समाजातील दृष्टीहीन, कर्णबधिर, अस्थिव्यंग, मनोविकलांग व कुष्ठरोगमुक्त अपंग व्यक्तींकडे त्यांच्या अपंगत्वाकडे न पाहता त्यांच्यामध्ये असलेल्या सामर्थ्यांकडे पाहून त्यांच्या मधील असलेले सुप्त सामर्थ्य विकसित करुन त्यांना समाज जीवनाच्या सर्व अंगामध्ये समान संधी, संपूर्ण सहभाग व त्यांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे या दृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय, तसेच इतर विविध विभागांमार्फत कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. त्याचप्रमाणे सामाजिक सुरक्षिततेसाठी अपंगांना काही क्षेत्रामध्ये आरक्षण, सवलती, सूट व प्राधान्य देण्यात आलेले आहे. या सर्वांचे उद्देश अपंग व्यक्तींना सक्षम बनवून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट करणे हा आहे. त्या योजना खालीलप्रमाणे.
मुळातच अपंगत्व येऊ नये म्हणून अपंग प्रतिबंधात्मक कार्यक्रम, अपंग व्यक्तींचे सर्वेक्षण, शालेय आरोग्य तपासणी, जनजागृती, माता बाल संगोपन कार्यक्रम, वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण, वेयक्तिक स्वच्छता व आरोग्य इत्यादी कार्यक्रम आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येतात.
अपंग विद्यार्थी अतितीव्र अपंगत्वामुळे सामान्य मुलांबरोबर सामान्य शाळेत येऊ शकत नाहीत. अशा विद्यार्थ्यांसाठी तसेच स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविल्या जाणाऱ्या अपंगांच्या विशेष शाळांमधून दृष्टीहीन, कर्णबधिर, अस्थिविकलांगांसाठी शिक्षणाची सोय केली आहे. या शाळा निवासी व अनिवासी स्वरुपाच्या असून निवास, भोजनाची विनामुल्य सोय आहे.
सामान्य शाळेमध्ये तसेच अपंगांच्या विशेष अनिवासी शाळेमध्ये इयत्ता पहिली ते दहावी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या अपंग विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाची इयत्ता पहिली ते चौथी दरमहा रु. 50/- इयत्ता पाचवी ते सातवी दरमहा रु. 75/- इयत्ता नववी ते दहावी दरमहा रु. 100/- तसेच मतिमंदांच्या विशेष अनिवासी शाळेतील मतिमंद विद्यार्थ्यांना दरमहा रु. 75/- या दराने शिष्यवृत्ती देण्यात येते.
अंध, अधूदृष्टी, कुष्ठरोगमुक्त, कर्णबधिर, अस्थिव्यंग, मतिमंद विद्यार्थ्यांना इयत्ता दहावी नंतरचे महाविद्यालयीन व्यावसायिक, तांत्रिक व अभियांत्रिकी शिक्षणासाठी त्यांच्या अभ्यासक्रमाच्या दर्जाप्रमाणे अभ्यासक्रमाचे गट करुन शिष्यवृत्तीची रक्कम देण्यात येते. त्याचप्रमाणे अंध विद्यार्थ्यांना वाचक भत्ता तसेच सर्व अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती बरोबर शैक्षणिक शुल्क, प्रकल्प टंकलेखन खर्च, अभ्यास दौरा खर्चाची रक्कम दिली जाते.
18 ते 45 वयोगटातील प्रौढ अपंग व्यक्तींना सामाजिक न्याय विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या अपंगांच्या कार्यशाळेमधून रोजगार व स्वयंरोजगाराचे वेगवेगळया व्यवसायाचे मोफत प्रशिक्षण निवासी व अनिवासी देण्यात येते. राज्यात चार शासकीय कार्यशाळा आणि एक औद्योगिक प्रशिक्षण केंद्र व 78 स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या कार्यशाळा आहेत.
शासकीय व शासन अधिपत्याखालील कार्यालयामध्ये गट अ ते गट ड पदावर सरळ सेवाभरतीमध्ये अंध / अल्पदृष्टी (दृष्टीक्षीणता) 1%, कर्णबधिर 1%, आणि अस्थिव्यंग / मंदगती 1%, असे एकूण 3% आरक्षण व सरळ सेवेने भरण्यास यावयाच्या प्रत्ये पदासाठी 100 बिंदू नामावलीमधील क्रमांक 1, 34 आणि 67 अपंगांसाठी राखीव आहेत.
अपंग व्यक्तींना शासकीय तसेच शासनाच्या अधिपत्याखालील सरळ सेवा भरतीसाठी गट अ ते गट ड मधील पदावर नियुक्ती देण्याबाबत उच्च वयोमर्यादा सरसकट 45 वर्षापर्यंत शिथिल करण्यात आली आहे.
शासकीय व निमशासकीय सेवेतील अंध / अल्पदृष्टी, कर्णबधिर आणि अस्थिव्यंग प्रवर्गातील अपंग कर्मचाऱ्यांना गट क मधून गट ब, गट ड मधून गट क मध्ये नियुक्तीस योग्य ठरविलेल्या पदावर पदोन्नतीमध्ये 3 टक्क्यांपर्यंत आरक्षण ठेवण्यात आले असून, पदोन्नतीच्या 100 बिंदू नामावलीमध्ये क्रमांक 1, 34 व 67 हे बिंदू अपंगांसाठी आरक्षित ठेवलेले आहेत.
ज्या अस्थिव्यंग अपंगांना टंकलेखन करणे शक्य होत नाही अशांना लिपिक पदावर नेमणूक करताना टंकलेखनापासून सूट तसेच टंकलेखन कौशल्य प्राप्त करुन घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या अवयवांमध्ये हात किंवा बोटे यामध्ये 60% किंवा त्याहून अधिक अपंगत्व असल्यास 30 शब्द प्रति मिनिटंाची परिक्षा देण्यासाठी 7 मिनिटांऐवजी 10 मिनिटे म्हणजे 3 मिनिटे अधिक सवलत आहे.
शासकीय धोरणानुसार 3% आरक्षणाचा लाभ अपंगांना शासकीय नोकऱ्यांमध्ये मिळवून देण्याचा प्रयत्न असतोच पण खाजगी क्षेत्रात आजही अपंगांना नोकरीच्या संधी तितक्या सहजपणे उपलब्ध होताना दिसत नाहीत. व त्यांनाही या क्षेत्रात भरपूर संधी मिळवून देऊन आर्थिक दृष्टया स्वावलंबी करण्याच्या उद्देशाने जिल्हयात रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात येते.
नाव नोंदणी केंद्र : जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे
कामायनी उद्योग केंद्र, 270,गोखलेनगर, पुणे.
18 ते 50 वयोगटातील दृष्टीहीन, कर्णबधिर, अस्थिविकलांग अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी रु. 1,50,000/- च्या व्यवसायाकरीता 80% बँकेमार्फत कर्ज व 20% अथवा कमाल रु. 30,000/- अनुदान स्वरुपात दिले जाते.
जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद.
शासकीय तसेच शासनमान्य संस्थेमधून प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 18 ते 50 वयोगटातील अपंग व्यक्तीस प्रशिक्षण पूर्ण केलेला व्यवसाय सुरु करण्यासाठी लागणाऱ्या साधनांकरीता रु. 1,000/- अर्थसहाय्य देण्यात येते.
जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद.
अपंग व्यक्तींच्या सामाजिक व आर्थिक उन्नतीच्या योजना राबविण्यासाठी महाराष्ट्र राज्य अपंग वित्त विकास महामंडळाची स्थापना केली आहे. या महामंडळामार्फत अपंगांच्या आर्थिक उन्नतीच्या विविध योजना तसेच राष्ट्रीय अपंग आर्थिक विकास महामंडळाच्या योजना राबविण्यात येतात. जिल्हा स्तरावर इतर मागासवर्गीय विकास महामंडळ, बंगला क्र. 5, येरवडा पोस्टाशेजारी, पुणे 411 006 दुरध्वनी क्र. 020-26612504 यांचे कार्यालयामार्फत कर्ज प्रस्तावावर कार्यवाही करण्यात येते.
अपंग व्यक्तींना सार्वजनिक व इतर ठिकाणी प्रवेश करणे सोईचे व्हावे या दृष्टीने इमारत बांधकाम नियमावलीमध्ये केंद्र शासनाच्या सुचनेनुसार महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम 1966 च्या कलम 37 मध्ये आवश्यक ते फेरबदल करण्याबाबत नगर विकास विभागाचे आदेश आहेत.
शासकीय इमारतींचे बांधकाम करताना अपंग व्यक्तींना मुक्त संचाराच्या दृष्टीने इमारतीमध्ये अपंग व्यक्तींसाठी असणाऱ्या आवश्यक सोई सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागात सूचना केलेल्या आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वाहतूक बसमध्ये अपंगांसाठी आरक्षित आसन तसेच अपंगांना प्रवास भाडयामध्ये सवलती इ. सुविधा उपलब्ध करुन दिलेल्या आहेत.
शारिरीक पुनर्वसनाच्या दृष्टीने अस्थिविकलांग व्यक्तींकरीता कॅलिपर्स कृत्रिम अवयव, तीन चाकी सायकल, कर्णबधिरांकरीता श्रवणयंत्र व अंध व्यक्तींना चष्मे, काठया तसेच इयत्ता दहावी नंतरचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी अंध विद्यार्थ्यांना टेप रेकॉर्डर व दहा कोऱ्या कॅसेट्सचे संच दिले जातात.
या योजनेंतर्गत मासिक उत्पन्न रु. 1,500/- पर्यंत असणाऱ्या अर्जदारास अवयव व साधनांच्या खरेदीसाठी 100% तर मासिक उत्पन्न रु. 1,501/- ते 2,000/- पर्यंत असणाऱ्या अर्जदारास 50% अथसहाय्य देण्यात येईल. ही योजना प्रौढ व्यक्तींसाठी 3 ते 5 वर्षातून एकदा आणि 15 वर्षाखालील मुलांना दरवर्षी लागू असेल. या योजनेंतर्गत अर्थसहाय्याची मर्यादा किमान रु. 25/- व कमाल रु. 3,000/- अशी राहील. कृत्रिम अवयवांच्याबाबतीत अवयव बसविण्यासाठी आकारण्यात येणाऱ्या खर्चाच्या 15% रक्कम लाभार्थ्यांस देण्यात येईल.
कृत्रिम अवयव, कॅलिपर्स इ. साठीच्या अर्जासोबत अपंगत्वाचा स्पष्ट उल्लेख असणारा वैद्यकीय दाखला जोडावा. त्या अपंगत्वानुसार लागणाऱ्या कृत्रिम अवयव/साधनांचा अर्जात स्पष्ट उल्लेख असावा. अर्जदाराला यापूर्वी या कार्यालयाकडून कोणत्या स्वरुपाची मदत मिळाली हे नमूद करावे.
जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद.
अपंग व्यक्तींना दिलेल्या ओळखपत्राच्या आधारे एस.टी. प्रवास भाडयामध्ये अपंग व्यक्तीस 75% व त्याच्या सोबत्यास 50% प्रवास सवलत देण्यात आली आहे.
लाभार्थी पुणे जिल्हयातील रहिवासी असावा.
संपर्क
जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद.
मनोविकलांग, मेंदूचा पक्षाघात झालेल्या व्यक्ती, बहुविकलांग तसेच आत्ममग्न व्यक्तींच्या कल्याणाच्या दृष्टीेने राष्ट्रीय विश्वस्त न्यास अधिनियम 1999 अंतर्गत कायदेशी पालकत्व देण्यात येते.
अपंगत्वाचे प्रमाणपत्र जिल्हा शल्य चिकित्सकाकडून प्राप्त केलेले असावे.
लाभार्थी पुणे जिल्हयातील रहिवासी असावा.
संपर्क
जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद.
मृत्यूनंतर आपले डोळे दुसऱ्यांना बसवून दृष्टिलाभ करुन देण्यास संमती देणे म्हणजे नेत्रदान.
नेत्रदात्याच्या मृत्यूची सूचना मिळताच नेत्रपेढीचे वैद्यकीय अधिकारी तेथ्े त्वरीत जाऊन मृताचे डोळे काढून नेतात. या कामास 15-20 मिनिटे पुरतात.
या डोळयातील पारदर्शक भाग (Cornea) ऑपरेशन करुन 24 ते 36 तासांचे आत अंधाचे डोळयावर बसवतात. एकाचे नेत्रदानाने दोन अंधांना दृष्टिलाभ होतो.
कोणीही लहान-थोर, स्त्री-पुरुष, कोणत्याही जातीचे धर्माचे वर्णाचे असोत, नेत्रदान करु शकतात. मोतीबिंदू ऑपरेशन झालेले, दृष्टीदोष किंवा डोळे अधू असणारे, चष्मा वापरणारे सुद्धा नेत्रदान करु शकतात.
नाही. डोळे काढल्यावर मृत व्यक्तींचा चेहरा विद्रुप होत नाही. उलट या नाशवंत देहाचा अंश नेत्ररुपाने अंधाला डोळस बनवतो. त्याच्या अंधाऱ्या जगात प्रकाशाची ज्योत पेटवतो.
अजिबात नाही. जिवंतपणी आणि मृत्यूनंतरही इतरांचे भले करा असाच सर्व धर्माचा आदेश आहे. नेत्रदान हे अत्यंत धार्मिक कृत्य आहे.
कॉर्निया (डोळयाचा पुढील पारदर्शक भाग) याच्या विकाराने अंध असणाऱ्यांना याचा फायदा मिळतो. अशा व्यक्तींनी यादीतील नेत्रपेढयांकडे डोळे तपासून घ्यावेत आणि नेत्रदान शस्त्रक्रियेसाठी आपले नाव नोंदवावे.
प्रथम मृताच्या डोळयाच्या पापण्या बंद करा. डोळयावर ओले कापसाचे बोळे किंवा कापडाची घडी ठेवा. खोलीतील फॅन/एसी बंद करा. यामुळे डोळे कोरडे पडणार नाहीत. नंतर वेळ न दवडता ताबडतोब नेत्रपेढीला फोन करुन नेत्रदात्याच्या मृत्यूची त्यांना सूचना द्या. त्यांना नाव, पत्ता आणि जवळची खूण सांगा. मृत्यूचा दाखला तयार ठेवा. संबंधिताच्या निधनानंतर नेत्रदान शक्यतो 4 ते 6 तासाचे आत व्हावे. पुढील व्यवस्था नेत्रपेढी तत्परतेने करील. ही सेवा अहोरात्र चालू असते.
अपंगत्व प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पुणे जिल्हयाने सन 2013-14 या वर्षात रु. पन्नास लाख इतकी तरतूद केलेली असून जिल्हयातील सर्व किशोरवयीन मुलींना लसीकरण करण्यात येणार आहे.
अपंग कल्याण व पुनर्वसनाच्या विविध योजना केंद्र शासन, राज्य शासन व जिल्हा परिषदेमार्फत कार्यान्वित आहेत. तथापि ग्रामिण भागातील अपंग व्यक्ती व त्यंाचे पालक यांना या योजनांची माहिती नसल्याने पात्र अपंग व्यक्ती या योजना मिळण्यापासून वंचित राहतात.
या विविध योजनांबरोबरच समाजात अपंगत्व प्रतिबंधात्मक उपाय, अपंगांचे शिक्षण/प्रशिक्षण व पुनर्वसन यांची अनुषंगिक माहिती ग्रामीण भागापर्यंत पोहचविण्यासाठी पुणे जिल्हयाच्या प्रत्येक तालुक्यात अपंगांचे मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत.
अपंगांच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांची परिणामकारकपणे अंमलबजावणी होण्याकरीता तसेच तालुक्याच्या ठिकाणी अपंगांना योजनेचा लाभ मिळण्याच्या दृष्टीकोनातून जिल्हयातील अपंगांच्या सर्व शाळांमध्ये (80) तसेच पंचायत समितीमध्ये (13) अपंग सल्ला व मार्गदर्शन केंद्र स्थापन केलेली आहेत.
या केंद्रामधून अपंगांसाठीच्या विविध या योजनांचे अर्ज देण्यात येतात, अपंग व्यक्तींना आवश्यकतेप्रमाणे सल्ला दिला जातो व मार्गदर्शनही करण्यात येते. त्यामुळे अपंग व्यक्ती व त्यांच्या पालकांचे श्रम, पैसा व वेळेची बचत होते.
स्त्रोत - पुणे जिल्हा परिषद
अंतिम सुधारित : 8/1/2020
विविध योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनामार्फत...