८ मार्च हा जागतिक महिला दिवस फक्त त्या दिवसा पुरता साजरा करु नका आपण वर्षाचे ३६५ दिवस आनंदी कसे राहू यासाठी प्रयत्न करा’’
तुम्ही एखाद्या समाजापासून दुरावलेल्या महिलेला काय द्याल. नोकरी, घर, पैसा, समाजात प्रतिष्ठेने जगण्याची संधी. पण एखाद्या महिलेने समाजातील शोषित पीडित महिलांसाठी आपले जीवनच अर्पण केले असेल तर…!
पुण्यातील उपनगर पिंपरी-चिंचवडमध्ये राहणाऱ्या ज्योती पठानिया ह्या मुळच्या मुंबईच्या. लग्न झाल्यानंतर त्या पुण्यातच स्थायिक झाल्या. त्यांचे शिक्षण बी.एससी (अॅग्री) पण मुळातच त्यांना समाजसेवा करण्याची आवड. विशेषत: शहरातील शोषित महिला, त्यांची लहान मुले, शोषित मुलींना सक्षम व स्वावलंबी बनविण्यापासून त्यांची ओळख निर्माण झाली.
संयुक्तरित्या एकत्रित येऊन या कामाला अजून गती देण्यासाठी १९९४ साली त्यांनी नोंदणीकृत चैतन्य महिला मंडळाची स्थापना केली. सुरुवातीच्या काळात त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. या क्षेत्रातील महिलांसाठी काम करण्यासाठी वाघिणीचे काळीज लागते व अनेकांशी शत्रूत्वही घ्यावे लागते. परंतु त्यांना न घाबरता अनेक अडचणीतून मार्ग काढत सर्व प्रथम कुटुंबसखी समुपदेशन केंद्र व त्यानंतर अडचणीत सापडलेल्या महिलांसाठी 'आश्रय' सुरु केले.
'आश्रय' चालवताना त्यांना लक्षात आले की सर्वात जास्त पीडित महिला या बाजारू लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या महिला असतात. यामुळे त्यांनी देहव्यापारात अडकलेल्या, लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या महिलांच्या मुलांसाठी मंडळाच्या माध्यमातून बालसंस्कार केंद्र, पोटभर जेवण देणारे सार्वजनिक संगोपन केंद्र, खेळण्याचे, अभ्यासाचे व झोपण्याचे सुरक्षित ठिकाण म्हणून चैतन्य मंडळ संचालित उत्कर्ष रात्रीचे पाळणाघर पुण्यातील बुधवार पेठेत सुरु केले.
अडचणीत सापडलेल्या महिला व मुलींना बाहेर काढून त्यांना स्वावलंबी करण्यासाठी स्कील डेव्हलपमेंट या स्व.प्रमोद महाजन कौशल्य विकास योजनेअंतर्गत महिलांना नर्सिंग, हाऊस किपींग, चारचाकी वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा त्यांचा मानस प्रगतीपथावर आहे. एका महिलेस मदत केल्यावर ती १०० अन्य महिलांना मदत करते हे त्यांचे उद्दिष्ट सिद्ध होताना दिसत आहे. काळाची पावले ओळखत या मंडळाच्या माध्यमातून त्यांनी वेळोवेळी महिलांना आधुनिकतेने सक्षम केले आहे.
सध्या फसवून देहव्यापारात अडकलेल्या, लैंगिक शोषण होत असलेल्या महिला आणि महिलांची तस्करी, लैंगिक छळ, कौटुंबिक ताण, मानसिक अस्थिरता, समाजाने वाळीत टाकलेल्या स्त्रिया व मानसिक छळाने पीडित महिलांची या मंडळात वैद्यकीय काळजी घेतली जाते. तसेच येथे महिलांना मानसिक उपचार, शिक्षण, सामाजिक सुविधा दिल्या जातात.
चैतन्य महिला मंडळात सर्व वयोगटातील मुली व महिला आहेत. येथे पीडित महिलेसोबत तिच्या सात वर्ष वयापर्यंतच्या मुलांना राहण्याची मुभा आहे. आजवर मंडळातून सर्व जाती धर्मातील महिला व मुलींना सक्षम बनवण्यात आले आहे. या सर्व महिला समाजातील विविध क्षेत्रात चांगल्या पध्दतीचे काम करत आहेत व आज जी वेळ त्यांच्यावर आली ती इतर महिलांवर येऊ नये म्हणून अनेक गरजू महिला व मुलींना मदत करत आहेत. तसेच मंडळाच्या माध्यमातून कौंटुबिक सल्ला केंद्र व एक मोफत कायदेशीर मदत केंद्रही सुरु करण्यात आले आहे. सर्व प्रक्रिया सनदशीर मार्गाने पूर्ण व्हावी यासाठी ज्योती पठानिया यांनी स्वत: एलएलबी चे शिक्षण देखील घेतले आहे.
त्यांच्या या निस्वार्थ, प्रेरणादायी कामासाठी त्यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार, महाराष्ट्र राज्य एज्युकेशन सोसायटीच्यावतीने महिला चेतना पुरस्कार, क्रांतीदूत पुरस्कार, संपदा समाज भुषण पुरस्कार, राजमाता जिजाऊ पुरस्कार, सावरकर पुरस्कार व सखीगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. सध्या त्या महिला व मुलांच्या सक्षमीकरणासाठी पूर्ण वेळ चैतन्य मंडळात काम पाहतात.
त्यांच्या या कार्याला सलाम!
लेखक - रोहीत साबळे
संहिता लेखक, जिल्हा माहिती कार्यालय, पुणे