देशातील लघु उद्योगांना सहज कर्ज पुरवठा व्हावा, यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मायक्रो युनिटस् डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी अर्थात मुद्रा बँक योजना सुरू केली. ‘नको जामीन, नको अनुषंगिक तारण, मुद्रा योजनेचे हेच धोरण’ हे या योजनेचे ब्रीद. त्याची प्रभावी अंमलबजावणी करत सांगली शहर परिसरातील अनेक बचतगटांना प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेने प्रगतीची संधी उपलब्ध करून दिली आहे. पारंपरिक व्यवसायाबरोबरच व्यावसायिक दृष्टीकोन ठेवून अनेक महिलांना नवीन व्यवसायाची चाके आपल्या बचतगटाला जोडून घेतली आहेत. यातून महिलांच्या अंगभूत कलेला वाव मिळत आहे.
संजयनगरचा सिद्धाई महिला बचतगट त्यापैकीच एक. दीपज्योती शिवराज काटकर या बचतगटाच्या प्रमुख आहेत. त्यांच्या परिसरातील महिलांना एकत्र येऊन काहीतरी करावे, असे वाटत असे. त्यांनी याबाबत मिरज येथील एकात्म समाज सेवा केंद्राचे मार्गदर्शन घेतले. त्यानंतर वन बांबू हस्तकलेचे प्रशिक्षणही घेतले. यातून एक आत्मविश्वास प्रत्येक महिलेमध्ये निर्माण झाला. याबाबत दीपज्योती काटकर म्हणाल्या, आम्ही प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेतून बँक ऑफ महाराष्ट्रकडून कर्ज घेतले. आता आम्ही आकाश कंदील, वॉल पिस, मेकअप बॉक्स, फ्लॉवर पॉट यासारख्या अनेक वस्तू हाताने बांबूपासून बनवितो. या वस्तु घरीच बनवत असल्यामुळे जागेसाठी भाडे द्यावे लागत नाही. बांबूपासून बनविलेल्या या वस्तू पुणे, मुंबई, मद्रास व दिल्ली या शहरांमध्ये विकतो. व्यवसायवृद्धीसाठी प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेंतर्गत आम्ही आणखी कर्ज घेणार आहोत. यामुळे उत्पादन जास्त होवून बचतगटातील महिलांना जास्तीत जास्त फायदा होईल. आमचा स्वतःचा कारखाना असावा, असे आमचे स्वप्न आहे. त्यादृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत.
गोमटेशनगर कुपवाडच्या गृहलक्ष्मी महिला बचत गटामध्ये 25 ते 30 महिला आहेत. 10 ते 12 वर्षांपासून हा बचतगट सुरू आहे. राजगिरा लाडू, चिक्की, वडी असे पदार्थ बनविण्यात या बचतगटाची खासियत आहे. या बचत गटाच्या माध्यमातून दररोज 10 हजार लाडू बनवितात. 5 हजार पाकिटे तयार करतात. चार ते पाच जिल्ह्यामध्ये हा माल जातो. डीमार्ट, मोठे मॉल यामध्येही या पदार्थांनी जागा मिळवली आहे. याबाबत बचतगट प्रमुख कस्तुरी सुधीर माळी म्हणाल्या, सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत आम्ही काम करतो. शाळेमध्येही माल जातो. सध्या आम्ही हँडमशिनव्दारे माल बनवितो. त्यामुळे थोडा थोडा माल बनतो. जास्त माल बनविण्यासाठी मशिनरीची आवश्यकता आहे. रोज 30 हजार रुपयांचे लाडू बनवितो. यामधून रोज अडीच ते तीन हजार रूपये लाभ मिळतो. व्यवसाय वाढविण्यासाठी मशिनरी खरेदी करणार आहोत. यासाठी 7 लाख रूपयांचे कर्ज बँक ऑफ महाराष्ट्रकडून मंजूर झाले आहे. मशिनरी बसविल्यानंतर आणखी जास्त महिलांना रोजगार मिळेल.
वानलेसवाडीचा पंचरत्न महिला बचतगट साडी व ड्रेस मटेरियल, शर्ट व पॅन्ट पिस, टॉवेल, टोपी, छत्री, रेनकोट विक्रीचा व्यवसाय करतो. याबाबत बचतगट प्रमुख सुनिता रावत म्हणाल्या, आम्ही बँक ऑफ महाराष्ट्रकडून प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेतून 50 हजार रूपयांचे कर्ज घेतले आहे. सूरतवरून कपडे खरेदी केली जाते. त्यातून महिना 40 ते 50 हजार रूपयांचा व्यवसाय होतो. त्यामुळे घरच्या उत्पनात हातभार लागतो. इतर महिलानांही या व्यवसायातून फायदा होतो. विवाह, वास्तुशांती अशा विविध कार्यक्रमामध्ये आम्ही मागणीप्रमाणे माल पोहोच करतो. व्यवसाय वाढविण्यासाठी व जागा घेण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेंतर्गत आणखी कर्ज घेणार आहोत.
एकूणच असंघटित लघुउद्योगांच्या विकासाकरिता वित्तीय गरजा पूर्ण करण्यासाठी सुरू केलेल्या प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेचा लाभ सांगली परिसरातील अनेक बचतगटांना होत आहे. या लघुउद्योगांना आर्थिक सहाय्य पुरवून नवउद्यमींना आशेचा किरण या योजनेने मिळाला आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
-संप्रदा द. बीडकर
माहिती स्रोत: महान्युज
अंतिम सुधारित : 8/12/2020