“मैंने कभी सोचा ही नहीं था कि, मैं गाडी चला सकूंगी...”
“इस हाथ से मैं खा सकता हूं, पी सकता हूं, 3-4 किलो का बोजा उठा सकता हूं, सायकल चला सकता हूं... बहुत सुपर-डूपर है ये!...”
‘एलएन-4’ हा कृत्रिम हात बसवल्यावर त्या 146 जणांच्या प्रतिक्रियाही जवळपास अशाच होत्या!
‘रोटरी क्लब ऑफ पूना डाऊनटाऊन’ने जानेवारी 2014 पासून ते जून 2015 पर्यंत ‘एलएन-4’ हे अत्याधुनिक कृत्रिम हात मोफत बसविण्याची चार शिबिरे आयोजित केली होती. या शिबिरांत 165 व्यक्तींना हा कृत्रिम हात बसविण्यात आला. यातील बहुतांश व्यक्ती महाराष्ट्रातील असल्या, तरी 6 व्यक्ती इतर राज्यांतून आलेल्या होत्या. जसे की- आंध प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश इत्यादी. या शिबिरात महिलांची संख्या त्या मानाने कमी होती. फक्त 26 म्हणजेच एकूण उपस्थितांच्या 16 टक्के महिला या शिबिरात सहभागी झाल्या होत्या. विशेष म्हणजे 40 वर्षांपेक्षा कमी वयाच्या 104 व्यक्ती उपस्थित होत्या. शिबिरात सहभागी झालेल्यांपैकी 125 जणांनी आपले हात अपघातात गमावले होते. काही जणांना औद्योगिक अपघात होऊन, तर काही जणांना शेतीतील कामे करताना अपघात होऊन हात गमवावा लागला होता. कोणाला वाहन अपघातात तर कोणाला विजेचा धक्का लागल्याने आपला हात गमावावा लागलेला होता. हात बसवल्यानंतर त्यांना मिळालेला आनंद अवर्णनीय होता. त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियाही खूप बोलक्या होत्या.
कुणी म्हणाले, “... खूप चांगले वाटते. माझे जे काही खूप दिवसांपासून हरवलेले होते, ते ऐंशी टक्के मला परत मिळाले...”; तर कुणी म्हणाले, “...हात बसविल्यानंतर असे वाटते की, एक नवीन जीवन भेटले; हरवलेली खुशी परत मिळाली. आता मला आनंद वाटतो...”
“...मला येथे आल्यानंतर जगण्याची नवी उभारी मिळाली, एक प्रकारचा उत्साह मिळाला...” अशा एक ना अनेक प्रतिक्रियांतून लाभार्थी आपला आनंद व्यक्त करीत होते.
17 वर्षे वयाचा जयेश सावंत म्हणतो, “...मी आतापर्यंत एका हाताने क्रिकेट खेळायचो; पण ‘रोटरी क्लब’ने मला ‘एलएन-4’ हा कृत्रिम हात दिला. आता मी जगातील सर्वात मोठा क्रिकेटर होणार. माझे अर्धे स्वप्न रोटरी क्लबने पूर्ण केले, आता उरलेले स्वप्न मी पूर्ण करणार.”
सर्वात आनंद देणारी प्रतिक्रिया होती श्री. रवी नाईक यांची. कॉलेजपर्यंत शिक्षण झालेल्या रवीने रेल्वे अपघातात हात गमावले. रेल्वेतच भीक मागून सध्या तो पोट भरतो; पण आता त्याने निर्धार केला आहे की, यापुढे भिकेसाठी हात न पसरता हाताने काम करूनच जगणार.
‘रोटरी क्लब’मार्फत एलएन-4 हा कृत्रिम हात पूर्णपणे विनामूल्य बसविण्याची शिबिरे नियमितपणे आयोजित केली जातात. या शिबिरात सहभागी होणार्यास ‘एलएन-4’ हा कृत्रिम हात बसविण्याबरोबरच ‘अपंगांचे प्रेरणास्रोत’ हे पुस्तक भेट दिले जाते. याशिवाय जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण कक्षाच्या वतीने लाभार्थींना शासनाने अपंगांच्या कल्याणासाठी राबवलेल्या विविध योजनांची माहिती दिली जाते. आपल्या पाहण्यात कोणी गरजू व्यक्ती असल्यास कृपया त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवावी.
शब्बीर जामनगरवाला, गिफ्ट ऑफ मोबिलिटी प्रकल्प, रोटरी क्लब ऑफ पूना डाऊनटाऊन, पुणे (rotaryhandgift@gmail.com) किंवा सुधीर गायकवाड (9011 0352 94), उल्हास भोसले (9371 0051 49)
जितू मेहता (98900 11881), कीर्ती मेहता (9823 0521 21)
स्त्रोत: वनराई
अंतिम सुधारित : 7/9/2020