दरवर्षी ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त संस्थेमार्फत काही कार्यक्रम राबविले जातात. ह्याच महिला दिनानिमित्त २६ मार्च २००० रोजी फर्दापूर, या ठिकाणी ५ गावातील स्वयंसाहाय्य गटाच्या एकूण १०० महिला एकत्रित आल्या.
महिलांना प्रोत्साहन व आत्मविश्वास वाढविण्याकरिता संस्थेने महिला स्वयंसाहाय्य गटासाठी दोन स्पर्धा आयोजित केल्या होत्या. त्या खालीलप्रमाणे –
१. १५ दिवसांत निरक्षर महिलांनी सही करणे.
२. स्वयंसाहाय्य गटाचे आजपर्यंतचे त्यांचे बचतीचे हिशोब सदर करणे.
(प्रगती अहवाल व गटाची आजपर्यंतची वाटचाल)
ठरविल्याप्रमाणे महिलांनीदेखील जोरदार तयारी केली व २६ मार्चच्या मेळाव्यामध्ये अंदाजे ३० निरक्षर महिलांनी प्रथमच व्यासपीठावर येऊन सर्व मेळाव्यातील महिलांच्यासमोर श्या करून दाखवल्या. एवढया मोठ्या समुदायासमोर व्यासपीठावर उभे राहण्याची महिलांची प्रथमच वेळ होती. महिला थोडया घाबरल्या, पण एकमेकींच्या आधाराने त्या पुढे आल्या. त्यांना बक्षीस म्हणून प्रत्येकी १०० ग्राम कार्ल्याच्या बियांचे वाटप करण्यात आले. महिलांनी ह्यामध्ये उत्साहाने भाग घेतलेला पाहून इतर महिलांचाही स्वतःबद्दल आत्मविश्वास वाढला.
दोन गटांनी बचत गटावर व इतर सामाजिक विषयांवर आधारित गीत सादर केले. महिला थोडया गडबडल्या, पण गट म्हणून जेव्हा त्यांनी गाणे म्हणायला सुरुवात केली तेव्हा मात्र त्यांनी अतिशय उत्साहाने गीत सादर केले.
दुसरी स्पर्धा घेण्यात आली, त्यामध्ये सोयगावच्या शेतकरी व अडाणी महिलेने स्वयंसाहाय्य गटाचा आजपर्यंतचा आर्थिक प्रवास त्यामध्ये सर्व आकडेवारी तोंडी थोडक्या वेळात महिलांसमोर मांडली. त्याचप्रमाणे सहभागी झालेल्या ४ गावांतील महिलांनी थोडक्यात आपआपल्या गटाची आकडेवारी मांडली. त्यांनाही प्रोत्साहनपर बक्षिसे गटाच्या नावाने देण्यात आली. बक्षीस रु. २०१/-, दुसरे बक्षीस रु.१५०/-, तिसरे बक्षीस रु. १००/- गटाच्या नावाने देण्यात आले. अशा रीतीने ही अभिनव पद्धतीची स्पर्धा घेण्यात आली. आपण आपल्या गावाबरोबरच इतर जवळपासच्या गावातील महिलांना एकत्र करून अशा प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करू शकता.
आपल्या गटांच्या व गावाच्या पुढील विकासाला आमच्या हार्दिक शुभेच्छा!
लेखक : वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट
स्त्रोत : बोल अनुभवाचे - पुस्तिका
अंतिम सुधारित : 5/27/2020