माण, खटाव, फलटण व कोरेगावचा काही भाग दुष्काळी पट्ट्यात मोडतो. बिदाल गाव दुष्काळाचे केंद्रबिंदू आहे. या गावाच्या परिसरात गेल्या दोन वर्षांपासून टँकर सुरू होता. शासनाने या गावाचा जलयुक्त शिवार योजनेमध्ये समावेश करून जलसंधारणाची कामे केली. पाणी फाऊंडशेनच्या माध्यमातून या गावात जलसंधारणाची चांगली कामे झाली. यामुळे अल्प पाऊस होऊनही हे गाव पाणीदार झाले. कोरड्या विहिरी, विंधन विहिरींची पाणी पातळी वाढल्याने हे गाव टँकरमुक्त झाले. सातारा जिल्ह्याच्या पूर्व बाजूला असणाऱ्या माण तालुक्याच्या मुख्यालयापासून 4 कि.मी. अंतरावर बिदाल हे गाव आहे. वॉटरकप स्पर्धेत क्र.2 मध्ये राज्यात तिसरा क्रमांक पटकविणाऱ्या या गावाने छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून श्रमदानाला सुरुवात केली. या गावातील लोकांनी पाहुणे, नोकरीसाठी बाहेर असणाऱ्या लोकांना निमंत्रित करून गावातील 4 हजार 561 व बाहेरील 1 हजार 299 अशा एकूण 5 हजार 860 लोकांनी श्रमदान करून एकाच दिवशी 210 लुज बोल्ड बांधून एक विक्रम केला होता.
हिवरे बाजार आणि राळेगणसिद्धीत जशी वृक्षतोडीस बंदी व चराई बंदी करून, प्रत्येक पाण्याचा थेंब कसा जिरवता येईल हे पाहिले जाते, तेच चित्र बिदालमध्येही पाहायला मिळाले. खोकड मळ्यासह जे तीन मोठे पाणलोट क्षेत्र आहेत तिथे मोठ्या प्रमाणात पाणी झिरपले. या पाणलोट क्षेत्रात आतापर्यंत कसल्याच प्रकारचे गवत येत नव्हते. मात्र गावाने चराई बंदी केल्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात गवत दिसते आहे. गवत आणि गवताच्या मुळ्या या मृदसंधारणाचे अतिशय चांगले काम करतात. त्यामुळे या डोंगर कड्यावरील प्रत्येक थेंब जमिनीत कसा जाईल याचा कटाक्षाने प्रयत्न केला आहे.
जिल्हा प्रशासनाने बिदाल गावात ग्रामसभा घेऊन जलसंधारणाचे महत्त्व विशद करण्यात आले. या आवाहनाला गावकऱ्यांनी साद दिल्याने मोठी संघटित शक्ती उभी राहिली. या गावासाठी शासनाच्या विविध योजनेतून मोठे अनुदान देण्यात आले. जसे नॅडेपसाठी 21 लाख 52 हजार 500 रुपये शोषखड्ड्यांसाठी 28 लाख 10 हजार, विहीर पुनर्भरणासाठी 6 लाख 84 हजार, शेततळ्यासाठी 9 लाख 50 हजार अशा योजनांसाठी व इतर योजनांच्या माध्यमातून 70 लाख रुपयांचे अनुदान या गावासाठी देण्यात आले. बिदाल गावात 8 एप्रिल ते 22 मे 2017 या कालावधीत 30 हजार 96 पुरुषांनी तर 36 हजार 293 महिलांनी श्रमदान केले. यंत्राद्वारे सलग समतल चर 28,481.14 घ.मी., कपार्टमेंट बंडिंग 30,179,77. घ.मी., कंटुर बंडिंग 21,115,35 घ.मी.माती नाला बांध 62,818, ओढा रुंदीकरण व खोलीकरण 7,047.99 घ.मी., नदी खोलीकरण व रुंदीकरण 1,88,22 घ.मी. व सिमेंट बंधारा 1,400 घ.मी. असे एकूण 4,82,720.57 घ.मी. काम पूर्ण करण्यात आले. माणगंगा नदीच्या तीरावर वसलेल्या बिदाल गावाची लोकसंख्या 5 हजार 974 इतकी आहे. सत्यमेव वॉटर कपमध्ये गावाने राज्यात चमकदार काम केले. गावाच्या एकजुटीचा अभूतपूर्व आविष्कार जल चळवळीत परिवर्तित झाला. या बिदाल गावातील लोकांनी श्रमदानातून मातीनाला बांध 10, कंपार्टमेंट बंडिंग 220 हेक्टर, सीसीटी 15 हेक्टर, खोल सीसीटी 130 हेक्टर, शेततळे 22, लुज बोल्डर 203, खोलीकरण व रुंदीकरण 1500 मीटर, लहान मातीचे बांध 17, गॅबीयन बंधारा 1 आणि सिमेंट नालाबांध 1 ही कामे केली. यामुळे 401 टीसीएम पाणीसाठा झालेला आहे. यामुळे विहिरींची तसेच विंधन विहिरींची पाणी पातळी एक ते दीड मीटरपर्यंत वाढली आहे.
कराड अर्बन बँक, ज्ञानदीप सोसायटी, सिद्धनाथ पतसंस्था, चैतन्य पतसंस्था, प्रियदर्शनी पतसंस्था, दहिवडी पतसंस्था यांच्यासह इतर संस्था तसेच मान्यवरांनी गावच्या जलसंधारण कामासाठी निधी दिला.
दुष्काळ हा निसर्गाबरोबरच मानवनिर्मित असतो. निसर्गाकडून मिळालेल्या गोष्टींची परतफेड आपण निसर्गाला केली तर तो आपल्याला समृद्ध करतो, दुष्काळमुक्त करतो. मात्र निसर्गाला आपण ओरबाडले तर तो आपल्याला दुष्काळ देतो. त्यामुळे जलसंधारणाच्या विविध उपचार पद्धतीने दुष्काळमुक्तीसाठी प्रयत्न केले पाहिजेत. गावाच्या शिवारात पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब अडवला पाहिजे, तो जमिनीत जिरवला पाहिजे. गावात एकजुटीने जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात घेणे आवश्यक आहे. जलसंधारणाच्या विविध कामांमुळे हे गाव आता पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाले असून टँकरमुक्तही झाले आहे. सुट्टीच्या दिवशी गावातील शासकीय कर्मचारी, डॉक्टर, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी तसेच विविध सामाजिक संस्था गावात येऊन श्रमदान करतात.
बिदाल गावातील महत्त्वाच्या ठिकाणी भोंगे बसवले आहेत. पहिला भोंगा 5.30 वाजता होतो. त्यानंतर गावातील लोक उठून घरगुती कामे करतात. दुसरा भोंगा 6.30 वाजता होतो. कामाच्या ठिकाणी जाण्याची तयारी करतात. तिसरा भोंगा 6.45 वाजता या भोंग्याला लोक एकत्र जमतात व 7 चा चौथा भोंगा झाला की लोक श्रमदानाला लागतात. या काळात गावातील दुकाने सकाळी 6 ते 9 या कालावधीत बंद ठेवली जातात. गाव म्हटले की, राजकारण आले, गट तट आल्यावर संघर्ष ठरलेलाच असतो. या साऱ्या गोष्टींना फाटा देत यावर्षी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली. गावची ग्रामपंचायत ही आय.एस.ओ. या नामांकनाने सन्मानित असून संपूर्ण महाराष्ट्रातील 4 थी व सातारा जिल्ह्यातील पहिली आय.एस.ओ. ग्रामपंचायत आहे. ग्रामपंचायतीची स्थापना 1951 मध्ये झाली आहे. गेली 50 वर्षे ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध होत आहे. बिदाल हे देशातील पहिले महिला विमा ग्राम आहे. या गावाला ग्राम स्वच्छतेचा पुरस्कारही मिळाला आहे.
‘बिदालमध्ये पाऊस पडत होता पण पाणी नदी, ओढ्या, नाल्याद्वारे वाहून जात होते. गावामध्ये जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात घेऊन पावसाचा प्रत्येक थेंब जिरवण्यात आला. त्याचे दृष्य परिणाम आज दिसू लागले असून, गाव पाण्याबाबतीत स्वयंपूर्ण झाले आहे.’ - अशोक इंगवले, शेतकरी
‘जलसंधारणाच्या कामांमुळे गावात कमी पाऊस होऊनही आज आमच्या विहिरींची पाणी पातळी चांगली वाढलेली आहे. भविष्य काळात आम्हाला पाण्याची अडचण भासणार नाही.’ - विलास पिसाळ,शेतकरी
माण तालुक्यातील अवर्षणग्रस्त भागातील बिदाल गावच्या घशाची कोरड टँकरशिवाय संपत नव्हती. मात्र आता हे गाव पाण्याने आज स्वयंपूर्ण झाले आहे. गाव टँकरमुक्त झाले आहे. राज्यातील इतर गावांसाठी बिदाल गावाने वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
लेखक - युवराज पाटील,
जिल्हा माहिती अधिकारी, सातारा
माहिती स्रोत : महान्यूज
अंतिम सुधारित : 1/28/2020