पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील पुरंदर किल्ल्यापासून आणि नारायणपूरच्या एकमुखी दत्तमंदिरापासून १५ ते २० किलोमीटर अंतरावर भिवरी हे गाव वसलं आहे. “पुरातन चतुर्मुख महादेव मंदिर” हे गावाच्या सीमेवरच आहे. तसेच कानिफनाथ मंदिरासाठी प्रसिद्ध असलेलं बोपदेव गाव हे ही या भिवरी गावाला लागूनच आह. गाव डोंगराळ भागात असल्यामुळं जमिनही खडकाळ ! शिवाय पावसाचं प्रमाणही कमी ! त्यामुळं शेतकऱ्यांचं शेत उत्पादनही मर्यादितच होत असे. त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य शासनाच्या योजना राबवून गावातील गावकरी आपली प्रगती साधत आहेत. या गावच्या चिमाजी सदाशिव लोणकर यांना प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) योजनेंतर्गत साधारणपणे २६९ चौ.फुटाचे घर मंजूर झाल्यामुळे त्यांना हक्काचं घर मिळालं आहे.
पुणे जिल्ह्यातील दौंड आणि पुरंदर तालुक्याचा बराचसा भाग डोंगराळ असल्यामुळं ज्वारी, बाजरी या प्रमुख पिकांबरोबरच हरभरा, मूग, मटकी, वाटाणा, पावटा, हुलगा ही पिकंही इथं घेतली जातात.! पावसाचं प्रमाण आणि उपलब्ध पाणीसाठ्याचा विचार करुन कांदा, मका अशी पिकंही या भागात घेतली जातात. शासनाच्या विविध योजना राबवून या भागातील शेतकऱ्यांची वाटचाल प्रगतीच्या दिशेने सुरु आहे. याच भागातील चिमाजी सदाशिव लोणकर यांचीही शासकीय योजनेमुळे स्वत:च्या निवाऱ्याची सोय झाली आहे.
शासनाने २०२२ पर्यंत सर्वांसाठी घर हे महत्त्वाकांक्षी धोरण जाहीर केले आहे. त्यानुसार ग्रामीण गरीब गरजू कुटूंबांना हक्काचे घर उपलब्ध करून देण्याकरिता प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण राबविण्यात येत आहे. शासनाच्या विविध विभागांच्या घरकुल योजनांची प्रभावीपणे अमंलबजावणी करण्यासाठी व्यवस्थापन कक्षाची स्थापना केली आहे. या योजनेंतर्गत थेट लाभार्थ्यांच्या खाती अर्थसहाय्य जमा करण्यात येते. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील भिवरी या गावात राहणारे चिमाजी सदाशिव लोणकर यांचे पूर्वीचे दगड मातीचे कच्चे घर होते. ते शेतमजूर म्हणून काम करतात. शेती हंगामाव्यतिरिक्त रोजंदारीच्या कामावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. जुन्या घराचे छप्पर मोडके कौलारू असल्यामुळे पावसाळ्यात घर गळत असे. त्यामुळे त्यांना घरात राहणे अतिशय अवघड झाले होते.
सन २०११ मध्ये शासनातर्फे सामाजिक, आर्थिक व जातनिहाय सर्वेक्षण करण्यात आले होते. यामध्ये घराबाबतच्या माहितीचा सर्व्हे होता. प्रधानमंत्री आवास योजना सन २०१६-१७ करिता सामाजिक आर्थिक व जातनिहाय सर्वेक्षण 2011 मधील तपशील वापरण्यात आला होता. शासनाने प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण करिता लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध केली. म्हणजेच बेघर व कच्च्या घरांची यादी ऑनलाईन संबंधित वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली. या यादीत चिमाजी सदाशिव लोणकर यांचे नाव होते.
हक्काचे व संरक्षित छप्पर हवे म्हणून त्यांनी शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज केला आणि अल्पावधीतच घरकुल योजनेतून त्यांना घरकुल मंजूर झाले. साधारणत: २६९ चौ. फुटाचे घर त्यांनी या योजनेतून बांधले आहे. यासाठी लागणारे रु. १ लाख २० हजाराचे अर्थसहाय्य श्री.लोणकर यांना मंजूर झाले. तसेच स्वत:कडील काही रकमेची जमवाजमव करुन श्री.लोणकर यांनी स्वत:चे घरकुल बांधले आहे.
प्रधानमंत्री आवास योजना ही ग्रामीण भागातील गरीब, गरजू घर नसलेल्यांसाठी प्रभावी ठरत आहे.
श्री.लोणकर यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शासन अनुदानातून पक्के घर मंजूर झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबाचा निवासाचा प्रश्न कायमस्वरूपी मिटलेला आहे आणि पक्के घर मिळाल्यामुळे त्यांचं कुटुंब समाधानी आहे.
केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांचा लाभ श्री.लोणकर यांच्याप्रमाणेच अन्य नागरिकांनी करुन घेतल्यास त्यांनाही त्यांच्या हक्काचे घरकुल मिळण्याबरोबरच स्वत:ची प्रगती साधणे शक्य होईल.!
लेखिका - वृषाली पाटील,
माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय,पुणे
माहिती स्रोत : महान्यूज
अंतिम सुधारित : 2/29/2020