‘ग्रहणांकित चांदणं’ या २०१३ च्या दिवाळी अंकातील चर्चा, अनुभवकथन आपण वाचलं आहेच. याच नावाच्या या सदरात अपंग व्यक्तींच्या समस्यांवर सातत्याने चर्चा व्हावी आणि आपला दृष्टीकोन अधिकाधिक व्यापक होत जावा असा आमचा प्रयत्न आहे. अशा व्यापक दृष्टीकोनाच्या पायाभरणीतूनच हा प्रश्न सोडवायला मदत होणार आहे.
दिल्लीच्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (एम्स) मध्ये आपल्या कापलेल्या डाव्या पायावर अरुणिमा सिन्हा उपचार करून घेत होती. त्यादिवशीच्या वृत्तपत्रात जगातील सर्वात उंच शिखर एव्हरेस्टवर चढणार्यांशी संबंधित बातमी ती वाचत होती. ती विचार करू लागली, ‘ती स्वत: असे करू शकेल?’ जेव्हा अरुणिमा सिन्हाचे दोन्ही पाय होते तेव्हा तिने एव्हरेस्टवर चढण्याविषयी विचार केला नव्हता. ती व्हॉलीबॉलची चांगली खेळाडू होती आणि त्यामध्येच तिला आपल्या देशाचे नाव मोठे करायचे होते. जेव्हा पाय गमावून बसली तेव्हा एव्हरेस्टवर चढण्याची इच्छा निर्माण झाली.
अरुणिमाने हा विचार झटकून टाकला. आपण ते करू शकणार नाही असे तिला वाटले. परंतु जेव्हा एम्समध्ये उपचार घेत असताना अरुणिमाला कृत्रिम पाय बसविण्यात आले तेव्हा अरुणिमाला वाटले की आता ती एव्हरेस्टवर चढण्याचे आपले स्वप्न साकार करू शकेल.
एम्समध्ये उपचार घेत असताना अरुणिमाची भेट एव्हरेस्टवर चढणार्या बचेंद्री पालशी झाली. अरुणिमाने तिला आपल्या स्वप्नाविषयी सांगितले. तेव्हा बचेंद्री पालने तिचा उत्साह वाढविला आणि सांगितले की तू हे नक्की करू शकशील.
अरुणिमाला तिच्या मोठ्या भावाने, ओमप्रकाश सिन्हाने सांगितले की अमेरिकेतील महिला रोंडा ग्राहमने हे केले आहे तेव्हा अरुणिमाला वाटले की, एव्हरेस्ट सर करणे हा असा मार्ग आहे, ज्यामुळे तिच्या खेळाडू जीवनाला नवीन दिशा मिळू शकेल. हा विचार तिच्या मनात येताच तिचा उत्साह वाढला. त्यामुळे अरुणिमाची तब्येत लवकर सुधारू लागली. तिने आता आपले स्वप्न साकार करण्याची मोहीम सुरू केली.
अरुणिमा सिन्हा उत्तर प्रदेशातील आंबेडकर जिल्ह्यातील रहिवासी आहे. २३ वर्षांच्या अरुणिमा सिन्हाला व्हॉलीबॉल खेळाडू होण्याची इच्छा होती. उत्तर प्रदेशकडून तिने राष्ट्रीय पातळीवरील व्हॉलीबॉल स्पर्धेत भाग घेतला होता. खेळाडू होण्यासाठी मेहनतीबरोबर पैसाही लागतो. त्यासाठी अरुणिमा सीआयएसएफमध्ये कॉन्स्टेबलच्या पदावर भरती होऊ इच्छित होती. सोमवार ११ एप्रिल २०११ च्या रात्री ती पद्मावती एक्सप्रेसने दिल्लीला चालली होती. दुसर्या दिवशी मंगळवारी सीआयएसएपमध्ये कॉन्स्टेबलच्या पदावर भरती होण्यासाठी तिची मुलाखत होणार होती.
१२ एप्रिलच्या रात्री अडीचच्या दरम्यान गाडी बरेलीजवळ पोहोचली होती. तेवढ्यात गाडीतील सहा बदमाशांनी अरुणिमाची सोन्याची चेन ओढण्याचा प्रयत्न केला. अरुणिमाने त्यांना विरोध केला. तेव्हा बदमाशांनी तिला धक्का देऊन गाडीतून बाहेर ढकलले. अरुणिमाचा एक पाय गाडीच्या चाकाखाली आल्यामुळे तुटला. रात्री अडीच वाजता घडलेल्या या घटनेची बातमी रेल्वेला सकाळी ६ वाजेपर्यंत समजली. सकाळी खेडुतांनी अरुणिमाला गाडीच्या रुळावर जखमी पाय तुटल्याच्या अवस्थेत पाहिले. अरुणिमाच्या दृष्टीने हे सहा तास जास्त भयावह होते.
अरुणिमाला सकाळी ८ वाजता जीआरपीचा शिपाई एजाज अहमदने टेंपोत टाकून जिल्हा हॉस्पिटलमध्ये पोहोचविले. हॉस्पिटलमध्ये अरुणिमावर उपचार अस्थिरोग विशषेज्ञ डॉ. टी.एस.आर्य यांनी उपचार केले. पायातून जास्त रक्त वाहून गेल्यामुळे तिचे हिमोग्लोबिन घटून ते ७ पॉईंट राहिले होते. रक्ताची कमतरता पूर्ण करण्यासाठी फार्मासिस्ट व्ही.सी.यादवने रक्तदान केले. त्यानंतर ४ दिवस अरुणिमा बरेलीच्या एका हॉस्पिटलमध्ये होती. येथेही तिच्यावर योग्य उपचार झाले नाहीत. शनिवार १६ एप्रिल रोजी अरुणिमाला केंद्रिय महिला आयोगाच्या पथकाने बरेलीहून उपचारासाठी लखनौ मेडिकल कॉलेजात आणले. लखनौच्या मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांचे म्हणणे होते की अरुणिमाच्या पायाची जखम बरी झाल्यावर तिला कृत्रिम पाय बसविण्याची व्यवस्था केली जाईल.
अरुणिमाच्या उपचारासाठी मुख्यमंत्री मदत निधीतून १ लाख रुपये आणि परिवहन मंत्री रामअचल राजभर यांनी ५० हजार रुपये दिले. केंद्र सरकारने अरुणिमाला नोकरी देण्याचे आश्वासन दिले. समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी अरुणिमाची हॉस्पिटलमध्ये भेट घेतली आणि तिला आर्थिक मदत दिली. हरभजनसिंग आणि युवराज सिंगसारख्या क्रिकेटपटूंनी अरुणिमाला मदत केली.
अरुणिमाचे वडील हरेंद्रकुमार सैन्यात होते. १६ वर्षापूर्वी त्यांचे निधन झाले. कुटुंबाची जबाबदारी अरुणिमाची आई ज्ञानबाला उचलते. ती आरोग्य विभागात काम करते. अरुणिमाचा भाऊ राहुल नोकरीच्या शोधात आहे. तिची बहीण लक्ष्मीचे लग्न झाले आहे. अरुणिमाला तिच्या वडिलांनी फार उत्साहित केले होते. त्यांचा उत्साह तिच्यातही आहे. तिचा मोठा भाऊ ओमप्रकाशने तिला फार उत्तेजन दिले. आता अरुणिमाने निश्चय केला की, ती ऍथलिट म्हणून स्वत:ला स्थापित करील. अरुणिमाला खेळाडूंचा उत्साह वाढविण्यासाठी स्पोर्ट्स कॉलेज काढण्याची इच्छा आहे.
२०१२ मध्ये अरुणिमा उत्तरकाशीमध्ये टाटा स्टील ऍडव्हेंचर फाऊंडेशनशी जोडली गेली आहे. येथे एव्हरेस्टवर चढणारी पहिली भारतीय महिला बचेंद्री पालने तिला ट्रेनिंग द्यायला सुरूवात केली. भरपूर मेहनत आणि चिकाटीच्या बळावर अरुणिमाने १ एप्रिल २०१२ रोजी झारखंडची गिर्यारोहक सुमन महतोबरोबर लडाखच्या ६,६२२ मीटर उंच शिखर चामशेर कांगरीवर चढाई करून आपल्या गिर्यारोहणाच्या अभियानाची सुरूवात केली. बरोबर १ वर्षाने २१ मे रोजी सकाळी १० वाजून ५५ मिनिटांनी अरुणिमाने ८,८४८ मीटर उंच एव्हरेस्ट शिखरावर चढाई करून दाखविली. अरुणिमाचे नाव भारताची पहिली महिला अपंग गिर्यारोहक म्हणून नोंदले गेले, जिने एव्हरेस्ट शिखर सर केले.
आंबेडकरनगरचे जिल्हाधिकारी पंकज यादव अरुणिमाच्या घरी गेले आणि त्यांनी तिच्या कुटुंबाचे अभिनंदन केले. त्यांनी अरुणिमाच्या आईच्या गळ्यात हार घालून मिठाई वाटली. अरुणिमाने पहिली अपंग गिर्यारोहक महिला म्हणून एव्हरेस्टवर चढाई करून इतिहासात आपले नाव सुवर्णाक्षराने नोंदविले. आता सीआयएसएफ केंद्रीय औद्योगिक सुरक्षाबल अरुणिमाला नोकरी देण्याचा विचार करीत आहे.
----
रमेश महाले
श्रेय/३, माणिकनगर,
गंगापूर रोड, नाशिक ः ४२२०१३
चलभाष ः ९५५२६९२४९०
स्त्रोत:
अंतिम सुधारित : 7/28/2020