बाजारात यांत्रिकीकरणाने तयार केलेली तुरीची डाळ सर्वत्र उपलब्ध आहे. या डाळीमध्ये मायेचा ओलावा नसतो, तेलपाणी लावून तुरीवर होणारी प्रक्रियासुद्धा नसते. कानापुरच्या महिला बचत गटांनी पुढाकार घेऊन स्वादिष्ट आणि प्रोटीनयुक्त डाळ तयार केली आहे. शेतकऱ्यांना तुरी न विकता डाळ करून विकण्याचा नवीन मार्गही महिला बचत गटांनी दाखविला आहे. शेतातील तूर थेट बाजारपेठेत न विकता त्यावर प्रक्रिया करून डाळीच्या स्वरूपात विकल्यास दोन पैसे जास्त मिळतात, हा संदेश कानापुरच्या महिलांनी ग्रामीण भागात रूजविला आहे. जय भोले शेतकरी महिला बचत गटाची स्थापना करून कानापुरच्या प्रगतीशील शेतकरी श्रीमती सविता जीवनराव येळणे यांनी आपल्या अकरा भगिनींना सोबत घेऊन मागील वर्षी कृषी विभागाच्या साहाय्याने गावातच स्वतःच्या जागेवर दालमिल सुरू केली. कानापूरसह सुकळी, घोऱ्हाड, सेलू आदी दहा ते बारा गावातील शेतकरी शेतातील तुरीवर प्रक्रिया करून महिला बचत गटातून डाळ तयार करण्यासाठी आणत असल्यामुळे सरासरी शंभर क्विंटल दाळ या महिला बचतगटाने तयार केली आहे. डाळ तयार करत असताना दाळीला तेलपाणी लावून प्रत्यक्ष डाळ तयार करण्यासाठी 400 रूपये क्विंटल प्रमाणे प्रक्रिया खर्च घेत असल्यामुळे सरासरी 75 हजार रूपयांपेक्षा जास्त उत्पन्न या बचतगटाला झाले आहे. कान्हापुरसारख्या छोट्याशा गावात महिला बचत गटाची निर्मिती करून दालमिल सुरू करण्याच्या प्रकल्पाबद्दल सांगताना श्रीमती सविताताई येळणे म्हणाल्या, की गावातील शेतकरी तूर विकून दाळ खरेदी करत होते. तुरीवर गावातच प्रक्रिया करून डाळ तयार केल्यास मोठ्या प्रमाणात बचत होईल, या उद्देशाने मागील वर्षी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने तयार केलेले दालमिल खरेदी करण्याच्या निर्णय घेतला. त्यानुसार बचतगटांच्या महिलांनी पैसे गोळा करून 1 लक्ष 53 हजार रूपयाच्या यंत्र खरेदी केले. यावर कृषी विभागातर्फे 70 हजार रूपयांची सबसिडी मिळाली. बचतगटातर्फे दरमहिन्याला आम्ही 100 रूपये जमा करतो. यावर्षी डाळी तयार करण्यापासून 75 हजार रूपये तर 150 क्विंटल गहू साफ करण्यापासून तेवढेच पैसे मिळतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कान्हापुरच्या महिलांनी सुरू केलेल्या या उपक्रमास ग्रामस्थ व शेतकऱ्यांनीही सहकार्य केल्यामुळे शेतातील गहू साफ करून त्याची प्रतवारी सुधारण्यासाठी दालमिलचा चांगला उपयोग होत आहे. प्रतवारी सुधारल्यामुळे गव्हाला सुद्धा दोन हजार ते बावीसशे रूपये क्विंटल भाव मिळत आहे. दालमिलची डाळ 90 रूपये किलोने विकल्या जात आहे. महिला बचत गटाच्या दालमिलमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दालमिल सोबतच धान्य स्वच्छ करण्याचे यंत्र सुद्धा सुरू केल्यामुळे सोयाबीन गहू तुरी आदी कृषी उत्पादन स्वच्छ करणे शक्य झाले आहे. वर्ध्याच्या वर्धिनीने महिला बचत गटाला नवी दिशा दिली, त्यामुळेच प्रत्येक गावात बचत गटाची चळवळ रूजत आहे. कान्हापूरच्या सविताताई येळणे यांनी येणूताई भुरे, उषा बोरकर, सविता सातपुते, सुशीला गुरूले, मिराताई येळणे, माया झाडे, प्रमिला भुरे, अर्चना पेठकर, पुष्पा साकोकार, माया पुंजबैल आदी भगिनींच्या सहकार्याने दालमिलच्या माध्यमातून ग्रामोद्योग सुरू केला. या उद्योगाला कृषी विभागासह सेंट्रल बँकेनेही मदतीचा हात दिला. शेतकरी कष्टाने शेती पिकवतो, त्यानंतर शेतातील धान्य थेट बाजारभावात विकतो परंतु त्यावर प्रक्रिया केल्यास शेतकऱ्याची आर्थिक स्थिती उंचावेल आणि गावातही सुबकता येईल, याच उद्देशाने कान्हापूरच्या महिलांनी सुरू केलेल्या या ग्रामोद्योगाचा आदर्श इतर गावांसाठीही निश्चितच आदर्शवत ठरणारा आहे.
-अनिल गडेकर
जिल्हा माहिती अधिकारी, वर्धा
मो. नं. ९८९०१५७७८८
माहिती स्त्रोत : महान्युज
अंतिम सुधारित : 7/23/2020
गरीब हे जास्त गरीबच होत चालले आहेत. ही परिस्थिती त...
महिलांना बचतगटाच्या माध्यमातून घरबसल्या रोजगार मिळ...
महिलांनी जंगलात कोष उत्पादनच केले नाही तर त्यापासू...
एकदा काय झाले, गुंजाळवाडीतल्या तीन स्वयंसाहाय्य गट...