অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

"आदिवासी" विषयक माहिती

"आदिवासी" विषयक माहिती

"आदिवासी" विषयक माहिती

आदिवासी

नागर संस्कृतीपासून दूर व अलिप्त राहिलेले संबंधित प्रदेशातील मुळचे रहिवासी म्हणजे आदिवासी, असे सामान्यपणे म्हणता येईल. सर्वसाधारणपणे जंगलात, दुर्गम दऱ्याखोऱ्यांत व सुसंस्कृत समाजापासून तुटक असलेल्या प्रदेशात ते तुरळक वस्ती करून राहतात. नागर संस्कृतीचा त्याप्रमाणे वर्गश्रेणीबद्ध समाजाचा संपर्क न झालेल्या वैशिष्ट्यपूर्ण चालीरीती किंवा ‘संस्कृती’ आदिवासींत आढळतात. अर्थात जगातील सर्व आदिवासी त्या त्या प्रदेशातील मूळ रहिवासी आहेतच, असे ठामपणे म्हणता येत नाही. परंतु दुसऱ्या सर्वमान्य संज्ञेच्या अभावी आदिम संस्कृतीची दर्शक अशी आदिवासी हीच संज्ञा रूढ झाली आहे. अनेक नागर संस्कृतींचे उदयास्त झाले, परंतु त्यांच्याशी संपर्क न साधल्यामुळे किंवा न आल्यामुळे आदिवासी जमाती जशाच्या तशाच राहिल्या. त्यांच्यात हजारो वर्षे विशेष परिवर्तन झाले नाही.

दक्षिण पॅसिफिक महासागरातील न्यू आयलँड बेटावरील मेलानीशियन आदिवासीचे कोरीव गणचिन्ह.

इतर संज्ञा

आदिवासी हा इंग्रजीतील ‘अ‍ॅबॉरिजिनीझ्’ या शब्दाचा रूढ मराठी पर्याय आहे. त्यांना वनवासी म्हणावे, आदिवासी म्हणू नये, असाही एक दृष्टिकोन आहे; आदिवासींची वेगळी अस्मिता किंवा संस्कृती नसून ते इतर नागरिकांप्रमाणेच आहेत, ते वनात वस्ती करून राहतात, एवढाच त्यांचा वेगळेपणा आहे, अशा प्रकारचा हा दृष्टिकोन आहे. बरेच आदिवासी गट डोंगरांतून राहात असल्यामुळे त्यांना अलीकडे गिरिजन म्हटले जाते. एका विशिष्ट आदिवासी गटास जमात म्हणूनही संबोधण्यात येते; उदा., वारली जमात, ठाकूर जमात इ. इंग्रजीत ‘अ‍ॅबॉरिजिनीझ्’ या शब्दाव्यतिरिक्त इतरही काही शब्द आहेत.

‘प्रिमिटिव्ह म्हणजे आदिम किंवा अप्रगत लोक आणि ‘सॅव्हेज’ म्हणजे मागासलेले किंवा रानटी लोक. ‘प्रिमिटिव्ह’ किंवा ‘सॅव्हेज’ या शब्दांतून आदिवासींचा मागासलेपणा, अज्ञान किंवा त्यांचा भोळेपणाही सूचित होतो. आदिवासी शब्दास निःसंदिग्ध अर्थ प्राप्त करून देणे, हे मानवशास्त्रातील आजही न सुटलेले कोडे आहे. आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेने आदिवासींना तद्देशीय (इंडिजिनस) संबोधावे अशी शिफारस केली आहे; कारण आदिवासी संस्कृतीची घडण, इतर संस्कृतींच्या संपर्कावाचून स्वतंत्र रीतीने झाली आहे. अलीकडे त्यांना निरक्षर (नॉन्‌लिटरेट) समाज म्हणून संबोधण्याचीही शिफारस करण्यात येते.

आदिवासी बोलींना लिपी नसते. त्यामुळे आदिवासी समाज निरक्षर असतात. अलीकडील मानवशास्त्रीय लिखाणात, आदिवासी समाजांचा निरक्षर समाज असाच उल्लेख करण्यात येतो. पश्चिम आफ्रिकेतीलकॅमेरून जमातीची कोरीव लाकडी तिवई.

आदिवासींसंबंधीचे दृष्टिकोन व अध्ययन

सर्वसाधारण समाजात आदिवासींबाबत भीतियुक्त औत्सुक्य असते. प्राथमिक अर्थव्यवस्था असणारे, स्त्रियांचे जबरदस्तीने अपहरण करून त्यांच्याशी पाशवी वर्तन करणारे, स्वच्छंद लैंगिक संबंध ठेवणारे, वाटेल ते भक्षण करणारे, किंबहुना नरभक्षणाचीही खंत न बाळगणारे, तसेच जादूटोण्यावर श्रद्धा ठेवणारे, उघडेनागडे लोक म्हणजे आदिवासी, असा एक समज आहे. याउलट निसर्गाशी तादात्म्य पावलेल्या, स्वच्छंदी व स्वतंत्र वृत्तीच्या आणि आधुनिक जगाच्या संपर्कामुळे भ्रष्ट न झालेल्या आदिवासींचे जीवन सुखमय व अनुकरणीय आहे, हा विचारही विशेषतः पश्चिमी साहित्यात आग्रहाने मांडलेला आहे. काही विद्वानांच्या मते विज्ञानयुगात सभ्यतेचा प्रगतिशील विकास झाला असला, तरी त्यामुळे नैसर्गिक सुखांपासून माणसे दुरावतात. विज्ञानामुळे मिळालेल्या भौतिक सुखांपेक्षा त्यामुळे निर्माण झालेली मानसिक दुःखे अधिक आहेत. अर्थात आदिवासी जीवनाच्या सुखाची तरफदारी करणारे लोक फार थोडे आहेत.

भारतीय स्मृति-ग्रंथांत आदिवासी जमातींचा उल्लेख सापडतो. स्मृतिकारांनी त्या अनुलोम-प्रतिलोम संकरांतून निर्माण झाल्या, असे म्हटले आहे. परंतु त्यांतील शबर, रक्श, निषाद, किरात यांसारखे पुष्कळसे गट जाती नसून आदिवासी होते व त्यामुळेत्यांना हीन दर्जा प्राप्त झाला. रामायणात किरात, निषाद, शबर इ. आदिवासींचा उल्लेख आहे. बेटावर राहणारे, कच्चे मासे खाणारे व खाली मानवाचे नि वर वाघाचे शरीर असणारे, असा किरातांविषयीचा उल्लेख आहे. निषाद हे जंगलात राहणारे लोक, असा उल्लेख आहे. महाभारतात पुलिंद व किरात हे हिमालयात राहणारे आदिवासी, असा उल्लेख आहे. एकलव्याची कथा सर्वश्रुतच आहे. पुढे कलचुरी राजाविरुद्ध धिरू नावाच्या जमातीने बंड केल्याचा उल्लेख चेदी राजांच्या शिलालेखात सापडतो.

भारताच्या इतिहासात आदिवासी जमाती स्थानिक राजांच्या वतीने लढल्याची अनेक उदाहरणे आहेत. शिवाजीस रामोशी व कोळी जमातींचे बरेच साहाय्य झाले. आदिवासींची पिळवणूक करणाऱ्यांविरुद्ध बरीच बंडे झाली. १७७८ ते १९४७ च्या दरम्यान आसाम, बिहार, मध्य प्रदेश व आंध्र प्रदेश या राज्यांत सुमारे ७५ बंडे झाली. यांतील अधिकांश ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या विरुद्ध होती. महाराष्ट्रातही भिल्लांनी इंग्रजांविरुद्ध उठाव केला होता. १९५६ ते १९५८च्या दरम्यान ठाणे जिल्ह्यात वारल्यांनी जमीनदारीच्या विरुद्ध बंड पुकारले होते.

अमेरिकेच्या शोधापासून पश्चिमी लोकांची आदिवासींकडे दृष्टी वळली. अमेरिकेत वसाहत करणाऱ्यांना स्थानिक आदिवासींशी वारंवार युद्धे करावी लागली. त्यावेळी यूरोपात आदिवासींच्या स्थितीबद्दल बरीच उलटसुलट चर्चा झाली. मॉन्टेनने आदिवासी संस्कृतीत ढवळाढवळ न करण्याचा सल्ला दिला होता. त्याच्या मते रानटी फुलांइतकेच आदिवासीही रानटी असतात.

सतराव्या शतकात आदिवासींच्या सुखमय जीवनावर आधारलेले बरेच ललित साहित्य लिहिले गेले. १६४० साली वॉल्टर हेमान्डने मादागास्कर बेटावरील लोक जगात सर्वांत जास्त सुखी आहेत, असा निर्वाळा दिला. प्रख्यात फ्रेंच लेखक रूसो याने रानटी आदिमानवाच्या स्वतंत्र रम्य जीवनासंबंधी विचार मांडले व तेव्हापासून ‘नोबल सॅव्हेज’ या संज्ञेस प्रसिद्धी मिळाली. पुढच्या शतकात कॅप्‍टन कुक व इतर प्रवाशांच्या प्रवासवर्णनांतून हाच सूर निघतो. कॅप्‍टन कुकने ऑस्ट्रेलियाचे आदिवासी यूरोपीय लोकांपेक्षा फार सुखी आहेत, असे उद्‍गार काढलेले आहेत.

यूरोपीय साम्राज्यवादाचा जसजसा विस्तार झाला, तसतसा ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या कार्याचाही जोर वाढला. ख्रिस्ती मिशनऱ्यांनी वसाहतींतील लोकांना धर्मांतर करण्यास प्रवृत्त केले. साम्राज्यवादाच्या व ख्रिस्ती धर्माच्या प्रसाराबरोबर आदिवासी संस्कृतीचे अधिकाधिक अध्ययन सुरू झाले, किंबहुना त्यांच्यात धर्मप्रसार सुकर व्हावा, म्हणून त्यांच्या चालीरीतींचे काटेकोर अध्ययन करण्यात आले. तत्पूर्वी आदिवासी संस्कृतीची तुटपुंजी ओळख अनेकांच्या प्रवासवर्णनांतून दिलेल्या माहितीच्या आधारे झाली होती. आदिवासींच्या अगदी वेगळ्या आचारविचारांचे वर्णन सर्वसामान्य लोकांना गमतीदार वाटले.

मध्यभारतातील माडिया जमातीचे गव्याच्या शिंगाचे शिरोभूषण.

डार्विनने आपला जैवविकासाचा सिद्धांत १८५९ साली मांडला; त्याप्रमाणे हर्बर्ट स्पेन्सरनेही सामाजिक संस्थांसंबंधीचा विकाससिद्धांत प्रतिपादन केला. मानवाप्रमाणेच मानवी संस्थांचाही विकास कोणत्यातरी तत्त्वानुसार झाला असावा, हे उघड आहे. मानवप्राणी जर एकाच जातीचा आहे, तर त्याच्या विभिन्न संस्कृती का, या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्‍न कसोशीने करण्यात आला. आदिवासी समाज शतकानुशतके आधुनिक सभ्यतेपासून दूर अशा दऱ्याखोऱ्यांतून जगत असल्याने आदिवासींच्या संस्थांचे अध्ययन केल्यास, त्यावरून मानवी संस्थांच्या उगमाबद्दल व विकासाबद्दल निश्चित कल्पना मांडता येतील, असे सुरवातीच्या मानवशास्त्रज्ञांस वाटले. त्या अनुषंगाने अमेरिका, आफ्रिका, आशिया व ऑस्ट्रेलियातील आदिवासींच्या संस्कृतींचे अध्ययन करण्यात आले. मानवशास्त्रीय सिद्धांत या अध्ययनावर आधारलेले आहेत. आदिवासी संस्कृतीत साम्यवादी अर्थव्यवस्था व समाजव्यवस्था होती, असे मत ल्यूइस मॉर्गन या अमेरिकन मानवशास्त्रज्ञाने प्रथम मांडले, तिचा ऱ्हास होऊन पुढे दास्यश्रमाधिष्ठित प्राचीन व्यवस्था, सरंजामशाही व नंतर भांडवलशाही यांचा उदय झाला.

हे मत मार्क्सवाद्यांनी उचलले, परंतु त्यानंतर झालेल्या आदिवासींच्या तपशीलवार अध्ययनाने हे मत निराधार ठरले. मानवशास्त्रामुळे आदिवासींच्या अध्ययनास महत्त्व प्राप्त झाले आहे. मानवशास्त्रज्ञांच्या मते आधुनिक जटिल संस्कृतींचा अभ्यास करण्यापूर्वी आदिवासींच्या साध्या व बिनगुंतागुंतीच्या संस्कृतींचा अभ्यास जास्त सयुक्तिक ठरतो; कारण साध्या संस्कृतीचे अध्ययन केल्याने मानवी व्यवहाराची मूलभूत तत्त्वे शोधून काढणे व त्यांच्या आधारे जटिल संस्कृतींना समजून घेण्याचा प्रयत्‍न करणे, अधिक सोपे व उपयुक्त होते. मानवसमाजाच्या सर्व घटकांचा सारखा विकास घडवून आणण्यासाठी आदिवासींचीही प्रगती करावी, या मानवतावादी दृष्टिकोनानुसारही आदिवासींविषयक अध्ययनास अलीकडे महत्त्व प्राप्त झाले आहे

उत्तर अमेरिकेतील मैदू जमातीच्या वैशिष्ट्यपूर्ण टोपल्यांचे पाच नमुने

आदिवासींची ठळक वैशिष्ट्ये

आदिवासी समाजांसंबंधी भरपूर संशोधन व लिखाण झाले असले, तरी आदिवासी या संज्ञेची एकही सर्वमान्य व्याख्या करता आलेली नाही. आदिवासी जमातींची काही ठळक वैशिष्ट्ये अशी :
  1. एक एक आदिवासी जमात एका विशिष्ट भूप्रदेशात राहाते व तो भूप्रदेश क्षेत्रफळाच्या दृष्टीने प्रगत समाजाच्या प्रदेशाच्या मानाने लहान असतो. आदिवासी क्षेत्र इतर प्रगत समाजापासून दूर किंवा जंगलात असते. रस्त्यांच्या अभावी तो प्रदेश दुर्गम असतो.
  2. आदिवासी जमात साधारणपणे अंतर्विवाही असते व तिचे बहिर्विवाही कुळींत विभाजन झालेले असते. समाजातील गट लहान असतात व ते नातेसंबंधांवर आधारलेले असतात. या गटांचे सदस्यत्व आधुनिक समाजातील मंडळाच्या (क्लब) सदस्यत्वाप्रमाणे ऐच्छिक नसते.
  3. प्रत्येक आदिवासी जमातीची स्वतंत्र पंचायत असते. आदिवासी समाजाचे नियंत्रण पूर्णपणे पंचायत किंवा त्यांचा मुखिया करतो.
  4. एकेका आदिवासी जमातीची बहुधा स्वतंत्र भाषा वा बोली असते.
  5. आदिवासींचा धर्म क्षेत्रीय म्हणजे त्यांच्या निवासस्थानापुरता मर्यादित असतो; त्यांची तीर्थक्षेत्रेही त्यांच्या भागातच असतात.
  6. आदिवासी अर्थव्यवस्थेत गटवार श्रमविभाजनाचा वा धंदेवार भिन्न सामाजिक गटांचा अभाव असतो. सर्व लोक सर्व प्रकारची कामे करतात. याशिवाय आदिवासी अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने प्राथमिक स्वरूपाची असतात. पाटावरवंटा, सापळे, जाळी, आकडे, गळ, दोऱ्या, टोकदार व धारदार दांडकी, हातोडा, कोयता ह्यांसारखी प्राथमिक अवजारेच वापरात असतात. अर्थव्यवस्थेतील उत्पादन-वितरण-सेवन या तीन टप्प्यांपैकी वितरण म्हणजे मालाची वा उत्पन्नाची सार्वत्रिक देवघेव, हा टप्पा आदिवासी अर्थव्यवस्थेत नसतो. उत्पादन कमी असल्यामुळे बाजारपेठाही नसतात. जो तो आपापल्या उत्पादनाचा उपभोग घेतो. त्यांची अर्थव्यवस्था बहुधा नाणे इ. चलनावाचून चालणारी व वस्तुविनिमयाधिष्ठित असते. वस्तुविनिमय म्हणजे उपयुक्त वस्तूंची देवघेव.
  7. आदिवासी समाजात परंपरेला प्राधान्य असते. परंपरेचा ठेवा एक पिढी दुसऱ्या पिढीस कथा, काव्य, नृत्य इ. माध्यमांद्वारे देते.
  8. धर्मात निसर्गपूजेस व जादूसारख्या क्रियाकल्पास महत्त्व असते.
  9. आदिवासी समाजात परंपरा व सामाजिक नियंत्रण यांवर भर असल्याने सर्व लोकांच्या वागण्यात सारखेपणा असतो. दैनंदिन व्यवहारातील ठराविक चाकोरीमुळे सवयी व चालीरीती बनतात. एकंदरीत समाजात एकजिनसीपणा जास्त आढळतो.
  10. आदिवासी समाज बरेचसे स्वयंकेंद्रित असतात; त्यांचे आर्थिक, सामाजिक व धार्मिक जीवन बाह्यसंपर्कापासून शतकानुशतके अलिप्त राहिल्याने स्वयंकेंद्रितता येणे स्वाभाविक आहे. जगातील सर्व समाज पूर्वी आदिवासी अवस्थेत होते. पुढे ते ग्रामीण समाज झाले. नंतर राज्यसंस्था आल्यानंतर राजधान्या व व्यापारी पेठा झाल्या व त्यामुळे नागरीकरणास प्रारंभ झाला. औद्योगिक क्रांतीनंतर संपूर्ण नागरीकरणाच्या दिशेने मानवी समाज वाटचाल करू लागले आहेत, असे प्रख्यात मानवशास्त्रज्ञ रॉबर्ट रेडफिल्डचे मत आहे. आधुनिक काळात त्यामुळेच निर्जमातीकरणाची प्रक्रिया सुरू होऊन आदिवासी समाजांचे ग्रामीण समाजावस्थेत रूपांतर होऊ लागले आहे.

आदिवासी अर्थव्यवस्था

आदिवासी अर्थव्यवस्थेत पैशाचे चलन नसते; वस्तूंची देवाणघेवाण होते. एका जर्मन अर्थशास्त्रज्ञाच्या मते आदिवासी प्राक्-आर्थिक स्थितीत आहेत. व्यक्तीने स्वतःपुरते अन्न गोळा करावयाचे, हाच एक आर्थिक व्यवसाय आदिवासी समाजात आहे, हे म्हणणे बरोबर नाही. अन्नाचा प्रश्न आदिवासी समाजात सामाजिक प्रश्न समजला जातो व त्याप्रमाणे तो हाताळला जातो. कौटुंबिक जबाबदाऱ्या, नातेसंबंध, शेजारधर्म, वडिलांचा व मुखियांचा मान, कुळींचे आचारधर्म, निषेधनियम, पूर्वज व देवता या सर्वांचाच विचार आर्थिक व्यवस्थेत केला जातो.

कामाकरिता काम किंवा पैशांकरिता काम, असा व्यवहार आदिवासी समाजात नसतो. ज्या व्यक्तीचे काम असेल, त्यास कामात मदत करणे इतरांचे कर्तव्य ठरते. किती वेळ काम केले, यावरून मोबदला ठरविण्यात येत नाही; कारण सर्वसाधारणपणे आदिवासी समाजात वेळेस विशेष महत्त्व नसते. आदिवासी आळशी असतात असे नाही, तर ते गरजेनुसार काम करतात येवढेच. अन्न, वस्त्र, व निवारा या मूलभूत गरजांच्या पूर्तीसाठीच त्यांचे आर्थिक व्यवहार होतात. सगेसोयरे व पूर्वज यांचा मान, आतिथ्य, दीक्षाविधी, विवाह, सामाजिक दर्जाचे दिग्दर्शन यांसारख्या इतर गोष्टींनीही आदिवासींचे आर्थिक व्यवहार प्रेरित केले जातात.

आदिवासी समाजातील श्रमविभाजन व्यावसायिक-सामाजिक गटवारीवर आधारलेले नसते; ते लिंगभेदावर आधारलेले असते. प्रत्येक व्यक्तीस शेती, मासेमारी, सुतारकी इ. व्यवसाय कमीजास्त प्रमाणात यावे लागतात वा येत असतात, त्यामुळे सहकार हे आदिवासी जीवनाचे ब्रीद आहे. तसेच आदिवासी उद्योगांत तांत्रिक व धार्मिक क्रियांचा फार जवळचा संबंध असतो. शेती, मासेमारी किंवा होड्यांचे उत्पादन, प्रवास इत्यादींशी धार्मिक विधी निगडित असतात. वस्तुविनिमयातही गिऱ्हाईक कोण आहे, त्याचा दर्जा काय आहे इ. घटक लक्षात घेतले जातात. स्वतःचा मोठेपणा दाखविण्यासाठी दुसऱ्याने दिलेल्या देणगीपेक्षा अधिक भारी किंमतीच्या देणग्या दिल्या जातात. वस्तूची किंमत तिच्या विनिमयक्षमतेवरून न ठरविता तिच्या उपयोगावरून ठरविली जाते. काही आदिवासी समाजांत मात्र काही पदार्थांचा चलन म्हणून उपयोग करतात; निकोबार बेटात नारळ, आफ्रिकेत कवड्या किंवा भाल्याची पाती, सॉलोमन बेटांवर व न्यू गिनीत डुक्कर, फिजी बेटात व्हेल माशाचा दात, बोर्निओत मेण किंवा भारताच्या अरुणाचल प्रदेशात मिथान नावाचा प्राणी इत्यादींचा चलन म्हणून उपयोग करण्यात येतो. विवाहात वा धार्मिक समारंभांत दान देण्यासाठी अशा चलनाचा उपयोग होतो.

नैर्ऋत्य पॅसिफिकमधील न्यू हेब्रिडीस या बेटांवरील आदिवासींचा डुक्कर मारण्याचा मोगरा.

अन्नसंपादन

अन्नसंपादन दोन प्रकारे केले जाते : अन्न गोळा करणे व अन्नाचे उत्पादन करणे. अन्न गोळा करण्याचे तीन प्रकार असतात : शिकार, मासेमारी व इतर अन्न पदार्थांचे अर्जन. प्रत्येक आदिवासी जमातीत हे प्रकार आढळतात. मात्र त्यांचा कमीअधिक उपयोग नैसर्गिक परिस्थितीवर अवलंबून असतो. अन्न उत्पादनही तीन प्रकारे केले जाते:
  1. गुराढोरांचा उपयोग न करता केवळ स्वतःच्या अंगमेहनतीने धान्य पिकविणे.
  2. गुराढोरांच्या मदतीने शेती करणे.
  3. केवळ दुभत्या जनावरांवर निर्वाह चालविणे.
  4. अन्न गोळा करणाऱ्या जमाती सांस्कृतिक दृष्ट्या एकमेकांपासून भिन्न असल्या, तरी त्यांची काही समान वैशिष्ट्ये दिसून येतात :
  1. त्यांत लोकसंख्येची घनता कमी असते. पॅसिफिकचा उत्तर किनारा व अमेरिकेचे सपाट मैदान यांतील काही जमातींचा यास अपवाद आहे.
  2. हे समाज लहान व काही अपवाद सोडल्यास भटके असतात.
  3. हे समाज स्वावलंबी कुटुंबांच्या संघांनी बनलेले असतात. त्यामुळे समाजनियंत्रण नातेसंबंधांवर आधारलेले असते, ते राजकीय पातळीवर संघटित झालेले नसते.
  4. हे समाज दूरच्या व दुर्गम प्रदेशात राहतात; किंबहुना हळूहळू त्यांची अशा प्रदेशात हकालपट्टी झालेली असते. त्यामुळे त्यांच्यातील संस्कृतिपरिवर्तनाचा वेग फारच मंद आहे.

शिकार

ऑस्ट्रेलियन आदिवासी कांगारू व तत्सम प्राण्यांची शिकार करतात. एस्किमो हिवाळ्यात सील व वॉलरसची शिकार करतात, तर उन्हाळ्यात कॅरिबू नावाच्या प्राण्याची पारध करतात. वेगवेगळ्या प्रकारच्या शिकारीकरिता वेगवेगळ्या प्रकारची हत्यारे वापरावी लागतात. अमेरिकेत सपाट प्रदेशात राहणारे रेड इंडियन लोक शिकारीसाठी रानरेड्यांच्या कळपात लांडग्याचे रूप घेऊन शिरतात. कॅलिफोर्नियाचे आदिवासी हरणाची शिकार करण्यासाठी अंगावर हरणाचे कातडे पांघरतात. दक्षिण आफ्रिकेचे ð बुशमन लोक शहामृगाची शिकार करण्यास शहामृगासारखे सोंग आणतात.

एस्किमो लोक प्राण्यांच्या नराचा वा मादीचा आवाज काढून त्यांच्या जोडीदारास आपल्याजवळ येण्यास आकृष्ट करतात. शिकार बहुतेक गटागटाने केली जाते. हाकारून प्राण्यास जाळ्यात पकडण्याचे प्रकार सर्व आदिवासी जमातींत सापडतात. सशांची शिकारही या पद्धतीने केली जाते. याकरिता सापळे, जाळी, खंदक आदींचा उपयोग करण्यात येतो. बहुतेक आदिवासी जमाती शिकारीत कुत्र्यांची मदत घेतात.

उत्तर अमेरिकेतील हैदा जमातीची चित्रकला : लांडग्याच्या रूपातील समुद्रराक्षस दोन ऱ्हेल माशांना ओढून नेत आहे.

मासेमारी

उत्तर पॅसिफिक, ब्रिटिश कोलंबिया व दक्षिण अलास्कातील आदिवासींचे मासे हेच मुख्य अन्न असते. या लोकांना एकाच ठिकाणी राहता येते. शिकाऱ्यांप्रमाणे भटकावे लागत नाही. मासे पकडण्याकरिता भाले, आकडे व जाळ्यांचा उपयोग करतात. तसेच त्यांना बेशुद्ध पाडण्याकरिता विषारी वनस्पतीही वापरतात.

ऑस्ट्रेलियन आदिवासींच्या बूमरेंगचा एक नमुना.

अन्न गोळा करणे :जंगलात सापडणारी विविध फळे हे आदिवासींचे बहुतेक ठिकाणी मुख्य अन्न असते. जंगलातील फळे गोळा करणाऱ्या आदिवासींची संख्या उत्तर अमेरिकेत जास्त आहे. बी, बोरे, कंद गोळा करणाऱ्यांना त्यांच्यातील कडवटपणा किंवा विषारीपणा घालविण्याचे प्रकार माहीत असतात. या लोकांनाही ऋतुमानाप्रमाणे भटकावे लागते. भारतात मध्य प्रदेशातील कमार व आंध्र प्रदेशातील चेंचू या जमाती अशा प्रकारे अन्नपदार्थ गोळा करतात.

पशुपालन

आशियात किरगीज व कझाक हे गोपालन करणारे प्रसिद्ध लोक आहेत. भारतातील निलगिरी पर्वतप्रदेशात तोडा जमातीचे लोकही पशुपालनावर उपजीविका करतात. महाराष्ट्रातील धनगर याच सदरात येतात. बहुतेक गोपालकांना ऋतुमानाप्रमाणे एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात जावे लागते. एस्किमो,लॅप व तुंगूस या लोकांनी रेनडियरचे पालन करून ते एक उपजीविकेचे साधन बनविले आहे. गोपालक व शेती करणाऱ्या लोकांत नेहमीच वितुष्ट येत असते. आफ्रिका, आशिया खंडांतील गोपालकांनी शेतकरी समाजांचा पराभव करून राज्ये स्थापल्याची उदाहरणे इतिहासात आहेत.

मध्य भारतातील मुढिया जमातीचा घंटिकायुक्त तंबाखू-बटवा.

वस्त्र व निवारा

एस्किमो लोक हिवाळ्यात बाहेर काम करताना नीट शिवलेले फरचे कपडे नखशिखांत वापरतात, पण ते आपल्या घरात पाहुण्यांच्या देखतही उघडेनागडे वावरतात. त्यांचेच शेजारी लॅब्रॅडॉरचे नास्कापी इंडियन हात व चेहरा सोडून इतर अवयव उघडे टाकणे असभ्यपणाचे समजतात. नीती-अनीतीच्या कल्पना सापेक्ष असल्याने त्यांचा वस्त्रालंकारावरही परिणाम होतो. हैदा इंडियनांचे स्त्रीचे शरीर उघडे राहिले, तरी त्यात तिला विशेष लज्जा वाटत नाही; पण ओठांच्या अलंकरणाशिवाय ती इतरांच्या नजरेस पडली, तर तिला लाज वाटते. आफ्रिकेतील मुसलमानांत स्त्रीचे स्तन दिसले, तर त्यात विशेष वावगे मानत नाहीत; पण अगदी जवळचे नातेवाईक सोडल्यास तिचा चेहरा दुसऱ्यास दिसणे वावगे मानतात. शरीराचे रक्षण करण्यासाठी ओना जमातीचे लोक माती व मेण यांचे मिश्रण अंगास लावतात. सॅन फ्रॅन्सिस्कोजवळील आदिवासी थंडीपासून बचाव करण्यासाठी अंगास चिखल माखतात. वस्त्रांचा उपयोग आपला सामाजिक दर्जा दाखविण्यासाठीही केला जातो.

आदिवासी लोक अलंकार तर वापरतातच; पण त्याशिवाय आपले शरीर रंगवितात, गोंदवतात व डाग देऊन त्यावर आकृत्याही काढतात. पॉलिनीशियात उच्च पदाधिकारी आपले सर्व शरीर गोंदवून घेतो. ऑस्ट्रेलियातील आदिवासींच्या काळेपणामुळे गोंदवलेले दिसत नाही, म्हणून ते कातडीस डाग देऊन त्यावर आकृत्या काढून घेतात. ओशिअ‍ॅनियात पांढरे दात विद्रूप समजले जातात, त्यामुळे सर्व लोक दात काळे करण्याचा प्रयत्‍न करतात. तसेच केस, नखे इत्यादींनाही वेगवेगळी रूपे देण्याच्या पद्धती आढळतात. लाकूड, दगड, हाड व कवडी यांचा उपयोग अलंकार बनविण्यासाठी करण्यात येतो. रंगीत बिया, मणी, पिसे यांचाही अलंकार म्हणून उपयोग केला जातो.

एस्किमोंचे बदक पकडण्याचे जाळे

आदिवासींची घरे दोन घटकांवर अवलंबून असतात

  1. नैसर्गिक परिस्थिती व तीतून घर बांधण्याकरिता मिळणारी सामग्री.
  2. अन्नोत्पादनाचे स्वरूप. भटक्या लोकांना आपली घरे सहजासहजी हलवता येतील, अशीच तयार करावी लागतात. अपशी लोक बांबू गवत व कातडी यांचा उपयोग करून घुमटाकार घर बनवितात. ईशान्य कॅनडातील मॅकेंझी भागातील इंडियन कातड्याचे तंबू वापरतात. हैदा आदिवासींची घरे सु. ११ मी. रूंद व १४ मी. लांब असतात व छप्पर उंचीला दाराजवळ सुं २ मी. व मध्ये सु. ३ मी. असते. जवळजवळ दहा खांबांवर हे छप्पर उभे असते. भिंती लाकडाच्या असतात. घरांच्या जुळवणीत खिळ्यांचा वापर करण्यात येत नाही. झाडांच्या सालींनी खांब बांधले जातात. महाराष्ट्रातील भिल्लांच्या घरांना कुडाच्या भिंती व गवती छप्पर असते. अरुणाचल प्रदेशातील आदिवासींची घरे बांबूंवर अधांतरी बांधलेली असतात.

पूर्व आफ्रिकेतील आदिवासींचा हत्ती पकडण्याचा सापळा

मालमत्तेचे स्वरूप

आदिवासी समाजात मालमत्तेचे स्वरूप अधिकांशांनी सार्वजनिक असते, त्यामुळे त्यांची अर्थव्यवस्था साम्यवादी आहे, असा दावा बऱ्याच वेळा करण्यात येतो. अनेकदा आदिवासी खेडेगाव हे एका विस्तारित कुटुंबाचे, नातेसंबंधीयांचे वा एकाच कुळीच्या लोकांचे बनलेले असते. अशा खेड्यात मालमत्ता सार्वजनिक असली, तरी ती साम्यवादी म्हणता येत नाही. आदिवासी समाज हा स्वावलंबी जीवन व्यतीत करत असल्यामुळे एकमेकांशी सहकार्य केल्याशिवाय तो जगूच शकत नाही. नदीच्या काठी नाव रिकामी असल्यास तिचा वापर कोणीही करू शकतो. शिकारी टोळ्या जमिनीच्या हद्दी वाटून घेतात. तसेच मासेमारी करणारे लोकही पाण्याचा प्रवाह वाटून घेतात. आदिवासी समाजात सामाजिक, आर्थिक व धार्मिक जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी एकमेकांना देणग्या देण्यावर भर असतो. देवाचे, नातेवाईकांचे व बदनामीचे भय वाटून देणग्या देतात. त्यांची काही काळानंतर परतफेडही केली जाते. अशा प्रकारच्या व्यवहारांमुळे आदिवासी अर्थव्यवस्था साम्यवादी असल्याचा भास होतो.जपानमधील ऐनू जमातीचा डुक्कर मारण्याचा समारंभ

मेलानीशियातील ट्रोब्रिआंड बेटावरील आदिवासींत दोन प्रकारच्या वस्तूंद्वारा विनिमय चालतो. त्या म्हणजे हातातील पांढऱ्या कवड्यांची कंकणे व गळ्यातील लाल कवड्यांच्या माळा. या वस्तुंचा दागिने म्हणून क्वचितच उपयोग करण्यात येतो. त्यांचे उत्पादनही मोठ्या प्रमाणावर करण्यात येते. या विनिमयात निरनिराळ्या बेटांवरील आदिवासी भाग घेतात. अलंकारांबरोबर उपयोगी वस्तू भेटीदाखल देण्यात येतात. दुसऱ्या बेटावर भेटी नेण्याकरिता नवीन नावा बांधण्यात येतात व त्यांना सभारंभपूर्वक निरोप देण्यात येतो. अशा रीतीने देणग्यांच्या रूपाने त्या भागात व्यवहार चालतो. यास कुला म्हणतात. सहकार करणे व देणग्यांच्या देवाणघेवाणीने संबंध टिकविणे, हे आदिवासी अर्थव्यवस्थेचे सूत्र दिसते.

आफ्रिकेतील सूदान राज्यात राहणाऱ्या बोंगा जमातीचे मासे पकडण्याचे जाळे.

सामाजिक संघटना : सामाजिक संघटना व्यक्तींच्या समाजमान्य परस्परसंबंधांवर आधारलेली असते. समाजमान्य संबंधांतून सामाजिक गटांचा जन्म होतो. आधुनिक समाजात ऐच्छिक संबंधांवर आधारलेले बरेच गट आढळतात. आदिवासी जमातींत बहुसंख्य गट नातेसंबंधांवर आधारित असतात.

आदिवासी कुटुंब

कुटुंब हा मानवसमाजातील सर्वात महत्त्वाचा नातेगट असतो. सर्व नातेसंबंधांस कुटुंबापासून सुरुवात होते. कुटुंब द्विपक्षीय नातेसमूह असतो. माता व पिता या दोहोंच्या नातेवाईकांशी व्यक्तीचा संबंध येतो. समाज पितृनामी, पितृसत्ताक, पितृनिवासी, पितृवंशी किंवा मातृनामी, मातृसत्ताक, मातृनिवासी, मातृवंशी असतो. याचा अर्थ पितृवंशी समाजात व्यक्तीचा मातृसंबंधीयांशी नातेव्यवहार राहत नाहीत, असा नाही. रोजच्या व्यवहारात व समारंभात दोन्ही बाजूंच्या नातेवाईकांचा संबंध येतो. अमेरिकेतील मातृनामी होपी आदिवासी जमातीत आडनाव आईकडून घेतले जाते, पण व्यक्तीचे नाव पित्याच्या नातेसमूहातून सुचविण्यात येते. तसेच मातृनामी उत्तर अमेरिकेतील हिदस्ता जमातीत पवित्र वस्तू पित्याकडून पुत्रास मिळतात. पित्याच्या नातेवाईकांस देणग्या दिल्या जातात व अंत्यसंस्कार पितृनातेसंबंधीयांकरवी करण्यात येतात. द. आफ्रिकेतील पितृनामी ð थोंगा जमातीत वधूला मिळालेल्या देणग्यांचा काही हिस्सा तिचा मामा घेतो. तसेच तो भाच्याशी निगडित असलेल्या समारंभात प्रामुख्याने भाग घेतो. तसेच मामाच्या मिळकतीवर भाच्याचा हक्क पोचतो. क्वचित विधवा मामीही भाच्याजवळ येऊन राहते.

या उदाहरणांवरून प्रत्यक्ष व्यवहारात दोन्ही बाजूंच्या

नातेसंबंधांचे महत्त्व कळून येते. मातापित्यांचे अपत्यांवर प्रेम तर असतेच, शिवाय त्यांचा एक आर्थिक सहकारी गट निर्माण झालेला असतो. यास बीजकुटुंब म्हणतात. विवाह केवळ लैंगिक सुखाकरिता केला जात नाही. विवाहामुळे एक आर्थिक समूह घडविला जातो. काही आदिवासी विवाहबाह्य संबंध ठेवू शकतात; पण स्वयंपाक करावयास, मातीची भांडी बनविण्यास, चटया विणण्यास त्यास सहचारिणी हवी असते. तो तिला राहण्यास घर व अन्न देतो. ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड प्रदेशात पुरूष मासळी व शिकार पुरवितो, तर स्त्री लहान मासळी, कंद व फळे गोळा करते. आदिवासी जमातींत स्त्रीपुरुषांचे श्रमविभाजन दिसून येते. कोणत्याही प्रकारचा विवाह असला, तरी आदिवासींत बीजकुटुंब हाच मूलगामी गट असतो.

शरीरावरील दर्दराकृती रंगचित्रण

उत्तर अमेरिकेच्या पॅसिफिक किनाऱ्यावरील काफिउल्ल जमात.

कुटुंबाची एकी टिकविण्यास एकत्रनिवास फार महत्त्वाचा असतो; विवाहानंतर वधूने वराच्या घरी जाऊन राहणे किंवा वराने वधूकडे जाऊन राहणे किंवा दोघांनीही नवीन ठिकाणी निवास करणे, असे निवासाचे तीन प्रमुख प्रकार आहेत. निवासप्रकारांवर नातेसंबंधांची घडण अवलंबून असते. पितृनिवासी पद्धती असलेल्या समाजात एका बाजूचे सपिंड नातेसंबंधी एका ठिकाणी राहतात व त्यांच्यात जास्त जवळीक निर्माण होते. त्यांतूनच पुढे घराणे, कुळी इ. नातेगट निर्माण होतात. पितृनिवासी पद्धतीत पुरुषांच्या बाजूचे संबंध जास्त घनिष्ठ होतात. मातृनिवासी पद्धतीत जावई दुसऱ्या कुटुंबातून आलेला असतो. अशा कुटुंबात सत्ता मामाच्या हातात असते व तो कुटुंबाचे निर्णय घेतो. मातृनिवासी पद्धतीच्या हिदस्ता, नैऋत्य आफ्रिकेतील ओव्हांबो व आसाममधील खासी जमातींत विवाहानंतर काही वर्षांनी त्या जोडप्याला नवीन निवास स्थापण्यास मदत केली जाते. पितृनिवासी आदिवासी जमातींतही वधूमूल्य देण्याची ऐपत नसल्यास, जावयास सासुरवाडीस काही वर्षे काम करून, देणे चुकते करावे लागते. निवासाचे नियम काहीही असले, तरी त्यांत परिस्थितीप्रमाणे बदल शक्य असतो व त्यामुळे दोन्ही बाजूंचे नातेसंबंध साधले जातात.

शरीरावरील अस्वलाकृती रंगचित्रण : उत्तर अमेरिकेच्या पॅसिफिक किनाऱ्यावरील काफिउल्ल जमात.

पतिपत्‍नीमधील श्रमविभाजन वेगवेगळ्या आदिवासी जमातींत वेगवेगळे असते. पुरुषांनी आणलेल्या शिकारीत स्त्रिया कंद, लहान मासे इत्यादींची भर टाकतात. शिवाय त्या अल्पशी शेतीही करतात. अमेरिका, आफ्रिका व ओशिअ‍ॅनियात मळ्याचे काम स्त्रियांकडेही असते. उत्तर अमेरिकेत चामडी कमावण्याचे काम स्त्रिया करतात, तर आग्नेय अमेरिकेत ते काम पुरुष करतात. अमेरिकेच्या उत्तर अ‍ॅरिझोनातील होपी जमातीत कापड विणण्याचे काम पुरुषांचे असते, तर शेजारच्या ð नॅव्हाहो जमातीत ते काम स्त्रिया करतात. सर्वसाधारणपणे हातांनी बनविण्याजोगी मातीची भांडी स्त्रिया तयार करतात, तर पुरुष चाकावर भांडी घडवितात. भारतातील तोडा जमातीत स्त्रियांना म्हशींच्या गोठ्यात जाण्यास मज्‍जाव असतो, इतकेच नव्हे, तर दुधाचा कोणताही पदार्थ त्या शिजवत नाहीत.

आदिवासी कुटुंबात तरुणतरुणींना विशेष प्रकारचे स्थान असते. भारतात भुडिया, नागा, ओराओं इ. जमातींत तरुणतरुणींची युवागृहे असतात. संध्याकाळ व रात्र तरुणतरुणी आपल्या कुटुंबाबाहेर या युवागृहांत घालवितात.

विवाहसंस्था : आदिवासींमध्ये विवाहसंस्थेचा कोणतातरी प्रकार सर्वत्र आढळतो. कोणत्याही प्रकारची विवाहसंस्था नाही, असा आदिवासी समाज नाही. विवाहामुळे दोन कुटुंबे, दोन घराणी, दोन कुळी जवळ येतात. विवाह कोणाशी करावा किंवा करु नये, याबाबत प्रत्येक जमातीत विधिनिषेध आहेत. बीजकुटुंबात पतिपत्‍नी सोडले, तर इतरांचे परस्पर लैंगिक संबंध निषिद्ध असतात. याशिवाय ð अगम्य आप्तसंभोगासंबंधी निरनिराळ्या जमातींत भिन्न भिन्न नियम आहेत. आदिवासींत एका कुळीतील लोकांचे विवाहसंबंध निषिद्ध असतात. एकाच पूर्वजाची प्रजा असल्याने एका कुळीचे लोक आपापसांत बहीणभाऊ ठरतात. त्यामुळे कुळीच्या बाहेर विवाह करावा लागतो, त्यास बहिर्विवाह म्हणतात. मात्र विवाह जमातीतच करावे लागतात, यास अंतर्विवाह म्हणतात. अंतर्विवाह व बहिर्विवाहाच्या नियमांमुळे जोडीदार निवडण्याचे क्षेत्र बरेच मर्यादित होते.

बीजकुटुंब सोडले, तर अन्य प्रकारच्या आदिवासी कुटुंबांत विवाहसंबंधांचे अनेक प्रकार पाहावयास मिळतात. पॉलिनीशियातील मारक्वेसॉन जमातीत आतेशी, सेमा नागा जमातीत मावशीशी

उत्तर फिलीपीन्सच्या गिरिप्रदेशातील आदिवासींच्या घरांचे विविध प्रकार

ईशान्य भारतातील लखेर व इंडोनेशियातील मेंटावाई बेटावरील मेंटावियन जमातींत सावत्र बहिणीशी (प्रत्येकाचा पिता वेगळा पण आई एक), प. आफ्रिकेतील ð एडो व इंडोनेशियातील सुमात्रा बेटावरील मिनांगकाबाऊ जमातींत सावत्र बहिणीशी (प्रत्येकाची आई वेगळी पण पिता एक), इंडोनेशियातील बाली व ईशान्य सायबीरियातील चुकची जमातींत चुलत-मावस बहिणींशी असे विविध विवाहसंबंध प्रचलित आहेत. तसेच प्रत्येक जमातीत बीजकुटुंबाबाहेरही विशिष्ट आप्तसंभोग निषिद्ध असतात. आदिवासींत अधिमान्यविवाहाचेही नियम आढळतात. अधिमान्यता म्हणजे अग्रक्रम ठरलेला असणे. जोडीदार निवडताना काही आप्तस्वकीयांस अग्रक्रम द्यावा लागतो. अशा अग्रक्रमी आप्तांत वर वधू उपलब्ध होत नसल्यास, इतर कुटुंबातून त्यांची निवड केली जाते. बऱ्याच आदिवासी जमातींत मामेबहीण, आतेबहीण किंवा बहिणीची मुलगी यांस अधिमान्यता असते. मामे-आते भावंडांचे विवाह श्रीलंकेतील वेद्दा व भारतातील तोडा व मीकीर या जमातींत आढळतात. आते-मामे भावंडे ही शक्य तो सख्खी असावयास हवीत, आते-मामे भावंडे ही बहिर्विवाहाच्या नियमांनुसार कधीही एका कुळातील नसतात. त्यामुळे त्यांच्यातील विवाह निषिद्ध नसतो. चुलत-मावस भावंडांच्या विवाहामुळे वंशसत्ता, वारसाहक्क इ. प्रश्न गुंतागुंतीचे बनण्याची शक्यता असते. म्हणून बहुतेक जमातींत तसले विवाह टाळण्यात येतात. आप्तविवाहांचा नातेवाचक संज्ञांवर फार दुरगामी परिणाम झालेला आहे. मामा व सासरा ही एकच व्यक्ती असते. तसेच आत्या व सासू, मामेबहीण-आतेबहीण व पत्‍नी, पत्‍नीचा भाऊ व मामे-आते भाऊ वा मामे-आते बहीण व पत्‍नी या निरनिराळ्या भूमिका एका एका व्यक्तीत सामावल्या गेल्यामुळे त्यांच्याकरिता वापरल्या जाणाऱ्या नातेवाचक संज्ञांही सारख्याच असतात. फिजी बेटावरील आदिवासींत व वेद्दा जमातीत मामा व सासरा आणि आत्या व सासू यांस एकच संज्ञा वापरली जाते.

देवर-विवाह व मेहुणी-विवाह हे बऱ्याच आदिवासी जमातींत आढळतात : नॅव्हाहो इंडियन, सायबीरियातील ð कोर्याक तसेच अंदमान बेटे, पश्चिम ऑस्ट्रेलिया, मेलानीशियातील सांताक्रूझ बेट, टॉरसची सामुद्रधुनी, बँक्सची बेटे इ. ठिकाणच्या जमाती यांत विधवेने देवराशी, दिराशी म्हणजे आपल्या पतीच्या धाकट्या किंवा कधी कधी मोठ्या भावाशी विवाह करण्याची पद्धत आहे. ज्या जमातींत मेहुणी-विवाह संमत आहे – उदा., कोर्याक, उत्तर अमेरिकेतील आदिवासी इ. – त्या जमातींत पत्‍नी मयत झाल्यावर किंवा जिवंत असताना तिच्या धाकट्या बहिणीशी व क्वचित मोठ्या बहिणीशीही विवाह करता येतो. वधूमुल्य देऊन विवाह केलेली पत्‍नी मयत झाल्यास तिच्या बहिणीवर हक्क सांगता येतो. हे दोन्ही प्रकारचे विवाह बहुधा द्वितीय विवाह असल्याने त्यांचा नातेसंज्ञांवर विशेष परिणाम होत नाही.

आदिवासींत वराला वधूपित्यास वधूमूल्य द्यावे लागते. हे वधूमूल्य द. आफ्रिकेतील बांटू व इतर गोपालक जमातींत गुरांच्या रूपाने, मेलानीशियात डुक्कर किंवा कवडीच्या चलनाच्या रूपात व तुंगूस जमातीत रेनडियरांच्या रूपात देण्यात येते. भारताच्या अरुणाचल प्रदेशामध्ये मिथानचा उपयोग वधूमूल्यासाठी करण्यात येतो. बहुधा वधूमूल्य एकाच वेळी देण्यात येते; पण ऑस्ट्रेलियातील आदिवासी, शस्त्र, कपडे व अलंकारांच्या रूपाने जन्मभर त्याची फेड करीत राहतो. आदिवासी अर्थव्यवस्थेत श्रमिकांचे फार महत्त्व असते. मुलीचे लग्न केल्याने घरातील एक श्रमिक कमी होतो, त्याची फेड म्हणून वधूमूल्य देण्यात येते. वधूमुल्य देण्याची ऐपत नसल्यास ते फिटेपर्यंत मुलास सासऱ्याकडे काम करावे लागते. यास सेवाविवाह म्हणतात. एखाद्या व्यक्तीची पत्‍नी दुसऱ्याबरोबर पळून गेल्यास किंवा पित्याकडे परत गेल्यास प्रियकराने वा पित्याने वधूमुल्याची परतफेड करावयाची असते. वाईट वागणूक मिळाल्यास स्त्री पळून जाईल, म्हणून चांगली वागणूक देण्यात येते. वधूमूल्य टाळण्यासाठी कधी कधी विनिमयविवाह केले जातात. दोन बहिणींची दोन कुटुंबांत अदलाबदल झाल्यास वधूमूल्य द्यावे लागत नाही. द. आफ्रिकेच्या थोंगा जमातीत वधूमूल्यास ‘लोबोला’ म्हणतात.

मानवशास्त्रीय लिखाणात लोबोला ही संज्ञा वधूमूल्यासाठी मान्य झाली आहे. बांटू जमातीत घटस्फोटानंतर वधूपित्यास लोबोला परत करावा लागतो. गुरेढोरे परत न केल्यास स्त्रीची मुले पित्याकडे राहतात. लोबोला परत केल्यास मुले आईकडे जातात. इतर विवाह-प्रकारांत गांधर्वविवाह व अपहरणविवाह प्रसिद्ध आहेत. दोन्ही विवाह वधूमूल्य दिल्याशिवाय समाजसंमत होत नाहीत. परंतु या विवाहांत वधूमूल्य कमी असते. पूर्व आफ्रिकेतील किकूयू जमातीत काम विभागले जावे, म्हणून बायकाच सवत आणण्यास नवऱ्यास प्रोत्साहन देतात. न्यूगिनीतील काई, सायबीरियातील चुकची व द. आफ्रिकेतील थोंगा जमातींतही जवळजवळ तशीच परिस्थिती आहे.

जास्त मुले होण्यासाठीही बहुविवाह करण्यात येतात व प्रत्येक स्त्रीला राहण्यासाठी स्वतंत्र झोपडी दिलेली असते. पूर्व आफ्रिकेतील काही जमाती, भारतातील तोडा व खस, तसेच एस्किमो व तिबेटमधील काही जमाती यांत तुरळक प्रमाणात बहुपतित्व आढळते. बहुपतित्वाची नेमकी कारणे सांगता येत नाहीत; परंतु असल्या जमातींत मुलींना लहान वयात मारण्याची प्रथा आहे. तोडा जमातीत एक पती आपल्या गर्भवती पत्‍नीस लहान धनुष्यबाण देतो. तो समारंभ झाल्यानंतर पत्‍नीस होणारी सर्व मुले त्या पुरुषाची समजण्यात येतात. यावरून काही आदिवासींतील पालकत्वाचे महत्त्व सामाजिक असून जैविक पालकत्वास विशेष स्थान नसते, असे दिसते. दुसऱ्या पतीने परत योग्य ते विधी केल्याशिवाय त्यास सामाजिक दृष्ट्या पालकत्व प्राप्त होत नाही. बहुपतित्व बहुधा भ्रातृक असते, म्हणजे स्त्रीचे पती हे भाऊ-भाऊ असतात. पूर्वी द. भारतातील नायर समाजात अभ्रातृक बहुपतित्वाची प्रथा होती, ती आता नष्ट झाली आहे. मारक्वेसॉन जमातीत अजून अभ्रातृक बहुपतित्व आढळते. ऑस्ट्रेलियात आदिवासी जमातींत शय्या देण्याची पद्धत आहे. पूर्व आफ्रिकेतील मसाई लोकांतही पाहुण्यास पत्‍नी व झोपडी देण्याची पद्धत आहे.

इतर सामाजिक गट : एकपक्षी वंशानुक्रम असलेला बहिर्विवाही नातेगट, अशी कुळीची सर्वसाधारण व्याख्या करता येते. कुळीचे सभासद एका पूर्वजाचे वंशज म्हणवितात. हा पूर्वज पुष्कळदा काल्पनिक वा मनुष्येतरही असू शकतो. अशा पूर्वजास कुळीचे गणचिन्ह म्हणतात. कुळी व गोत्र दोन्ही बहिर्विवाही असतात.

लाकडी वाघ

भारताच्या बिहार राज्यातील ओराओं जमातीचे गणचिन्ह.

कुळींच्या देवदेवता असतात. कुळींची पंचायतही असते. ती कुळींमधील भांडणे व नियमांचे उल्लंघन यांबाबत निर्णय देते. एकमेकांना मदत करणे हे कुळीच्या सभासदांचे मुख्य ब्रीद असते. विशेषतः दुसऱ्या कुळीच्या लोकांशी भांडणतंटे झाल्यास कुळीचे लोक एकजुटीने त्यात भाग घेतात. कुळींमधील सूडभावना व कुळींबद्दलचे सभासदांचे प्रेम यांस क्रमाने इंग्रजीत ‘क्लॅन व्हेन्जन्स’ व ‘क्लॅनिश मेंटॅलिटी’ असे म्हणतात. आफ्रिकी देशांच्या राजकारणात कुळींचा प्रभाव अधिक आहे.

ज्या जमातींचे गणचिन्ह किंवा नाव पूर्वजांवरून ठरलेले नसते, त्यांचे गणचिन्ह बहुधा कोणत्यातरी प्राण्याचे असते. गणचिन्हाचे नाव कुळीचे नाव असते. पूर्व अमेरिकेतील इरोक्वाइस या अमेरिकन इंडियन जमातीत अस्वल, कासव, ईल अशी कुळींची नावे आहेत. हैदा जमातीत प्राण्यांच्या आकृत्या अंगांवर गोंदतात, कपड्यांवर काढतात व लाकडांवरही कोरतात. पूर्व आफ्रिकेच्या बूगांडातील आदिवासी जमातींत ३६ बहिर्विवाही कुळी आहेत. प्रत्येक कुळीच्या ढोलाचा ठेका वेगळा असतो. प्रत्येक कुळीस दोन गणचिन्हे असतात. त्यांपैकी एक कुळीचा पूर्वज असतो. कुळींच्या नावांचे भाषांतर असे : सिंह, चित्ता, माकड, उंदीर इत्यादी. ऑस्ट्रेलियात गणचिन्हवादाचा जास्त प्रसार आहे. मध्य ऑस्ट्रेलियातील आरूंटा जमातीत गणचिन्हासाठी विशिष्ट जागा असते व तिची सीमा आखलेली असते. गणचिन्ह असलेल्या प्राण्यांची हत्या करीत नाहीत. ऑस्ट्रेलियन गणचिन्हपद्धतीचे द्यूरकेम या फ्रेंच समाजशास्त्रज्ञाने संशोधन करून धर्माची सुरुवात त्यापासून झाली, असे प्रतिपादिले आहे. गणचिन्ह मानलेल्या प्राण्यांच्या वा वस्तूंच्या आदरार्थ समारंभ करून त्या निमित्ताने कुळीचे लोक आपली एकी टिकवतात व वाढवतात, असा त्याचा सिद्धांत आहे.

आदिवासी पादत्राणे : १. फिनलंड. २. अफगाणिस्तान. ३. पेरू.

काही कुळींचा मिळून एक मोठा नातेगट निर्माण होतो, त्यास सकुलक (फ्रॅट्री) म्हणतात. जेव्हा एका जमातीत केवळ दोनच सकुलक कुळी असतात, तेव्हा त्यास द्विदल संघटना किंवा अर्धक (मॉइटी) म्हणतात. तोडा जमातीत दोन अर्धके आहेत. सकुलक व अर्धक बहिर्विवाही असतात. क्वचित ते अंतर्विवाही असू शकतात. दोन्ही प्रकारची उदाहरणे आढळतात. भारतातील अर्धके अंतर्विवाही आहेत, तर ऑस्ट्रेलियातील व मेलानीशियातील अर्धके बहिर्विवाही आहेत. आंध्रमधील चेंचू जमातीत चार सकुलक आहेत व दहा कुळी आहेत. एका अंतर्विवाही जमातीचे विभाजन पुढील तीन बहिर्विवाही गटांत होऊ शकते : कुळी, सकुलक व अर्धक.

आदिवासी नातेसंबंध : आदिवासींत नातेसंबंध महत्त्वपूर्ण असतात; कारण बहुतेक सामाजिक गट नातेसंबंधांवर आधारलेले असतात. वंशानुक्रमाने व्यक्तींचे नातेसंबंध दाखविता आल्यास त्यास सपिंड आप्त म्हणतात. वैवाहिक संबंधांमुळे नाते निर्माण झाल्यास त्यास विवाहोद्‍गत आप्त म्हणतात.

निरनिराळ्या आदिवासी जमातींमधील आप्तसंबंधीयांबाबतचे आचारविचार भिन्न असतात. काहींत ते सलगीसंबंध असतात, तर काहींत परिहार्य संबंध असतात. बऱ्याच जमातींत मामा, आते इ. आप्तसंबंध वैशिष्ट्यपूर्ण असतात. द. आफ्रिकेतील पितृवंशी थोंगा जमातीतील मामा-भाचे संबंधांची विस्तृत चर्चा रॅडक्‍लिफ-ब्राउन या मानवशास्त्रज्ञाने केली आहे. मामा जन्मभर भाच्याची नीट काळजी घेतो. भाचा आजारी असल्यास, त्याला बरा करण्यासाठी तो देवास कौल लावतो. मामाचे सलगीसंबंध पक्के असतात. मामाच्या मृत्यूनंतर त्याच्या मालमत्तेचा काही हिस्सा भाच्यास मिळू शकतो. मामीवरही त्याचा हक्क असू शकतो. पॉलिनीशियातील टिकोपिया जमातीमधील कुटुंबात आतेचे आगळे स्थान असते. विवाह होइपर्यंत भाच्याच्या संगोपनास आत्या हातभार लावते. विवाह झाल्यावर ती भावाकडे समारंभप्रसंगी येते व तेव्हा तिला मानाची वागणूक मिळते. ती पितृवंशी कुटुंबीय असल्याने तिच्याशी सलगी करण्याचा प्रयत्‍न केला जात नाही. शिवाय तिला पित्याप्रमाणेच

घराण्याच्या देवाबद्दल अभिमान असून घराण्याच्या संस्कृतीची माहिती असते. बऱ्याचदा पित्याचा मृत्यू झाल्यानंतर तिला वडीलकीचा मान व स्थान प्राप्त होते.

बहुधा आशिया, ओशिअ‍ॅनिया, उत्तर अमेरिका व आफ्रिका यांतील सर्व आदिवासी जमातींत व्यक्तीचे आपल्या पत्‍नीच्या धाकट्या आप्तांशी सलगीचे संबंध असतात व सासूसासरा आणि तिची वडील भावंडे यांच्याशी अलिप्ततेचे किंवा परिहार्य संबंध असतात.

आदिवासी जमातींमध्ये पूर्वजपूजेला फार महत्त्व असते. त्यामुळे कुळीतील हयात व्यक्ती व मृत व्यक्ती यांमधील आप्तभावना जागृत राहते.

आदिवासी स्त्री

आदिवासींतील स्त्रीच्या दर्जाबद्दल परस्परविरोधी मते मांडली जातात. आदिवासी स्त्री ही गुलाम असते, मूल्य देऊन तिला विकत घेण्यात येते व तिच्याशी पाशवी वर्तन करण्यात येते, असा एक दृष्टिकोन आहे. मातृसत्ताक आदिवासी जमाती फार कमी आहेत. ऑस्ट्रेलियातील व आफ्रिकेतील काही जमाती, भारतातील खासी जमात, उत्तर अमेरिकेतील इरोक्वाइस, ð प्यूब्‍लो, ट्लीनगिट या जमाती मातृसत्ताक आहेत. ब्रिटिश कोलंबियात वंशसत्ता मातृप्रधान दिसत असली, तरी प्रत्यक्ष व्यवहारात स्त्रीच्या भावाकडे सत्ता असते व नंतर ती भाच्याकडे जाते. खासी जमातीत मात्र मालमत्ता आईकडून मुलीकडे जाते. जोवर विवाहित मुलगी नवीन निवासस्थान निर्माण करीत नाही, तोवर तिचा भाऊ व नंतर तिचा पती मालमत्तेची व्यवस्था पाहतो. इरोक्वाइस जमातीत विवाह स्त्रियाच ठरवितात व मालमत्तेवरील हक्क त्यांच्याकडे असतो. प्यूब्‍लो जमातीत मालकी हक्क स्त्रियांकडे असतात, पण राजकीय व धार्मिक क्षेत्रांत पुरुषांचा वरचष्मा असतो. मातृनिवासी जमातींत मातृकुळीच्या लोकांचे वर्चस्व असते. त्यात पिता हाच मालमत्तेचा खरा मालक असतो. प्यूब्‍लो जमातीत स्त्री घराची मालकीण असते व ती मर्जीनुसार नवऱ्यास घराबाहेर हाकलून देऊ शकते.

आर्थिक दृष्टीने पाहता वधूमूल्य देणाऱ्या जमातींत आदिवासी स्त्रीचा दर्जा नीच मानला जात नाही, असे गृहीत धरावे लागते. शेतीप्रधान पशुपालक समाजात स्त्रीचा दर्जा खालावलेला असतो, असे रॉबर्ट लोईने म्हटले आहे. मेलानीशिया व दक्षिण अमेरिका यांतील शेती करणाऱ्या जमातींत स्त्रियांचा दर्जा खालचा आहे. वेद्दा व अंदमानी शिकारी जमातींत स्त्रियांचा दर्जा खालावलेला नाही. तोडा जमातीत स्त्रियांना चांगली वागणूक मिळते, पण आर्थिक व धार्मिक जीवनात त्यांना विशेष स्थान नाही. तथापि आदिवासी स्त्रीच्या दर्जाशी आर्थिक कारणांचा निर्णायक संबंध दाखविता येत नाही.

सर्वसाधारणतः स्त्रीस चांगली वागणूक मिळते. स्त्री जरी नेहमी कामात असली, तरी तिच्या जबाबदाऱ्या पुरुषांच्या मानाने कमी असतात. आदिवासी जमातींत स्त्रीच्या मासिक विटाळाबद्दल घृणा असते. त्यांना त्या काळात वेगळे ठेवण्यात येते व त्यामुळेच त्यांना धार्मिक जीवनात महत्त्वाचे स्थान दिले जात नाही. मात्र आदिवासी स्त्रियांना प्रगत समाजातील स्त्रियांच्या तुलनेने अधिक लैंगिक स्वातंत्र्य असते.

आदिवासी कायदा व राजकीय संघटना : आदिवासींतील सर्वांत महत्त्वाचा सामाजिक गट म्हणजे कुळी होय. कायद्याच्या बाबतीतही गुन्हा व शासन यांबाबतीत कुळीचे सभासद सार्वजनिक जबाबदारी सामुदायिक रीत्या स्वीकारतात. त्याचप्रमाणे दोन कुळींच्या सभासदांचे भांडण झाल्यास बदला घेण्याची प्रवृत्ती असते. मात्र विरुद्ध कुळीच्या एका विशिष्ट व्यक्तीवर रोख ठेवून बदला न घेता तो त्या कुळीतील कोणत्याही व्यक्तीच्या बाबतीत घेतला जातो. आदिवासी जमातींत गुन्ह्यांचे दोन प्रकार ठळकपणे दिसून येतात :

  1. चोरी, खून इ. गुन्हे
  2. अगम्यआप्तसंभोग, जादूटोणा इत्यादी. आपल्याच कुळीतील व्यक्तींच्या बाबतीत गुन्हे केल्यास शिक्षा करणे कठीण असते. दुसऱ्या प्रकारच्या गुन्ह्यांसाठी दैवी शासन मिळते, असा समज आहे. या गुन्ह्यांच्या बाबतीत जमातीची प्रतिक्रिया तीव्र असते व आरोपीला कुळीबाहेर काढण्याची सर्वात मोठी शिक्षाही करण्यात येते. आदिवासींचे जीवन सहकार्यावर आधारित असल्याने असहकार ही शिक्षा परिणामकारक ठरते. जादूटोण्याच्या बाबतीत त्याच स्वरूपाच्या प्रतिकाराची भीती असते. गुन्ह्यास शासन करण्याबाबत मुख्य दोन दृष्टिकोन असतात :
  1. सुधारवादी शासन : गुन्हेगारास सुधारण्याचा प्रयत्‍न करणे.
  2. प्रतिरोधक शासन : गुन्हेगारास कठोर शिक्षा देऊन त्याद्वारे संभाव्य गुन्हेगारांना धाक बसविणे. तिसरा शुद्धीचा म्हणजे प्रक्षालनाचा दृष्टिकोनही मांडण्यात आला आहे; व्यक्तीने गुन्हा किंवा वाईट कर्म केल्यास समाजाचा समतोल ढळतो; त्यास शिक्षा करून किंवा दंड करून समाजाचा समतोल पुन्हा प्रस्थापित करण्याचा विचार या दृष्टिकोनात अभिप्रेत आहे.

उत्तर अमेरिकेतील जूनी जमातीचा कलाकुसरयुक्त घट.

ऑस्ट्रेलियातील आदिवासींत गुन्ह्यांचा विचार करण्यासाठी पंचायतीची सभा होते. अगम्यआप्तसंभोग हा जमातीविरुद्ध घडलेला गुन्हा मानण्यात येतो. अमंगल जादूचा वापर करून खून केल्यास वा दीक्षाविधीच्या वेळी सांगितलेली गुपिते फोडल्यास शिक्षा करण्यात येते.

ग्रीनलंड बेटावरील एस्किमो लोक शिक्षा करण्याची जगावेगळी रीत अवलंबितात. ज्या माणसाने चोरी केली असेल किंवा दुसऱ्याच्या बायकोस पळवून नेले असेल, त्यास सर्व लोकांसमोर उभे करून त्याच्यावर विडंबनात्मक कविता रचण्यात येतात. एस्किमो जमातीत अन्नाचा नेहमीच तुटवडा असतो. एखाद्याने पाप केल्यास तुटवडा जास्त भासतो असा समज आहे. त्यामुळे गुन्हेगारास शिक्षा करण्यात येते. गुन्हेगाराने गुन्हा स्वतःच कबूल करावयाचा असतो. शामानच्या मदतीने गुन्हेगार शोधला गेल्यास त्यास जबर शासन करण्यात येते. प्रसंगी मृत्युदंडही देण्यात येतो. पॉलिनीशियातील सॅमोआ जमातीत पंचायतीचे सभासद गुन्हेगाराच्या घरी जाऊन त्याच्या घराची व मालमत्तेची मोडतोड करून ती नष्ट करतात. न्यूझीलंडमधील ð माओरी जमातीतही असाच प्रकार आढळतो. स्वतःच्या छातीवर व डोक्यावर रक्त येईपर्यंत दगडाचे घाव घालावयास गुन्हेगार सांगतात. तोंड सुजून त्रास व्हावा म्हणून त्यास विषारी वनस्पतीही खावयास सांगतात.

आफ्रिकेतील आदिवासी जमातींत कायदा जास्त सुसंघटित आहे. अफगाणिस्तानमधील ð काफीर जमातीत दिवाणी व फौजदारी गुन्हे असे फरक करण्यात येतात. राजकीय गुन्हे, चेटूक व खून यांसारखे फौजदारी गुन्हे जमातींच्या मुखियासमोर चालविले जातात. पुरुषाच्या खुनाबद्दल सात गुरे व स्त्रीच्या खुनाबद्दल दहा गुरे असा दंड असतो. व्यभिचार हा दिवाणी गुन्हा मानला जातो. व्यक्तीच्या सामाजिक दर्जास अनुसरून एक ते चार गुरे असा दंड करण्यात येतो. गर्भ राहिल्यास सात ते दहा गुरे दंड होतो. युगांडात खटले चालविण्याकरिता न्यायशुल्कदेखील आकारले जाते.

मध्य कोंगोतील बुशंगो जमातीचा कोरीव कप.

आदिवासींत जमातसभा व पंचायतशासनाव्यतिरिक्त इतर प्रकारची राजकीय संघटना किंवा प्रशासन काही जमातींचे अपवाद सोडल्यास जवळजवळ नसतेच; कारण सर्व समाजसंघटना नातेसंबंधांवर आधारलेली असते. ऑस्ट्रेलियन आदिवासी जमातींत पुढारीपण वृद्धांकडे असते. आदिवासी ज्ञान अलिखित असल्याने अनुभवी वृद्धांकडे पुढारीपण जाते. वृद्धांच्या सभेत चेटूकामुळे घडलेला मृत्यू, अगम्यआप्तसंभोग व समारंभांची संघटना इ. गोष्टींवर चर्चा होते. एकमताने निर्णय घेतात. एकमत नसल्यास सभा पुढे ढकलतात. पुढारीपण बहुधा आनुवंशिक असते. पुढारी उत्तम वक्ता, सगळ्यांची मने वळविणारा, शूर योद्धा व चांगला वैद्य असावा, अशी लोकांची अपेक्षा असते. आरूंटा व ऑस्ट्रेलियातील वारामुंगा जमातींत कुळींच्या प्रमुखांतून पाच व्यक्तींची निवड करण्यात येते. हे पंच अनौपचारिक रीत्या भेटतात व निर्णय देतात. पॉलिनीशियात पुढारीपण वडिलोपार्जित असते. पण एखादा पुढारी नालायक ठरल्यास त्याच्या परिवारातील दुसऱ्या व्यक्तीस पुढारीपण देण्यात येते. पुढाऱ्यास विशेष अधिकार असतात. तो नदीवरील किंवा जंगलातील वाहतूक यांवर निर्बंध घालू शकतो. त्याच्या आज्ञेचे उल्लंघन केल्यास देव रागावतात व त्यामुळे रोग होण्याचा वा मृत्यू येण्याचा संभव असतो, अशी समजूत असते. सॉलोमन बेटावर तीन प्रकारचे मुखिया असतात. जी व्यक्ती लोकांच्या उपयोगाकरिता वा मनोरंजनाकरिता एक मोठी झोपडी बांधून तीत ढोल व इतर वाद्ये ठेवू शकते, तिच्याकडे पुढारीपण येते. नंतर ते आनुवंशिक बनते. जवळजवळ शंभर लोकांना ज्या व्यक्तींचे पुढारीपण मान्य आहे, ते दुसऱ्या दर्जाचे पुढारी होतात. प्रथम दर्जाचे पुढारी प्रमुख कुटुंबांतून निवडण्यात येतात.

आफ्रिकेत मात्र मोठमोठी आदिवासी राज्ये आहेत. राजाचे नातेवाईक जिल्ह्यांवर राज्य करतात व त्यांचेच एक मंत्रिमंडळ असते. त्यांच्यात कलह निर्माण झाल्यास राजाचे वर्चस्व कमी होते. राजाच्या दरबारात भाट व विदूषकांचे बरेच महत्त्व असते. वेद्दा, मैदू, अमेरिकन इंडियन, सॅमोआ इ. जमातींत आप्तसंबंधांपेक्षा क्षेत्रीय संबंध जास्त घनिष्ट असतात. आपल्या खेड्याचे क्षेत्र वाढविण्यासाठी भांडणेही होतात.

आदिवासी कायद्याचे पालन दैवी शक्तींच्या भीतीपोटी होत असल्याने पुढाऱ्यास त्या शक्तींबद्दलचे ज्ञान आवश्यक असते. आदिवासींतील सामाजिक समारंभ धार्मिक स्वरूपाचेच असतात. त्याकरिता नातेगटांवर प्रभुत्व गाजविणारे पुढारी धर्मपारंगतही असावे लागतात. परंतु सर्वच आदिवासी जमातींमधील पुढारी धर्मपारंगत किंवा वैद्यकीय तज्ञ असतातच असे नाही.

धर्म वा जादू

आदिवासींच्या धार्मिक आचारविचारांबद्दल गेल्या दोन शतकांत विचारवंतांनी जितकी चर्चा केली, तितकी इतर कोणत्याही आदिवासी संस्थेविषयी केली नाही. ख्रिस्ती मिशनरी आदिवासींच्या धर्मकल्पना समजून घेण्यासाठी फार उत्सुक होते व आहेत; कारण त्यांना सुधारण्याचे कार्य त्यांनी पहिल्यापासून स्वीकारले आहे. अनपेक्षित संकटांतून मार्ग काढण्यासाठी अनेक विधी व समारंभ आदिवासींमधे करण्यात येतात. एस्किमो जमातीत अन्नाचा तुटवडा झाल्यास त्याचे कारण शोधून काढण्यासाठी शामान जादूप्रयोग करतो. शेतीप्रधान जमातींत शेतीच्या प्रत्येक क्रियेशी विधी व समारंभ निगडित असतात. होपी समाजात सर्पनृत्याने पिकास भरपूर पाऊस लाभतो, असा समज आहे. ट्रोब्रिआंड येथील जमातींत शेतीच्या मशागतीपूर्वी पुरोहित शेतजमिनीवर धार्मिक विधी करतो. नंतर पेरणी, कापणी इ. बाबतींतही पुरोहिताची मदत घेण्यात येते.

धर्माच्या द्वारे मानव सतत आपल्या भोवतालच्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्‍न करीत आला आहे. मानवी व्यवहारात लक्ष घालून हस्तक्षेप करणारे देव, दानव, भूतात्मे, मृतात्मे व आत्मे इत्यादींचे जग असते, असा सर्व आदिवासींचा समज आहे. त्या जगाशी संबंध ठेवणारे विशिष्ट अधिकारी असतात. त्यांस पुरोहित, जादूगार, मांत्रिक, चेटकीण, देवऋषी इ. नावे आहेत. सर्व ब्रह्मांड एक किंवा अनेक विलक्षण व अतिमानवी शक्तींनी व्यापलेले आहे, अशी बहुतेक सर्व आदिवासी जमातींची श्रद्धा असते. त्या शक्ती मानवात, निसर्गात, देवदानवांतही असतात. देवदेवतांत अशी शक्ती अधिक असते एवढेच. या शक्तीस मेलानीशियन लोकांत ‘माना’ म्हणतात व त्याच अर्थाने हा शब्द मानवशास्त्रात रूढ झाला आहे. एखादी व्यक्ती युद्धकुशल असते, कारण तिच्यात जास्त प्रमाणात मानाशक्ती असते. एखाद्याची शेती चांगली असते किंवा कोंबडी जास्त अंडी देते, तीही मानामुळेच. पॉलिनीशियातील जमातींत उच्चनीच स्तरीकरण आहे, तेही व्यक्तींत कमीअधिक प्रमाणात माना असतो म्हणूनच. देवांतही लहानमोठे भेद यामुळेच असतात. तसेच शिलाखंड, शस्त्रे, होड्या, घरे इत्यादींतही मानाचा संचार असतो. मानामुळे यश लाभते. अपयश त्याच्याच अभावामुळे येते. धर्माचरण केल्याने व वेळोवेळी धर्मविधी केल्याने माना टिकून राहतो किंवा वाढतो. त्यामुळे शस्त्र घडविताना किंवा शेती करताना धार्मिक विधी करणाऱ्या मांत्रिकाची वा पुरोहिताची गरज भासते. तसेच जास्त माना असणाऱ्या वस्तू, मानव किंवा देव यांना कमी माना असणाऱ्यांनी स्पर्श करावयाचा नसतो. जमातीचा मुखिया, त्याची शस्त्रे वगैरे त्यामुळेच निषिद्ध म्हणजे ‘ताबू’ या सदरात मोडतात. आदिवासींत धर्मकर्म सांगणारे पुढारी असतात ते यामुळेच. मानाशक्ती मूळात चांगली किंवा वाईट नसते.

व्यक्तीवरून मानाचे स्वरूप ठरते. आदिवासींत इतरही काही धर्मविषयक समज दिसून येतात. प्रत्येक जीवात आत्मा असतो व तो शरीराचा नाश झाल्यानंतरही अस्तित्वात राहतो. भूत, पिशाच्च, जिंद इत्यादींशी बरोबरी करू इच्छिणारे प्रेतात्मे किंवा भूतात्मे असतात व ते मानवी जीवनात लुडबूड करतात. साहजिकच अशा प्रेतात्म्यांबद्दल आदिवासींना भीतियुक्त आदर असतो. त्यामुळे पूजादी मार्गांनी आदिवासी त्यांची कृपादृष्टी संपादन करण्याचा यत्‍न करतात. प्रेतात्मे व तत्सम शक्ती मंगल, अमंगल वा तटस्थ असू शकतात. देवांचा दैनंदिन जीवनाशी संबंध येत नाही, असे नैऋत्य अमेरिकेतील चिरिकाहुआ अपशी जमातीत मानतात. इतर आत्म्यांना मात्र मानवी जीवनात महत्त्वाचे स्थान असते. त्यांची पूजाअर्चा करून त्यांना प्रसन्न करण्यात येते. भूतपिशाच्च जरी अमानवी असले, तरी त्यांची पूजा करीत नाहीत. त्यांच्याबद्दल आदिवासींच्या मनात भीती असते व त्यामुळे त्यांना टाळण्याचे प्रयत्‍न केले जातात. प्रत्येक प्रौढ अपशी स्त्री-पुरुषाचा एक आवडता आत्मा असतो व संकटकाळी त्यालाच आवाहन केले जाते. त्या जमातीत घुबड, सर्प व अस्वल या तीन प्राण्यांच्या आत्मांच्या शक्तीबद्दल आदरयुक्त भीती असते. या आत्म्यांपासून त्यांना शक्ती प्राप्त होते. या शक्तीमुळे त्यांना आजारातून बरे होण्यास किंवा इतर संकटांतून बाहेर पडण्यास मदत मिळते. त्याकरिता बरेच धार्मिक विधी अर्थातच करावे लागतात.

कोंगोच्या परिसरातील वांबाला जमातीचे अलंकृत काष्ठपात्र.

आदिवासी जमातींत पूर्वजपूजेसही बरेच महत्त्व असते. मृतव्यक्तींचे आत्मे आपल्या नातेसंबंधीयांचे संरक्षण करतात, अशी आदिवासींची श्रद्धा असते. आत्मे त्यांची पुजाअर्चा केल्याने संतुष्ट राहतात. मेक्सिकोच्या याकी व मेयो जमातींत मृत हे नातेवाईक कुटुंबांचे सभासद मानण्यात येतात. त्यांनी येऊन भोजन करावे, म्हणून श्राद्धाचे समारंभ केले जातात. प्रत्येक समारंभात मृतात्म्यांची प्रार्थना करण्यात येते. मृतात्मे कुटुंबात पुन्हा जन्म घेतात, असा बहुतेक आदिवासी जमातींचा समज आहे. म्हणूनच पूर्वजांची नावे परत परत ठेवण्यात येतात. न्यू मेक्सिकोच्या झूनी जमातीत मृतात्मे पर्जन्य-आत्म्यांच्या श्रेणीत जाऊन बसतात. पाऊस पडण्यास त्यांची मदत होते. हिवाळ्यात हे आत्मे मानवात मिसळतात. निरनिराळ्या समारंभांद्वारे त्यांचे मनोरंजन करण्यात येते.

पूर्व आफ्रिकेतील बूगांडा राज्यातील जमातींत तीन प्रकारच्या देवदेवता असतात : कुळीदेवता, मृत राजांचे आत्मे व सर्व जमातींच्या देवता. राजांचे आत्मे देवता बनतात; ते पुनर्जन्म घेत नाहीत, असा समज आहे. कुळीदेवता व शाही मृतात्मे पूर्वजपूजेचाच एक भाग आहे. कटोन्डा या देवाने विश्व निर्माण केले व तो निघून गेला. व्हिक्टोरिया सरोवराची मुकासा देवता त्यांना मासळी प्राप्त करून देते व वादळांवर नियंत्रण ठेवते, तसेच ती प्रजननाचीही देवता असते. जुळ्या अपत्यांविषयी बूगांडात बरेच कौतुक असते. चांगले पीक येणे व गुराढोरांची संख्या वाढणे या देवतेमुळेच शक्य होते.

उत्तर अमेरिकेतील झूनी इंडियन जमातीचे शिरोभूषण व मुखवटा

प्रत्येक आदिवासी जमातीत इतर सर्वसामान्य व्यक्तींपेक्षा दैवी शक्तींशी जास्त निकटचा संबंध ठेवणाऱ्या काही व्यक्ती असतात. या आपल्या असामान्य व्यक्तिमत्त्वामुळे किंवा प्रशिक्षणामुळे तशा शक्तींशी संपर्क ठेवू शकतात, असा समज असतो. धार्मिक कार्ये करणाऱ्या व्यक्तीस ‘शामान’ म्हणतात. शामानास निरनिराळ्या आत्म्यांचा साक्षात्कार होतो. वादळ सुरू करणे किंवा शमविणे, शिकारीचे प्राणी जवळ बोलावणे किंवा त्यास दूर पाठविणे व सर्वांत महत्त्वाचे म्हणजे रोग बरा करणे इ. कामे तो करतो. आत्मा ढळल्यामुळे रोग होतो व तो नाहीसा झाल्यास मरण येते, असा समज असून शामान आत्म्यास पूर्वस्थळी आणण्याचे कार्य करतो. यासाठी त्यास बरेच विधी करावे लागतात. शामान बहुधा खाजगी विधी पार पाडतो. सर्व जमातींचे किंवा मोठ्या समुदायाचे विधी पुरोहित करतो. पौरोहित्याचे शिक्षण घ्यावे लागते. पौरोहित्य पूर्णवेळेचा व्यवसाय असतो. ज्या जमातीची आर्थिक व्यवस्था अधिक संघटित असते, तिच्यातच असले व्यवसायीकरण शक्य असते. झुनी, पश्चिम आफ्रिकेतील ð दहोमियन इ. आदिवासी जमातींत पुरोहित वर्ग प्रामुख्याने सापडतो.

उत्तर अमेरिकेतील झूनी जमातीच्या अलौकिक शक्तीचा मूर्तिरूप आविष्कार.

एकंदरीत आदिवासी जमातींत धर्मसंस्थेच्या द्वारा मानवाचा अतिमानवी व नैसर्गिक जगांशी संबंध प्रस्थापित होतो. धर्मामुळे सामाजिक मूल्यांचे जतन होते. आदिवासी संस्कृतीत लिखित ज्ञानाचा अभाव असल्याने, धार्मिक विधी व समारंभ यांच्या द्वारा ज्ञानाचे जतन होते व ते एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होते. धार्मिक समारंभ व खेळ यांच्या द्वारे आदिवासी संस्कृतीच्या विविध अंगांचा आविष्कार होतो. शिकारी जमातींत नृत्याद्वारे प्राण्यांचे अंगविक्षेप व शिकारीचे तंत्र दाखविण्यात येते. नॅव्हाहो जमातीच्या समारंभात विश्वाच्या निर्मितीचे दर्शन घडविण्यात येते. धार्मिक समारंभामुळे समाजाची एकजूट कायम राहते. धार्मिक समारंभ हे सामाजिक समारंभही असतात. त्यांत एकमेकांना देणग्या देऊन समाजाची आर्थिक बाजूही सांभाळली जाते. आदिवासी धर्म मुख्यत्वे व्यक्तीच्या मनावरील भीतीचे व अनपेक्षित घटनांचे दडपण दूर करतो व तिला मानसिक शांती मिळवून देतो.

जादू : आदिवासींत जादूटोण्यास फार महत्त्व असते. उत्पादन वाढविण्यास, विशिष्ट व्यक्तीशी विवाह करण्यास, रोगराई दूर करण्यास किंवा सुरू करण्यास जादूटोण्याचा उपयोग करण्यात येतो. जादूटोणा किंवा करणी करण्यासाठी समाजात मांत्रिक, चेटकीण इ. व्यक्ती असतात. त्यांना वैद्यकाचेही चांगले ज्ञान असते. आदिवासींच्या धर्माचा व जादूचा निकटचा संबंध आहे. उत्पादन वाढविण्याकरिता किंवा रोग बरे करण्याकरिता करण्यात येणारे सर्व विधी व समारंभ हे मंगल जादूचेच आविष्कार होत.

आदिवासी वैद्यक : आदिवासी वैद्यकविद्येचा धर्मसंस्था व जादू यांच्याशी जवळचा संबंध असतो. दुसऱ्याने चेटूक केल्यामुळे, नियमांचे उल्लंघन केल्यामुळे, भूतात्म्याने किंवा प्रेतात्म्याने झपाटल्यामुळे किंवा आत्मा ढळल्यामुळे रोग होतो, असा आदिवासी लोकांचा समज असतो. रोग बरा करण्यासाठी मांत्रिकाची मदत घेतली जाते. छातीत दुखणे, श्वासोच्छ्‍वासास त्रास होणे व थुंकीबरोबर रक्त पडणे ही चेटूक केल्याची लक्षणे आहेत, असा आफ्रिकेतील झुलू लोकांचा समज आहे. रोगांवरील उपचारांत औषधांचा वाटा कमी असून मांत्रिकाचा वाटा मोठा असतो. आरोग्यप्राप्तीसाठी आदिवासी जमातींत देवदेवतांपुढे प्राण्यांचे बळी देण्यात येतात. रोग झाला म्हणजे आत्म्याचा शरीराशी असलेला समतोल ढळला, असे मानतात. तो समतोल पुन्हा प्रस्थापित करण्याचे कार्य मांत्रिकाचे वा देवऋषीचे असते.

आदिवासी केशभूषा : १. पापुआ व न्यू गिनीतील आदिवासींची. २. रिओ प्रौढ (द. अमेरिका) मधील प्यूम्लो जमातीच्या पुरोहिताची. ३. उत्तर अमेरिकेतील होपी जमातीची.

आदिवासी कला

धर्म व जादू यांच्याशी आदिवासींची कला निगडित आहे. ती प्राधान्याने कार्योपयोगी असते. उपयुक्त वस्तूंना कलात्मक रूप देण्याची प्रवृत्ती आदिवासींत आढळते. होडी, वाद्ये, भिंती यांवर काढलेल्या आकृत्या पुष्कळदा चेटकापासून त्या त्या वस्तूंचे संरक्षण करण्यासाठी काढलेल्या असतात; परंतु कित्येकदा त्यांमागे आदिवासींची सौंदर्यदृष्टीही संभवते. अश्मयुगीन आदिवासींनी जादूच्या निमित्ताने निर्मिलेल्या कलाकृती पश्चिम यूरोपातील गुंफांमधे सापडल्या आहेत.

पाषाणांची व शिंपल्याची आभूषणे अश्मयुगातही होती. नंतर अस्थी व कच्च्या धातूंचा वापर त्यांकरिता करण्यात येऊ लागला. मातीची किंवा लाकडी भांडी, मुखवटे, गणचिन्हे इत्यादींतून आदिवासी कलेचे दर्शन घडते. लाकडी व हस्तिदंताच्या कारागिरीत निग्रोवंशीय लोक जास्त वाकबगार समजले जातात. पश्चिम आफ्रिकेतील लाकडी मूर्ती व मुखवटे उल्लेखनीय आहेत. दक्षिण नायजेरियातील हस्तिदंती वस्तू व पितळी मूर्तिकाम प्रगत आहे. न्यू गिनीत आत्म्यांसाठी लाकडी समाधी बांधत, ती कलापूर्ण असते. माओरी जमातीत माशांच्या अस्थींवर नक्षीकाम केले जाते. एस्किमो जमातीचे मुखवटे प्रसिद्ध आहेत. प्यूब्‍लो जमातीत मातीच्या भांड्यांवर रंगीत चित्रे काढण्यात येतात. ऑस्ट्रेलियात प्राण्यांच्या केवळ बाह्यांगाचे चित्रीकरण करत नाहीत, तर त्यांच्या शरीरातील हाडे, नसा इत्यादीही दाखवितात. आदिवासी जमातींत कलांचे गटवार व्यवसायीकरण न झाल्याने अनेक व्यक्ती अनेक कलात पारंगत असू शकतात. आदिवासी कला बऱ्याच अंशी प्रतीकात्मक असते. धार्मिक प्रतीके वापरण्यात आल्यामुळे केवळ आदिवासींनाच त्यांची कला उमगू शकते. मध्य अमेरिकेतील माया जमातीची प्रतीकात्मक कलानिर्मिती प्रसिद्ध आहे. आदिवासी कलेचा उपयोग जमातीच्या मूल्यांचा व आचारविचारांचा प्रसार करण्यासाठीही करण्यात येतो. अ‍ॅमेझॉन नदीच्या खोऱ्यातील जमातींत पेरणीच्या पूर्वी बरेच धार्मिक समारंभ व नृत्ये करण्यात येतात. या समारंभांत पेरणीबाबत व पिकांची काळजी घेण्याबाबत बरीच माहिती सांगितली जाते. या दृष्टीने लोककथा व दंतकथाही सांगण्यात येतात.

काही आदिवासी वाद्यप्रकार : १. घर्षण-नगारा. २. नासिका वेणू. ३. वेणुसंघ ४. वृषण शिंग. ५. संगीतधनु.

संगीत व साहित्य

आदिवासी जमातींत गीतगायनाचे प्रसंग वारंवार येतात. अंगाईगीते, प्रीतिगीते, युद्धगीते, भजने हे प्रकार आदिवासींत आढळतात. तसेच थट्टामस्करीही गीतांतून करण्यात येते. एस्किमो जमातींत तर संगीतस्पर्धा योजून भावनांचे उन्नयन केले जाते व भांडणे मिटविली जातात. भांडणाऱ्या व्यक्ती ढोलक्याच्या साथीवर गीत म्हणून एकमेकांवर आरोपप्रत्यारोप करतात. गीताचा व साहित्याचा अर्थातच संस्कृतीशी निकटचा संबंध असतो. जमातींचा इतिहास सांगण्यासाठी व आयुष्यातील वेगवेगळ्या प्रसंगांचे वर्णन करण्यासाठी गीतरचना करण्यात येते. दंतकथांद्वारे जमातींची माहिती देण्यात येते. त्यांच्या कथांत शिकारीचे अनुभव, प्रणय व प्रणयातील खोटी भांडणे, विवाहप्रकाराचे चित्रण इत्यादींचे रसभरित वर्णन असते. सृष्टी, जमात व कुळी यांच्या उत्पत्तीसंबंधीही कथा असतात. मानव व पशू यांच्या संभोगातून कुळी निर्माण झाल्याबद्दल अनेक कथा आढळतात. गीतांचे काही प्रकार असे :

  1. सर्वसामान्य गीते
  2. प्रासंगिक गीते
  3. कुळी-गीते
  4. धार्मिक गीते
  5. स्त्रीगीते
  6. बोधगीते.

याशिवाय म्हणी, उखाणे इत्यादीही आदिवासी जमातींत आढळून येतात.

बहुतेक आदिवासी जमातींत संध्याकाळी युवक व युवती एका ठिकाणी जमून एकत्र नृत्य करतात. अशा तरुणतरुणींस आपापले जोडीदार निवडण्याची मोकळीक असल्याने प्रियाराधन करण्याकरिता गीतांचा भरपूर उपयोग करण्यात येतो. तसेच नातेसंबंध, सलगीसंबंध व परिहार्यसंबंधही गीत गाऊन दर्शविले जातात. त्यांच्यात संगीत नृत्याला फार महत्त्व असते व सर्व लोक त्यांत उत्साहाने भाग घेतात.

आदिवासींची वाद्ये त्यांच्या आसपास मिळणाऱ्या वस्तूंची बनविलेली असतात. निरनिराळ्या प्रकारचे ढोल, बासरी, टाळ, टिपऱ्या, एकतारी ही वाद्ये त्यांच्यात आढळतात. काही आदिवासी जमातींत धनुष्याकृती वीणा वाद्येही आढळतात. त्यांना एक किंवा अनेक तारा असू शकतात. या वाद्यांचे अनंत प्रकार आढळतात.

भारतातील आदिवासी

आफ्रिका खंडाच्या खालोखाल भारतात आदिवासींची संख्या जास्त आहे. १९६१च्या जनगणनेनुसार आदिवासींची संख्या २,९८,४६,३०० म्हणजे भारताच्या एकूण लोकसंख्येच्या ६·८ टक्के होती. या आदिवासींपैकी सु. निम्मे आदिवासी मध्य प्रदेश (६६ लक्ष), ओरिसा (४२ लक्ष) व बिहार (४२ लक्ष) या तीन राज्यांत आहेत. त्याशिवाय गुजरात (२७ लक्ष), राजस्थान (२३ लक्ष), आसाम (२० लक्ष), महाराष्ट्र (२४ लक्ष), पश्चिम बंगाल (२० लक्ष) व आंध्र प्रदेश (१३ लक्ष) यांतही आदिवासी मोठ्या संख्येने आहेत. नागालँड, मेघालय व अरुणाचल प्रदेश ही आदिवासी राज्ये आहेत. भारतीय संविधानानुसार आदिवासींना अनुसूचित जमाती म्हटले जाते. गोंड, संथाळ व भिल्ल या जमातींचे लोक प्रत्येकी २५ लाखांहून अधिक आहेत. गोंड आंध्र, बिहार, मध्य प्रदेश, महाराष्ट्र व ओरिसा; संथाळ बिहार, ओरिसा व पश्चिम बंगाल; तर भिल्ल आंध्र, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र व राजस्थान या राज्यांत विखुरलेले आहेत. ओराओं, नागा, खोंड, मुंडा या जमातींची संख्या ५ ते १० लाखांच्या दरम्यान आहे.

भौगोलिक दृष्ट्या भारतातील आदिवासींचे चार प्रमुख गटांत विभाजन करता येईल :

  1. उत्तर व ईशान्य विभाग : यात मुख्यतः भुटिया, थारू, लेपचा, नागा, गारो, खासी, डफला, कुकी, अबोर  मीकीर इ. जमाती येतात. यांपैकी भुटिया व थारू जमाती उत्तर प्रदेशाच्या उत्तर सीमेवरील प्रदेशात राहतात. लेपचा सिक्कीम व भारत-सिक्कीम सीमेलगत आहेत. इतर जमाती आसाम-ईशान्य सीमाप्रदेशात व कामेंग नागा पर्वतक्षेत्रात राहतात.
  2. मध्य विभाग : या प्रदेशात आदिवासींची संख्या सर्वांत जास्त आहे. बिहारमध्ये संथाळ, मुंडा, ओराओं, बिऱ्होर, ओरिसात बोंडो, खोंड, सावरा व जुआंग, मध्य प्रदेशात गोंड, बैगा, कोल, कोरकू, भूजिया इ. राजस्थानात भिल्ल व दख्खनच्या पठारावरील चेंचू, कोलाम, कोया इ. आदिवासी जमाती प्रसिद्ध आहेत.
  3. पश्चिम विभाग : या विभागात सह्याद्रीच्या परिसरात राहणाऱ्या आदिवासी जमातींचा समावेश होतो. त्यांपैकी वारली, कातकरी, महादेव-कोळी, ठाकूर व भिल्ल या प्रमुख जमाती आहेत. यांशिवाय अंध, कोलाम इ. जमाती आहेत. गुजरातमध्ये वारली, भिल्ल, दुबळा, वाघरी इ. जमाती राहतात.
  4. दक्षिण विभाग : या प्रदेशात अनेक अल्पसंख्यांक आदिवासी राहतात. त्यांपैकी तोडा, बदागा, कोरा, इरूला, कुरुंबा, एरवल्लन, अडियन, अरंडन इ. उल्लेखनीय आहेत. त्रिपुरा, मणिपूर, अंदमान व निकोबार बेटे येथेही बऱ्याच आदिवासी जमाती राहतात. एकंदर भारतात ३००च्या वर आदिवासी जमाती आहेत.

नैर्ऋत्य पॅसिफिकमधील सॉलोमन बेटावरील आदिवासी जमातीच्या नगारेवजा चर्मवाद्यावरील नक्षीकाम.

भारतातील सर्व आदिवासी जमातींचा इतर संस्कृतींशी संपर्क आल्याने त्यांच्यात काही महत्त्वपूर्ण बदल झाले आहेत. या दृष्टीने आदिवासी जमातींचे पांच भागांत वर्गीकरण करता येईल :

  1. इतर संस्कृतींशी संपर्क न आलेल्या किंबहुना अत्यंत अल्प प्रमाणात बदललेल्या जमाती.
  2. बाह्य संपर्काने प्रभावित झालेल्या, परंतु स्वतःची समाजरचना व सांस्कृतिक वैशिष्ट्ये टिकविणाऱ्या जमाती.
  3. समूहांशी मिळून-मिसळून राहणारे आदिवासी.
  4. बाह्य संपर्कामुळे ज्यांना अस्पृश्यांसारखी वागणूक मिळते, असे आदिवासी समूह.
  5. आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे व राजकीय प्रभावामुळे भारतीय समाजात स्वतःचे उच्च स्थान मिळवलेले आदिवासी.

या वर्गीकरणामुळे भारतातील आदिवासी जमातींमधील सांस्कृतिक प्रक्रिया समजण्यास, त्यांच्या आर्थिक, सामाजिक, धार्मिक स्थितींचे वास्तविक मूल्यांकन करण्यास व त्यांच्या समस्यांवर तोडगा सुचविण्यास मदत होऊ शकते. पुढील आदिवासी जमाती अत्यंत अविकसित अवस्थेत आहेत : आंध्रमधील कोया, चेंचू, येनाडी; आसाममधील मीकीर, अबोर; बिहारमधील बिऱ्होर, असुर, खाडिया, सावरा ;पहाडिया, केरळमधील कादर, इरूलर, पणियन, कट्‍टुनायकन, विशवन, मध्यप्रदेशमधील कोया, बैगा, अभुज, ð माडिया, बिऱ्होर, सेहरिया; तमिळनाडूमधील कादर, इरूलर, पणियन, मलयाली, महाराष्ट्रामधील कातकरी, गोंड; कर्नाटकमधील कुरुंबा, जेनू-कुरुबा, कोरगा, इरूलर; ओरिसातील बिऱ्होर, बोंडो, जुआंग, सावरा, कोया, सावरा पहाडिया, राभा व लेपचा आणि अंदमान निकोबार बेटांवरील ओंगी, सेंटिनीली आणि शाँपेन.

भाषिक व वांशिक वर्गीकरण

भारतातील आदिवासींच्या भाषा प्रामुख्याने द्राविडी व ऑस्ट्रो-आशियाई भाषासमूहांतील आहेत. तसेच हिमालयाच्या दक्षिण प्रदेशातील काही आदिवासी भाषा सिनो-तिबेटन भाषासमूहातील आढळतात. तथापि आधुनिक भारतीय भाषांच्या संपर्काने आदिवासींच्या भाषांवर बराच परिणाम झाला आहे. खासी व संथाळी भाषांस कलकत्ता विद्यापीठाने दुय्यम भाषा म्हणून मान्यता दिली आहे. मुंडारी जमातीची बोली तर आता लोप पावू लागली आहे. नागा जमाती एकमेकांच्या बोली समजू शकत नाहीत. त्यांपैकी काही बोलींची अलीकडे ख्रिस्ती मिशनऱ्यांनी लिपी बनविली आहे. मणिपुरी आदिवासींनी बंगाली लेखनपद्धती स्वीकारली आहे. भारतीय आदिवासी द्राविड व मंगोल वंशगटांत येतात. जोसेफ हेडनच्या मते प्राक्-द्राविड काळातील आदिवासी हे भारताचे मूळ रहिवासी. हॅमनडॉर्फच्या मते ज्या काळात आर्य भारतात आले, त्याच सुमारास द्रविड लोक पश्चिम किनाऱ्यावर समुद्रमार्गे आले. हा काळ ख्रि. पू. सरासरी २००० ते १००० हा होय. वायव्य व दक्षिण प्रदेशांतून आर्यांनी व द्रविड लोकांनी हुसकलेले लोक मध्य क्षेत्रातील डोंगरात व जंगलात गेले; ते आजचे आदिवासी होत असा विचार मांडण्यात आला आहे. अलीकडे बी. एस्. गुहा व जे. एच्. हटन यांनी वांशिक वर्गीकरणाबाबत आपले विचार मांडले आहेत. आजचे आदिवासी नेग्रिटो, प्रोटो-ऑस्ट्रेलॉइड किंवा मंगोलवंशी असावेत. त्यांपैकी नेग्रिटो सर्वात प्राचीन आहेत. केरळमधील कादर आदिवासी नेग्रिटो वंशीय आहेत. मध्य क्षेत्रातील आदिवासी प्रोटो-ऑस्ट्रेलॉइड वंशीय व ईशान्येकडील मंगोलवंशीय आहेत, असा सिद्धांत आहे. बी. एस्. गुहांच्या मते भारतीय आदिवासींचे चार प्रकार करता येतात :

  1. कादर, इरूला व पणियन हे दाक्षिणात्य आदिवासी. त्यांच्या केसावरून त्यांच्यावरील निग्रो वंशाचा प्रभाव दिसतो.
  2. मध्य क्षेत्रातील आदिवासी प्रोटो-ऑस्ट्रेलॉइड आहेत.
  3. ईशान्येकडील पृथुकपाली मंगोलवंशी.
  4. ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यातील मध्यम बांधा व मध्यम नाक असणारे आदिवासी मंगोलवंशी असावेत.

जरी काही भारतीय जमातींत निग्रोवंशीय विशेष आढळतात, तरी त्यावरून निग्रोवंशीय जमाती भारतात आल्या होत्या किंवा काय यासंबंधी मानवशास्त्रज्ञांत एकमत नाही. एकंदरीत भारताचे मूळ निवासी कोण, याबाबत निर्णायकपणे काहीच सांगता येत नाही. शिवाय वांशिक मिश्रणामुळे आदिवासींचे निर्विवाद वर्गीकरण करता येत नाही.

आर्थिक संघटना : भारतातील आदिवासींच्या आर्थिक अवस्था तीन प्रकारच्या आहेत :

  1. अन्नसंकलनावस्था
  2. अस्थिर किंवा स्थलांतरित प्राथमिक कृषि-अवस्था
  3. स्थिर प्राथमिक कृषि-अवस्था.

यांशिवाय तीन इतर प्रकार संभवतात :

  1. पशुपालन करणारे
  2. विशिष्ट उद्योगांद्वारा उपजीविका करणारे
  3. गुन्हेगारीवर उपजीविका करणारे. या तीन प्रकारांतील आदिवासींची संख्या कमी आहे. वर सांगितलेल्या कोणत्याही अवस्थेतील लोक केवळ एकाच प्रकारचे जीवन व्यतीत करू शकत नाहीत. पूर्णपणे स्वावलंबी अर्थव्यवस्था कोणत्याही गटातील आदिवासींची नाही. खाद्यसंकलन करणारे आदिवासी वनात राहतात. यात बिहारमधील बिऱ्होर व खाडिया; आसाम व ईशान्येकडील कुकी, कोन्याक नागा; बस्तरचे डोंगरी माडिया, गोंड; ओरिसाचे जुआंग; आंध्रमधील चेंचू; केरळमधील कादर इ. जमातींचा समावेश होतो. आदिवासींत शिकार व्यक्तिगत किंवा सामूहिक रीतीने करण्यात येते. जंगलातील मध, डिंक इ. गोळा करून ते कंत्राटदाराला विकतात. अस्थिर किंवा स्थलांतरित शेती करणाऱ्या जमातींत मध्य प्रदेशातील कमार व बैगा, आंध्रमधील कोंडा रेड्‍डी, महाराष्ट्राच्या चंद्रपूर जिल्ह्यातील डोंगरी माडिया व आसाममधील नागा यांचा समावेश होतो.

आदिवासींत शेतीस वेगवेगळ्या ठिकाणी झूम, पोडू, बेवार, दाही अशी विविध नावे आढळतात. त्यांपैकी झूम ही संज्ञा भारतीय मानवशास्त्रीय साहित्यात सर्वमान्य झाली आहे. या पद्धतीमुळे जंगलांचा नाश होतो. झूम शेतीस सरकारी जंगलखात्याचा विरोध असल्याने सामान्य शेती करावयास आदिवासी शिकत आहेत. ईशान्येकडील नागा व इतर आदिवासी सोपानशेती करतात व तिच्यासाठी पाटबंधाऱ्यांचाही उपयोग करण्यात येतो. तसेच खासी, गोंड, ओराओं, भिल्ल, मुंडा, संथाळ इ. जमातीही स्थिर शेती करतात.

निलगिरीतील तोडा जमात पशुपालनावर उपजीविका करते. त्यांचा भर म्हशी पाळण्यावर असतो. दूध व दुधाच्या पदार्थांचा ते बदागा जमातीशी विनिमय करतात. कोटा जमातीचे लोक त्यांना भांडी पुरवतात. बिहारमधील असुर व मध्य प्रदेशातील आगरिया जमाती लोहारकाम करणाऱ्या आहेत. बस्तरचे आदिवासी लोक मासेमारी करतात. भटक्या जमातींत , गाडिया लोहार, कंजर, फासेपारधी, कैकाडी इ. अनेक जमाती समाविष्ट आहेत. त्यांच्यापैकी बऱ्याच जमाती वराहपालन, दोर वळणे, माकड-अस्वलांचे खेळ इ. व्यवसाय करतात. याशिवाय मोघीया, बैरागी, संसी, लमाणी, भामटे, बेरड, मांगगारूडी, बंजारा, लोधा इ. जमातींना गुन्हेगार जमाती म्हणत. अलीकडे त्यांना विमुक्त जाती म्हणून संबोधण्यात येते.

औद्योगिकीकरणामुळे बिहार, प. बंगाल व आसामातील कारखान्यांत आदिवासी अलीकडे काम करू लागले आहेत. आसामातील चहाच्या मळ्यांत, जमशेटपूरच्या पोलाद कारखान्यांत, बिहार व मध्य प्रदेश यांतील खाणींत संथाळ, हो, गोंड, भुईया, मुंडा इ. जमातींचे लोक रोजगारी करतात. या आदिवासींच्या प्रदेशात खाणींचा शोध लागल्याने तेथे मोठ्या उद्योगांचा झपाट्याने विकास होत आहे. हा विकास पचनी पाडण्याच्या दृष्टीने आदिवासी जमाती अपरिपक्व आहेत.

भारतीय आदिवासींत आठवड्याचे बाजार भरतात. त्या ठिकाणी रोख पैसे देऊन किंवा वस्तूंचा विनिमय करून व्यवहार चालतात. कंत्राटदारीची पद्धत वाढल्यामुळे आदिवासींची फार मोठ्या प्रमाणावर आर्थिक पिळवणूक होत आहे.

सामाजिक संघटना

भारतातील आदिवासींच्या जमातींत कुटुंब हाच प्राथमिक गट आहे. पितृसत्ताक कुटुंबपद्धती अधिक जमातींत आढळते. परंतु मातृसत्ताक कुटुंबाचीही काही उदाहरणे आहेत. आसाममधील खासी, गारोइ. जमातींमधील मातृसत्ताक कुटुंबपद्धती प्रसिद्ध आहे. काही पितृवंशीय जमातींत मातृनिवास अपवाद म्हणून आढळतो. डेहराडून जिल्ह्यातील खस जमातीत बहुपतिकत्व आढळते. सर्व भाऊ आपल्या एक किंवा अनेक बायकांसह एकाच कुटुंबात राहतात. पहिले मूल मोठ्या भावाचे मानले जाते व नंतरची मुले क्रमशः इतर भावांची मानली जातात. ओरिसातील खाडियांत एकविवाही पितृसत्ताक कुटुंब असते. शेतीकामात स्त्रियांना मज्जाव असतो व धर्मसमारंभात भाग घेण्यास त्यांस मनाई असते. एकंदरीत आदिवासी जमातींत कुटुंबाचा एकच एक विशिष्ट प्रकार आढळत नाही. नागा जमाती एकविवाही अथवा बहुपत्‍नीविवाही असतात, परंतु पितृसत्ताक असतात. त्यांच्या शेजारीच मातृसत्ताक कुटुंब असलेल्या खासी जमातीचे वास्तव्य आहे. तोडा, खासी व कादर या जमाती मातृपितृसत्ताक आहेत. मध्य भारतातील जमाती बहुतेक पितृसत्ताक आहेत.

बऱ्याच जमाती स्वतंत्र उपजमातींत विभागलेल्या आढळतात. या उपजमाती अंतर्विवाही बनल्या आहेत. गोंड जमातीत अनेक उपजमाती निर्माण झाल्या आहेत. त्यांत सांस्कृतिक भिन्नताही आढळते. मध्य प्रदेशचे गोंड, बस्तरचे मुडिया व माडिया, आंध्र प्रदेशातील राजगोंड व कोया ह्या मूळच्या उपजमाती आता स्वतंत्र झाल्या आहेत. त्यांच्यात परस्परांत विवाह होत नाही. नागा जमातीचेही असेच आहे. तोडा जमात तार्थारोल व ताइव्हलिओल अशा दोन अंतर्विवाही अर्धकांत विभागलेली आहे. ð अंगामी नागातील अर्धके पूर्वी बहिर्विवाही होती, आता ती अंतर्विवाही आहेत. तसेच ओरिसातील बोंडो जमातीतील ओंतल व किल्लो ही अर्धके अंतर्विवाही आहेत. राजगोंडी जमातीत चार सकुलक आहेत व ते बावीस कुळींचे बनलेले आहेत. कुळी व सकुलक दोन्ही बहिर्विवाही आहेत. अंदमान बेटावरील आदिवासी तसेच कादर ही जमात सोडल्यास भारतातील इतर सर्व आदिवासी जमातींत कुळी आहेत. संथाळ जमातीत शंभरावर कुळी आहेत. हो जमातीत ५०, तर मुंडा जमातीत ६४ कुळी आहेत. बऱ्याच जमातींत कुळींची स्वतंत्र गणचिन्हे असतात. गणचिन्ह असलेल्या प्राण्यास न मारणे, तो मेल्यास शोक करणे व कोणत्यातरी स्वरूपात त्याचे चित्र धारण करणे या प्रथा गणचिन्हाशी निगडित असतात. ओरिसातील जुआंग व कोंड जमातींत एका गावातील मुलामुलींचे विवाह त्याच गावात होत नाहीत.

कुटुंब, कुळी, सकुलक, अर्धक व गाव यांव्यतिरिक्त सामाजिक संघटनेचा महत्त्वाचा घटक नातेसंबंध. अधिकांश आदिवासी जमातींत वर्गात्मक नातेसंबंध आहेत. दर्शक अथवा वर्णनात्मक संबंध कमी आहेत. तोडा जमातीत ‘पिता’ या आप्तसंज्ञेत पित्याचे भाऊ, कुळीतील पित्याच्या वयाचे सर्व पुरुष व मावशीचे पती यांचाही समावेश होतो. सेमा नागांत ‘आज’ ही संज्ञा माता, काकू व मावशीस लागू पडते. माता व काकूकरिता असलेली एकच संज्ञा देवरविवाह सुचविते, तर माता व मावशीकरिता वापरण्यात येणारी एकच संज्ञा मेहुणीविवाहाची प्रथा सूचित करते. पिता, काका व मावशीचा नवरा भाऊभाऊ असावेत हे दिसते. आत्या व मावशीकरिता एक संज्ञा आते-मामे भावंडांतील विवाहाची द्योतक आहे. कुकी कुळीत पित्याचा पिता, मातेचा पिता, मामा, पत्‍नीचा पिता, मामेभाऊ, पत्‍नीचा भाऊ व पत्‍नीच्या भावाचा मुलगा यांस ‘हेपू’ म्हणतात; म्हणजे वेगवेगळ्या पिढीच्या लोकांना एकच संज्ञा वापरली जाते. अंगामी नागांत थोरला भाऊ, बायकोची थोरली बहीण, नवऱ्याचा मोठा भाऊ, थोरल्या बहिणीचा नवरा, थोरल्या भावाची बायको, मामी व काकू या सर्वांस ‘शि’ संज्ञा वापरतात. यांत लिंगभेद पाळण्यात आलेला नाही. ओराओं जमातीत आत्या, मामा, मावशी व सासू यांस ‘ताची’ म्हणतात. यावरून आते-मामे भावंडातील विवाह व मेहुणीविवाह सूचित होतात. अशा प्रकारे आप्तसंज्ञांवरून सामाजिक चालीरीतींचे दर्शन घडते.

बहुतेक सर्व भारतीय आदिवासी जमातींत पुरुष आपल्या धाकट्या भावजयींशी व थोरल्या मेहुणींशी परिहार्यसंबंध पाळतात. एकमेकांशी बोलणे, स्पर्श करणे, एकांतात बसणे निषिद्ध समजले जाते. याउलट पुरुष भावजयीशी वा धाकट्या मेहुणीशी सलगीसंबंध ठेवू शकतो.

जीवनचक्रातील जन्म, विवाह व मृत्यू या तीन महत्त्वाच्या अवस्थांशी आदिवासींचे रीतिरिवाज निगडित झालेले आहेत. यांशिवाय नामकरण, दीक्षाविधी, रजोदर्शनविधी इ. संस्कारही महत्त्वपूर्ण असतात. पूर्वजआत्म्यास त्याच कुटुंबात पुनर्जन्म घेण्याची इच्छा असल्यास व देवाने तसा आदेश दिल्यास गर्भाधान होते, असा कमार जमातीत समज आहे. बोंडो जमातीत मुलगा झाल्यास पतिपत्‍नीला दोन महिने व मुलगी झाल्यास तीन महिने एकमेकांपासून वेगळे करण्यात येते.

भारतीय आदिवासींत जोडीदार मिळविण्याचे बरेच प्रकार आहेत. कुकी जमातीत मुलगा मुलीकडे जाऊन राहतो. त्यांचे एकमेकांशी पटल्यास विवाह होतो. विवाह न झाल्यास मुलगा मुलीच्या पित्यास भरपाई देतो. बळजबरीचे विवाह कमी झाले आहेत, तथापि नागा, गोंड, भिल्ल, हो इ. जमातींत अजून हा प्रकार आढळतो. वधूमूल्य देता न आल्यास मुलगा मुलीकडे जाऊन शेतावर काम करतो व त्याच्या मजुरीच्या रूपाने वधूमूल्य दिले जाते. गोंड, बिऱ्होर व बैगा जमातींत अशा प्रकारचे सेवाविवाह आढळतात. तसेच दोन कुटुंबांनी आपल्या मुलींची परस्परांत अदलाबदल केल्यास वधूमूल्याचे प्रश्न उद्‍भवत नाहीत. बहुतेक सर्व जमातींत हा प्रकार आढळतो. तसेच मुलामुलींचा विवाह कुटुंबियांना अमान्य असल्यास दोघेही पळून जाऊन विवाहबद्ध होतात. यास सहपलायनाविवाह म्हणतात. भिल्ल जमातीत होळीच्या अथवा दिवाळीच्या प्रसंगी गर्दीचा फायदा घेऊन असे पलायनाचे प्रकार घडतात. हो व बिऱ्होर जमातींमधील मुलगी ज्या मुलाशी लग्‍न करावयाचे असते, त्याची संमती नसतानाही त्याच्या घरात घुसते. मारहाण केली किंवा मानहानी केली, तरी ती जात नाही व तिच्याशी विवाह केल्याशिवाय गत्यंतरच राहात नाही. यास पैठू विवाह किंवा अनादरविवाह म्हणतात.

आदिवासींत बालविवाह क्वचितच आढळतात, मात्र विधवाविवाह सर्वमान्य आहे. खाडिया जमातीत विधवेच्या पुनर्विवाहात वधूमूल्य द्यावे लागत नाही. हो जमातीत वयाच्या अठराव्या वर्षापूर्वी मुलीचा व वयाच्या चोविसाव्या वर्षापूर्वी मुलाचा विवाह होत नाही. मुलगी अविवाहित राहिल्यास ती चेटकीण होण्याचा संभव असतो. देवरविवाह व मेहुणीविवाह बहुधा सर्व जमातींत मान्य असतो.

खाडिया, ओराओं व गोंड जमातींत आते-मामे भावंड विवाहास अग्रक्रम देण्यात येतो. गोंड जमातीत तसा विवाह न केल्यास दंड भरावा लागतो. खासी, संथाळ व कादर या एकविवाही जमाती आहेत. वधूमूल्याची रक्कम मोठी असते, त्यामुळे हो जमातीत बहुपत्‍नीविवाह अशक्य आहे. मात्र तो भिल्ल, गोंड, बैगा इ. जमातींत रूढ आहे. भ्रातृक बहुपतिविवाह तोडा व खस जमातींत आढळतात.

बहुतेक सर्व जमातींत विवाहपूर्व लैंगिक संबंधांकडे दुर्लक्ष केले जाते. गर्भाधान झाल्यास संबंधित व्यक्तींना विवाह करावा लागतो. वधूमूल्य देण्यात येत नाही किंवा अल्पसे देण्यात येते. गोंड जमातीत अविवाहित मुले व मुली एकाच युवागृहात झोपतात. विवाहबाह्य संबंधांतून खुनाचे प्रकार उद्‍भवतात. माडिया व भिल्ल जमातींत व्यभिचारामुळे खून पडतात. बहुपतिक खस जमातीत पत्‍नीला विवाहबाह्य संबंध ठेवता येत नाहीत; परंतु माहेरी गेल्यावर मुलगी या नात्याने तिच्यावर बंधने नसतात.

आदिवासींत घटस्फोट मान्य आहे. खासी जमातीत व्यभिचार, वंध्यता व बेबनाव या कारणांकरिता घटस्फोट मिळतो. घटस्फोट सार्वजनिक विधी असतो. ईशान्य भारतातील लुशाई जमातीत नवऱ्याने बायकोस टाकल्यास तो भरपाई देतो. स्त्री व्यभिचारी असल्यास तिला वधूमूल्याची रक्कम नवऱ्यास परत करावी लागते. गोंड, मुडिया व खाडिया जमातींतही वरील कारणांनी घटस्फोट मिळतो. भरपाईची रक्कम पंचायत ठरविते. आदिवासी जमातींत मृत्यू हा जीवनाचा शेवट मानीत नाहीत. मृत्यू हा एक अपघात असतो : देवाचा कोप, मृतात्मे, जीवात्मे व भूतात्म्यांचा रोष, चेटूक इत्यादींमुळे मृत्यू येतो, अशी आदिवासींची समजूत असते. शवाचे दहन अथवा दफन करण्यात येते. मृत व्यक्ती वृद्ध असल्यास शवाचे बहुधा दहन करतात. मयताच्या वस्तूंवर चेटूक करणे शक्य असते म्हणून त्या त्याज्य असतात. दफनाच्या जागी लाकडावर किंवा दगडावर कोरलेले स्मारक उभे करण्यात येते.काही काळ गेल्यावर मृतात्म्यास परत आवाहन करण्यात येते व त्यास सर्वांचे रक्षण करण्याची विनंती केली जाते. शुद्धिस्‍नान व शुद्धिभोजन करण्यात येते.

भारतातील बऱ्याच जमातींत युवागृहे आढळतात. मुंडा, हो, ओराओं, खाडिया, गोंड, भूईया व नागा जमातींत ही संस्था

महत्त्वपूर्ण आहे. युवागृहांना त्या त्या जमातीत निरनिराळ्या संज्ञा असतात. स्त्रियांच्या व पुरुषांच्या युवागृहांना काहींच्यामध्ये भिन्न भिन्न संज्ञाही असतात. दक्षिणेत मुथुवन, मन्नन व  पल्लियन जमातींत युवागृहे आढळतात. युवागृहे गावाच्या एका टोकास असतात. युवागृहांत आदिवासी संस्कृतीचे शिक्षण दिले जाते. मुडियांच्या गोटुलमधील लैंगिक जीवनाचे व्हेरिअर एल्विनने यथातथ्य वर्णन केले आहे. युवागृहातील वातावरण अत्यंत उत्साहवर्धक असते. युवकांचे ते स्वतंत्र राज्यच असते. युवागृहातील घटनांबाबत गुप्तता पाळण्यात येते. युवागृहे केवळ मनोरंजनाची स्थाने नसून, आदिवासी संस्कृतीचे शिक्षण देणाऱ्या संस्थाच होत. तेथे नेतृत्वाचे तसेच धर्म व जादूटोण्याचेही शिक्षण देण्यात येते. अलीकडे त्यांचा अतिथिगृह म्हणूनही उपयोग करण्यात येतो.

आदिवासी स्त्री

मातृसत्ताक कुटुंबांत स्त्रीचा दर्जा उच्च असणे स्वाभाविकच आहे. हॉबहाउसच्या मते पशुपालन करणाऱ्या ८७ टक्के जमातींत व शेतीव्यवसाय करणाऱ्या ७३ टक्के जमातींत स्त्रीचा दर्जा निकृष्ट असतो. शेती व पशुपालन ही प्रामुख्याने पुरुषांची कामे आहेत, असे या संदर्भात कारण देण्यात येते. अन्नसंकलन करणाऱ्या कादर, मलपंतरम, पल्लियन, इरूला, पणियन, चेंचू व अंदमान-पिग्मी जमातींत वारसाहक्काचे काहीही नियम नसल्याने स्त्रीपुरुषांना समान दर्जा असतो. विवाहोत्तर निवासाचा स्त्रियांच्या दर्जावर फार परिणाम होतो. पितृनिवासी जमातींत पुरुषांस जास्त अधिकार असतात. स्त्रीवर अनेक प्रकारचे निर्बंध घालण्यात येतात. त्यांपैकी काही संरक्षणात्मक, काही निषेधक व इतर संवर्धक असतात. तोडा स्त्रियांवरील धर्मविषयक निर्बंध निषेधक असतात. बाळंतपण, रजोदर्शन यांसारख्या अशुद्ध अवस्थांचा दूध-उत्पादनावर विपरित परिणाम होऊ नये, म्हणून निषेधनियम केलेले असतात. गोंड स्त्रीस विवाहपूर्व लैंगिक स्वातंत्र्य, आपला जोडीदार निवडण्याचा हक्क व घटस्फोटाचा अधिकार असतो. थारू जमातीत पुरुषांवर स्त्रियांचा वचक असतो, कारण स्त्रियांना चेटूकाचे ज्ञान असते असा समज आहे. खस स्त्रीस माहेरी पूर्ण स्वातंत्र्य असते.

धर्म

भारतातील आदिवासींच्या धर्मकल्पनांत जडप्राणवाद, मानावाद, पूर्वजपूजा, मृतात्मे, जीवात्मे, प्रेतात्मे अथवा भूतात्मे इत्यादींचा अंतर्भाव होतो. डोंगर, झाडे, नद्या यांत जीवात्मे वास करतात अशी कमारांची श्रद्धा आहे. त्यांना वेळोवेळी बळी देण्यात येतात. पीकपाणी, गुरेढोरे यांचे पालन करणारे जीवात्मे असतात, अशी काही जमातींत समजूत आहे. मुंडा, हो व छोटा नागपुर भागातील इतर जमाती अतिमानवी माना शक्तीस 'बोंगा' म्हणतात. अंमगल शक्तींना आदिवासी फार घाबरतात व त्यामुळे त्यांची जास्त उपासना करण्यात येते. व्यक्तीचे बाह्य व आंतरिक असे दोन आत्मे असतात, यांवर बऱ्याच जमातींचा विश्वास असतो. स्वप्‍नात आत्मा कधी कधी शरीराबाहेर जातो व नंतर त्यात परत येतो, मृत्यू अस्थायी असतो, अशा श्रद्धेतून तोडा व हो जमातींत अंत्यविधी दोनदा करतात. मृत्यू झाल्याबरोबर कच्चा अंत्यविधी करतात व नंतर दफनसमयी पक्का अंत्यविधी करतात. कमार जमातीत महादेव हा सर्वात प्रमुख देव आहे. आकाश आणि पृथ्वी मानवी व्यवहारात हस्तक्षेप करत नसल्यामुळे त्यांची विशेष पूजाअर्चा करण्यात येत नाही.

सपाट प्रदेशात राहणाऱ्या आदिवासींच्या धर्मकल्पनांवर हिंदुधर्माचा प्रभाव आहे. त्यांच्या स्थानिक देवांशिवाय हिंदूंचे राम, कृष्ण, हनुमान, गणपती व महादेव हे देव त्यांनी स्वीकारले आहेत.

भारतातील सर्व आदिवासी जमातींचा जादूटोण्यावर विश्वास आहे. फलप्राप्तीकरिता विविध मंत्र वा मंतरलेल्या वस्तू वापरतात. जडीबुटी, देवतांनी स्पर्श केलेल्या वस्तू, विशिष्ट ठिकाणची माती व पाणी, विशिष्ट पक्ष्याचे पंख इत्यादींना फार महत्त्व असते. प्रत्येक जमातीत जादुटोणा करणाऱ्या विशिष्ट व्यक्ती असतात. त्यांना बैगा, भगत, गुनी अशी जमातीपरत्वे वेगवेगळी नावे आहेत. हेच मांत्रिक रोगाचे निदान करतात व मंत्रसामर्थ्याने आणि जडीबुटी देऊन रोग बरे करतात. बऱ्याच जमातींत कौल लावण्याकरिता सुपात धान्य घेऊन मंत्र म्हणतात व त्यांचे छोटे छोटे ढीग रचून त्यांतील दाणे मोजण्यात येतात; त्यांतील सम अथवा विषम संख्यांच्या आधारे निष्कर्ष काढले जातात. बाधेचे निराकरण करण्यास बहुधा कोंबड्यांचा बळी देण्यात येतो. वाघापासून जास्त त्रास झाल्यास मंतरलेले दगड वेशीजवळ टांगण्यात येतात. गावात रोग फैलावल्यास मंत्रसामर्थ्याने त्या रोगास वाजतगाजत गावाच्या बाहेर हाकलण्यात येते.

कला

भारतातील आदिवासींची कला बहुरंगी आहे. घरावरील नक्षाकाम, स्मशानातील कोरीव खांब, समारंभप्रसंगीचे पोषाख, आभूषणे, मुखवटे, देवदेवतांच्या आकृत्या इ. प्रकारांत आदिवासींची कलादृष्टी दिसून येते. नागा जमातीचे पोषाख, मिझोंच्या टोप्या, टोपल्या, वाद्ये, मासे पकडण्याची जाळी इत्यादींतील रंगसंगती, तसेच कोरीवकाम व नक्षीकाम कलात्मक असते. साजशृंगाराची आदिवासींना आवड असते. अंगावर गोंदवून घेणे, समारंभप्रसंगी शरीरास रंग लावणे, केशभूषा करणे, गळ्यात रंगीबेरंगी माळा घालणे हे प्रकार सर्व जमातींत आढळतात. कपड्यांचा वापर फारच अल्प करण्यात येतो. माळा चकचकीत दगडांच्याही बनविण्यात येतात. नागालँड व मणिपुरमध्ये कपडे जमातीतच विणतात. बोंडो जमातीत झाडाच्या सालीपासून कपडे तयार करतात. गदाबा लोक वाघाच्या कातडीसारखे पट्‍ट्यापट्‍ट्यांचे कपडे विणतात. कोंड जमातीत केळीची पाने कमरेभोवती गुंडाळतात.

आदिवासींच्या दागिन्यांत कवड्यांचा सर्वांत जास्त उपयोग करण्यात येतो. आदिवासी स्त्रिया वेणीवर कवड्यांचा गजरा घालतात, जाकिटासाठी व पिशव्यांसाठी कवड्यांचा वापर करतात. कवड्यांबद्दल बरीच मते आहेत. काहींच्या मते कवडी ही मानवी डोळ्याचे प्रतीक आहे. काहींना ती स्त्रीच्या योनीचे प्रतीक वाटते, तर काही तिला केवल अलंकार मानतात. कवडी वापरल्याने दृष्ट लागत नाही, असा लमाणी, मुडिया, माडिया व जुआंग या जमातींचा समज आहे. बोंडो, गोंड व ð परधान जमातींमधील स्त्रियांही कवड्यांचा वापर दागिन्यांकरिता करतात.

फणीचा वापर प्राचीन काळापासून करण्यात आला आहे. मुडिया जमातीत तिचा जास्त वापर केला जातो. युवागृहात एकमेकींची वेणी घालण्यास किंवा अंग खाजविण्यास फणी वापरतात. तरुण

मुले आपल्या प्रेयसींना फणी भेट देतात. स्त्रिया अशा फण्या सतत केसांत खोचून ठेवतात. घरांच्या दारांवरही फण्यांच्या आकृत्या कोरण्यात येतात.

माडिया जमातीत समारंभप्रसंगी बांबूच्या टोपीवर वनगाईचे शिंग व मोराचे पीस लावतात. कोंड जमातीत कधी कधी पितळेची शिंगेही वापरतात. सावरा जमातीत बांबुच्या टोपीस रंगीत कागद लावतात. बऱ्याच जमातींचे लोक निरनिराळ्या पक्ष्यांची पिसे डोक्यावर खोचतात.

माडिया, मुडिया व कोंड जमातींचे लोक तंबाखू ठेवण्यासाठी कलाकुसर केलेल्या डब्या व बटवे वापरतात, बांबू कोरून, चाक, कासव, आंबा, मासे इत्यादींच्या आकारांच्या तंबाखूच्या डब्या ते तयार करतात.

विवाहसमयी दीपस्तंभ बनविण्याची पद्धत आहे. दिव्यास प्रेमाचे प्रतीक मानतात. त्याबद्दलचे उखाणे बैगा जमातीत गाईले जातात. प्रत्येक घरात देवळी असतेच.

माडिया, मुडिया, भिल्ल, कोरकू, गोंड इ. जमातींमध्ये मृताच्या स्मरणार्थ दगडाचे व लाकडाचे कोरीव खांब उभारतात. दरवाज्यांवर व भिंतींवर प्राण्यांची चित्रे कोरतात. तसेच गणचिन्हदर्शक खेळणी बनविण्यात येतात. नृत्यप्रसंगी व इतर धार्मिक व सामाजिक समारंभांत मुखवटे वापरण्यात येतात. त्यांना भडक रंग देतात. मुखवटे लावून आदिवासी नकला करतात. त्यांच्या रोजच्या जीवनातील प्रसंग युवागृहांच्या वा घरांच्या दारांवर कोरण्यात येतात. त्यांत शिकारीचे प्रसंग जास्त असतात. तसेच घरातील भिंतींवर देवाधर्माची चित्रेही रंगविण्यात येतात. सामग्री स्थानिक असते, हे आदिवासी कलेचे वैशिष्ट्य होय. (चित्रपत्रे ३, ४, ५, ६, ७).

महाराष्ट्रातील आदिवासी : १९७१ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात ५,०४,१२,२३५ लोकांपैकी २९,५४,२४९ म्हणजेच एकंदर लोकसंख्येच्या ५·८६ टक्के आदिवासी आहेत. ते १९६१ मध्ये

भारतातील आदिवासी लोकसंख्येच्या ७·९६ टक्के होते. धूळे – ६,१५,८०१; ठाणे –- ५,७९,५३८; नासिक – ५,६१,२०२; चंद्रपूर – २,३१,४०२; यवतमाळ – १,९७,९७७; अहमदनगर – १,४५,७१३; जळगाव – १,२५,०२६; पुणे – १,०८,४०५ अशी काही जिल्हावार विभागणी आहे. याशिवाय इतरत्रही त्यांची तुरळक वस्ती आहे. ठाणे जिल्ह्यातील तलासरी व मोखाडा, नासिक जिल्ह्यातील सुरगाणा व धुळे जिल्ह्यातील अक्राणी या तालुक्यांत आदिवासींचे प्रमाण जास्त आहे. महाराष्ट्रातील ४० आदिवासी जमातींना अनुसूचित जमाती म्हणून सरकारने मान्यता दिली आहे. त्यांपैकी भिल्ल – ५,७५,००० (२४ टक्के); महादेव कोळी – २,७४,००० (११ टक्के); गोंड – २,७२,००० (११ टक्के); वारली २,४३,००० (१० टक्के); कोकणा – २,१२,००० (९ टक्के); ठाकूर – १,५९,००० (७ टक्के) व काथोडी किंवा कातकरी १,४०,००० (६ टक्के) या १९६१च्या जनगणनेनुसार बहुसंख्य आहेत.

महाराष्ट्रातील आदिवासींची अर्थव्यवस्था, समाजसंघटना, धर्मविधी, कला इ. भारतातील इतर आदिवासींप्रमाणेच आहेत. मुख्य व्यवसाय शेती. याशिवाय अन्नसंकलन, मासेमारी व शिकार हे इतर व्यवसाय. शेतमजूर व जंगल कामगार म्हणूनही बरेच आदिवासी राबतात. कातकरी कोळशाच्या भट्ट्यांवर काम करतात. चंद्रपूर जिल्ह्यात घनदाट

जंगलात राहणाऱ्या माडिया गोंड जमातीत अजूनही वस्तुविनिमय पद्धत आढळते. झोपड्या बांबूच्या किंवा कुडाच्या, पण स्वच्छ असतात. कपडे फार कमी वापरतात, उदा., वारली व भिल्ल पुरूष केवळ लंगोटीच वापरतात. माडिया स्त्रिया कमरेभोवती मांड्या झाकतील एवढाच कपडा गुंडाळतात. त्यांना मण्यांच्या दागिन्यांची फार हौस. काही आदिवासी जर्मन-सिल्व्हरचे दागिने वापरतात. माडिया गोंड अजूनही थोड्या प्रमाणात चोरून फिरती शेती करतात. महाराष्ट्रातील आदिवासींचे कुटुंब सर्वसाधारणपणे एकविवाही असते. गावपाटील, भगत इ. प्रमुख व्यक्तींत बहुपत्‍नीकत्व आढळते. वधूमूल्याच्या रिवाजामुळे चांगल्या परिस्थितीतील आदिवासी व्यक्ती अधिक विवाह करू शकते. बहुपतिकत्व नाही. मेहुणीविवाह व क्वचित देवरविवाहाची उदाहरणे आढळतात. सेवा, सहपलायन, विनिमय, घरघुशी इ. विवाहप्रकारही आढळतात. अलीकडे शिक्षणप्रसारामुळे मुलीच्या शिक्षणावरही वधूशुल्क अवलंबून असते. स्त्रीचा दर्जा चांगला आहे व तिला पुरुषाच्या बरोबरीने वागणूक मिळते. स्त्रीस घटस्फोटाचे स्वातंत्र्य असते.

महाराष्ट्रातील आदिवासींच्या धर्मावर हिंदुधर्माचा बराच पगडा आहे. जडप्राणवाद व जादूटोणा यांवर माडिया गोंड जमातीची जास्त श्रद्धा आहे. भिल्ल लोक अर्जुनास राजा फांटा व कृष्णास गांडा ठाकूर म्हणतात. ते दिवाळी व होळी हे सण करतात, परंतु त्यांची पद्धत वेगळी असते. निरनिराळ्या गावांची दिवाळी निरनिराळ्या दिवशी करतात. सणांच्या व यात्रेच्या गर्दीत प्रेमप्रकार व सहपलायनाचे प्रसंग घडतात. दिवाळीस सकाळी देवाची पूजा करून त्यास बळी देण्यात येतात. संध्याकाळी गावजेवण असते. पुजारी व मांत्रिक ह्या दोन भिन्न व्यक्ती असतात. मांत्रिक चेटूक काढणे, रोगांवर औषधे देणे इ. बाबतींत मदत करतो. बहुतेक पुजारी व मांत्रिक हे स्वतःचा शेतीव्यवसाय सांभाळून काम करतात. जमातीत गावप्रमुखही असतो. ही सर्व पदे वंशपरंपरागत असतात.

महाराष्ट्रातील भिल्ल, महादेव कोळी, ठाकूर, कातकरी, गोंड व वारली जमातींत नृत्यगीते, विवाहगीते, शिकारीची गाणी, शोकगीते, शेतकऱ्यांची गाणी, अंगाई गीते इ. लोकगीतांचे प्रकार आहेत. त्याशिवाय पौराणिक दंतकथा, उखाणे, म्हणी यांचे अलिखित लोकसाहित्य बरेच आहे.

पंडित जवाहरलाल नेहरूंनी आदिवासींच्या विकासाची पाच सूत्रे सागितली आहेत

  1. आदिवासी लोकांनी आपली बुद्धी व कुवत यांनुसार विकास करून घ्यावा. इतरांनी त्यांच्यावर याबाबत दडपण आणू नये. त्यांच्या पारंपरिक संस्कृतींना व कलांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्‍न केला पाहिजे.
  2. आदिवासींचे जमीनविषयक व वनविषयक हक्क मान्य केले पाहिजेत.
  3. प्रशासन व विकासकार्य करण्यासाठी त्यांच्यातील लोकांना शिक्षण देऊन कार्यतत्पर करण्याचा प्रयत्‍न केला पाहिजे. सुरुवातीस बाहेरच्या काही तंत्रज्ञांची आवश्यकता भासेल, परंतु आदिवासी क्षेत्रात बाहेरच्या जास्त लोकांचा शिरकाव करण्याचे टाळले पाहिजे.
  4. आदिवासी क्षेत्रांवर वाजवीपेक्षा जास्त व गुंतागुंतीचे प्रशासन लादू नये व त्यांना गोंधळात पाडू नये. त्यांच्याच सामाजिक व सांस्कृतिक संस्थांद्वारे विकासकार्य साधावे.
  5. आदिवासींच्या विकासकार्यासाठी किती पैसे खर्च झाले यावरून प्रगतीचा निष्कर्ष न काढता, त्यांच्या स्वभावगुणविशेषांच्या विकासाच्या आधारे तो ठरवावा.

वरील सूत्रांनुसार आदिवासींच्या जीवनात फार ढवळाढवळ न करता त्यांना सुखी जीवन जगण्यास इतरांनी मदत करावी, या दृष्टीने आदिवासी विकासयोजना सध्या राबविल्या जात आहेत.

 

संदर्भ : 1. Beals, Ralph & Hoijer, Harry, An Introduction to Anthropology, New York, 1959.

2. Elwin, Verrier, The Tribal Art of Middle India, London, 1951.

3. Firth, R.Human Types, London, 1956.

4. Frazer, J. G. The New Golden Bough, New York, 1964.

5. Ghurye, G. S. The Scheduled Tribes, Bombay, 1959.

6. Government of India,Report of the Scheduled Areas and Scheduled Tribes Commission,

Delhi, 1961.

7. Herskovits, M. J. Man And His Works, New York, 1948.

8. Leclair, E. E. & Schneider, H. K. Economic Anthropology, New York, 1968.

9. Lowie, R. H. Primitive Religion, London, 1952.

10. Lowie, R. H. Primitive Society, London, 1960.

11. Lowie, R. H.Social Organization, London, 1956.

12. Majumdar, D. N. Races and Culture of India, Bombay, 1961.

13. Murdock, G. P. Social Structure, New York, 1965.

14. Piddington, R. An Introduction to Social Anthropology, Vol. I London, 1963.

15. Radcliffe Brown, A. R. Structure and Function in primitive Society, London, 1963.

16. Royal Anthropological Institute of Great Britain & Ireland, Notes and Querries on

Anthropology, London, 1964.

१७. कर्वे, इरावती, मराठी लोकांची संस्कृति, पुणे, १९६२.

१८. महाराष्ट्र लोकसाहित्य समिति, महाराष्ट्र लोकसाहित्य माला, पुष्प चौथे, पुणे, १९६०.

१९. संगवे, विलास, आदिवासींचे सामाजिक जीवन, मुंबई, १९७२.

 

लेखक - राजन केलसिंग पावरा

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/31/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate