भारतातील केरळ राज्यात राहत असलेली एक वन्य जमात. त्यांची संख्या सु. ३५० आहे (१९६१). आल (लोक) व आल्स (गुंफांत राहणारे) या दोन मलयाळम् शब्दांपासून ‘अल्लर’ हे नाव प्राप्त झाले असावे. काळा रंग, बसके नाक, जाड ओठ, कुरळे केस आणि सर्वसाधारण उंची ही त्यांची शारीरिक वैशिष्ट्ये होत. अल्लर जवळजवळ नग्न अवस्थेत राहतात. त्यांचे लैंगिक जीवन स्वैर असून जवळच्या नातेवाइकांतही मुक्त लैंगिक व्यवहार चालतात. पूर्वी पळवून नेऊन किंवा बळजबरीने स्त्रीस हस्तगत करून, पुरुष विवाह करीत असत. परंतु अलीकडे वधूमूल्य देऊन विवाह करण्याची प्रथा सुरू झाली आहे. विवाहप्रसंगी नवरा मण्यांची माळ नवरीच्या गळ्यात घालतो. पिता माहीत असल्यास त्याच्याकरवी मुलाचे नाव बहुधा ठेवण्यात येते; नाहीतर मामा मुलाचे नाव ठेवतो. ते गायीचे व म्हशीचे मांस खात नाहीत. गायीला व तिच्या शेणाला स्पर्श करीत नाहीत. ते मलयाळम् भाषा बोलतात. पण त्यांच्या संभाषणात तमिळ व तुळू भाषांतील शब्दही आढळतात.
अल्लर लोकांत पितृसत्ताक कुटुंब-परंपरा अस्तित्वात असून बाप मेल्यानंतर त्याची झोपडी अगर ढोली जाळून टाकतात. ते शेती करीत नसल्यामुळे अन्न-संशोधनार्थ सदैव भटकत असतात.
लेखक : सु. र.देशपांडे
माहिती स्रोत : मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 1/30/2020