह हैदराबाद येथील रुग्णालयाशी जोडले गेले आहे. धारणी परिसरातील चार हजारांहून अधिक रुग्णांनी या सुविधांचा लाभ घेतला आहे. देशातील या पहिल्या आदर्श डिजिटल गावाचे कौतुक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘न्यू बिगिनिंग’ या नियतकालिकात केले आहे.

हरिसालसह भोवतीचा परिसरही बदलत आहे. शासनाकडून मेळघाटातील इतर परिसरातील पर्यटन लक्षात घेता स्थानिक आदिवासी बांधवांना आदरातिथ्य प्रशिक्षणही दिले जात आहे. अशा प्रशिक्षित तरुणांना रोजगार मिळू लागला आहे. हरिसालभोवतीच्या परिसरात स्ट्रॉबेरी लागवडीचे प्रयत्न यशस्वी ठरत आहेत. परिसराची वीजेची गरज लक्षात घेऊन मध्‍यप्रदेश राज्‍यातून 132 किलो व्‍होल्‍टची वीज वाहिनी आणण्यात आली. त्यामुळे मेळघाटातील 100 गावांना नियमित वीज पुरवठा राहण्‍यास मदत झाली. धारणीजवळ चिखलदरा तालुक्यात उंच डोंगररांगालगतच्या विस्तीर्ण पठारांवर पवनऊर्जा प्रकल्प उभे राहात आहेत.

अंगणवाडी सेविका व आरोग्यसेवक यांची समन्वय यंत्रणा, टेलिमेडिसीन, बाईक ॲम्ब्युलन्स आदी आरोग्य सुविधांबरोबरच रोजगारनिर्मिती, शिक्षण यावरही भर देण्यात येत आहे. या सर्व प्रयत्नांच्या परिणामातून मातामृत्यू आणि बालमृत्यूच्या आकडेवारीत घट होत आहे.

मेळघाटातल्या घनदाट जंगलात वसलेल्या रंगुबेली या दुर्गम गावाला जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी नुकतीच भेट दिली व तिथे मुक्कामी राहून तेथील समस्या गावक-यांकडून जाणून घेतल्या. या भेटीच्या दुस-या दिवशी धारणी येथे झालेल्या अधिका-यांच्या बैठकीत रंगुबेलीसह परिसरातील गावांत सिंचनाची सोय, बँकिंग करस्पॉडन्स, वीजेची सुविधा आदी अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले गेले. त्यामुळे रंगुबेली व परिसरातील गावे आता विकासाकडे पाऊल टाकत आहेत.

शासनाने वन अधिकार कायदा, 2006 लागू केल्‍याने सुमारे 60,000 हेक्‍टर वनक्षेत्रावर स्थानिकांना सामुदायिक व वैयक्तिक वन हक्‍क दिले गेले आहेत. त्‍याचप्रमाणे पेसा कायदाही लागू झाल्यामुळे वनांतून मिळणाऱ्या बांबू, तेंदूपत्ता, डिंक आदी उत्पादनाची मालकी गावकऱ्यांना मिळाली आहे. या दोन कायद्यामुळे परिसरातील नागरिकांसाठी खात्रीचे शाश्‍वत उत्‍पन्‍न स्त्रोत निर्माण झालेले आहेत.

शासनाचे विविध विभाग, लोकप्रतिनिधी, सा‍माजिक संघटना आणि नागरिकांच्या सहभागाने मेळघाटातील चित्र झपाट्याने बदलत आहे. अद्ययावत तंत्रज्ञानाचा व दळणवळण सुविधेचा वापर करुन आदिवासी बांधवांसाठी विकासाचे दरवाजे खुले करण्‍यात येत आहेत. येथील तरुण पिढी या संधीचा उपयोग करुन मेळघाटाला मुख्‍य प्रवाहामध्‍ये नक्‍की आणेल असा विश्‍वास आहे.

लेखक -हर्षवर्धन पवार,

जिल्हा माहिती अधिकारी, अमरावती

माहिती स्रोत : 'महान्यूज'

अंतिम सुधारित : 6/18/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate