অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

स्वयंसिद्धा पुष्पा बाळू वाघ

स्वयंसिद्धा पुष्पा बाळू वाघ

आदिवासी कातकरी ही आदिवासी अदिम समाजातील जात. अज्ञान, अंधश्रद्धा, निरक्षरता आणि कमालीचे दारिद्र्य यात खितपत पडलेला हा समाज रोजगारासाठी सतत स्थलांतर करत राहतो. पूर्वी शिक्षण आणि शाळा यांचा या आदिवासींना ना गंध होता ना त्याची गरज वाटली. रोजगारासाठी सतत स्थलांतर करणाऱ्या या आदिवासी कातकरी समाजाला दारिद्र्य हे पिढ्यानपिढ्या पाचवीलाच पूजलेले होते.

परंतू जेव्हा अशा समाजातील एखाद्या मुलीला शिक्षणाचा परिसस्पर्श होतो आणि रोजगाराभिमुख शिक्षणाची संधी मिळते, शासनाच्या आदिवासी विकास योजनेचा सुवर्णस्पर्श होतो तेव्हा ती दारिद्र्याविरुद्धची लढाई समर्थपणे लढा देणारी स्वयंसिद्धा बनते. याची प्रचिती ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील अवाळा या गावच्या पुष्पा बाळू वाघ या आदिवासी कातकरी समाजातील एका युवतीने आणून दिली आहे. तिच्या या यशस्वी लढ्याची यशोगाथा.....

ठाणे जिल्ह्याच्या शहापूर तालुक्यातील अवाळा हे आदिवासी कातकरी समाजाचे वस्ती असलेले गाव. माहुली किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेले हे गाव. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री जिजामाता यांच्या पदस्पर्शाने पुनित झालेला निसर्गरम्य झालेला माहुली किल्ला पर्यटकांचे आकर्षण स्थळ. मात्र तरीही या ऐतिहासिक किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या अवाळा गावातील आदिवासी समाजाच्या जीवनात मात्र विकासाची फळे चाखण्याची संधी हवी तशी मिळालेली नाही.

वर्षभर रोजगारासाठी गावोगावी शहराच्या ठिकाणी प्रामुख्याने वीटभट्टीवर रोजगारासाठी कुटुंबासह स्थलांतर करावे, पावसाळ्यात वीटभट्टीवरील रोजगार थांबला की, पुन्हा आदिवासी वस्तीवर यावे आणि गावात दुसऱ्यांच्या शेतात भात लावणी, चिखळणी, झोडणी या सारखी कष्टाची कामे करुन पोटाची खळगी भरणे हा त्यांचा जीवनक्रम.

स्वत:ची जमिन नसल्याने स्वत:ची शेती करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. दारिद्र्यातून जन्माला घातलेले अंधश्रद्धा, कुपोषण, शिक्षणाचा अभाव, व्यसनाधिनता, माता बालमृत्यू या चक्रव्युहातून या आदिवासी कातकरी समाजाची सुटका होऊ शकलेली नाही.

कुडाच्या घरात राहणाऱ्या अवाळा गावचा बाळू पोश्या वाघ या आदिवासी कातकऱ्याचे जीवन यापेक्षा वेगळे नव्हते. कुटुंब नियोजनाचा गंधही नसलेल्या बाळूला सविता, पुष्पा, मुक्ता या तीन मुली आणि कमलेश आणि तुकाराम हे दोन मुलगे अशी पाच अपत्ये.

पत्नीसह सोबत सात जणांचा चरितार्थ कसा चालवित असेल याची कल्पनाच न केलेली बरी. मोठी मुलगी सविताचे लग्न होऊन ती सासरी गेल्याने कुटुंबातील एका व्यक्तीचा भार कमी झाला असला तरीही गरीबीतून काही सुटका झालेली नाही.

याही परिस्थितीत बाळू वाघची 21 वर्षीय दुसरी मुलगी पुष्पा आईच्या प्रोत्साहनाने शाळेत जाऊ लागली. पहिली ते सातवी पर्यंतचे शिक्षण माहुली जिल्हा परिषद शाळेत झाल्यावर आठवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण जवळच्या चांदरोटी गावात झाले. मग घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे पुढील शिक्षण होऊ न शकल्याने बारावी नापास हा शिक्का तिच्या माथी बसला.

कुमारी पुष्पाने जिद्द न सोडता रोजगाराभिमुख प्रशिक्षण घेण्यासाठी शेणवा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेतला. दहावी उत्तीर्ण असल्याने पुष्पाला प्रवेश सहज मिळाला. पुष्पाने या आयटीआयमध्ये शिवणकाम म्हणजेच ड्रेस मेकिंगचा एक वर्षाचा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला.

अवाळे ते शहापूर एसटीचे भाडे 15रु. आणि शहापूर ते शेणवा एसटीचे भाडे 15 रु. असा रोजचा प्रवास करुन पुष्पा शिवणकामाच्या प्रशिक्षणात पारंगत झाली. पुष्पाने अवाळा गावात येऊन पहिली महिला टेलर बनून गावातच कायमस्वरुपी रोजगार निर्मिती केली.

अशावेळी सुशिक्षीत पुष्पाला शहापूरच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचा आधार मिळाला. आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्र शासनाच्या योजनांमुळे आदिम जमातीचे संरक्षण तथा विकास या योजनेंतर्गत प्रशिक्षीत आदिवासींना या व्यवसायाकरीता शंभर टक्के अनुदान योजनेचा लाभ घेण्याचे पुष्पाने ठरविले.

शैक्षणिक पात्रता, जातीचा दाखला, आयटीआय शिवण कलेचा अभ्यासक्रम पूर्ण केल्याचा दाखला, ग्रामपंचायतीचा आदिवासीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला आदि कागदपत्रे मिळून शहापूरच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे विहित नमुन्यातील प्रस्ताव सादर केला.

प्रकल्प कार्यालयातील धनंजय जाधव यांनी पुष्पाला या कामी बहुमोल मार्गदर्शन केले. प्रकल्प अधिकारी लोमेश सलामे यांनी अर्जाची छाननी करुन सन 2013-14 मध्ये विशेष बाब म्हणून ठाण्याच्या आदिवासी विकास विभागाच्या अपर आयुक्तांकडून नियमानुसार एक लाखाचे 100 टक्के अनुदान मंजूर केले.

पुष्पा वाघने या अर्थसहाय्यातून साधी शिलाई मशीन, मल्टीपर्पज फॅशनमेकर मशीन, कपडे कापण्याकरीता एक मोठा लाकडी टेबल, इस्त्री, रंगीबेरंगी रिळाचे बॉक्स, विविध रंगीत ब्लाऊज पीस, कातर, सुया, बॉबीन इतर किरकोळ साहित्य खरेदी केले. अवाळा गावातील या पहिल्या महिला लेडीज टेलरने नव्या उमेदीने आपल्या शिवणकामाच्या व्यवसायाला आधुनिकतेची जोड दिली. ब्लाऊज, ड्रेस, परकर, सलवार-कुडता, फॅशनमेकींगचे ब्लाऊज, साड्यांना फॉल-बिडींग अशी कामे ती करु लागली. दिवसाला किमान चार ब्लाऊज ती शिवते.

पुर्वी ब्लाऊज पीससाठी अवाळ्यातील महिलांना तालुक्याच्या ठिकाणी शहापूरला जावे लागत असे. आता गावातच मॅचिंग ब्लाऊज पीस मिळू लागल्याने स्थानिक महिला वर्गात समाधान व्यक्त होत आहे.

पुष्पा बाळू वाघ या आदिवासी तरुणीने शिक्षणातून संस्कारीत होऊन गरीबीवर जिद्दीने मात केली. दारिद्र्याशी लढा कसा देता येतो याचा आदर्श आदिवासी समाजासमोर उभा केलाय.

कातकरी समाजात पुष्पाच्या रुपाने एक स्वयंसिद्धा निर्माण झाल्याने तिच्या कुटुंबाचे रोजगारासाठीचे स्थलांतर थांबून इतर भावंडेही शिक्षणाच्या प्रवाहात सामील झाली आहेत.

पुष्पासारख्या अशा अनेक स्वयंसिद्धा निर्माण करण्याचे सामर्थ्य आदिवासी विकास योजनेत निश्चितपणे आहे. त्याचा डोळसपणे शोध घेण्याची जिद्द हवी हे दाखवून पुष्पाने नारी शक्तीची प्रचिती आणून दिली आहे.

 

लेखक: धनंजय प्र.कासार, सिनेयंत्रचालक, जिल्हा माहिती कार्यालय, ठाणे

माहिती स्रोत: महान्यूज

अंतिम सुधारित : 4/16/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate