অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

चाईल्ड लाईन... डायल 1098

सिग्नलला गाडी थांबली की गाडीवर कापड मारणारी... बस स्टॅण्ड, गर्दीचे रस्ते, मंदिरे याठिकाणी केविलवाण्या नजरेनं पैशासाठी हात पसरणारी...कुठल्यातरी देवी, देवतेचे चित्र ताटात घेऊन त्याच्या जिवावर पैसे गोळा करणारी... कधी चहाच्या टपऱ्या, खाद्यपदार्थाचे स्टॉल याठिकाणी भांडी विसळणारी... कचरा-कोंडाळा, मोठ्या पाईप किंवा अन्य घाणेरड्या जागी व्यसने करणारी ... अशा एक ना अनेक रुपात बकाल अवस्थेत उदास चेहऱ्याने आणि शून्य नजरा घेवून फिरणारी अनेक बालकं आपणास दिसतात. कधी सरावाने आपण खिशात हात घालतो आणि एक-दोन रुपयाचं नाणं या मुलांच्या हातावर ठेवतो.

कधी इतक्याच सरावानं त्यांना रागानं दूरही करतो. पण ज्या घटकांकडे तुच्छतेनं अथवा कीव करीत पाहिलं जात. त्यांच्या पुनर्वसनासाठी, त्यांच्या मदतीसाठी, त्यांना हक्काचा निवारा देण्यासाठी, त्यांना समजून घेण्यासाठी, त्यांचं बालपण वाचविण्यासाठी आणि जपण्यासाठी धडपणारी यंत्रणा म्हणजे चाईल्ड लाईन अर्थात 1098.
चाईल्ड लाईन हा केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाचा उपक्रम आहे.

काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या शून्य ते 19 वयोगटातील मुला-मुलींकरिता 24 तास कार्यरत असणारी मोफत सेवा आहे. कोल्हापूरमध्ये ही सेवा ऑगस्ट 2011 पासून सुरु आहे. सन 2014-15 या वर्षात चाईल्ड लाईनकडे 410 प्रकरणे व 2379 फोन कॉल्स आले.
व्यसनमुक्ती, बालमजुरी, बालविवाह, बालभिक्षेकरी, लैंगिक शोषण अशा अनेक क्षेत्रामध्ये चाईल्ड लाईन शून्य ते 18 वर्षाखालील मुलां-मुलींच्या मदतीसाठी कार्य करते.

व्यसनमुक्ती

घरात मोठी व्यक्ती व्यसनाधीन असेल तर मुले त्यांचे अनुकरण करतात. तसेच आपल्या वयापेक्षा मोठ्या किंवा बरोबरीच्या व्यसनाधीन मुलांच्या संगतीने ती व्यसनाधित होतात. यातील अनेक बालकांना पेट्रोलचा वास घेणे, दारु पिणे, गुटखा खाणे अशा सवयी असणाऱ्यांबाबत चाईल्ड लाईनकडे मदतीसाठी दूरध्वनी आले. अशा अनेक मुलांना चाईल्ड लाईनने समुपदेशन व मानसोपचारतज्ज्ञाचे मार्गदर्शन याद्वारे पुनर्वसन केले.
यातीलच एक सुनील (नाव बदलेले आहे) त्याला पेट्रोलचा वास घेण्याची इतकी सवय लागली की तो या वासाच्या गुंगीत कुठेही झाडाझुडुपात घाणीच्या ठिकाणी जाऊन बसे.

शिक्षणातही काही रस नव्हता. चाईल्ड लाईनने त्याला मानसोपचारतज्ज्ञाकडे नेऊन उपचार चालू केले. त्याला बालकल्याण समितीकडे सादर केले. इनरव्हील क्लब व डॉ. हमीद दाभोळकर यांना भेटून त्यांच्यामार्फत सातारा येथील सहयोगी परिवर्तन संस्थेत दोन महिन्यांसाठी दाखल केले. या काळात त्याच्यात आत्मविश्वास वाढला. आता त्याला पेट्रोलचा वास घेण्याची इच्छाही होत नाही. चाईल्ड लाईनचे डायरेक्टर फादर रोशन यांनी त्याला नागपूर येथे व्यावसायिक प्रशिक्षणासाठी प्रवेश मिळवून दिला. आता तो प्रशिक्षण पूर्ण करुन घरी परत आला आहे. अशा अनेक मुलांचे पुनर्वसन चाईल्ड लाईनच्या टिमने केले आहे.

बाल भिक्षेकरी

चाईल्ड लाईनन आजपर्यंत बऱ्याच बाल भिक्षेकरी मुलांचे पुनर्वसन केले आहे. कधी घरची परिस्थिती बिकट असल्याने आई-वडील मुलांना भीक मागायला पाठवितात. मुलांना पैशाचे आकर्षण असते म्हणून भीक मागितली जाते. अशा स्थितीत चाईल्ड लाईन प्रथम धाडी टाकते व यात सापडलेल्या मुलांना व त्यांच्या पालकांना समज दिली जाते. चाईल्ड लाईनने कागल, करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली येथे धाडी टाकून मुले पकडली. आता ही मुले नियमित शाळेत जातात.

बाल विवाह

चाईल्ड लाईनकडे वर्षभरात 10 बालविवाहाची प्रकरणे आली. बालविवाह करणाऱ्यांमध्ये गोसावी, गोपाळ समाजाचे प्रमाण जास्त असते असे दिसून आले. चाईल्ड लाईनने धाडी टाकून 8 मुलींचे बालविवाह थांबविले आहेत. यात शाहूवाडी तालुक्यातील तसेच कोल्हापूर शहरातील बालविवाहांचा समावेश आहे. बालविवाहाच्या कारणांमध्ये घरची परिस्थिती गरीब असणे, प्रेम-प्रकरणांची कुणकुण लागल्यास कुटुंबाच्या प्रतिष्ठेचा विचार, कुटुंबात भावंडाची संख्या जास्त असल्यास जबाबदारीतून मुक्त होण्यासाठी बालविवाह केले जातात. बालविवाहाचा मुलीवर मानसिक व शारिरीक विपरीत परिणाम होतो.
बालविवाह कोल्हापूर जिल्ह्यातही होताना आढळतात.

चाईल्ड लाईनकडे शाहूवाडी तालुक्यातील 17 वर्षांच्या मुलीचे लग्न तिच्या इच्छेविरुद्ध पालक ठरवित असल्याची तक्रार आली. मुलीने लग्नास होकार द्यावा यासाठी तिला मारहाण करण्यात येत होती. चाईल्ड लाईनने शाहूवाडी पोलिसांच्या मदतीने मुलीच्या घरी भेट दिली. तेव्हा पहिल्यांदा पालक व नातेवाईक यांनी काही थांगपता लागू दिला नाही. या मुलीचे आजोबाच तंटामुक्त समितीचे अध्यक्ष असल्याने सरपंच आणि पोलीस पाटील यांचीही मदत होत नव्हती. त्यामुळे चाईल्ड लाईनने मुलीलाच बाजूला घेऊन तिच्याशी चर्चा केली. लग्नासाठी घरातून मारहाण होत असल्याचे सांगितले. त्यानंतर मुलीला व तिच्या आईला बालविवाहाचे धोके समजावून सांगितले. आई-वडिलांकडून मुलीचे लग्न 18 वर्षे पूर्ण झाल्याशिवाय करणार नाही. असे लिहून घेण्यात आले.
आता तर कायद्याने ग्रामपंचायत स्तरावर बालविवाह रोखण्यासाठी ग्रामसेवकांना बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून अधिकार प्रदान केले आहेत.

लैगिक शोषण

अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये चाईल्ड लाईन संस्था शोषित मुलींना व त्यांच्या कुटुंबियांना समुपदेशन करते. पुन्हा नव्याने आयुष्यात पुढे जगण्यासाठी प्रोत्साहित करते. शोषितांच्या शारिरीक व मानसिक स्थितीचा विचार करुन चाईल्ड लाईन पुनर्वसनाचे काम करते.

पीडितांना सरकारी योजनांपर्यंत पोहोचविण्याचे व मानसिक आधार देऊन कायदेशीर कारवाईबाबत सहकार्य करते.
एकूणच काय तर बालकांचे बालपण जपण्यासाठी चाईल्ड लाईन धडपडत असते. जर एखाद्या बालकाचे बालपण खुडले जात असेल, उध्वस्त होत असेल तर त्याच्या मदतीसाठी आपणही डायल करा 1098.

-वर्षा पाटोळे
जिल्हा माहिती अधिकारी, कोल्हापूर.

माहिती स्त्रोत : महान्युज

अंतिम सुधारित : 6/14/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate