स्वर्णजयंती ग्रामस्वरोजगार योजनेने महिलांमध्ये खऱ्या अर्थाने उद्योगी भावना निर्माण करून त्यांना आर्थिक प्रगतीकडे वाटचाल करण्यास मोलाची मदत केली आहे. केंद्र शासनाच्यावतीने आणि राज्याच्या सहकार्याने राबविण्यात येत असलेल्या या योजनेमुळे लाखो महिला उद्योग व्यवसायात आल्या आहे. योजनेच्या आधारे गावागावात आर्थिक समृध्दी निर्माण झाली आहे.
महिलांच्या हातात पैसा आला तरच घरे, गावे खऱ्या अर्थाने समृध्द होतील, असे म्हटले जाते. ती किमया या योजनेमुळे साध्य झाली आहे. या योजनेच्या माध्यमातून अशाच प्रकारची प्रगती करत अनेक महिला बचतगटांनी जिल्ह्यात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यातीलच यवतमाळ शहरानजीक उमरसरा या गावातील संघ महिला बचतगटाचा उल्लेख करावा लागेल. अगरबत्ती व्यवसायातून गटाच्या महिलांनी इतर महिलांसाठी चांगला आदर्श निर्माण केला आहे.
उमरसरा येथील 12 महिलांनी एकत्र येऊन 2005 साली बचतगटाची स्थापन केली. सुरूवातीस महिलांनी मासिक 50 रूपये बचतीतून सुरूवात केली. या बचतीतून जमा झालेल्या निधीतून काहीतरी उद्योग व्यवसाय सुरू करण्याचा मनोदय गटातील काही महिलांनी व्यक्त केला. परंतु पारंपारीक उद्योगांना न निवडता काहीतरी वेगळा उद्योग सुरू करण्याची इच्छा महिलांनी व्यक्त केली. घराघरात अगरबत्तीचा वापर होतो. हा व्यवसाय सुरू केल्यास त्यातून चांगले आर्थिक उत्पन्न मिळू शकते. त्यामुळे अगरबत्ती उद्योग निवडण्यात आला. या व्यवसायाचे प्रशिक्षण घेण्यासाठी निलीमा राऊत यांच्यासह गटातील अन्य तीन महिलांनी नागपुर गाठले. नागपुर येथील एका अगरबत्ती कारखान्यात या महिलांनी प्रशिक्षण घेतल्यानंतर यवतमाळात घरीच अगरबत्ती निर्मीतीस महिलांनी सुरूवात केली. इतर महिलांनाही प्रशिक्षण देण्यात आले. महिलांचे परिश्रम आणि मेहनतीमुळे या व्यवसायाने आता उत्तुंग भरारी घेतली आहे.
गेल्या पाच वर्षांपासून महिलांचा हा अगरबत्ती व्यवसाय यशस्वीपणे सुरू आहे. या व्यवसायासाठी गटाने २०१० साली महाराष्ट्र बॅंकेकडून १० हजार रूपयाचे कर्ज घेतले होते. त्यानंतर पुन्हा एक लाख रूपयाचे कर्ज घेऊन उद्योगाला महिलांनी व्यापक स्वरूप दिले. कर्जाची परतफेड करून महिलांनी अल्पावधीतच हा व्यवसाय नफ्यात आणला. आजमितीस मासिक १० हजार रूपयाचे उत्पन्न गटाला या व्यवसायातून मिळत असल्याचे निलीमा राऊत यांनी सांगितले. साध्या अगरबत्ती निर्मीतीचे प्रशिक्षण नागपुर येथे घेतल्यानंतर सुगंधी अगरबत्ती बनविण्याचे प्रशिक्षण यवतमाळ येथे पंचायत समितीमार्फत आयोजित प्रशिक्षणात घेतले. महिला आपल्या उद्योगातून आता दहा प्रकारच्या सुगंधी अगरबत्ती तयार करतात. या अगरबत्तीला सर्वत्र चांगली मागणी आहे. या व्यवसायासाठी लागणारा कच्चा माल महिला नागपुरहुन मागवितात.
गटातील महिला आपापल्या घरीच फावल्यावेळात अगरबत्ती निर्मीती करतात. त्यामुळे प्रत्येक महिला दरदिवशी शंभर रूपये कमवितात. महिन्याला २५ हजार रूपयाच्या आसपास अगरबत्ती निर्माण करून ती विकल्या जाते. सुगंधी अगरबत्ती यवतमाळ शहरात तर कच्ची अगरबत्ती माहुर, नेर आदी ठिकाणी विकल्या जात असल्याचे श्रीमती राऊत यांनी सांगितले.
लेखक : मंगेश वरकड
माहिती संकलक : अतुल पगार
स्त्रोत:महान्यूज http://www.mahanews.gov.in/Home/HomeDetails.aspx?str=LIDzcad6YWM=
अंतिम सुधारित : 8/2/2020
यवतमाळ शहरालगत असलेल्या उमरसरा येथील एका बचतगटाने ...
शहरी व ग्रामीण भागातील महिलांना स्वयंसहाय्यता बचतग...