स्त्री ही आई, बहीण, पत्नीची भूमिका पार पाडत कौटुंबिक जबाबदारी समर्थपणे पेलत असते. पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रिया पुरुषांवर अवलंबून असल्याने त्यांना स्वतःचा निर्णय घेण्याचा फारसा अधिकार नाही. त्यामुळे आजही त्यांचे स्थान नगण्यच असल्याने त्यांच्यावर अन्याय, अत्याचार होताना दिसतो. आधुनिक काळात त्यांना राजकीय, प्रशासकीय व व्यवस्थापन क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने संधी मिळाली पाहिजे, तरच त्यांचा आर्थिक दर्जा सुधारेल व राष्ट्राच्या प्रगतीत त्यांचे योगदान वाढेल. प्रत्येक स्तरातील महिलांच्या समस्या वेगवेगळ्या आहेत. तरी सर्वसाधारण समस्यांचा विचार केला तर पुढील प्रमाणे समस्याची वर्गवारी करता येईल. कौटूबिंक हिंसाचार, सामाजिक हिंसाचार, शिक्षणाच्या समस्या, आरोग्याच्या समस्या इ.
महिलांना त्यांच्या लग्नानंतर अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते या प्रकारातील समस्या ह्या ग्रामीण व शहरी भागात वेगवेगळ्या असू शकतात तसेच वेगवेगळ्या पातळीवरील असू शकतात. सध्या आपण विज्ञान-तंत्रज्ञानासारख्या उच्च क्षेत्रात प्रगती केली, पण आजही आपले विचार खालच्या दर्जाचे आहेत. मुलगा न झाल्यास मुलगी झाल्यास आई-वडील शोक करतांना दिसतात. महिलांना त्यांच्या मर्जी विरुद्ध गर्भ लिंगनिदान करायला लावतात व मुलगी असेल तर त्या महिलेला दोष दिला जातो. ज्याच्या पदरी पाप त्याला मुली आपोआप हिच भावना लोकांच्या मनात आहे. म्हणूनच स्त्री भ्रूणहत्या मोठ्या प्रमाणावर होत आहे. कौटूबिंक हिंसाचारात हुंडाबळी, माहेरून पैसे आणण्यासाठी मारहाण, मुले झाले नाहीत किंवा फक्त मुलीच झाल्या म्हणून शारीरिक त्रास, व्यसनी पती असल्याने संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी, इ. या समस्या कुटुंबाच्या दबावामुळे सर्वांसमोर येत नाही व पोलिसात तक्रार दिली जात नाही.
या प्रकारात समाजाकडून विविध प्रकारांनी महिलांना त्रास दिला जातो. यात छेडाछेड, विनयभंग, बलात्कार असे मुद्दे येतात. एकतर्फी प्रेमातून केला जाणारा असिड हल्ला, चाकू हल्ला. तसेच ऑफीस मध्ये काम करणाऱ्या महिलांना बऱ्याच वेळा छेडाछेडीला तोंड द्यावे लागते. या सगळ्यामागे पुरुषाच्या लेखी बाईचे असलेले दुय्यम स्थान, तिच्यावर त्याने प्रस्थापित केलेला मालकीहक्कच कारणीभूत आहे. समोरची व्यक्ती म्हणजे स्त्री ही आपल्या मालकीची वस्तू असल्याने तिच्यावर अन्याय, अत्याचार करणे सहज शक्य आहे, असे पुरुषाला वाटत राहते. ती प्रतिकार करू शकणार नाही असे गृहीत धरूनच पुरुषांकडून एवढी हिंमत होते. स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटना घडल्यावर त्याचे पडसाद वेगवेगळ्या स्तरांवर उमटतात. अगदी रस्त्यांपासून संसदेपर्यंत. पण त्या घटना होऊ नयेत म्हणून जनजागृती मात्र कमीच होते.
महिला ह्या शिक्षणाच्या क्षेत्रात आजही मागे आहेत. आजही ग्रामीण भागात शिक्षणासाठी पाठवले जात नाही. मुलींना शिकून काय करायचं हाच विचार आपल्या समाजत रुजला आहे. पण महिलांना शिक्षण दिले तर त्या आपल्या कुटुंबा बरोबरच देशाचा विकास करू शकतात. एक महिला शिकली तर एक कुटुंब शिकते. महिलांसाठी सरकारने विविध शैक्षणिक योजना आणल्या आहेत पण जो पर्यंत समाजाची मानसिकता बदलत नाही तो पर्यंत त्या योजनांचा फायदा महिलांना मिळणार नाही. महिला फक्त चूल आणि मूल यासाठी या मानसिकतेतून आता समाजाने बाहेर पडले पाहिजे.
भारतातल्या दर दोन महिलांमागे एक महिला कसल्या ना कसल्या अशक्तपणाच्या तक्रारीने ग्रस्त आहेत. ३५ टक्के महिला गंभीर स्वरूपाच्या अशक्त आहेत तर १५ टक्के महिलांंना कमी गंभीर स्वरूपाच्या अशक्ततेचा त्रास आहे. महिलांसाठी पुरेशा वैद्यकीय सोयी उपलब्ध नसल्यामुळे त्यांच्या-मध्ये ही समस्या निर्माण झाली असल्याचे मत काही महिला डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. महिलांच्या जीवनात आरोग्य हा शेवटच्या प्राधान्याचा विषय असतो. लहान-मोठ्या आजारासाठी बायकांनी डॉक्टरकडे जाण्याची गरज नसते, असे सरसकट मानले जाते. त्यामुळे त्यांचे हे लहान-मोठे आजार बघता बघता मोठे होतात आणि गंभीर स्वरूप धारण करतात.
विशेषत: कर्करोगाच्या बाबतीत ही गोष्ट लक्षात येते. कितीही त्रास होत असला तरी तो सहन केला पाहिजे, ही महिलांची मानसिकता असल्यामुळे त्या कर्करोगाच्या पहिल्या अवस्थेतील त्रास तसाच अंगावर काढतात आणि जेव्हा त्या तपासण्यासाठी म्हणून डॉक्टरकडे जातात तेव्हा कर्करोग पुढच्या अवस्थेत गेलेला असतो. भारतात महिलांमध्ये गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण जास्त आहे. त्यामागे त्यांच्याकडे होणारे दुर्लक्ष हेच कारण आहे. भारतात सध्या कुपोषित बालक आणि अशा कुपोषित बालकांचे अवेळी होणारे मृत्यू ही मोठी गंभीर समस्या मानली जात आहे आणि त्यावर भरपूर चर्चा होत आहे. परंतु महिलांमधील कुपोषण ही काही कमी गंभीर समस्या आहे असे नाही.
लेखक : अतुल पगार (मास्टर्स ऑफ जर्नालिझम)अंतिम सुधारित : 8/23/2020
दर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात आरोग्य सेवे...
काही समस्यांमुळे आरोग्यसेवांवरचा एकूण खर्च वाढत चा...
काडातून थेट पेरणी करणाऱ्या यंत्राने पेरणी केली, की...
अल्सर म्हणजे काय, अल्सर कशाने होतो , अल्सरची लक्षण...