অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या भगिनी योगिता व दिपाली शिलधनकर

शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या भगिनी योगिता व दिपाली शिलधनकर

राज्य शासनाचा क्रीडा क्षेत्रातील शिवछत्रपती हा मानाचा क्रीडा पुरस्कार मिळवून रायगड जिल्ह्याच्या क्रीडा वैभवात भर टाकणाऱ्या रायगडच्या कन्या योगिता व दिपाली शिलधनकर भगिनी. सायकलिंग सारख्या आगळया-वेगळया क्षेत्रात या दोघींनीही कमी वयात कौतुकास्पद कामगिरी करुन उज्वल यश मिळविले आहे. त्यांच्या या सायकलिंग क्षेत्रातील कामगिरीवर टाकलेला एक अल्पसा दृष्टीक्षेप….

रायगड जिल्ह्याच्या अलिबाग तालुक्यामधील सासवणे गावातील योगिता व दिपाली शिलधनकर या दोघी भगिनी. या दोघींनाही सायकलिंग मध्ये राज्याचा शिवछत्रपती पुरस्कार मिळाला. मूर्ती लहान पण किर्ती महान ही म्हण दोघींसाठीही समर्पक. लहानपणापासून दोघींनाही खेळाची हौस आणि हीच हौस पुढे आवड झाली. सासवणे येथे महाशिवरात्री निमित्त विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात. त्यात 2006 यावर्षी सायलिंकची स्पर्धा जाहीर झाली आणि त्यात दोघींनीही भाग घेतला. कोणतीही स्पर्धा असो यश, अपयश ठरलेलेच. कोणी यशस्वी होतो तर कोणी पराजित. असो.. सायकलचे चाक यांच्या प्रगतीचे चक्र ठरले. आणि तेथूनच त्यांच्या सायकलिंग करिअरची सुरवात झाली. योगायोग पहा, योगिताला राज्य शासनाचा सन 2012-13 वर्षासाठीचा तर दिपालीला सन 2013-14 वर्षासाठीचा शिवछत्रपती पुरस्कार मिळाला.

2007 साली शालेय सायकलिंग स्पर्धेत दिपालीने 17 वर्ष वयोगटामध्ये आणि योगिताने 19 वर्ष वयोगटात पहिल्यांदा राष्ट्रीय पदक जिंकले. त्यानंतर त्यांनी बालेवाडी पुणे येथे प्रशिक्षण घेतले. 2007 ते 2016 या वर्षात ट्रॅक राष्ट्रीय स्पर्धा तसेच रोड राष्ट्रीय स्पर्धा ऑल इंडिया युनिर्व्हसिटी या स्पर्धेमध्ये योगिता व दिपाली यांनी बरीच पदके प्राप्त केली आहेत. नुकतेच अहमदाबाद येथे पार पडलेल्या 50 कि.मी. सायकलिंग स्पर्धेत दिपालीला सुवर्ण पदक प्राप्त झाले आहे. तसेच त्या दोघी भगिनींनी कर्नाटक, पंजाब, अमृतसर, केरळ, गुजरात, मणिपूर, बिहार, झारखंड अशा वेगवेगळया झालेल्या स्पर्धेत सहभाग घेऊन यश प्राप्त केले आहे.

सायकलिंग या क्रीडा प्रकाराला आवश्यक असणाऱ्या विशेष सोयी-सुविधा गावाकडे उपलब्ध नसतानाही या भगिनींनी सायकलिंग क्षेत्रात केलेली नेत्रदिपक कामगिरी निश्चितच कौतुकास्पद आहे. कच्चा रस्ता, काही वेळा समुद्र किनारी सायकलिंगचा सराव करुन कठोर परिश्रम घेऊन त्यांनी या क्षेत्रात आपले उद्दिष्ट साध्य केले आहे. यासाठी त्यांना घरच्यांचे भक्कम पाठबळ मिळाले आहे.

हे करत असताना येणाऱ्या यश-अपयशात जास्त गुंतून न पडता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सायकलिंग क्षेत्रात आपली चमक दाखविण्यासाठी या दोघी सध्या बालेवाडी पुणे येथे नियमितपणे आपला सराव करीत आहेत. त्यांना अपेक्षित यश मिळून दोघींनी देशाचे, पर्यायाने महाराष्ट्राचे नाव उज्वल करावे, यासाठी शुभेच्छा.

लेखक  - विष्णू काकडे

स्त्रोत - महान्युज

अंतिम सुधारित : 4/27/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate