पावसाळ्याला सुरुवात झाली की वीजपुरवठा खंडित होतो. मुसळधार पाऊस नसताना किंवा वादळ नसताना वीजपुरवठा खंडित का होतो, असा प्रश्न सर्वांनाच पडतो. त्यासाठी वीजवितरण यंत्रणेवर ऊन-पावसाचा काय परिणाम होतो, हे जाणून घ्यावे लागेल.
पावसात वीज खंडित का होते?
वीज खांबावर असणारे चॉकलेटी रंगाचे पिन किंवा डिस्क इन्सुलेटर (चिमणी) तसेच डीपी स्ट्रक्चरवर असणारे पोस्ट इन्सुलेटर हे चिनी मातीचे असतात. वीजप्रवाह वितरण यंत्रणेच्या लोखंडी खांबात उतरू नये, यासाठी हे इन्सुलेटर अतिशय महत्त्वाचे असतात. उन्हाळ्यात चिनी मातीचे हे इन्सुलेटर तापतात. त्यानंतर पावसाचे दोन-चार थेंब पडले की इन्सुलेटरला तडे जातात. त्यामुळे विजेचा संभाव्य
अपघात टाळण्यासाठी आपात्कालिन यंत्रणा (ब्रेकर) कार्यान्वित होते आणि वाहिनीमधील वीजप्रवाह खंडित होतो. याशिवाय भूमिगत वाहिन्यांच्या ठिकाणी वेगवेगळ्या कामांसाठी खोदकाम केले जाते. यात भूमिगत वाहिन्यांना धक्का बसतो. वाहिनीला छिद्रे पडतात. उन्हाळ्यात त्यावर काही परिणाम होत नाही.
परंतु, पावसाला सुरुवात झाली की, पाणी या वाहिन्यांमध्ये शिरते आणि वाहिनीत बिघाड होतो. परिणामी वीजपुरवठा खंडित होतो. प्रामुख्याने या दोन बाबी फार जोराचा नसलेल्या पावसातही वीजपुरवठा खंडित होण्यासाठी कारणीभूत ठरतात. यंदाच्या पावसाळ्याला सुरुवात होत आहे. यात पावसाचा जोर आणखी वाढणे अपेक्षित आहे. अशा स्थितीत खंडित वीजपुरवठा सुरू करण्याचे जोखमीचे काम महावितरणकडून युद्धपातळीवर केले जाते. भर पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होण्याची आणखी वेगळी कारणे आहेत. वीज यंत्रणेवर झाडे कोसळणे, मोठ्या
फांद्या तुटून पडणे, पाणी तुंबून ते वाहिनीत शिरणे, वीज कोसळणे किंवा तिच्या कडकडाटाने दाब वाढणे आदींमुळे वीजपुरवठा खंडित होतो. या पार्श्वभूमीवर जीवितहानी टाळण्यास सर्वांनीच सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे.
* न दिसणार्या विजेपासून सावधान!
वीज दिसत नाही, पण परिणाम मात्र जीवघेणे असतात. विजेपासून प्रामुख्याने पावसाळ्यात सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. अतिवृष्टी, वादळामुळे तुटलेल्या वीजतारा किंवा शॉर्टसर्किटमुळे तसेच पाणी हे विजेचे चांगले वाहक असल्याने विविध दुर्घटना घडतात. त्यामुळे जीवितहानीचा धोका निर्माण होतो. तो टाळण्यासाठी सतर्कता हीच सुरक्षितता, हाच सर्वोत्तम उपाय आहे. पावसाळ्यात वादळवार्यामुळे वीजतारांमध्ये घर्षण होण्याची शक्यता असते. त्यामुळे विजेचे खांब, विजेच्या तारा व रोहित्रे (ट्रान्सफॉर्मर) यातून ठिणग्या पडत असतात. अशावेळी महावितरणच्या नजीकच्या कार्यालयाला त्वरित कळवावे. कारण
अशा ठिणग्यांतून वीजतारा तुटून किंवा आग लागून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असते.
* खबरदारी हीच सुरक्षितता !
पाणी हे विजेचे वाहक असल्याने पावसाळयात विद्युत उपकरणांचा पाण्यापासून बचाव करणे आवश्यक असते. त्या दृष्टीने पावसाच्या पाण्यापासून बचाव करण्यासाठी विद्युत
उपकरणांना पाणी लागणार नाही याची खबरदारी घ्यावी. विशेषतः मीटरजवळच्या जागेत पाणी झिरपून जागा ओली होत
असल्यास मीटरचे मुख्य स्विच बंद करावे व तात्काळ महावितरणच्या कार्यालयाशी संपर्क साधून मीटरची जागा बदलून घ्यावी. पावसाळ्यात घरातील कोळी, किटक, पाल, झुरळ, चिमण्या उबदार जागा म्हणून मीटर तसेच स्विच बोर्डच्या आश्रयाला येतात, त्यामुळे शॉटसर्किट होऊ शकते. त्या दृष्टीनेही खबरदारी घ्यावी. पावसाळयात विद्युत उपकरणे असलेली भिंत ओली असेल तर भिंतीस व अशा विद्युत
उपकरणांना हात लावू नये. तसेच ओलसर हातांनी वीज उपकरणे हाताळू नयेत. त्यात निर्माण झालेल्या ओलाव्यामुळे शॉक लागण्याची शक्यता असते. त्यामुळे वीज उपकरणे अशा ओलाव्यापासून दूर ठेवावीत. तसेच अशी उपकरणे खिडकी तसेच
बाल्कनीपासून दूर असावीत. जेणेकरून त्यात पाणी जाणार नाही. विद्युत उपकरणावर पाणी पडले अथवा त्यात पाणी शिरले तर ते उपकरण त्वरित बंद करून ते मूळ वीज जोडणीपासून बाजूला करावे. त्यामुळे त्या उपकरणातून शॉक लागण्याची शक्यता राहणार नाही.
* मेनस्विचमध्ये फ्यूज वायरच असावी
घराच्या किंवा इमारतीच्या मेन स्विचमध्ये व त्याच्या शेजारी असलेल्या किटकॅटमध्ये फ्यूज तार म्हणून तांब्याची तार वापरू नये. त्याऐवजी अॅल्यूमिनियम अलॉय ही विशिष्ट धातूची तार वापरली पाहिजे. अशी फ्यूज वायर वीजभारानुसार वापरल्यास शॉर्टसर्किट झाल्यास वीजपुरवठा आपोआप खंडित होतो.
तांब्याची एकेरी, दुहेरी वेढ्याची तार वापरल्यास शॉर्टसर्किट झाल्यास वीज खंडित होत नाही व मोठ्या दुर्घटनेची शक्यता निर्माण होते.
* उपाययोजनाही महत्त्वाच्या!
वीजमीटरपासून घरात जोडणी करण्यात आलेल्या तारांची स्थिती योग्य असल्याबाबतची खात्री अधिकृत परवानाधारक कंत्राटदाराकडून करून घ्यावी व घरातील वीजजोडणीसाठी लागणारे साहित्य आय.एस.आय. प्रमाणित असावे. सर्व वीज उपकरणांची अर्थिंग योग्य असल्याबाबतची खबरदारी घ्यावी.
माहिती स्रोत: MSEDCL Baramati Zone
अंतिम सुधारित : 8/15/2020
ढग अन विजेचे भांडण झाले शब्दाने शब्द वाढतच गेले ...
राजस्थानच्या एका टोकावर, चार गावांच्या अंधार्या ...
आपत्तीच्या मालिकेत वीज कोसळणेही सामील आहे. दरवर्षी...
अनामिकाला इंग्रजी शिकायला आवडते आणि, तिला डॉक्टर द...