(६ जुलै १८६२–२६ फेब्रुवारी १९३७). एक प्रसिद्ध मानवशास्त्रज्ञ. केरळ राज्यातील पालघाट. जिल्ह्यात एका गावी जन्म. काही काळ ते केरळमध्येच विज्ञानाचे प्राध्यापक होते. पुढे त्रावणकोर-कोचीन मानवजातिवर्णनविषयक सरकारी संस्थेचे प्रमुख म्हणून त्यांना नेमण्यात आले. केरळमधील जातिजमातींची त्यांनी सखोल व पद्धतशीर पाहणी करून माहिती गोळा केली व ती द कोचीन ट्राइब्ज अँड कास्ट्स या ग्रंथाच्या दोन खंडांत प्रसिद्ध केली (१९०८–१९१२). १९२१ साली भारतात प्रथमच कलकत्ता विद्यापीठात मानवशास्त्र-विभाग उघडण्यात आला. त्या विभागाचे पहिले प्राध्यापक होण्याचा मान डॉ. अय्यरांना मिळाला. कलकत्ता विद्यापीठात असताना त्यांनी द मायसोर ट्राइब्ज अँड कास्ट्स हा ग्रंथ चार खंडांत प्रकाशित केला (१९२८–३६). त्याशिवाय त्यांचे अँथ्रॉपॉलॉजी ऑफ द सिरियन ख्रिश्र्चन (१९२५) व लेक्चर्स ऑन इथ्नॉग्राफी (१९३०) हे ग्रंथही उल्लेखनीय आहेत. ब्रिटिश सरकारने दिवाणबहाद्दुर हा किताब देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला. १९३४ साली त्यांना यूरोपात व्याख्याने देण्यासाठी बोलावण्यात आले होते. भारतातील मानवशास्त्रीय अभ्यासाचे अग्रदूत म्हणून डॉ. अय्यरांचे नाव नेहमीच गौरविले जाईल. तसेच कर्नाटक व केरळमधील जातिजमातींवरील त्यांचे ग्रंथ आजही प्रमाणभूत मानले जातात.
लेखक : रामचंद्र मुटाटकर
माहिती स्रोत : मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 4/23/2020