অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

धीरेंद्रनाथ मजुमदार

धीरेंद्रनाथ मजुमदार

(३ जून १९०३–३१ मे १९६०). प्रसिद्ध भारतीय मानवशास्त्रज्ञ. त्यांचा जन्म बंगालमधील मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. कलकत्ता विद्यापीठातून त्यांनी मानवशास्त्र विषयात पहिल्या वर्गात एम्.ए. ही पदवी मिळविली (१९२४). लखनौ विद्यापीठात १९२८ पासून ते मानवशास्त्र विषयात व्याख्याते म्हणून रूजू झाले. नंतर त्यांनी इंग्लंडमध्ये केंब्रिज विद्यापीठाची पीएच्.डी. पदवी संपादन केली (१९३५) व पुन्हा ते लखनौ विद्यापीठात परत आले. पुढे मानवशास्त्र विभागाचे ते प्रमुखही झाले (१९५१). अखेरपर्यंत ते या पदावर होते. त्यांनी सांस्कृतिक व शारीरिक या दोन्ही मानवशास्त्रीय शाखांत विशेष प्रशिक्षण घेतले होते. त्यामुळे मानववंशासंबंधी समग्र संशोधन-अभ्यास करणे त्यांना सुलभ झाले. त्यांच्या विविध शोधनिबंधांतून तसेच मानवामितीवरील दोन ग्रंथांतून याचा प्रत्यय येतो. ए ट्राइब इन ट्रॅन्झिशन (१९३७) या त्यांच्या पहिल्या पुस्तकात मानवी शरीराचे संशोधनात्मक विवेचन आहे. यांशिवाय. त्यांनी उत्तर प्रदेश, गुजरात, बंगाल, मध्य प्रदेश व बिहार येथील आदिवासींचा अभ्यास करून रक्तरसशास्त्रीय दृष्ट्या सर्वेक्षण व त्यांचे संशोधन केले. त्यांनी केवळ पारंपरिक मानवशास्त्रापुरते आपले अभ्यासाचे क्षेत्र संकुचित ठेवले नाही. त्यांना मानवशास्त्राचा सर्वांगीण अभ्यास ही संकल्पना अभिप्रेत होती; म्हणून त्यांनी भारतातील सामाजिक स्तरीकरणाचे विश्लेषण करताना वांशिक घटकांच्या चिकित्सेवर अधिक भर देऊन मानवजातिवर्णन अभ्यास–पद्धतीला वांशिक घटक अभ्यासाची जोड दिली. एच्. एच्. रिश्ले यांनी सुरू केलेल्या संशोधनात त्यामुळे विधायक भर पडली. त्यांच्या प्रकाशित साहित्यात मानवजातिवर्णनात्मक स्वरूपाचे लेखन जास्त आहे. त्यांनी हो, खस, कोरवा, थारू, गोंड, भिल्ल इ, आदिम जमातींचा त्यांच्यात प्रत्यक्ष राहून अभ्यास केला. हो (१९३७) व खस (१९६२) जमातींवरील त्यांचे व्याप्तिलेख प्रसिद्ध आहेत. सांस्कृतिक मानवशास्त्राच्या दृष्टीने हे व्याप्तिलेख उल्लेखनीय आहेत.

इंग्लंडमधील विद्यार्थिदशेत त्यांचा मॅलिनोव्हस्की या मानवशास्त्राशी परिचय झाला. रूथ बेनिडिक्टच्या लेखनाचाही त्यांच्यावर पगडा होता. या विचारवंतांची छाप मजुमदारांच्या पुढील लेखनात स्पष्ट उमटलेली दिसते. त्यानंतर त्यांनी आदिवासींच्या जीवनावर आदिवासींव्यतिरिक्त इतर मानवसमाजाचा कसा परिणाम होतो, याचे संशोधन केले आणि ग्रामीण भागाचा त्या दृष्टिकोनातून अभ्यास करून रेस रिअँलिटिज इन कल्चरल गुजरात (१९५०) आणि कास्ट अँड कम्यूनिकेशन इन अॅन इंडियन व्हिलिज (१९५८) हे दोन मौलिक ग्रंथप्रसिद्ध केले. त्यांच्या शोधनिबंधांपैकी काही निबंध तसेच अँथ्रपोमेट्रिक सव्हें ऑफ द युनायटेड प्रॉव्हिसिस (सहलेखक पी. सी. महालनोबिस व सी. आर्. राव–१९४९) व रेस रिअँलिटिज इन कल्चरल गुजरातः रिपोर्ट ऑन द अँथ्रपोमेट्रिक सेरॉलॉजिकल अँड हेल्थ सव्हें ऑफ महागुजरात (१९५०) ही दोन पुस्तके विशेष अभ्यसनीय आहेत. यांत त्यांनी उत्तर प्रदेश, गुजरात व बंगाल येथील जातिजमातींचे रक्तरसशास्त्रीय आणि मानवमितीविषयक विश्लेषण केले आहे.

ते १९५२-५३ मध्ये वेन्नर–ग्रेन प्रतिष्ठानाने अमेरिकेत आयोजित केलेल्या मानवशास्त्रीय चर्चासत्रास उपस्थित होते. त्याच वेळी कार्नेल विद्यापीठात अभ्यागत व्याख्याता म्हणूनही त्यांनी काही व्याख्याने दिली. १९३९ मध्ये भरलेल्या इंडियन सायन्स काँग्रेसच्या मानवशास्त्र विभागाचे ते अध्यक्ष होते. १९४१ पासून नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे ते अधिछात्र होते. रोम येथे १९५४ साली लोक संख्येविषयीच्या जागतिक परिषदेत त्यांची संयुक्त राष्ट्रांतर्फे सदस्य म्हणून नियुक्ती झाली होती. १९५६ साली हेग येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय ‘ह्यूमन रिलेशन’  या परिषदेतील एका विभागाचे ते अध्यक्ष होते. तसेच अनेक मानसन्मान त्यांना लाभले होते. ईस्टर्न अँथ्रपॉलॉजी हे मासिक त्यांनी सुरू केले (१९४७) व अखेरपर्यंत ते त्याचे संपादकही होते.

त्यांनी जनांकिकी, रक्तरसशास्त्र, शारीरिक वृद्धी, सांस्कृतिक विक्रिया, नागरी समाज इ. विविध विषयांवर संशोधनात्मक विपुल लेखन केले. त्यांचे स्फुटलेख, शोधनिबंध व पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांपैकी द फॉर्च्युन्स ऑफ प्रिमिटिव्ह ट्राइब्ज (१९४४), रेसिस अँड कल्चर्स ऑफ इंडिया (१९४४), द अफेअर्स ऑफ ए ट्राइब : स्टडी इन ट्रायबल डाय्‍नॅमिक्स (१९५०), द संथाळ : ए स्टडी इन कल्चरल चेंज (१९५६), अ‍ॅन इंट्रोडक्शन टू सोशल अँथ्रपॉलॉजी (सहलेखक टी. एन. मदन – १९६१) इ. ग्रंथ मन्यावर व महत्त्वपूर्ण असून मानवशास्त्राच्या भावी संशोधन – अभ्यासास  उत्तेजन देणारे आहेत.

मानवजातिवर्णन विषयावरील त्यांचे लेखन तपशीलवार आणि अचूक आहे; तथापि सैद्धांतिक मीमांसेचा अभाव त्यात जाणवतो, असे काही टीकाकार म्हणतात. त्यांचे हे संशोधन प्रारंभीच्या काळातील होते. त्यामुळे धीरेंद्र मजुमदारांच्या लेखनातील काही उणिवा लक्षात घेऊनही आधुनिक मानवशास्त्रज्ञांना हे मान्य करावे लागते, की मजुमदारांनी भारतातील मानवशास्त्राच्या शास्त्रीय अभ्यासाचा पाया घातला आणि या क्षेत्रात मौलिक संशोधन केले. त्यांच्या या कार्यामुळेच भारतातील निरनिराळ्या आदिवासी जमातींचा मानवजातिविज्ञानाच्या दृष्टीतून पुढे अभ्यास झाला. लखनौ येथे ते मेंदूतील रक्तस्त्रावाने मरण पावले.

संदर्भ : Madan, T.N.; Sarana, Gopal, Ed. Indian Anthropology: Essays in Memory of D. N. Majumdar, New Delhi, 1962.

लेखिका : रुक्सा शेख

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/26/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate