অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ॲडोल्फ बास्टिआन

ॲडोल्फ बास्टिआन

(२६जून१८२६–३ फेब्रुवारी १९०५). प्रसिद्ध जर्मन मानवशास्त्रज्ञ. जन्म ब्रेमन येथे एका श्रीमंत व्यापारी कुटुंबात झाला. त्याने हायडेलबर्ग विद्यापीठात कायद्याचा अभ्यास केला. चार्ल्स विद्यापीठातून (प्रेग) मानवी वैद्यकातील पदवीही मिळविली (१८५०). जहाजावरील नोकरीच्या निमित्ताने त्यास ऑस्ट्रेलिया, पेरू, वेस्ट इंडिज, मोरोक्को, चीन, भारत, आफ्रिका इ. प्रदेशांचा प्रवास घडला. या प्रवासात भिन्न भौगोलिक परिस्थितीतील मानवी समस्यांचा अभ्यास करण्याची संधी त्यास लाभली. इ. स. १८६६ मध्ये बर्लिन येथील मानवजातिवैज्ञानिक संग्रहालयाचे संचालकत्व त्यास मिळाले.

लेखन-संशोधनाबरोबर शास्त्रीय स्वरूपाची काही तत्त्वेही त्याने मांडली. मनोधारणेतील साधर्म्यामुळे सर्व मानवजातींमध्ये मूल कल्पना (एलिमेंट आयडिया) जरी सारख्याच असल्या, तरी त्यांचे बाह्यरूप लोक (फोक) कल्पनांद्वारे प्रकट होते; भौगोलिक प्रदेशविशिष्टता, आसमंतीय घटक व ऐतिहासिक प्रक्रिया यांच्या अनुषंगाने याच लोककल्पनांना स्थानिक संस्कृतीचे रूप प्राप्त होते; याप्रकारचे तत्त्व त्याने प्रतिपादन केले. बास्टिआन याचे बरेचसे लेखन मुद्देसूद विवेचनाच्या अभावी तत्कालीन मानवशास्त्रज्ञांना दुर्बोध वाटत असे तरी पण नंतरच्या काळातील मानवशास्त्रज्ञांनी मांडलेल्या मूल स्वभाव (ओरिजनल नेचर), संस्कृती तसेच संस्कृति-क्षेत्र या कल्पनांचा पाया बास्टिआन याच्या तत्त्व प्रतिपादनातच होता, यात शंका नाही.

त्याने अनेक ग्रंथ लिहिले, त्यांपैकी Der Mensch in der Geschichte (३ खंड,१८६०), Die Volker des OstlichenAsien (६ खंड, १८६६-७१), बर्लिन (१८७८-७९), Der VolkergedankeSammlungen (१८८१), ZurLehre von den…Provinzen (१८८६) व Der Lehrevom Menschen (१८९५) हे महत्त्वपूर्ण होत. यांतील पहिला ग्रंथ Der Mensch... हा स्वानुभवाधारे विदेशी संस्कृतीसंबंधी वर्णनात्मक पद्धतीने लिहिलेला पहिलाच ग्रंथ ठरला. त्यामुळे तो मानवजातिवर्णनाचा जनक आणि मानवजातीचा पहिला निसर्गवैज्ञानिक समजला गेला. जर्नल ऑफ इन्थॉलॉजी हे नियतकालिक त्याने सुरू केले. त्याचा तो संपादकही होता. यातून त्याने आपले विचार स्फुटलेखांद्वारे मांडले. तो पोर्ट ऑफ स्पेन (त्रिनिदाद) येथे मरण पावला.

संदर्भ : 1. Haddon, A. C. History of Anthropology, London, 1934.

2. Lowie, R. H.The History of Ethnological Theory, New York, 1937.

लेखिका : सुमति कीर्तने

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/28/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate